घरसंपादकीयओपेडमनात संवेदनेची धाकटी ज्योत तरी पेटायला हवी!

मनात संवेदनेची धाकटी ज्योत तरी पेटायला हवी!

Subscribe

ज्या दिवशी आपण दिवाळी साजरी करून सर्व प्रकारचा आनंद लुटतो, विद्युत रोषणाईने सर्व परिसर चंदेरी झगमगाटात उजळून टाकतो, त्याच वेळी कित्येकांच्या घरात साधी पणतीही प्रकाशित झालेली नसते त्यांचे काय? तुकोबांच्याच भाषेत सांगायचे झाले तर समाजातील रंजलेल्या, गांजलेल्या, कष्टलेल्या, लोकांप्रती आपल्या मनात संवेदनेची धाकटी ज्योत तरी पेटायला नको का? अशा वंचित लोकांच्या जीवनात थोडा तरी ज्ञानाचा, सहानुभूतीचा प्रकाश पेरण्याचे काम जेव्हा होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने समतेची दिवाळी साजरी होईल!

-डॉ. अशोक लिंबेकर

दीपावली हा सण भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण! आनंद, उत्साह, चैतन्य, स्नेह व समाधानाचे प्रतीक म्हणजे दिवाळी! आपली संस्कृती ही पुराणकाळापासून तेजोनिधी प्रकाशाचे पूजन करणारी संस्कृती आहे. प्रकाश म्हणजे सत्याचे व ज्ञानाचे प्रतीक! विश्वानिर्मितीचा आरंभ व चिरंतन सत्य म्हणजे प्रकाश! प्रकाशाच्या अस्तित्वाशिवाय चैतन्य नाही. अनंत अवकाशाचा संपूर्ण परीघ या प्रकाशरूपी तत्वाने व्यापलेला! प्रकाशाच्या अनुपस्थितीने अवघी जीवसृष्टी मंदावते नव्हे थांबते! या कारणानेच विश्वातील सर्व प्राणीमात्र व माणूस नेहमीच सदैव प्रकाशाच्या शोधात असतो, पण सर्व प्राणीमात्रांमध्ये माणसानेच फक्त या तत्त्वातून ज्ञानाचा शोध घेतला. प्रकाशाच्या उगमाने सर्व प्रकारच्या अंधाराचा नायनाट होऊन सृष्टीतील दिनक्रम चालू होतो मग तो प्रकाश तेजोरूपी सूर्याचा असो की, त्या तत्वातील धाकुट्या पणतीचा.

- Advertisement -

‘जैसी दीपकळीका धाकुटी । परी बहु तेजाने प्रकटी ।’ तेजाचे प्रकटीकरण हा प्रकाशाचा स्थायी भावच असतो.. समर्थ रामदास म्हणतात ‘याकारणे सूर्यापुढे । दुसरी साम्या न घडे । जयाच्या प्रकाशे उजडे । प्राणीमात्रासी ।’ ज्याप्रमाणे सूर्य उगवला की अंधाराचे घनदाट जाळे विरून सर्व आकाश मोकळे होते तद्वतच ‘आपल्या जीवनातील आणि अंतर्मनातील प्रकाशाच्या आगमनानेही सर्व प्रकारच्या तिमिराचा लोप होतो. आपल्या स्वस्वरूपाचे ज्ञान झाले की मी तू पणाचे भेदही मावळतात आणि खर्‍या अर्थाने सत्याचे ज्ञान होते. अहंतेचा अंध:कार दूर झाला की व्यक्ती सोहमध्ये विसर्जित होते. मीपणाच्या अज्ञानरूपी अंधारातून बाहेर आले की माणसाचा समष्टीकडे प्रवास सुरू होतो.

नव्हे ही समष्टी म्हणजेच मी अशी विश्वात्मक व्यापक जाणीव निर्माण होते. जी आपल्या संत ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव तुकोबांच्या अंत:करणात निर्माण झाली. ही जाणीव कोणत्याही संवेदनाक्षम व्यक्तीस स्वस्थ बसू देत नाही. आजूबाजूचा व्यापक अंधार त्याला अस्वस्थ करतो. या अंधाराचे साम्राज्य किती प्रमाणात फैलावलेले असते नाही? अज्ञान, दारिद्य्र, विषमता, जातीय अहंता, वर्ण, वर्गव्यवस्था, स्त्रीपुरुषभेद, व्यसनाधीनता, विकारवशता, शोषण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, मिथ्या अभिमान, दाभिंक्ता, अंधश्रद्धा, कुपोषण, बेकारी, चंगळवाद, आभासी जगाचे आकर्षण, बेगडी प्रेम, वैचारिक, शारीरिक, सांस्कृतिक, आर्थिक मानसिक अशा सर्व प्रकारच्या अंधाराचा सामना आपणास दैनंदिन जीवनात करावा लागतो.

- Advertisement -

समाजजीवनातील हा काळोख मिटल्याशिवाय ज्ञानाची, विवेकाची, समतेची दिवाळी साजरी होईल का, हा खरा प्रश्न आहे. संत ज्ञानदेव म्हणतात, ‘तिमिरावरूद्ध जैसे । दृष्टीचे तेज भ्रंशे । मग पासीच असता न दिसे । वस्तुजात।’ अशा सर्व प्रकारच्या विकारांनी, लालसेने, स्वार्थाने, जातीपातीच्या, धर्मभेदाच्या अहंतेने ग्रासलेले, भ्रांत झालेले मानवी मन सद्सद्विवेक हरवून बसते. तेव्हा अशा अविवेकी मनाला विवेकाचा लगाम घालण्याचे काम, त्यांना पुन्हा विवेकरूपी प्रकाशाच्या मार्गावर आणण्याचे कार्य मराठी संतांनी तेराव्या शतकापासूनच केले आहे.

‘नाचू कीर्तनाच्या रंगी । ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत ज्ञानरूपी दिव्यांचा प्रकाश निर्माण करण्याचे व दाही दिशांनी आसमंत प्रकाशमान करण्याचे तेजस्वी कार्य या महात्म्यांनी केले. अत्त दीप भव : असं म्हणणारे भगवान गौतम बुद्ध असोत, समाजमनातील भीषण अंधाराबद्दलच आपली संवेदना प्रकट करून या अंधाराला भेदण्याचे कार्य केले. ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे, ‘अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळी। लोकमानसातील जातीपातीची, श्रेष्ठ कनिष्ठतेची, भेदभावाची ही अविवेकरूपी काजळी फेडून मानवतेचा विवेकदीप उजळायला हवा.

ज्या दिवशी आपण दिवाळी साजरी करून सर्व प्रकारचा आनंद लुटतो, विद्युत रोषणाईने सर्व परिसर चंदेरी झगमगाटात उजळून टाकतो, त्याच वेळी कित्येकांच्या घरात साधी पणतीही प्रकाशित झालेली नसते त्यांचे काय? तुकोबांच्याच भाषेत सांगायचे झाले तर समाजातील रंजलेल्या, गांजलेल्या, कष्टलेल्या, लोकांप्रती आपल्या मनात संवेदनेची धाकटी ज्योत तरी पेटायला नको का? अशा वंचित लोकांच्या जीवनात थोडा तरी ज्ञानाचा, सहानुभूतीचा, प्रकाश पेरण्याचे काम जेव्हा होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने समतेची दिवाळी साजरी होईल!

अंधश्रद्धेच्या, कर्मकांडाच्या व घोर अज्ञान गुहेतून समाजातील सामान्य जनाला विवेकाच्या प्रकाशवाटेवर आणण्याचे काम मराठी संतांनी केले. ‘ज्ञानराज माझी योग्याची माऊली । जेणें निगमवल्ली प्रगट केली । गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली । अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप । चैत्यन्याचा दीप उजळीला । नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।’ संत ज्ञानदेवांनि खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक, दीनदलित लोकांच्या जीवनात अध्यात्माची, विठ्ठलभक्तीची दिवाळी व भावभक्तीची मंजुळ पहाट उगवण्याचे कार्य केले. या संतांच्या अक्षर अभंगातील चिरंतन सत्याने व शाश्वत मूल्यांच्या लावण्यदीपांनी अवघे मानवी जीवनच उजळून गेले! त्यामुळेच विवेकनिष्ठ विचारांच्या अधिष्ठानावर तेवणारा हा संतसाहित्याचा नंदादीप मराठी संस्कृतीचाच नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा ठरतो.

ज्ञानदेवांचे पसायदान असो की नामयाचे कीर्तन, एकनाथांचे भारुड असो की तुकोबांचे अक्षर अभंग या संताच्या विचारदीपानी अवघे विश्वच प्रकाशमान झाले. या विचारांना स्थळ, काल, प्रदेशांच्या सीमारेषा कधीच आड आल्या नाहीत. त्या भेदून हा ज्ञानप्रकाश विश्वव्यापक बनला. विश्वाच्या कल्याणकारी विचाराला, ज्ञानाला व त्याच्या निर्मात्याला कोणतीच मर्यादा बाधत नाही. हे ज्ञान व देणारा ज्ञाता हा कोणत्याही एका धर्माचा किंवा राष्ट्राचा नसतो. तो वैश्विक सत्य मांडत असतो म्हणूनच तो सर्व विश्वाचा असतो. संत तुकारामांनी याचे खूप समपर्क उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, ‘दीप न देखे अंधार । आता हेची करा जतन ।’ दिव्याचा हा गुणधर्म असतो म्हणूनच प्रकाशाचे पूजन करायला हवे, परंतु दिवे लावूनही समाजजीवनात विविध प्रकारचा अंधार राहत असेल तर हा सण केवळ प्रतीकात्मकच राहतो. प्रकाशाचे प्रतीकात्मक पूजन करताना मी माझ्या आजूबाजूच्या सर्व अंधाराचा नायनाट करीन ही भावना जोपासायला हवी.

संतांची दिवाळी कशी होती? हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. त्यामागे काही पौराणिक संदर्भही आहेत. संत साहित्यातही दिवाळसणाचे संदर्भ आले आहेत, ‘सण दिवाळीचा आला । नामा राउळाशी गेला । या अभंगातून संत जनाबाईने दिवाळसणाचे मनोहारी वर्णन केले आहे. तुकाराम याबाबत म्हणतात, ‘दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील । आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखाशी नाही लेखा । धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हि वाचा रामनामे ।’ संत संगती व सज्जनाचा सहवास हीच आपल्यालेखी दिवाळी असे तुकोबा म्हणतात. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा । अशी त्यांची देव व भक्ती याबाबतची धारणा होती.

साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा ‘हीच धारणा पुढे समाजमनातही पेरली गेली, पण तोचि साधू ओळखावा, हा तुकोबांचा भाव आपण समजू शकलो नाहीत. त्यामुळे बाह्य वेषधारी साधूने पुन्हा समाजामध्ये भक्तीचे अवडंबरच माजवले. वेगळ्या मार्गाने शोषणच केले. अशा सर्व प्रकारच्या व सर्व क्षेत्रातील बेगडीपणापासून, सावध होऊन जेव्हा आपण सद्सद्विवेकबुद्धीच्या कसोटीवर वर्तमानाची नोंद घेऊ तेव्हाच ज्ञानाची दिवाळी उजाडू शकते, नाहीतर शतकानुशतकांचा घोर अंधार अजून संपलेला नाही. उलट तो अधिक तीव्र व व्यापक होतोय की काय? अशी खर्‍या संवेदनाक्षम व मानवतावादी विचार करणार्‍यांना भीती वाटू लागलीय ! आजचा समाज ज्या सामाजिक, वैचारिक कोंडीतून जातोय ! ही कोंडी फोडायची असेल तर सुसंस्कृत विवेकाची पेरणी व मानवतेच्या दीपावलीसाठी आपल्या भारतीय परंपरेतील दीपस्तंभाकडे पहावे लागेल.

त्यांच्या विचारांच्या प्रकाशात पुढील वाटचाल करावी लागेल! समग्र विश्वाला ज्यांनी प्रकाशमान केले त्या अनेक महात्म्यांचा शांततेचा, सर्वात्मकतेचा, सत्य, अहिंसा, शांती व करुणेचा मूलमंत्र पुन्हा एकवार आचरणात आणावा लागेल ! विविध धर्मसंप्रदायाने व त्यांच्या प्रेषितांनी मानवी कल्याणाची चिंता वाहिली, ‘अत्त दीप भव ।’ म्हणून बुद्धांनी निर्वाणाच्या वेळी आपल्या अंत:करणातील रत्नदीप प्रज्वलित करण्याचा प्रेमळ संदेश दिला, त्याशिवाय सत्याचा, ज्ञानाचा, प्रकाश कसा प्रदीप्त होणार? अंतरीचा दिवा विझलेला असेल, तर बाहेर लक्षावधी दीपमाळा लावून उपयोग काय? तेव्हा खरी गरज आहे ती विवेकनिष्ठ विचारांच्या तेजोमय दीपावलीची!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -