Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड बबन्याचा ‘बबनराव’ होता होता झाला तडीपार !

बबन्याचा ‘बबनराव’ होता होता झाला तडीपार !

Subscribe

पहाटेपर्यंत रेल्वे पूल, विजेचे खांब आणि झाडांना लटकवलेल्या बॅनरच्या सुतळी बांधून बबन्याचे तळहात सोलून आग झाली होती. आज मुख्य चौकात नेत्याचा कटआऊट लावायचा होता, कारणच तसं होतं, तरुणांचे आधारस्तंभ, आशास्थान, प्रेरणास्थळ, एकच आवाज, एकच वादा, एकच लक्ष्य, एकच आदेश असंं सगळं भारून असलेल्या एकमेव नेत्याचा वाढदिवस होता. त्यातच पक्षाचा वर्धापन दिन आज होता. कधी नव्हे तो बबनचा छोटासा फोटू शहराध्यक्षाच्या फोटूच्या खाली बबनराव म्हणून लागणार होता,पण त्याच्यावर तडीपार होण्याची पाळी आली.

–संजय सोनवणे

दहावीच्या परीक्षेत दोन विषयात दांडी गूल झाल्यावर गटप्रमुख म्हणून बबनची वर्णी पक्षाच्या शहराध्यक्षांनी लावली होती. बबनच्या नावापुढं ‘दादा’ लागल्यानंतर बबनला पक्षातले नवखे कार्यकर्ते बबनदादा शेठ म्हणू लागले. पोरांचं खाणंपिणं, पान, मट्रेलचा खर्च विभागप्रमुखानं बबनच्या खिशात टाकला. गेल्या वर्षी मतदारसंघात पक्षाध्यक्ष दाखल झाले तेव्हा बबनच्या खांद्यावर हात ठेवून प्रेसवाल्यांसाठी फोटू काढल्यावर आणि लोकल साप्ताहिकात आणि कधीतरी स्थानिक प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसालाच प्रकाशित होणार्‍या कुठल्याशा स्थानिक टाईम्समध्ये पक्ष सरचिटणासाच्या फोटोखाली बबनचा ‘दादा’ म्हणून उल्लेख होणारा फोटू टाकल्यावर त्याला आज आकाश ठेंगणं झालं होतं.

- Advertisement -

आता पक्षाला जवळपास २५ गल्लीतली सातशे-आठशे मतं मिळवून द्यायचीच, फोटोत फेट्यासोबत ही जबाबदारीही बबनच्या डोक्यावर पडली. पक्ष आणि पक्षाच्या वैचारिक भूमिकेसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे असं त्याला वाटू लागलं होतं. वैचारिक भूमिका, तत्वनिष्ठा असले शब्द त्याच्या कानावर पक्षातल्या थोरामोठ्या नेत्यांच्या भाषणातून पडत होते. निष्ठा म्हणजे पक्षासाठी काहीही, अगदी काहीही करणं, अगदी जेलवारी, आंदोलनं, रास्ता रोको, मोडतोड असलं सगळं काही त्यात आलंच, बबनही त्यासाठी तयार होता. पक्षादेशातून त्यानं जवळपासची दोन चायनीज हॉटेलं, एक दुकान, रस्ते कंत्राटदाराचं कार्यालय आणि एक टोलनाका फोडल्याची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनात झाली होती.

महाराष्ट्रातल्या या मुलांना त्यांच्या अधिकारातलं सत्तेचं माप मिळालंच पाहिजे, या मुद्यावर पक्षाध्यक्षांनी बेंबीच्या देठापासून जोरदार आरोळी दिल्यावर बबनला ‘आपल्यावर’ झालेल्या अन्याय अत्याचाराची जाणीव झाली होतीच. हे भाषण खूपच ‘अभ्यासपूर्ण’ असल्याचा साक्षात्कार इतर कार्यकर्त्यांसोबत जेवणावळी झडताना झाला होता. आता त्याला आपलं कौटुंबिक जगणं किती किरकोळ असल्याची जाणीव झाली होतीच. या ‘किरकोळ’पणातून बाहेर पडून पक्षासाठी निष्ठावान तरुण कार्यकर्ता म्हणून जगण्यातच आपलं सौख्य सामावलं आहे. याची जाणीव बबनला वयाच्या विसाव्या वर्षी झाली. शाळेतली बरोबरची पोरंटोरं कॉलेजात शिकायला जात असताना बबन मात्र नगरात पक्षासाठी आयोजित वैद्यकीय, रक्तदान शिबिरं भरवायला लागला होता.

- Advertisement -

पक्षाची काही ध्येयधोरणं असतात, राजकीय सत्ता हे आपलं साध्य नाही, ते साधन आहे, असं पक्षाचे प्रवक्ते स्थानिक युट्यूब चॅनलला मुलाखत देत असताना बोलले होते. या ध्येय धोरणासाठी प्रसंगी हातात दगडही उचलण्याची तयारी बबनची होती. आपल्याला जातीय, सामाजिक, प्रादेशिक, धार्मिक अशा कित्येक निष्ठा आहेत, असं बबनला नव्यानेच समजलं होतं. नाहीतर याआधी फक्त रेशनच्या लाईनीत केशरी कार्ड घेऊन नवा गहू तांदूळ आलाय का, एवढीच माहिती त्याच्या जगण्यासाठी पुरेशी होती. थेट वरच्या म्हणजेच पहिल्या फळीतल्या पक्षातल्या नेत्यांसोबत बबन कधीही मोबाईलवर बोलू शकत होता. पक्षाचं ध्येयगीत त्याच्या मोबाईलची रिंग आणि कॉलरट्यूनही होती, तोच जयघोष, तेच अभिवादन, तोच नमस्कार होता.

आज पक्ष जरी थेट सत्तेत नसला तरी मोठा राजकीय दबावगट म्हणून बबनच्या पार्टीचं राज्यात नाव होतं. पार्टीच्या शहरप्रमुखानं विकासाच्या मुद्यावर राजीनामा दिल्याचं समजल्यावर आतातरी ही जागा आपल्यासाठी खुली झाल्याचं बबनला वाटून तो ‘मनस्वी’ आनंदला होता. ही जागा खाली झाली तर तुझीच तसा शब्दच त्याला शहरात बसलेल्या हायकमांडनं दिला होता. आता बबनचं हायकमांड म्हणून ओळख असलेलं पक्षप्रमुखाचं नाव, हे म्युनसिपाल्टीत तीन नगरसेवकाच्या पाठिंब्यानं आणि त्यातल्या त्यात प्रादेशिक पक्षाच्या वळचणीला जाऊन बसणारं होतं, ही सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेरची पॉलिटिकल स्ट्रॅटजी असल्याचं बबनसारख्या अनेक कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं होतं. पक्षाची ‘राजकीय निष्ठा आणि पक्षांची ध्येयधोरणं तसेच आत्म्याचा आवाज आणि तत्वांच्या मुद्यावर’ बरीच भाषणं बबननं पक्षाच्या सभेत ऐकली होती. पक्ष जरी छोटा असला तरी व्हीजन मोठं असल्याचं त्याला सांगण्यात आलं होतं.

महापुरुषांच्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आपल्या पक्षाची गरज असल्याची खात्री त्याची झाली होतीच. भांडवलशाहीने देश कसा धोक्यात आणला आहे, शेतकरी, कामगार कसे देशोधडीला लावले जाताहेत याविषयी तावातावानं भांडणारे कार्यकर्ते त्याने ऐकले होते. भाषा आणि अस्मितेच्या मुद्यावर केलेल्या आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी एकजात सर्व कार्यकर्त्यांना निळ्या वायरलेस डब्यात भरून थेट पोलीस स्टेशनात नेऊन बसवलं होत. त्यावेळी आपल्याला सोडवायला स्थानिक आमदारानं सीनीयर पीआयला फोन केल्याचं आणि त्यांच्या एका शब्दावर आपल्यासह इतर सात जणांना सोडवल्याचं बबन आभिमानाने गावात सांगत फिरत होता. पक्षाच्या आदेशापुढं इतर कुठलाही ‘आदेश’ जुमानायचा नाही. पक्षाची ध्येयधोरणं काहीही करून सामान्य मतदारांपर्यंत पोहचवायचीच, हेच आपलं ध्येय असल्याचं बबनला वाटून गेलं होतं.

राजकारणाच्या पलीकडे काहीच नसतंय, मनात आणलं तर आपण दिल्लीची सत्ताही खेचून आणू, आमदारकी, खासदारकी काय चीज? इतका विश्वास त्याचा पक्ष नेतृत्वावर होता, पण मोठ्या साहेबांच्या कोंडाळ्यातून साहेबांपर्यंत पोहचण्यासाठी बबनला आणखी काम करावं लागणार होतं. मतदारसंघातल्या जवळपास अडीच ते तीन हजार मतांची जबाबदारी घ्यावी लागणार होती. निवडणुकीआधी पक्षनिधी गोळा करायच्या कामात पाच कंत्राटदार, तीन पालिकेतले बडे अधिकारी, दोन बारमालक, एकदोन चाळदादा, पाच ते सहा किरकोळ बिल्डर आणि आठ दहा स्थानिक समाजसेवकांना आपल्या बाजूला वळवण्याची गरज होती, मात्र त्यातले बरेचसे विरोधकांच्या गोटात असल्यानं त्यांना आपल्या बाजूनं कसं वळवावं हा मोठा प्रश्न होता. आपल्या समुदाय गटांना आजवर कसं डावललं गेलंय, आजवरच्या सगळ्याच सरकार सत्तांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा त्यानं पाठ केला होता. आपल्याच धर्म, रुढी, सण, परंपरांना कसा विरोध केला जातो, याचं रसभरीत वर्णन त्याला वारंवार ऐकवण्यात आलं होतं. व्हॉट्सअप आणि फेसबूकवर सातत्यानं पक्षाकडून पडणार्‍या पोस्टींचा रतिब यातून रोज नवं ज्ञान, नवी माहिती त्याच्यासाठी उपलब्ध केली जात होती.

बहिणीच्या लग्नात विभागप्रमुख आले होते, त्याचं कौतुक होतं. पक्षप्रमुख येणार म्हणून लग्नपत्रिकेत विशेष उपस्थिती म्हणून नावही टाकलं होतं, मात्र ऐन वेळी पक्षप्रमुखांना दिल्लीतून बोलावणं आल्यानं ते निघून गेल्याचं समजलं. बबनला आता बबनराव म्हटलं जाऊ लागलं, नवखे कार्यकर्ते दादा, भाऊ अशीही हाक देत होते. शाळा कॉलेजातलं अ‍ॅडमिशन, नाक्यावर वडापावची गाडी लावणं, सरकारी योजनांची माहिती देणं, महिलांसाठी आरोग्य शिबिरं भरवणं, हॉस्पिटलची इमर्जन्सी, अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देणं, सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, सणासुदीला मिठाया वाटणं, दिवाळीत, माफक दरात कंदील, उटणं, फराळ, फटाक्यांचा स्टॉल लावणं, अशा अनेकविध कामात बबनचा दिवस निघून जात असे. गल्लीबोळातली टवाळकी करणारी पोरंटोरं बबनभाऊ म्हणत बबनला आता वचकून होती. बेकायदा चाळीच्या बांधकामाला नोटीस आल्यावर बबननं वरतून दबाव आणून चाळ वाचवल्याची आख्यायिका नगरभर पसरली होती.

रस्ते बांधकामाच्या कंत्राटात स्थानिक नगरसेवकाबरोबर बबनचं बिनसलं होतं. या नगरसेवकांची विरोधकांशी हातमिळवणी असल्याची माहिती त्याला ‘आतल्या गोटातून’ मिळाली होती. टक्केवारीच्या राजकारणातला हिस्सा पक्षनिधीसाठी मिळवून देण्याचा शब्द त्यानं विभागप्रमुखांना दिला होता. या शब्दावर पक्षनेतृत्वापर्यंत ‘आपलं’ नाव पोहचलं असल्यानं त्यालाही विभागप्रमुख, शहरप्रमुखपासून ते थेट आमदारकीच्या तिकिटापर्यंत पोहचल्याचं समाधन मिळालं होतं. आपल्याला अजून राजकारणात बरंच काही करायचं आहे. इतक्यात सत्तापदाची लालसा नकोच, ही इमानदारीच बबन, बबन्यापासून बबनराव, बबनशेठपर्यंत घेऊन जाणार असल्याचा ठाम विश्वास त्याला होता. शहरस्टेशनच्या बाहेरच्या मोठ्या कटआऊटवर पक्षप्रमुखांच्या पोस्टरखाली हात जोडून बबनची छबी उभी होती.

आज पक्षप्रमुखांचा बड्डे होता, बाराबाय आठ फुटांचा बॅनर स्टेशनरोडवर लावण्याचे ‘आदेश’ आल्यानं बबन पहाटे उठला तेव्हा पक्षाची बातमी चॅनलवर झळकत होती. सरकार बदलत होतं, आपले पक्षप्रमुख आपल्याच धर्म, जात, संस्कृती आणि अस्मिताविरोधकांसोबत गेल्याचं टीव्हीच्या पडद्यावर पाहिल्यावर बबन मटकन खाली बसला. त्यानं विभागप्रमुखाला फोन लावून ‘भाऊ टीव्हीवर हे काय सुरूए’ असं विचारल्यावर भाऊ म्हणाले… करावं लागतं बबन, पक्ष संस्कृती आणि धर्मरक्षणासाठी सत्ता हवी…बबनराव चिंता करू नका, आता आपण सरकारमध्ये बसल्यावर तुमच्यावरच्या आजपर्यंतच्या सगळ्याच चॅप्टर केसेस मागे घेतल्या जातील, आपल्या साहेबांना नव्या साहेबांनी तसं वचन दिलं आहे, बोलून फोन कट…तेवढ्यात दरवाज्यात आलेल्या पोलीस शिपायानं २४ तासात राहतं ठिकाण सोडून जाण्याची तडीपारीची नोटीस बजावल्याची माहिती बबनरावांना दिली. त्याआधी पोलीस स्टेशनवर हजेरी लावण्याचं फर्मान सोडलं. बबन टीव्हीतली बातमी, कोपर्‍यातलं वाढदिवसाचं पोस्टर आणि हातातल्या नोटीशीकडे पाहत बराच वेळ थिजल्यासारखा जागीच उभा होता.

- Advertisment -