बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी वैजनाथ बीडमध्ये आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज हेदेखील याच जिल्ह्यातील. बीड जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभवही मोठे आहे. मराठी चित्र-नाट्यसृष्टीला अनेक कलाकारही याच जिल्ह्याने दिले आहेत. मात्र बीडचं हे सगळं वैभव सध्या बाजूला पडलं आहे आणि सध्या चर्चा होते ती फक्त बीडमधील गुन्हेगारीची. बीड हा कायम राजकीय नकाशावर असणारा जिल्हा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचे अपघाती निधन झाले. तर दिवंगत प्रमोद महाजन हे दिल्लीच्या राजकारणातील मोठे नाव होते. त्यांच्या नावातच ‘पीएम’ होते. प्रमोद महाजनांचाही अकाली मृत्यू झाला. सख्ख्या भावाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. महाजन-मुंडे हे मित्र आणि नातेवाईकदेखील होते. आता गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस बीडच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. मुंडेंच्या कन्या पंकजा आणि पुतणे धनंजय हे दोघेही देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे 12-13 दिवस होत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले आणि तीन तासांत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. देशमुख यांचे अपहरण करून त्यांना छळ-छळ करून मारण्यात आले. त्यांच्या मृतदेहाचे फोटो पाहून मृत्यूलाही भीती वाटावी एवढी मारहाण त्यांना करण्यात आली. असा कोणता गुन्हा संतोष देशमुख यांनी केला होता? मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना 6 डिसेंबर रोजी खंडणीसाठी मारहाण करण्यात आली होती. यात मस्साजोग येथील दलित समाजाच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी संतोष देशमुख आले, तेव्हा त्यांच्यातही मारहाण झाली. या मारहाणीचा राग मनात ठेवूनच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकार्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर आहे. तर यातील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यासह कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. धनंजय मुंडे यांची मतदारसंघातील ए टू झेड सर्व कामे वाल्मिक कराडच बघतो, असेही आता समोर येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर, धनंजय मुंडे यांच्या बहीण आणि फडणवीस सरकारमधील पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या जाहीर सभेत म्हटले होते की, धनंजय मुंडे यांचे पानही वाल्मिक कराडशिवाय हालत नाही. यावरून वाल्मिक कराड याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हाच वाल्मिक कराड अजूनही फरार आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला अटक करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षाकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
संतोष देशमुख हत्येने फडणवीस सरकार अडचणीत आले आहे. विरोधी पक्षाने या निर्घृण हत्येवरून विधिमंडळ दणाणून सोडले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी दबाव वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. अपहरणाची तक्रार नोंदवून घेण्यास तीन तास उशीर करणार्या केजच्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले गेले. तर पोलीस अधीक्षकाची बदली करून आयपीएस नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडवरून संतोष देशमुख हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंसोबत असलेले संबंध आणि त्यातूनच त्याला वाचवले जात असल्याचा गावकर्यांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत, तोपर्यंत वाल्मिक कराडवर कारवाई होणे अशक्य असल्याचे गावकरी म्हणत आहेत. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीच हिवाळी अधिवेशनात केला. परळीचा पीकविमा पॅटर्न हा पंतप्रधान मोदींनी गुजरात आणि वाराणसीतही लागू करावा अशी उपरोधिक मागणी करत त्यांनी परळीमध्ये पीकविमा माफिया तयार झाल्याचा आरोप केला. खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधींचा पीकविमा लाटला जात असल्याचा आरोप आहे. बीड हा अतिशय मागास जिल्हा मानला जातो. मात्र येथे गुन्हेगारीचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचे येथील सनदी अधिकारी खासगीत सांगतात.
स्त्रीभ्रूण हत्येचं सर्वात मोठं रॅकेट हे बीडमधूनच समोर आलं होतं. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे या दाम्पत्याला अटकही झाली. मात्र जामिनावर सुटून आल्यावरही त्यांनी त्यांचा धंदा सुरूच ठेवला. ऊसतोडीसाठी बीड जिल्ह्यातील मजूर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तेलंगणापर्यंत जातात. यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. ऊसतोडीसाठी कुटुंबेच्या कुटुंबे दिवाळीनंतर स्थलांतर करतात. जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी या तालुक्यातील गावं अक्षरश: ओस पडतात. यातूनच कधी ऊसतोडीसाठी घेतलेली उचल फेडू शकले नाही म्हणून कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे मुकादम, कारखान्यातील लोकांकडून अपहरण होते. बेदम मारहाण केली जाते. कधीकधी यात त्यांचा जीवही जातो. ही प्रकरणे तर नित्याची झाली आहेत. ऊसतोडीसाठी जाताना मुलींचे गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकारही बीड जिल्ह्यातून समोर आले आहेत. गरिबी, शिक्षणाचा अभाव, त्यामुळे बेरोजगारी आणि त्यातून पुन्हा गरिबी, अशा दुष्टचक्रात येथील नागरिक अडकलेले आहेत.
गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील तरुण गुन्हेगारीकडे वेगाने ओढला जात आहे. बीडमध्ये खंडणी, वसुली राजरोसपणे होत असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे येण्यास अनेक अधिकार्यांचा नकार असतो. अधिकारी आले तरी विविध कारणांमुळे ते कामाच्या ठिकाणी हजरच होत नाहीत, झाले तरी कामाच्या ठिकाणी सापडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. परळीतील थर्मल पॉवरमधील अभियंते आणि अधिकारी यांनी जिल्हाधिकार्यांकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्याचीही मागणी केलेली आहे. ही परिस्थिती फक्त थर्मल पॉवरचीच नाही तर इतरही शासकीय आणि खासगी आस्थापनांमधील आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 1,222 शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत. तर शेजारच्याच परभणीमध्ये अवघे 32 शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यावरून बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी एवढी शस्त्रे घेण्यात आली आहेत की आत्मरक्षणासाठी? हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो. याशिवाय अवैध शस्त्रांची मोजदाद नाही, ते वेगळेच.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तर, पोलीस अधीक्षक म्हणून तरुण आयपीएस अधिकारी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र याच बीडमध्ये आयपीएस अधिकारी रंजन मुखर्जी होते. 1992 साली त्यांची बदली झाल्यानंतर एक महिन्यात ते बेपत्ता झाले. ते अजूनही सापडलेले नाहीत. 32 वर्षांनंतरही एक आयपीएस अधिकारी सापडत नाही, ही महाराष्ट्रासाठी नक्कीच शोभनीय बाब नाही. बीडमध्ये वाळू माफियांची काही कमतरता नाही, सिंदफना असेल किंवा गोदावरी, या नदीपात्रातून राजरोसपणे वाळू उपसा केला जातो. बीडमधील जिल्हाधिकारीदेखील आपल्या ब्रिफकेसमध्ये कामाच्या फाईलसोबत रिव्हॉल्व्हर बाळगतात हे बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी स्वत: सांगितले आहे. त्यामुळे बीडचं बिहार होण्याला कारणीभूत येथील राजकारणीदेखील आहेत. कारण त्यांचा लोकांशी थेट संबंध असतो. त्यांनी ज्या पद्धतीचे लोक आपल्या आसपास ठेवले आहेत, त्याच मानसिकतेचा समाज तयार होत आहे. संपूर्ण बीड या मानसिकतेचं आहे, असं मुळीच नाही. मात्र ही गुन्हेगारी मानसिकता एका विशिष्ट वर्गात बळावत आहे. बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घ्यावं आणि येथील गुन्हेगारी संपवावी अशी मागणीही आता होत आहे.