Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड अजितदादा आणि पवार परिवाराचे सहकार तत्त्व!

अजितदादा आणि पवार परिवाराचे सहकार तत्त्व!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या भाजपविषयीच्या सकारात्मक विधानांंमुळे ते भाजपला जाऊन मिळणार का, अशा चर्चेला उधाण आले आहे, पण भाजपमध्ये जाऊन दादा यापूर्वी परत आलेले आहेत. त्यामागे त्यांचे फॅमिली बाँडिंग हे मुख्य कारण होते. पवार परिवाराला सहकार चळवळीचा वारसा आहे आणि तेच सूत्र त्यांच्या कुटुंबामध्येही आहे. त्यामुळे पवार मंडळी आपापसात स्पर्धा करत नाहीत, तर ते एकमेकांना सांभाळून घेतात. त्यामुळे अजितदादांना आपल्यात सामावून घेणे भाजपवाल्यांना वाटते तितके सोपे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये जातील, या शक्यतेवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेने जोर धरलेला आहे. या चर्चेला निमित्त ठरणारी काही कारणे घडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून जेव्हा एकच हलकल्लोळ उडाला, तेव्हा मोदींची पदवी बघून लोकांनी त्यांना दोन वेळा बहुमताने निवडून दिलेले नाही, असे बोलून अजित पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेने उचलून धरलेला हा मुद्दा निकाली काढला. त्यानंतर शिंदे यांच्यासोबत असलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात आले तरी भाजप आणि शिंदे यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारला धोका नाही, असे विधान अजित पवार यांनी केले.

त्यामुळे सत्ताधारी भाजपला पेचात पकडायचे सोडून त्यांना पोेषक अशी विधाने ते का करत आहेत, असा प्रश्न महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही पडला. अजितदादांच्या भाजपला पोषक विधानांमुळे भाजपच्या नेत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. याविषयी प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता सध्या अनेकांना माझ्याविषयी इतकं प्रेम का ऊतू जात आहे, असा मिश्कील सवाल त्यांनी केला. आजवर अजितदादा हे साधेभोळे असाच त्यांच्या काकांसह पक्षातील लोकांचाही समज होता, पण आपणही काकांसारखे अनप्रेडिक्टेबल आहोत हे त्यांनी भल्या पहाटे भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवून दिले. अर्थात त्यानंतर काकांनी त्यांना परत स्वगृही आणले तो भाग वेगळा. अर्थात अजितदादांना परत आणण्यात केवळ शरद पवार यांचा हात नव्हता, तर काकी प्रतिभाताई पवार, बहीण सुप्रियाताई सुळे असा बर्‍याच कुटुंबीयांचाही हात त्यामागे होता.

- Advertisement -

दादा जेव्हा पुन्हा सिल्व्हर ओकवर आले तेव्हा त्यांनी येताना सुप्रियाताईंसाठी मोठं कॅडबरीचं चॉकलेट आणलं होतं, हेही दिसलं होतं. दादा पुन्हा राष्ट्रवादीत तर आलेच. त्याच वेळी त्यांच्यावर जे राज्यातील जलसिंचन घोटाळ्याचे आरोप होते, त्यातूनही त्यांनी स्वत:ला मुक्त करून घेतले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात पवारांची फटफजिती करण्याचा भाजपचा डाव उधळला गेला होता. उलट पवारांनीच भाजपची फटफजिती केली होती. पुढे याच शपथविधीचे सूत्रधार भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ती आपल्याकडून झालेली चूक होती, त्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाली, लोकांच्या मनातील विश्वासाला धक्का लागला, असे कबूल केले होते.

याच फडणवीसांनी २०१९च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन, असा आत्मविश्वास व्यक्त करताना शरद पवारांचे राजकारण आता वयोमानानुसार संपलेले आहे, असा दावा केला होता, पण पुढे काय झाले ते सगळ्यांनी पाहिले. पवार एका पावसात भिजले आणि बाजू पलटली. पवारांनी उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता घालवली. त्यांनी अनपेक्षित अशी महाविकास आघाडी स्थापन केली आणि भाजपच्या स्वप्नांचा फज्जा उडवला. पुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या केंद्रातील सत्तेचा यथेच्छ वापर करून अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. त्यानंतर स्वत: दुय्यम स्थान घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, पण हा फॉर्म्युला भाजप किती काळ चालवणार हाही एक प्रश्न आहे.

- Advertisement -

अजितदादा हे आपल्याला पक्षामध्ये डोईजड होऊ नयेत यासाठी शरद पवारांनी नेहमीच काळजी घेतली असली तरी त्यांचे राजकीय वारसदार हे खर्‍या अर्थाने अजित पवारच आहेत हे त्यांनाही माहीत आहे. कारण महाराष्ट्र हा जरी कितीही पुरोगामी असला तरी महाराष्ट्रात अजून कुणी महिला मुख्यमंत्री झालेली नाही. अन्य राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या. राजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्र मेल डॉमिनन्ट स्टेट म्हणजे पुरुषप्रधान राज्य मानले जाते. जेव्हा सुप्रियाताईंना मागे तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहात का, असे विचारण्यात आले होते तेव्हा असे विधान त्यांनीच केले होते.

त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे नाव जरी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून काही वेळा घेतले जात असले तरी ते वाटते तितके सोपे नाही. अर्थात नसीब अपना अपना ही बाबही आहे. कारण राजीव गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे या मंडळींना स्वत:ची अशी काही राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यांना राजकारणात आणले गेले. अजित पवार पुढील काळात राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले तर त्यांची बहीण सुप्रियाताई या काही त्यांना कडवा विरोध करून त्यांच्याशी स्पर्धा करणार नाहीत किंवा स्वत:चा वेगळा पक्ष काढणार नाहीत किंवा गट तयार करतील असे वाटत नाही. हीच पवार कुटुंबीयांची खासियत आहे.

पवार कुटुंबीयांची त्यासाठी मानसिकता समजून घ्यावी लागेल. सहकारातून साधूया उद्धार, हे सूत्र पवार कुटुंबीयांनी जपलेले आहे. महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे ही राजकारणातील प्रमुख घराणी आहेत, पण राजकारण करताना सहकाराचे जे तत्त्व पवार कुटुंबीयांनी जपले आहे, ते ठाकरे कुटुंबीयांना जपता आले नाही. त्यामुळे पक्षामध्ये उभी फूट पडून राज ठाकरे यांनी बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला. आता तर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली. शिवसेनाप्रमुखांचे पुत्र असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हाती आता पक्ष आणि चिन्ह राहिलेले नाही. आपल्या हातात आता काही नाही, असे स्वत:च उद्धव ठाकरे सांगत आहेत.

अजितदादांची अस्वस्थताही लपून राहिलेली नाही, पण ते भाजपमध्ये जातील आणि राष्ट्रवादी निकामी होईल असे वाटत नाही. पवार कुटुंबीयांना सहकार चळवळीचा मोठा वारसा आहे. त्यातूनच ते राजकारणात आलेले आहेत आणि टिकून आहेत. सहकार चळवळीतून त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. अनेक साखर कारखाने उभे केले. शेती विकासाचे अनेक प्रकल्प राबवले आहेत. आज पवार आडनावाचा जो तळागाळात प्रभाव आहे तो त्यांच्या सहकाराच्या वृत्तीमुळे. अगदी कौटुंबिक पातळीवरही पवारांनी सहकाराचे तत्त्व जोपासले आहे. पवारांच्या प्रत्येक भावाने आपापली जबाबदारी विभागून घेतलेली आहे. ते एकमेकांना मदत करतात, पण एकमेकांच्या क्षेत्रात खोडा घालत नाहीत. गणपती, दिवाळी, रक्षाबंधन अशा सणांना सगळे पवार कुटुंबीय बारामतीच्या घरी जमतात. पवारांचे हे संयुक्त कुटुंब हीच त्यांची संघटित ताकद आहे. आमदार रोहित पवार हे पवार कुटुंबातून पुढे येणारा नवा चेहरा आहे. अलीकडेच त्यांना तुम्ही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणाला पसंती द्याल, असे विचारले असता त्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

पवार कुटुंबीय एकमेकांवर कधी उघड टीका करताना दिसत नाहीत. कारण आपण महाराष्ट्रातील एक प्रमुख समाज असलेल्या मराठा समाजातील आहोत. त्यामुळे आपल्याला जबाबदारीने वागले पाहिजे याची त्यांना जाण आहे. त्यामुळे राज्यातील इतर राजकीय घराण्यांमध्ये जशी उणीदुणी काढलेली पाहायला मिळतात, तशी पवारांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे अजितदादा भाजपमध्ये जातील असे वाटत नाही. त्यातही यदाकदाचित जर ते भाजपमध्ये गेले तर भाजपच्या संस्कृतीत ते फार काळ रमतील असे वाटत नाही. त्यात पुन्हा आज अजितदादांना भाजपमध्ये घेऊन त्यांना कुठे सामावून घेणार, हा प्रश्न आहे आणि कुठलेही मुख्य पद नसताना दादा भाजपमध्ये कशासाठी जातील, तसेच ते म्हणतात त्याप्रमाणे विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यांच्या सरकारला कुठलाही धोका नाही.

तसेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. त्यात पुन्हा अजित पवार गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. त्या कार्यकर्त्यांची विचारसरणी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे अजितदादा भाजपमध्ये आले तर त्याचा फायदा आपल्याला होईल हा भाजपचा भ्रम आहे. उलट पवारांना आपल्याकडे घेतले तर भाजपची बोट अतिभारीत होईल आणि भाजपचे नेते बाहेर फेकले जातील आणि अजितदादांच्याच हातात सगळी सत्ता येईल. मूळ भाजपवाल्यांना आज जसे एकनाथ शिंदे यांच्या पालखीचे भोई व्हावे लागले आहे तसे उद्या अजितदादांच्या पालखीचे भोई व्हावे लागेल. त्यात पुन्हा अजितदादांना आपल्याकडे घेतल्यावर एकनाथ शिंदेंचे काय करणार, हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या विधानांमुळे भाजप नेत्यांना आनंदाच्या कितीही उकळ्या फुटत असल्या तरी मामला वाटतो तितका सोपा नाही. कारण पवारांचा सहकारावर आधारित परिवार तोडणे अवघड आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -