घरसंपादकीयओपेडखेळाचा पराभव करणारी खेळाडूंची अखिलाडू वृत्ती!

खेळाचा पराभव करणारी खेळाडूंची अखिलाडू वृत्ती!

Subscribe

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडले आणि त्यानंतर क्रिकेट विश्वात जोर धरला तो म्हणजे एकाच चर्चेने की, या दोन्ही संघांतील खेळाडूंना खिलाडी म्हणावे की अनाडी. खेळ म्हटले की हरणे किंवा जिंकणे हे येणारच, परंतु त्याही पलीकडे महत्वाची असते ती म्हणजे खिलाडू वृत्ती. मात्र ती जर का एकदा लोप पावली की एखादा संघ जिंकतो, पण त्या खेळाचा पराभव होतो.

१९९४ साली बॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा ‘मै खिलाडी तू अनाडी’ हा सिनेमा आणि हे गाणे बरेच गाजले होते. जवळपास ३० वर्षांनंतरही सिनेमातील या गाण्यांच्या ओळी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. या गाण्यांच्या ओळींना इतक्या वर्षांनी उजाळा देण्याचे कारण काही वेगळे नाही. सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात घडलेल्या अखिलाडू वृत्तीच्या दर्शनानंतर या खेळाडूंना खिलाडी म्हणावे की अनाडी, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे.

५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू असलेली ही स्पर्धा अद्यापपर्यंत निर्विवाद सुरू होती, मात्र सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी पार पडलेला स्पर्धेतील ३८वा सामना म्हणजेच बांगलादेश आणि श्रीलंका या सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वात एक ऐतिहासिक घटना घडली. कोणत्याही खेळाडूने नवविक्रम रचण्यासारखी ही ऐतिहासिक घटना नव्हती, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला लाजवण्यासारखा प्रकार घडला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला ‘टाईम आऊट’ म्हणजेच विलंबाचित घोषित करण्यात आले. क्रिकेटच्या जवळपास १५० वर्षांच्या इतिहासात एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे बाद देण्याचा हा पहिलाच प्रकार घडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तरी अद्यापपर्यंत कोणताही खेळाडू अशा प्रकारे बाद झाल्याची नोेंद नाही. अँजेलो मॅथ्यूज बाद होताच विलंबाचित होण्याच्या प्रकारावर सर्वत्र चर्चा सुरू झाली ती म्हणजे त्याला अशा प्रकारे बाद करणे योग्य की अयोग्य?

- Advertisement -

अशा प्रकारची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगणेे हे स्वाभाविक आहे. कारण जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाकडून अशाप्रकारे खेळाडूंना बाद करण्यासाठी अपील केले जात नाही तोपर्यंत पंच खेळाडू बाद किंवा नाबाद याबाबत निर्णय घेत नाहीत, परंतु प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि कर्णधारांनी याबाबत अपील केल्यास नियमानुसार पंच खेळाडूला बाद ठरवू शकतात. संघातील एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू फलंदाजीला येण्यासाठी मैदानात दोन मिनिटांमध्ये पोहोचणे, असा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. टी-२० क्रिकेटच्या प्रकारात फलंदाजांसाठी अवघा ९० सेकंदांचा म्हणजेच दीड मिनिटांची वेळ आहे, तर टेस्ट म्हणजेच कसोटी क्रिकेटच्या प्रकारात फलंदाजांना मैदानातील खेळपट्टीवर पोहोचण्यासाठी ३ मिनिटांची मुभा आहे. जर का एखादा खेळाडू काही कारणात्सव विलंबाने दाखल झाल्यास, तसेच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी याबाबत अपील केल्यास मैदानावरील पंच हे त्याला बाद ठरवू शकतात.

हे झाले क्रिकेट खेळातील नियमानुसार, मात्र अनेकदा फलंदाजी करताना आवश्यक असणार्‍या सर्व साहित्यांची जमवाजमव करताना अथवा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असल्यास मैदानातील खेळपट्टीपर्यंत पोहोचण्यास त्याला निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाला तरी त्याला विलंबाचित केले जात नव्हते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही संबंधित खेळाडूची अडचण समजून घेत याबाबत कधीच अपील करत नव्हते. जवळपास १५० वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात कधीच कोणत्याही संघाने अपील केले नाही आणि कोणत्याही खेळाडूला विलंबाचित करण्याची वेळ आली नाही. खेळ भावनेतूनच याबाबत सर्वांकडून विचार केला जायचा आणि हा प्रश्न सामंजस्याने सोडवला जायचा. त्यावेळी नियम अस्तित्वात नव्हता असे नाही. नियम त्याही वेळी होते आणि आताही आहेत, परंतु केवळ खेळ भावना जोपासली जायची आणि कोणाहीविरोधात अशा प्रकारचे अपील करण्यात येत नव्हते, मात्र बांग्लादेशच्या संघाने अँजेलो मॅथ्यूजविरोधात अशा प्रकारचे अपील पहिल्यांदाच केले आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या खेळाडूला विलंबाचित बाद ठरविण्यात आले.

- Advertisement -

खरे तर असा प्रकार घडायला नको होता, अशीच भावना क्रिकेट विश्वातील अनेकांची आहे. कारण, पाहायला गेले तर अँजेलो मॅथ्यूज हा खेळपट्टीवर जवळपास दोन मिनिटे पूर्ण होण्याच्या एकदम अखेरच्या टप्प्यात दाखल झाला होता. त्यामुळे त्याला उशीर झाला, असेही म्हणणे कदाचित चुकीचे ठरेल. खेळपट्टीवर पोहोचताच आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचे त्याला लक्षात येताच त्याने संघातील राखीव खेळाडूला नवे हेल्मेट घेऊन येण्यास सांगितले. मॅथ्यूने यादरम्यान याची कल्पना पंचांना किंवा प्रतिस्पर्धी संघातील कर्णधाराला देणे अपेक्षित होते, परंतु त्याने तसे केले नाही. येथेच मॅथ्यूजचे चुकले, असे म्हणण्यास वाव आहे. खेळ भावनेतून त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना याबाबत कल्पना देणे किंवा निदान पंचांना तरी सांगायला हवे होते.

त्याने तसे न करता थेट आपल्या संघातील राखीव खेळाडूकडे इशारा करत त्याला नवे हेल्मेट घेऊन येण्यास सांगितले. या प्रक्रियेत खेळ सुरू होण्यास आणखी विलंब होवू लागताच बांगलादेश संघाचा कर्णधार शकिब अल हसनसह सर्व खेळाडूंनी मॅथ्यूजविरोधात अपील केले. विशेष म्हणजे खरंच आपण अशा प्रकारे अपील करत आहात का, याची खातरजमा पंचांनी बांगलादेश संघाकडून एकदा नव्हे तर दोनदा करून घेतली. कारण हा प्रकार खेळ भावनेला धरून नाही, हे पंचांनाही चांगलेच ठाऊक होते. बांगलादेशच्या संघाचे वागणे हे खिलाडूवृत्तीला धरून नसल्यानेच पंचांनी एकदा नव्हे तर दोनदा आपण अशा प्रकारचे अपील करत आहात का, अशी विचारणा बांग्लादेशचा कर्णधार शकिब अल हसनला केली. बांग्लादेशचा संघ दोन्ही वेळा आपल्या अपीलावर ठाम राहताच मैदानावरील दोन्ही पंचांनी तिसर्‍या आणि चौथ्या पंचांसोबत सल्लामसलत करत नियमानुसार मॅथ्यूजला अखेर विलंबाचित ठरविण्यात आले.

अशा प्रकारे बाद ठरविण्यात आल्यानंतर मॅथ्यूजने पंचांना मैदानावरच स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटलेला असल्याचे त्याने पंचांसह प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही दाखवले, परंतु नियमानुसार त्याला बाद ठरविण्याच्या मागणीवर बांग्लादेशचा संघ कायम राहिल्याने त्याला मैदानातून अखेर काढता पाय घ्यावाच लागला. कदाचित बांगलादेशच्या संघाने येथे मनाचा मोठेपणा दाखवत आणि खिलाडू वृत्तीची भावना जोपासत त्याला खेळू देण्याची तयारी दर्शविली असती तर पंचांनीही मॅथ्यूजला खेळण्याची मुभा पुन्हा दिली असती, परंतु त्यांनी ती खेळ भावना जोपासली नाही. याचाच राग सर्वांना आला. खेळपट्टीवर पोहचण्यास केवळ मॅथ्यूजलाच विलंब झाला असा प्रकार नाही. अनेक संघातील खेळाडूंबाबत या ना त्या कारणाने हे बरेचदा घडल्याची उदाहरणे आहेत.

भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली एकदा जवळपास ६ मिनिटे उशीरा पोहोचल्याचा इतिहास आहे, मात्र गांगुलीने प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणि मैदानावरील पंचाला उशीर होण्याबाबतचे योग्य कारण देताच सर्वांनी त्याला समजून घेतले. दोन्हीकडच्या खेळाडूंकडून व्यवस्थितपणे खेळ भावना जोपासण्यात आली. त्यामुळे वाद उद्भवलाच नाही. याउलट श्रीलंका आणि बांगलादेशच्या संघांकडून अशी भावनाच जोपासण्यात आली नाही. मॅथ्यूजला अशा प्रकारे बाद देण्यात आल्यानंतर संपूर्ण सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा वादाचे खटके उडत असल्याचे पाहायला मिळत होते. संपूर्ण सामन्यात खेळ भावना लोप पावल्याचे चित्र होते. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या चुका शोधण्यात व्यस्त होते. कुठे एखादी चूक सापडते आणि आपण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला नियमांच्या कचाट्यात पकडतो, यासाठीच सर्व जण प्रयत्नशील होते. अशा वातावरणात खेळ भावना ही कुठेच नव्हती.

या सामन्यात बांगलादेशच्या संघाने ३ गडी राखून विजय मिळविला, परंतु कहर म्हणजे सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी एकमेकांसोबत हात मिळवणेही टाळले. हाच प्रकार सर्वात भयंकर होता. केवळ क्रिकेटच नव्हे तर सर्व खेळांच्या प्रकारांत सामन्यानंतर सर्व खेळाडूंकडून एकमेकांसोबत हातमिळवणीही केली जाते. सामन्यानंतर सर्व खेळाडू या हातमिळवणीदरम्यानच एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधत असतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. खेळ भावना आणि खिलाडी वृत्तीतूनच ही परंपरा आत्तापर्यंत केवळ क्रिकेटच नव्हे तर सर्व प्रकारच्या खेळांमध्ये जोपासण्यात आली आहे.

सामन्याचा निकाल काही असो, परंतु खेळ खेळण्याच्या भावनेतूनच आपण सर्व खेळाडू म्हणून खेळत असतो आणि सामन्यादरम्यान जे काही चांगले, वाईट झाले, गेले ते सर्व विसरून जावे आणि पुढची तयारी आणखी चांगल्या पद्धतीने करू, या भावनेतून ही हातमिळवणी केली जाते. खिलाडू वृत्तीची ही भावना गेल्या अनेक वर्षांपासून जोपासण्यात येत असून ही ऐतिहासिक परंपरा वर्षानुवर्षांपूर्वीची आहे, मात्र या दोन्ही संघांनी ती जोपासण्याचे औदार्य दाखवू नये, हे क्रिकेटच्या भवितव्यासाठी चांगले नाही. मॅथ्यूजला विलंबाचित बाद करण्याचा घडलेला प्रकार हा योग्य किंवा अयोग्य ही चर्चा होतच राहील, परंतु खेळाडूंचे वागणे हे कायम लक्षात ठेवले जाते, याचे भान किमान या खेळाडूंनी ठेवणे गरजेचे आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -