घरसंपादकीयओपेडबेस्टने करून दाखवलं, बाकीचे कधी करणार?

बेस्टने करून दाखवलं, बाकीचे कधी करणार?

Subscribe

मोबाईलचा स्पीकर वापरून कुणी गाणी ऐकत असेल, मोठमोठ्यानं बोलत असेल तर त्या प्रवाशाला समज देण्याची सूचना बसचे चालक, वाहक आणि तिकीट तपासनीस यांना प्रशासनाकडून करण्यात आलीय. समज देऊनही संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर त्या प्रवाशाची थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं बेस्ट प्रशासनानं ठरवलंय. बेस्टने बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्याच्या दिशेने पाऊल उचलून करून दाखवलं आहे, आता बाकीच्या आस्थापना असे पाऊल कधी उचलणार?

झलक दिखला जा…ओss…ओss… म्हणत गाण्याचा किंबहुना घसा खाकरून बसमध्ये बसलेल्या सहप्रवाशांच्या डोक्यात तिडीक जाईल, असा कर्णकर्कश्श सूर लावत किंचाळणार्‍या कॉलेजकुमारांच्या ग्रुपला कंडक्टरने दरडावताच त्यातील एकजण वस्सकन कंडक्टरच्याच अंगावर आला. आम्ही तिकीट काढून बसमध्ये बसलोय… तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? ही बस सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमच्या घरची नाही…असं म्हणत डोळेही वटारले. काय करणार बिचारा जनतेचा नोकर गपगुमान झाला आणि तिकीट… कुणाचं तिकीट घ्यायचं शिल्लक आहे, म्हणत पुढं निघून गेला. हे अपवादात्मक उदाहरण मुळीच नाही. मित्रमंडळी एकत्र आल्यावर थोडाफार कल्ला तर होणारच, पण त्याशिवाय फोनवर मोठमोठ्यानं बोलून घरगुती कलह, क्लेश, मित्र-मैत्रीणीशी लाडीगोडी, रूसवे-फुगवे, कामाधंद्यातले वादविवाद, सहकार्‍यांशी गप्पा टप्पा… इच्छा नसूनही सहप्रवाशांना ऐकवणारे महाभाग आपल्याला दररोजच्या प्रवासात शेकडोंनी भेटतात, तर अनेकवेळेस आपणही त्यातलेच एक झालेलो असतो.

दुसर्‍याचं बोललेलं कानावर पडून आपणही कळत न कळत या प्रवासादरम्यान काही काळापुरतं त्या भावविश्वात भरकटून जातो. मूड स्वींग, मूड ऑफ चेंजचा अनपेक्षितपणे अनुभव घेतो. हाच मूड आपल्या घरी वा दारी…अगदी कुठंही अनपेक्षितपणे कॅरी करतो. म्हणजेच या सकारात्मक-नकारात्मक स्वभाव लहरी स्वत:सोबत वहावत नेतो. तासभर वा काही मिनिटं एखाद्या त्रासलेल्या व्यक्तीचं संभाषण इच्छा नसताना कानावर पडल्यावर आपलीही चिडचिड न झाली तरच नवल. तसं होत नसेल तर आपल्या रोजच्या वर्तनवादी सवयीनं आपल्याच अंतिद्रिंयाला इतकं गौण ठरवलं आहे की जाणिवेची भावना अगदीच बोथट झालीय, म्हणून समजा, पण सजग लोकांचं तसं नाही.

- Advertisement -

जागृत सहप्रवाशांना या भणभणीचा त्रास झाल्याशिवाय रहात नाही. हे सारं तत्वज्ञान घोळण्याचं निमित्त हेच की काही दिवसांपूर्वीच बेस्ट प्रशासनानं एक स्तुत्य निर्णय घेतलाय. तो म्हणजे प्रशासनाकडून बेस्टच्या बसमध्ये मोबाईल फोनवर मोठमोठ्यानं बोलण्यास, गाणी वाजवण्यास मनाई करण्यात आलीय. या नियमाचं उल्लंघन करणार्‍या प्रवाशावर कारवाई करण्याचं बेस्ट प्रशासनानं ठरवलंय. बसमधील सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बेस्ट प्रशासनानं स्पष्ट केलंय. यासंबंधीचे अधिकृत आदेशही काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून जारी करण्यात आलेत. नियम मोडणारा प्रवासी कुणाचही ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नसेल, तर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेशदेखील बेस्ट प्रशासनाने दिलेत.

बस बेस्टची असो वा एसटीची, मुंबई लोकल वा लांब पल्ल्याची ट्रेन असो किंवा नव्याने दाखल झालेली मेट्रो. सगळीकडं आपल्याला हेच चित्र दिसून येतं. त्यातही बेस्ट बस आणि लोकल ट्रेनचंच उदाहरण द्यायचं झाल्यास बेस्ट बस आणि लोकल ट्रेन मुंबईची जीवनवाहिनी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखली जाते. या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. त्यातील बहुतांश प्रवासी आपल्याला मोबाईलमध्ये व्यग्र असलेले दिसून येतात. त्यापैकी काही प्रवासी मोबाईलवरून इतर व्यक्तीशी मोठमोठ्या आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठ्या आवाजात गाणी ऐकत असतात. लोकलमध्ये सकाळ वा सायंकाळच्या ऑफिस अवर्समध्ये टाळ कुटणारी भजनी मंडळी म्हणजे कहरच. भक्तीभावाच्या नावाखाली टाळ-चिपळ्या, कधीकधी डब्याच्या खिडक्या-पत्रे वाजवून ते डब्यात जो काही उच्छाद मांडतात, त्याला कशाचीही तोड नाही.

- Advertisement -

काय तो सुरेल आवाज आणि त्याला टिपेला पोहोचणार्‍या कोरसची साथ… मोहम्मद रफीलाही लाजवेल… याचा सहप्रवाशांना त्रास होत नसेल? पण काय करणार त्यांनाही धाकानं मूग गिळून गप्प बसावंच लागतं. कुठल्या प्रवाशानं जरा हळू आवाजात तुमचा घसा खाकरा… असा सल्ला दिल्यास वा समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडं लक्ष दिलं जात नाही. त्यातही कुणी समाजसेवकानं इतरांना होणार्‍या त्रासावरून त्यांना कायदा शिकवण्याचा प्रयत्न केलाच, तर ते घोळक्यानं अंगावर आल्यावाचून रहात नाही. त्यामुळं कशाला तो वाद आणि किटकिट नको म्हणून अनेकजण कर्णपटलांवर होणारा हा अत्याचार निमूटपणं सहन करतात. बेस्टच्या बसमधील वाहक आणि चालकांनाही अशाच प्रकारचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत सातत्याने आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणार्‍या वा गाणी ऐकणार्‍या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सहप्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून फोनवर बोलताना, गाणी ऐकताना इयर-फोनचा वापर करण्याचं आवाहन बेस्ट प्रशासनानं प्रवाशांना केलं आहे. या आवाहनाकडं दुर्लक्ष करून मोबाईलचा स्पीकर वापरून कुणी गाणी ऐकत असेल, मोठमोठ्यानं बोलत असेल तर त्या प्रवाशाला समज देण्याची सूचना बसचे चालक, वाहक आणि तिकीट तपासनीस यांना प्रशासनाकडून करण्यात आलीय. समज देऊनही संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर त्या प्रवाशाची थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं बेस्ट प्रशासनानं ठरवलंय. बेस्ट प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर पोलीस कायद्यानुसार (कलम ३८/११२) नुसार कारवाई करण्यात येईल. याबाबतचं परिपत्रकही बेस्टच्या सर्व बसमध्ये लवकरच लावण्यात येणार आहे. बेस्टच्या या प्रयत्नांना खरोखरच दाद द्यावी लागेल.

पण लोकल ट्रेनचं काय? मध्यंतरी सातत्याने तक्रारी आल्यानंतर भजनी मंडळींवर कारवाई करण्याचं रेल्वे प्रशासनानं ठरवलं होतं, पण या कारवाईसाठी तुडूंब भरलेल्या लोकल ट्रेनच्या गर्दीत पाऊल ठेवण्याचं धाडस मात्र रेल्वे पोलीस वा प्रशासनाला झालं नाही. त्यामुळं ही कारवाई काही दिवसांनी थंड पडली. कामधंद्याच्या निमित्तानं महामुंबईच्या एका टोकाहून दुसर्‍या टोकाला पोहोचणार्‍या मुंबईकरांचं निम्मं आयुष्य प्रवासात जातं. फोनवर मोठमोठ्यानं बोलणं हे काही त्रासाचं एकमेव उदाहरण नाही. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू-गुटखा खाऊन थुंकणं, कचरा टाकणं, ध्रुमपान करणं, सार्वजनिक ठिकाणी विधी उरकणं अशी एकाहून एक उदाहरणं आपल्याला सांगता येतील.

अशा लोकांना तुम्ही चार समजुतीचे शब्द सांगायला जाल, तर त्यांचे आठ उलटे शब्द ऐकून घ्यावे लागतील, ही परिस्थिती कुठल्या गावखेड्याची-शहराची नाही, तर संपूर्ण देशातलीच आहे. न शिकलेल्या, कमी शिकलेल्याच नाही, तर उच्च शिक्षित हायफाय इंग्रजी झाडणार्‍यांचाही यांत समावेश आहे. यामागचं कारण आहे ती भारतीयांची मानसिकता. या लोकांना कायदा शिकवायचा प्रयत्न करून तर बघाच, संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांचा धडा ते आपल्याला शिकवतील, पण तसं करताना त्याच संविधानानं दिलेल्या मूलभूत कर्तव्यांकडं मात्र ते डोळेझाक करतील.

काही दिवसांपूर्वी देशातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने युरोपचा दौरा केला. या दौर्‍यात तेथील साफसफाई पाहून तो भारावून गेला, पण त्याचसोबत तिकडच्या लोकांच्या मानसिकतेचंही त्यांना कौतुक वाटलं. अनेकांकडं कुत्रे-मांजरासारखे पाळीव प्राणी होते. त्यांची ते जितक्या प्रेमाने आणि जबाबदारीने देखभाल करत होते, तितक्याच जबाबदारीने आपली नागरी कर्तव्य निभावताना त्यांना दिसले. पाळीव प्राण्यांसोबत बाहेर फिरायला गेल्यावर प्राण्याने रस्त्यावर विष्ठा केली तर ती उचलून ते योग्य ठिकाणी टाकत होते. तिथं भारतासारखं जागोजागी कचरा, कागद-प्लास्टिकच्या पिशव्या, भटके प्राणी रस्त्यावर दिसत नव्हते.

जागोजागी गुटखा-तंबाखूच्या पिचकार्‍या दिसत नव्हत्या. कारण आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे तिकडचे नागरिक आपलं कर्तव्य समजतात. तिथं चौकाचौकात वाहतूक पोलीस उभे असलेले दिसत नाहीत आणि तिथं सहसा वाहतूक कोंडीही होत नाही. तिकडचे नागरिक शांतपणे रस्ते वाहतुकीचे नियम पाळत असतात. त्यामुळं पादचार्‍यांनाही रस्त्यावरून चालताना अडचण येत नाही, पण आपल्या भारतीयांना ही सर्व कामं सरकारने करावी आणि प्रत्येक गोष्टीचा दोष सरकारला द्यावा, आपलं काही नागरी कर्तव्यच नाही, असं वाटतं. भारतीयांनी सिव्हिक सेन्स अर्थात सार्वजनिक ठिकाणी वागण्याचा सुज्ञपणा युरोपीय देशांकडून शिकायला हवा, असं त्यांचं मत झालं.

नागरिकांना हक्काबरोबर कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ११ मूलभूत कर्तव्यांचा समावेश १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला. नागरिकांना कर्तव्यपालनाची जाणीव करून देऊन राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणं हा यामागील उद्देश आहे व तो योग्यच आहे. ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिन म्हणून पाळला जातो. कदाचित हेही कुणाच्या गावी नसावं. लोकांनी, लोकांचं व लोकांसाठी चालविलेलं सरकार म्हणजे लोकशाही म्हटलं जातं.

लोकांची कर्तव्यं निर्धारित करणं व कर्तव्याचं पालन करण्याचा आग्रह करणं हे देशहितासाठी व देश घडविण्यासाठीच आहे. नागरिकांनी देशाच्या कारभारात लक्ष द्यावं, सहभाग नोंदवावा हेच सुदृढ लोकशाहीसाठी अपेक्षित आहे. त्यामुळंच नागरी कर्तव्य पाळणं प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य ठरतं. काही दिवसांपूर्वीच मोबाईल फोनचे जनक आणि ९३ वर्षीय अमेरिकन इंजिनियर मार्टिन कूपर यांनी या संशोधनाबद्दल दु:ख झाल्याचं म्हटलं होतं. मोबाईलचा आवश्यकतेपेक्षा अतिवापर ही त्यांची तक्रार होती. यावर सविस्तर चर्चा करता येईल. तूर्तास सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर हळू आवाजात बोललं तरी पुरेसं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -