Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडBeed Crime : कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

Beed Crime : कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

Subscribe

महाराष्ट्राचा बिहार होत आहे, असे वारंवार म्हटले जात आहे. कारण, एकापाठोपाठ एक अशा घटनाच समोर येत आहेत. मानवताही शरमेने मान खाली घालेल, अशी अमानुषता प्रत्येक घटनेत दिसत आहे. पैसा आणि दंडेलशाहीचा वापर मुक्तपणाने केल्यावर सत्ता मिळते, हे गणित राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसले आहे. मतदारांना प्रलोभने किंवा धाकदपटशा दाखवणे हाच मार्ग अवलंबला जात आहे. यावर नियंत्रण ठेवणार्‍या निवडणूक आयोगासह इतर यंत्रणांनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. राजकारणातील हा मुर्दाडपणा आपल्यात येऊ नये, हीच काळाची गरज आहे. अन्यथा...

‘वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तुम्ही जर काहीच करणार नसाल तर, मग वर्तमानपत्र वाचून, क्षणभर हळहळता तरी कशाला? वर्तमानपत्र बंद करावं. ज्यांच्या दु:खावर मला फुंकर मारायला सवड नाही ते दु:ख मी वाचू नये, पाहू नये.

‘माणसं मग का वाचत असतील?

‘आपल्या वाट्याला ते दु:ख आलं नाही या समाधानासाठी. ज्यांना वाचताच येत नाही, त्यांचं काय अडतं? जे अत्याचाराचे बळी ठरतात ते वाचायला या जगात राहतच नाहीत. जे या अत्याचाराने धनी आहेत, ते अत्याचार झाला हेच नाकारतात. जे वाचतात ते आपल्या कामाला लागतात. म्हणूनच अनेक अत्याचार रोज घडतात. त्यात खंड नाही.’

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी जवळपास 50 वर्षांपूर्वी हे निरीक्षण नोंदवलेले आहे. त्यांच्या ‘वपुर्झा’ या पुस्तकात हा उतारा आहे. पण परिस्थिती अद्याप बदललेली नाही. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या, हेच दर्शवते. डिसेंबर 2024 च्या 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यातील अमानुषपणाची चर्चा होती, त्या अनुषंगाने आरोप-प्रत्यारोप सुरू होते. पण जेव्हा संतोष देशमुख यांना कशा प्रकारे हाल-हाल करून मारण्यात आले, एवढेच नव्हे तर, मृत्यूनंतरही त्यांच्या देहाची जी विटंबना केली गेली, ते सर्व फोटोंमुळे समोर आले. सारे काही अंगावर शहारे आणणारे होते. कुठे चाललो आहोत आपण?

हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कारण, त्याचा निकटवर्ती वाल्मिक कराड या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. पण त्याआधी दोन महिने धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते, आणि सरकारकडूनही त्यासाठी दबाव टाकण्यात आला नाही. राजीनामा घेण्यात झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमानुषतेचे फोटो आपण आधी पाहिले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे. हे सत्यही असू शकते, पण पक्षप्रमुखांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या वेळी बाजूला बसलेले असतानाही, ‘मी ते ऐकलेच नाही,’ असे सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांची परंपरा आपल्याकडे आहे. शिवाय, ज्याला गजाआड करण्याची वल्गना करत रान पेटवायचे आणि सत्तेत आल्यानंतर त्यालाच आपल्या बंगल्यावर बोलावून त्याप्रकरणाची फाईल दाखवायची, हीसुद्धा नवी का होईना आता परंपरा झाली आहे. त्यामुळे विश्वास कसा ठेवायचा.

त्यातही ज्या भाजप आमदाराने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, त्या सुरेश धस यांचाही असाच एक ‘वाल्मिक कराड’ असल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांत खेळणार्‍या या ‘वाल्मिक कराड’च्या अमानुषतेचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर आमदार सुरेश धस यांनी अपेक्षेप्रमाणे अनभिज्ञता दाखवत, ‘या गावगुंडावर कडक कारवाई झाली पाहिजे,’ अशी साळसूदपणाची भूमिका घेतली आहे. पण सत्य काय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. वास्तविक, बहुतांश पुढार्‍यांचे ‘वाल्मिक कराड’ आहेत, त्यांचा असाच हैदोस सुरू आहे. फक्त ‘जो पकडला जातो तो चोर,’ या उक्तीप्रमाणे आज सुरू आहे.

या गुंडांच्या दादागिरीला केवळ सर्वसामान्यांनाच सामोरे जावे लागत आहे, असे नाही तर, सध्या तर प्रत्यक्ष या राजकारणी आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना याला तोंड द्यावे लागत आहे. पुण्यात गुंड गजा मारणे याच्या हस्तकांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. मारहाण झालेला तरुण हा केंद्रातील सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा कार्यकर्ता होता. शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी बाईकला कट मारला म्हणून रागाने बघणार्‍या देवेंद्र जोग याला गजा मारणेच्या गुंडांनी लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या टोळक्यासह गजा मारणेवरही मकोकाची कारवाई झाली असली तरी, राजकीय वरदहस्त असलेल्या गजा मारणे याच्यावर फार मोठी कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येलाही अशाच गुंडगिरीला सामोरे जावे लागले. जळगावच्या मुक्ताईनगर कोथळी येथील यात्रेदरम्यान रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना घडली होती. तिची छेड काढण्याबरोबरच तिचा व्हिडीओही त्याने चित्रीत केला. हे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात दहशत पसरवणार्‍या गजा मारणे याची आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुनील लंके यांनी भेट घेतली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी ‘आज ना उद्या’ या कवितेत म्हटले आहे –

सत्तेसाठी बळी घेणे, हे कुकर्म अघोरी आहे

भूपुत्रांना जगण्याची या देशात चोरी आहे

गुंडगिरीच्या जोरावर सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा कमवायचा आणि नंतर गुंडगिरीसाठी गुंड पोसून त्यांच्या मदतीने सत्ता शाबूत ठेवायची. असलाच प्रकार सर्वत्र सुरू आहे. हे पोसलेले गुंडच नेत्यांसाठी बुमरँग ठरत आहेत. देशात कायद्याचे राज्य आहे, राज्यघटना सर्वोच्च आहे… हे सांगण्यापुरतं आहे आणि ऐकायला बरं वाटतं, इतकंच. प्रत्यक्षात या गुंडगिरीवर नियंत्रण ठेवणार्‍या यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी बनल्या आहेत. या यंत्रणा खरोखरच्या स्वायत्त होत नाही, तोपर्यंत कौरवांची ही दंडेलशाही अशीच सुरू राहील. कोणताही अंकुश नसल्याने रस्त्यावर बेधडक कोयते घेऊन गुंड फिरत आहेत. महिलांची अब्रू लुटली जात आहे. या गुंडांच्या वासनेतून चिमुरड्या मुलीही सुटत नाहीत. बेकायदेशीर होर्डिंग कोसळून सर्वसामान्यांचा बळी जात आहे. योग्य नियोजनाअभावी लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू होत आहे. अशा वेळी सरकार केवळ दोनच गोष्टी करते, दुर्घटनांमध्ये बळी गेलेल्यांना आर्थिक मदत पुढे करते आणि कोणाला सोडणार नाही, असे सांगत बड्या धेंडांना क्लीन चिटचे वाटप केले जाते.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या छळाचे जवळपास 15 व्हिडीओ सीआयडीच्या ताब्यात आहेत. संतोष देशमुख यांना अर्धनग्न करून अमानुषपणे लोखंडी पाईपाने मारहाण केली. एक गुंड त्यांच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला. तर, एकाने त्यांच्या मृतदेहावर लघुशंका केली… कुठून येतो हा निर्दयीपणा! सुरेश धस यांच्या निकटवर्तीय गुंडाने एका गरीब व्यक्तीच्या तळपायावर बॅटने फटके मारले. कशासाठी? खरं कारण कधी बाहेर येणार? निवडणुकीच्या वेळी हेच गुंड सर्वसामान्यांच्या दरवाजात जाऊन हात न जोडताही आपल्या बॉसला मतदान करायला सांगतील, तेव्हा मतदारांनी काय करायचे. भयमुक्त वातावरणात निष्पक्ष निवडणुका घेतल्याचा डंका निवडणूक आयोग कशाच्या आधारे पिटते? कविवर्य सुरेश भट यांच्या ‘साफसाफ’ कवितेतील या ओळी याला साजेशा आहेत,

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा…
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

जे काही चालले आहे ते, भयानक आहे. याचा अंत होणार आहे की नाही? होणार आहे तर कधी, हे कोणालाच माहीत नाही. कोरोना महामारीने केवळ देशातच नव्हे तर, संपूर्ण जगात थैमान घातले होते. यातून आपण बाहेर पडणार आहोत का? बाहेर पडणार असू तर ते कधी? अजून कोरोनाची भीती आणि त्यात मुलांच्या भवितव्याची चिंता अशा कात्रीत सर्वसामान्य सापडला होता. पण सुदैवाने ते दु:स्वप्न संपले आणि जगाची गाडी पूर्वपदावर आली. त्यामुळे राजकीय दंडेलशाहीचे स्वप्न संपेल आणि नवी पहाट उजाडेल, हीच आशा. उम्मीद पर दुनिया कायम हैं…