बेस्टची कंत्राटदार कंपनी तुपाशी, कामगार मात्र उपाशी !

कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्यास कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोकळ आश्वासन बेस्ट उपक्रमाकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत नाही. प्रत्येकवेळी कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालण्याचेच काम बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येते. यामुळं कंत्राटदार कंपनी मस्तवाल मालकाच्या भूमिकेतून कंत्राटी कामगारांवर अन्याय करतच राहते. बेस्टच्या कंत्राटी चालक-वाहक आणि इतर कर्मचार्‍यांच्या तक्रारी किंवा त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची तीव्रता बेस्ट प्रशासनाने वेळीच समजून घेतली तर कर्मचार्‍यांना आंदोलन पुकारण्याची वेळच येणार नाही.

बेस्ट उपक्रमाने परिवहन सेवेसाठी कंत्राटीकरणाचा निवडलेला मार्ग मुंबईकर प्रवाशांना भलताच त्रासदायक ठरू लागला आहे. पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे वडाळा आगारातील बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालवणार्‍या कंत्राटी चालकांनी रविवारपासून पुन्हा एकदा काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रविवारपासून सुरू असलेलं कंत्राटी चालक आणि इतर कामगारांचं आंदोलन मंगळवारपर्यंत सुरूच होतं. यामुळे वडाळा आगारातून ५० हून अधिक बसगाड्या सुटू शकल्या नाहीत. या आंदोलनादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या काही बसगाड्या सोडल्या खर्‍या. परंतु या बसगाड्यांचे मार्ग आणि संख्या अपुरीच ठरल्याने सोमवारी आणि मंगळवारी अशा आठवड्याच्या सुरूवातीलाच बेस्ट बसने कामावर जाणार्‍या शेकडो प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. कधी कुर्ला, कधी, वांद्रे, कधी कुलाबा तर कधी विक्रोळी अशा आगारांमध्येही अनेकदा कंत्राटी कामगारांनी संप पुकारलेला आहे.

बेस्ट उपक्रमाकडून बृहन्मुंबई महापालिका, नवी मुंबई, ठाणे आणि मिरा रोड, भाईंदर क्षेत्रात परिवहन सेवा पुरवण्यात येते. उपक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ३८०० पर्यावरणस्नेही बसगाड्यांच्या माध्यमातून ५०५ बसमार्गांवर ६३,७०० फेर्‍या चालवल्या जातात. या फेर्‍यांच्या माध्यमातून दररोज सरासरी २.९ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. पहिली लोकल ट्रेन पकडायची असो किंवा शेवटची ट्रेन हुकलेली असोत प्रत्येक अडचणीच्या वेळी बेस्टची बस प्रवाशांच्या सेवेला हजर होतेच होते. मुख्य मार्गापासून ते छोट्या, अरूंद रस्त्यावर, महामुंबईच्या कानाकोपर्‍यात १९२६ सालापासून ते आतापर्यंत बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही खर्‍या अर्थाने महामुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा कणा ठरलेली आहे. परंतु अंतर्गत राजकारण, आधुनिकीकरणाला झालेला उशीर, व्यवस्थापनाकडे केलेला कानाडोळा आणि प्रवाशांच्या सोईच्या परंतु तितक्याच व्यावसायिक पद्धतीने बस सेवा चालवण्यात आलेल्या अपयशामुळे मागील काही वर्षांमध्ये बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेला आहे. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या निधी पुरवठ्याच्या जोरावर उपक्रमाची सेवा तग धरून असली, तरी ती तोट्यातून निव्वळ नफ्याकडे घेऊन येण्यास आजही उपक्रमाला म्हणावं तितकं यश आलेलं नाही.

मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू होताच २४ मार्च २०२० पासून लोकलसेवा बंद करण्यात आली होती. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी मोठा दिलासा दिला. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असताना प्रवासासाठी सर्वसामान्य मुंबईकरांची पावलंही उपक्रमाच्या बसगाड्यांकडे वळू लागली. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या बेस्टच्या बसगाड्या हेच सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले. लॉकडाऊनआधी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यातून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करत होते. कोरोना काळात प्रवाशांची संख्या कमालीची घटली असली, तरी ती हळुहळू वाढू लागली. परंतु उपक्रम नफ्यात येऊ शकला नाही. या आर्थिक संकटावर उतारा म्हणून बेस्ट उपक्रमाने कंत्राटीकरणाचा मार्ग अवलंबला आहे. वाढत्या तोट्यावर उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी बेस्ट उपक्रमाने बसगाड्या भाडे तत्वावर घेतल्यानंतर चालक आणि वाहकांचीदेखील कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली.

नव्या धोरणानुसार, एसटी महामंडळाच्या धर्तीवर बेस्टमध्ये अनेक सेवा कंत्राटी तत्वावर चालवल्या जात आहेत. त्यासाठी निविदामार्फत निवडण्यात आलेल्या कंत्राटदारांना बेस्ट उपक्रमामार्फत ठरल्यानुसार रक्कम दिली जात आहे. यामाध्यमातून उपक्रमावरील आर्थिक बोजा कमी करण्यासोबतच शहर आणि उपनगरातील प्रवाशांना चांगली सेवा देणं हा देखील त्या मागचा उद्देश होता, परंतु कंत्राटदार कंपन्यांकडून चालक-वाहक आणि इतर कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि कंत्राटी कामगारांचं संप पुकारणं याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बेस उपक्रमाच्या सेवेला आणि ग्राहकांना सातत्याने बसू लागला आहे. यामुळं कंत्राटी पद्धतीने बस सेवा चालवण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. बेस्ट कंत्राटदाराकडून कंत्राटी चालक, कामगारांना मासिक पगार आणि अन्य लाभ दिले जात नसल्याचे वारंवार आढळून आले आहे. सध्या बेस्टमध्ये ६ कंत्राटदारांकडून विविध आगार, मार्गांवर बससेवा चालविल्या जात आहेत. त्यापैकी काही कंत्राटदार त्यांनी नियुक्त केलेले चालक, कामगारांचे पगार थकीत ठेवत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरत आहे. त्यातूनच कुठल्या ना कुठल्या आगारांत बेस्टचे कंत्राटी कामगार आंदोलन पुकारताना दिसतात.

बेस्टच्या कंत्राटी चालकांना महिना १६ ते १८ हजार रुपये पगार मिळतो. सुट्टीच्या दिवसांचा समावेश केल्यास पगाराची रक्कम आणखी कमी होते. असे असूनही कधी ३-४ तर कधी ५ ते ६ महिने पगार नियमित मिळत नसल्याची तक्रार कंत्राटी कामगार करतात. अनेकदा केवळ ५० टक्केच पगार कामगारांच्या खात्यात जमा केला जातो. तर कंत्राटदार कंपनीकडून ६ महिन्यानंतरही भविष्य निर्वाह निधी देण्यात आलेला नसल्याचा आरोप चालक करतात. कंत्राटातील अटी, शर्थींचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा बेस्ट उपक्रमाला अधिकार आहे. त्यात दंडवसुली किंवा कंत्राट रद्दबातल करणे अशा पर्यायांचा समावेश आहे. परंतु अशी एखादी घटना घडल्यास, कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्यास कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोकळ आश्वासन बेस्ट उपक्रमाकडून दिले जाते. प्रत्यक्षात कुठलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत नाही. प्रत्येकवेळी कंत्राटदार कंपनीला पाठिशी घालण्याचेच काम बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येते. यामुळं कंत्राटदार कंपनी मस्तवाल मालकाच्या भूमिकेतून कंत्राटी कामगारांवर अन्याय करतच राहते. बेस्टच्या कंत्राटी चालक-वाहक आणि इतर कर्मचार्‍यांच्या तक्रारी किंवा त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची तीव्रता बेस्ट प्रशासनाने वेळीच समजून घेतली तर कर्मचार्‍यांना आंदोलन पुकारण्याची वेळच येणार नाही. त्याचा नाहक त्रास प्रवाशांनाही होणार नाही आणि आर्थिक फटका बेस्ट उपक्रमालाही बसणार नाही, असं या कंत्राटी कामगारांचं म्हणणं आहे.

बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोईच्या दृष्टिकोनातून तसेच इंधनखर्च वाचवण्यासाठी जुन्या बसगाड्या भंगारात काढल्या. त्यानंतर वाहतूककोंडीतून सहज मार्ग काढू शकतील, इंधनखर्च वाचवू शकतील, अशा मिनी बसगाड्या घेतल्या. साध्या मिनी बसगाड्यांसोबतच मिनी एसी बसगाड्यांचाही त्यात समावेश झाला. इलेक्ट्रिक बसगाड्याही आता उपक्रमाच्या ताफ्यात हळुहळू सामील होऊ लागलेल्या आहेत. यातील बहुतांश बसगाड्या कंत्राटावर घेण्यात आल्या आहेत. जेणेकरून कमी प्रवासीसंख्येच्या मार्गांवरून चालवल्यावर देखील तोटा होऊ शकणार नाही. तोट्यातील, कमी प्रवासी संख्येचे मार्ग बदलण्यात आले. नव्या बसमार्गांवर सेवा सुरू करण्यात आल्या, ३८०० बसगाड्यांपैकी अंदाजे दीड हजारांहून कमी-अधिक बसगाड्या उपक्रमांच्या स्वमालकीच्या असतील. पण या निर्णयाचा निश्चितच बस प्रवाशांना फायदा होऊ लागलेला आहे. परंतु दुसरीकडं चालक-वाहक आणि इतर कर्मचार्‍यांचं कंत्राटीकरण केल्याचा आर्थिक फायदा वगळता उपक्रमाच्या सेवेला त्याचा फटकाच बसत असल्याचं दिसत आहे.

कंत्राटदारांकडूनच कंत्राटी चालकांची नेमणूक केली जाते. या नेमणुकीदरम्यान चालक आणि वाहकांची लायसन्स आणि बॅजची तांत्रिक पूर्तता करण्यापलिकडं कंत्राटदार कंपनीकडून त्यांना योग्य प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे. हे प्रशिक्षण बसगाड्या चालवण्यापुरतं मर्यादित नसून बेस्ट उपक्रमाचा वारसा आणि सेवेचं महत्त्व कंत्राटी कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचवण्यातही कंपन्या तोकड्या पडताना दिसत आहेत. त्याचा फटका उपक्रमाच्या सेवेला बसत आहे. बेस्टच्या सेवेत असलेल्या कायमस्वरूपी कामगारांना दाद मागायची असेल तर निदान बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट कामगार संघटना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट कर्मचारी परिवहन संघ, बेस्ट जागृत कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ आदींचे पाठबळ तरी आहे. परंतु कंत्राटी कामगारांना या संघटनांचे पाठबळ मिळत नसल्याने कंत्राटदार कंपन्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीवर दाद मागायची कुणाकडं असाही प्रश्न या कामगारांपुढं निर्माण होत आहे.

वाहतूक तज्ज्ञांच्या मते बेस्ट उपक्रमाचं खासगीकरण करण्याऐवजी त्याचं केवळ व्यावसायिकरण करणंच महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे अख्ख्या महामुंबईत मेट्रो मार्गांचा विस्तार होत असला तरीही भविष्यात बेस्ट बससेवेची आवश्यकता भासणार आहेच. यामुळं बेस्ट सेवा अतिशय व्यावसायिक पद्धतीने आणि कर्मचार्‍यांनीही शिस्तीने काम करणं आवश्यक आहे. खासगीकरणापेक्षा बेस्ट फेर्‍या, बसगाड्यांची देखभाल-दुरुस्ती, बस थांब्यावरील प्रवाशांसाठी सुविधा या आणि अन्य बाबींवर व्यावसायिक पद्धतीने काम करणे ही काळाची गरज आहे. बेस्ट थांबे आणि आगारातील मोकळ्या जागांचा कल्पकतेने वापर करून तेथे प्रवाशांसाठी शौचालये, विश्रामगृहे बांधण्यात यावीत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी बेस्ट बससेवेकडे आकर्षित होतील.

बस चालक हा कायमस्वरूपी असो किंवा कंत्राटी आजही बहुतेक बेस्ट थांब्यावर प्रवाशांची गर्दी असो किंवा नसो चालक बस न थांबवताच पुढे दामटवतात. यामागचं कारण केवळ फेर्‍या पूर्ण करणे हे कर्मचार्‍यांचे लक्ष्य असतं. मात्र, या प्रयत्नात अनेकदा रिकाम्या बस धावताना दिसतात. हे टाळण्याची गरज आहे. आता छोट्या बस आल्याने किमान तेवढ्या तरी पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी न्यायालयाने स्थानक परिसरात १५० मीटरचे निर्बंध घातले आहेत. या धर्तीवर बेस्ट थांब्यापासून विशिष्ट मीटर अंतरावर रिक्षा-टॅक्सींना निर्बंध घालणे आवश्यक आहे.

बसच्या प्रत्येक थांब्यावर येणार्‍या बसचे साधे वेळापत्रक लावण्यासोबत त्याच वेळेत बस प्रवाशांच्या सेवेत हजर होईल, याकडंही कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून बेस्ट बसचे प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडं न वळत बसलाच प्राधान्य देतील. बेस्ट उपक्रमाने बससेवेच्या काटेकोर व्यवस्थेला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. बेस्टचा कारभार सुरळीत चालावा आणि प्रवाशांच्या मागण्या जाणून घेता याव्यात यासाठी विशिष्ट कालावधीनंतर बैठका घेणे गरजेचं आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कर्मचार्‍यांच्या जीवावर ही सेवा सुरू आहे. ते कामगार कंत्राटी असोत किंवा कायमस्वरूपी असो, सर्वच कर्मचार्‍यांना त्यांचे लाभ म्हणजे पगारापासून नियमित भविष्य निर्वाह निधी, सुट्ट्या मिळत आहेत की नाहीत, कर्मचार्‍यांच्या काही तक्रारी आहेत की नाही, त्या सोडवल्या जात आहेत की नाही, हेदेखील उपक्रमाने गांभीर्याने बघितले पाहिजे. कर्मचारी समाधानी असल्याशिवाय कुठलीही कंपनी वा सेवा ही कार्यक्षमपणे चालू शकत नाही. हे ओळखून बेस्ट उपक्रमाने यंत्रणेतील आधुनिकीकरणासोबतच मॅन मॅनेजमेंट अर्थात मनुष्यबळाच्या योग्य व्यवस्थापनाकडंही लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच उपक्रमाची परिवहन सेवा ही प्रवाशांसोबतच कर्मचार्‍यांसाठीही ‘बेस्ट’ ठरू शकेल.