Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड अ‍ॅनिमेटेड वृत्त निवेदिका.. पण चिंता नको!

अ‍ॅनिमेटेड वृत्त निवेदिका.. पण चिंता नको!

Subscribe

आपण असे अनेक सायफाय चित्रपट बघितले असतील, ज्यात जगावर राज्य कॉम्प्युटर करतात आणि माणसं मात्र त्यांना घाबरून इकडं तिकडं लपतात. अर्थात हे चित्रपट केवळ कल्पनांवर आधारित होते, पण हीच कल्पना जर सत्यात उतरली तर? इंडिया टूडेने ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) न्यूज अँकरला टीव्हीच्या पडद्यावर आणले आहे तिला बघून आता भल्या-भल्यांना आपल्या नोकरीची चिंता वाटू लागलीय..

वृत्त निवेदक होण्याचं स्वप्न कुणी बघत असेल तर त्या स्वप्नाला आता मुरड घालावी लागते की काय अशी अवस्था आज अनेकांची झाली आहे. कारण इंडिया टूडे ग्रुपनं देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) न्यूज अँकरला अर्थात वृत्त निवेदिकेला गेल्या महिन्यात लॉन्च केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या वृत्त निवेदिकेचं नाव आहे सना. सनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपला परिचय दिला. ही निवेदिका २४ तास बातम्या वाचू शकते. यामुळे वृत्त वाहिनीचा निवेदिकेच्या वेतनावरील खर्चही कमी होणार आहे. वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीही या वृत्त निवेदिकेचा चांगला उपयोग होऊ शकतो. सनाची कार्यक्षमता ही माणसांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ती जास्त वेळ काम करू शकते.

परिणामी कामातल्या चुका कमी होतील आणि काम अधिक वेगानं होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवेदिकेचा आवाज, शब्दफेक, ओठांची हालचाल, चेहर्‍यावरील हावभाव हे एखाद्या व्यावसायिक निवेदिकेसारखेच आहेत. काही दिवसांपूर्वीच आज-तक वृत्तवाहिनीचे प्रसिद्ध पत्रकार सुधीर चौधरी यांच्या रात्री ९ वाजेच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’या शोमध्ये सनाचे लॉन्चिंग झालं. सना ही कॉम्प्युटर रोबोट आहे जी केवळ मजकूर वाचून दाखविणार्‍या (टेक्स्ट टू स्पीच) फिचरचा वापर करून व्हिडीओ बोटच्या रूपात सादरीकरण करते. तिची अशाप्रकारे निर्मिती करण्यात आली आहे की, आपण बोलतो ते तिला समजते आणि आपल्या प्रश्नांना ती योग्य उत्तरेदेखील देऊ शकते.

- Advertisement -

सनाची निर्मिती ज्या तंत्रज्ञानाने झाली आहे ते तंत्र रॉकेट सायन्ससारखं अवघडही नाही. ही व्हर्च्युअल निवेदिका रोबोट नाही किंवा ती मानवाचं थ्रीडी डिजिटल मॉडेलही नाही. ही निवेदिका म्हणजे माणसासारखं दिसणारं एक अ‍ॅनिमेशन आहे. या तंत्राच्या माध्यमातून लिखित मजकूर वाचून दाखवण्याचं काम होतं. मनुष्यामध्ये बुद्धिमत्तेचा विकास हा अपसूक होत असतो. काही बघून किंवा काही ऐकून अथवा कशाला स्पर्श करून आपण संबंधित बाबीसंदर्भात वर्तन कसे करायचे हे ठरवत असतो. त्याचप्रकारे एका विशिष्ट प्रकारच्या तंत्रामध्ये अशी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा हुशारी विकसित करण्यात आली आहे. थोडक्यात काय तर, मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये विकसित करण्यात आली आहे. त्यालाच आपण आर्टिफिशीयल इंटेलिजन्स म्हणतो. यापूर्वी २०१८ मध्ये चीनने जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या वृत्त निवेदकाची निर्मिती करून सगळ्यांनाच अचंबित केलं होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या वृत्त निवेदकाची निर्मिती चीनची आघाडीची वृत्तसंस्था क्षिनुआ आणि चिनी सर्च इंजिन कंपनी सोगोऊ यांनी मिळून केली. या वृत्त निवेदकाचं नाव झँग असं ठेवण्यात आलं. झँग इंग्रजी आणि मँडेरिन भाषेत बातम्या वाचतो.

अशा आभासी वृत्त निवेदकांचा वापर करणं ही माध्यम क्षेत्रातील मोठी क्रांती मानावी लागेल. यामुळे विशेषत: मालकवर्गाला मोठाच फायदा होणार आहे. दुसरीकडे चॅट जीपीटीनेही जगभरात धुमाकूळ घातला आहे. यात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. तुम्हाला निबंध हवा असेल, चित्रपटाची संहिता हवी असेल किंवा अन्य कोणतीही माहिती हवी असेल तर काही क्षणात ती उपलब्ध होऊ शकते. आजवर गुगल केवळ सर्च इंजिनचं काम करीत होतं. म्हणजे वेगवेगळ्या संकेतस्थळावर टाकलेली माहिती शोधून देण्याचं काम गुगल सर्च इंजिन करीत होतं, परंतु चॅट जीपीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकेतस्थळातील माहिती एकत्रित करून ती वापरकर्त्यासमोर सादर केली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम सध्या केवळ इंग्रजी भाषेत काम करत असून आगामी काळात त्याचा अन्य भाषांमध्येही वापर होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी या नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विशेषत: गणिततज्ज्ञ, कर गणना करणारे, इंजिनिअर आणि लेखकांचे काम धोक्यात आल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

भाषांतरकार, दुभाषी, सर्वेक्षण संशोधक, कवी, लेखक, प्राणी शास्त्रज्ञ, जनसंपर्क तज्ज्ञ, पेब आणि डिजिटल इंटरफेस डिझायनर्स, लिपिक, ब्लॉकचेन इंजिनिअर, वार्ताहर, मुद्रितशोधक, अकाऊंटंट्स आणि ऑडिटर्स, वृत्त विश्लेषक, पत्रकार, कायदेविषयक सचिव, प्रशासकीय सहाय्यक, क्लिनिक डेटा व्यवस्थापक, वातावरण बदल धोरण विश्लेषक, ग्राफीक डिझायनर्स, गुंतवणूक फंड व्यवस्थापक, विमा मंजूर करणारे आणि वाहनांचे नुकसान ठरवणारे या विभागात नोकर्‍या करणार्‍यांना या नवीन तंत्रज्ञानानं घाम फोडला आहे. देशातील कुशल तरुणांच्या नोकर्‍या जाणार असल्याची शक्यता वर्तवत या तंत्रज्ञानावरच बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे, मात्र या मागणीकडे लक्षच न देण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली दिसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर रेग्यूलेशन अथवा त्यावर बंदी घालण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला आपल्या सर्वांनाच सामोरं जावं लागणार आहे. कॉम्प्युटरच्या भारतातील उगमानंतरही असाच वाद झाला होता.

माहिती-माध्यम क्रांतीच्या लाटेवर आरुढ झाल्याशिवाय भारत खर्‍या अर्थाने विज्ञान युगात येणार नाही, असे निवेदन करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेक्नॉलॉजी मिशन्स स्थापन केले होती, परंतु जवळपास सगळ्याच डाव्या-उजव्या पक्षांनी आणि स्वयंघोषित विद्वानांनी राजीव गांधी, सॅम पित्रोदा अशा अनेक प्रभूतींची कॉम्प्युटर बॉइज म्हणून खिल्ली उडवली होती.‘ही श्रीमंत विदेशी खेळणी भारतीय संस्कृतीच्या काय कामाची’ या प्रश्नापासून ते ‘हा अमेरिकेचा सॉफ्टवेअर साम्राज्यवाद आहे’ असे निरुपण करण्यापर्यंत उजव्या-डाव्यांची मजल गेली होती, परंतु आज कॉम्प्युटरच्या वापराशिवाय जग पुढे जाऊच शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा फार बाऊ करण्यातही अर्थ नाही. हे तंत्रज्ञान आहे, त्यात मानवी भाव-भावनांना स्थान नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. आज सना ज्या पद्धतीने वृत्त निवेदन करतेय ते बघता ती खरीखुरी बाई आहे, असा समज होताना दिसत नाही. एखादी बाहुली आपल्याला बातम्या वाचून दाखवतेय असाच भास निर्माण होतो. चीनमध्ये गेल्या ५ वर्षांपासून आभासी वृत्त निवेदकाचा वापर केला जात आहे, परंतु त्याचा प्रभाव चीनच्या दर्शकांवर फारसा झालेला नाही.

कारण तो एकसुरात बोलतो. त्याचप्रमाणे भारतातील सनाचाही धसका घेण्याचे काहीएक कारण नाही. तिला आपली भाषा बोलता येईल. ओठांची हालचाल ती भाषेनुसार करेल. इतकेच नाही तर ती कपडेही भारतीय संस्कृतीनुसार परिधान करेल. म्हणजे अगदी गुढीपाडव्याला ती भरजरी पैठणी नेसून आणि नाकात नथ घालूनही टीव्हीच्या स्क्रीनवर दिसेल, पण बोलण्यातला गोडवा, मानवी भावना ती कुठून आणणार? एखादी निधन वार्ता ती ज्या भावनेने बोलून दाखवेल त्याच भावनेने ती आनंदवार्ताही सांगेल. अशा सपक भावना आपल्या पचनी पडतील का? एखादा वक्त्याने विषयांतर केलं तर ती त्याला मध्येच टोकेल का? ब्रेकिंग न्यूज देताना तिचा आवेश वाढेल का? उत्तरं नकारार्थीच येतात. म्हणजेच तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवाच्या मेंदूशी, त्याच्या भावनांशी त्याची बरोबरी होणार नाही. तसे असते तर चीनमधील झँगसारख्या अनेक आभासी निवेदकांनी एव्हाना इतरांच्या नोकर्‍या बळकावल्या असत्या.

माणसांकडून जे काम करताना चुका होण्याची शक्यता असते तसेच ज्या कामांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर बुद्धिमत्ता आवश्यक असते, अशी कामे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केली जातात. हे तंत्र कुठे वापरता येतील, हे ठरवणं मात्र सर्वस्वी माणसाच्या हातात असतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकर्‍या जाणार असं म्हटले जात असलं तरी, भारतात अंदाजे ४५ हजार आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित नोकर्‍यांच्या जागा रिक्त आहेत, असं टेक स्टाफिंग फर्म टीमलीज डिजिटलच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारणच नाही. एआय सेक्टरमध्ये काम केल्याचा पगार दरवर्षी १० ते १४ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतो, तर अधिक अनुभव असलेले उमेदवार त्या पगारात दुप्पट वाढ करतात, असं अहवालात नमूद केलं आहे. आरोग्य सुविधांपासून रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतच्या उद्योगांचा समावेश असलेल्या, या रिक्त पदांमुळे देशातील वाढत्या एआय मार्केटला चालना मिळेल. अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियत्रंण आणता येऊ शकते.

डिजिटल गोष्टीमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल. या तंत्रज्ञानामुळे नोकर्‍यांच्या अनेक संधीही तयार होणार याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाच्या कालावधीनंतर मनुष्य बळाऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अवलंबित्व वाढलं आहे. म्हणजेच त्याची व्याप्ती वाढली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये कमी स्पर्धा आहे. आगामी काळात आयटी, फायनान्स, सिक्युरिटी, डेटा कलेक्शन यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाढणार आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करू शकतात. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अ‍ॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकर्‍या मिळू शकतात. काडेपेटीचा शोध हा चूल पेटवण्यासाठी लागला होता. त्याचा उपयोग घरं पेटवण्यासाठी होऊ लागला तर त्यात तंत्रज्ञानाला दोष कसा देता येणार? तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचंही आहे इतकंच!

अ‍ॅनिमेटेड वृत्त निवेदिका.. पण चिंता नको!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -