घरसंपादकीयओपेडचॅट जीपीटी, मशीनच्या सर्जनशीलतेची सुरुवात

चॅट जीपीटी, मशीनच्या सर्जनशीलतेची सुरुवात

Subscribe

माहितीच्या क्षेत्रात येत्या काळात ज्या तंत्राचा गडद परिणाम होणार आहे, त्यात चॅट जीपीटी Chat GPT हे प्रमुख तंत्रज्ञान असेल. इंटरनेटच्या जगात येत्या काळात चॅट जीपीटीमुळे होणारे बदल आमुलाग्र आणि दीर्घकाळ परिणाम करणारे असे आहेत. त्यामुळे लाँचिंगपूर्वीच याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी एवढी उत्सुकता आहे की घोषणेनंतर काही तासातच कोटीच्या संख्येने यात लॉगिन आणि सबस्क्राईबर्स, व्ह्युवर्सची संख्या समोर आली आहे.

यूट्यूबवरील चॅट जीपीटीची माहिती देणारे व्हिडीओज अचानक वाढले आहेत. यातील ढोबळ माहितीही पाहिली तपासली जात आहे. हे नवे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान गुगललाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. गुगलमध्ये एखाद्या गोष्टीची माहिती विचारल्यास लेखी स्वरुपात माहिती समोर येते. माहितीचा हा डेटाबेस मानवी मनाबाबत संवेदनशील नसतो, पत्रकार, साहित्यिक, लेखक, शिक्षक किंवा माहिती गोळा करणारे अनुवादाच्या कामातही आजपर्यंत गुगल ट्रान्सलेशनचा होणारा वापरही चॅट जीपीटीमुळे संपुष्टात येईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गुगलकडून होणारा अनुवाद शब्दानुवादच असल्यामुळे आणि आशय विषय, संवेदना, शब्दयोजनेच्या बाबत उदासीन असतो. ही उदासीनता या तंत्राच्या निर्जिवतेमध्ये आहे. त्यामुळेच आजी माजी या मराठी शब्दाचा अर्थ गुगल अनुवाददाता ग्रँडमदर असा, करतं.

नातेसंबंध, तर खरे, खोटे ही आडनावंही असू शकतात हे गुगलला माहीत नसतं. त्यामुळेच या शब्दाचाही इंग्रजीतील शब्दार्थ ट्रू, फॉल्स, गुगलच्या सर्च इंजिनकडून घेतला जातो. गायधनी हे आडनाव असल्याचं गुगलला माहीत नाही, त्यामुळे या शब्दाचा इंग्रजी अनुवाद Cow owner असा गूगलकडून केला जातो. पत्रकारितेत अनुवादाचं काम करणार्‍यांना भावानुवाद, शब्दानुवाद, अर्थानुवाद, आशयानुवाद असे अनुवादाचे सर्वच प्रकार ज्ञात असावे लागतात. अन्यथा पुलंनी सांगितलेल्या माय स्वीट हनीचा माझ्या गोड मधा…सारखा शब्दशः गोंधळ उडतो. बैल गेला झोपा केलाचा अर्थ थेट The bull went to sleep असाच होऊन जातो. ठामपाचं TMC असल्याचं किंवा बृन्मुंमपाचं BMC असला प्रकार तिथं नसतो.चॅट जीपीटी Chat GPT मध्ये हे तांत्रिक गोंधळ टाळले जाणार असल्याचं म्हटलं जातंय, संगणकाला काही अंशी मानवी, जाणिवा आणि संवेदना बहाल करणारं हे नवं तंत्रज्ञान आहे.

- Advertisement -

संगणकात जे प्रश्न विचारले जातील त्याचं मानवी संवेदनांच्या जवळपास पोहचण्याचा प्रयत्न करून त्या अनुषंगाने छाननी होऊन उत्तर मिळवलं जाईल. चॅट जीपीटीतून जी कमांड दिली जाईल, त्याचं योग्य उत्तर काढण्यासाठी जवळपास सर्च इंजिनसारखंच तंत्रज्ञान असलेल्या या प्रणालीत सर्च इंजिनमधल्या जवळपास हजारो सर्व्हरमधून माहिती गोळा केली जाईल, प्रश्नाचा योग्य हेतू, उद्देश ध्यानात घेण्याचं काम ही प्रणालीच करेल. त्यातून प्रश्नकर्त्याला माहिती लिखित स्वरुपात दिली जाईल. हे काही सेकंदातच होईल. ही प्रणाली उपयोगात आणण्यासाठीची तयारी सुरू आहे. समाजमाध्यमांवर या प्रणालीच्या उपयोगितेविषयी घेण्यात आलेली तपासणी, परीक्षा त्याचे निकाल सकारात्मक असल्याचं संबंधित कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चॅट जीपीटी म्हणजे चॅट जनरेटिव प्रिट्रेंड ट्रांसफार्मर असं या प्रणालीचं पूर्ण नाव आहे. आर्टीफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ताक्षेत्रात चॅट जीपीटीमुळे कित्येक मैल पुढचं अंतर कापलं जाणार आहे. या प्रणालीचे मालक सॅम अल्टमनने ओपन एआयच्या सहकार्याने घेतलेली आभासी बुद्धीमत्तेच्या क्षेत्रातील ही मोठी उडी आहे, या उडीच्या वेगासोबत माहितीच्या क्षेत्राला, माहितीच्या क्षेत्रावर आधारित असलेल्या उद्योग, व्यवसायांनाही समांतर पळावं लागणार आहे. मागील वर्षी ३० नोव्हेंबरला ही प्रणाली प्रायोगिक स्वरुपात लाँच झालीय. त्यामुळे अजूनतरी केवळ इंग्रजी भाषेतच त्याचा वापर होतोय. जागतिक आणि स्थानिक भाषांमध्येही ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न सुरू असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळेच जगात दोन अब्जांपर्यंत वापरकर्त्यांनी यात रस दाखवला आहे.

- Advertisement -

चॅट जीपीटीमध्ये वस्तुनिष्ठ शक्यता संपवण्यात येत आहेत. एखादी माहिती सर्च इंजिनला विचारल्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने मिळालेली ठोकळ माहिती या प्रणालीत विचारणार्‍याच्या संवेदनांचा अभ्यास करते, विचारण्याचा हेतू विचारात घेते आणि उत्तर देते, यासाठी मुख्य सर्वरमागील शेकडो संगणकांमध्ये अपलोड केलेल्या आर्टीफिशल्स इंटिलिजन्सच्या प्रोग्रामला मानवी जाणिवांची जोड देऊन एखाद्या मित्राने विचारलेल्या उत्तराला मित्राकडून मिळालेल्या उत्तरासारखं हे उत्तर असतं, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अलेक्झाला शाब्दीक बोलण्यातून आदेश देऊन राबवण्याच्या कित्येक पुढं हे तंत्र जात आहे. संगणकाला प्रश्न विचारल्यास माहितीचे स्रोत वेबसाईटमधून उघडले जात होते. त्या वेबसाईटवरून डाटाबेसमधून आपल्याला हवी ती माहिती घेण्यासाठी सॉर्टींग केलं जात होतं. हे काम आता चॅट जीपीटी स्वतःहून करेल आणि नेमकी आणि मोजकी माहिती समोर आणून ठेवेल. निबंध, यूट्यब चित्रीकरण, स्क्रीप्ट लेखन, कव्हर लेटर, बायोग्राफी, पत्रलेखन, अर्ज, रेस्युमे, अहवाल असं जवळपास सगळ्याचेच पर्याय चॅट जीपीटीनं द्यावेत असं प्रयोजन ही प्रणाली विकसित करणार्‍यांचं आहे.

मुलाखतीचा रोख जर अमिताभच्या जीवनातील आव्हाने, असा केल्यास उत्तरे त्या अनुषंगाने दिली जातात. उत्तरांनी आपले समाधान झालेय का, अथवा नाही असं विचारणारा ऑप्शनही इथं आहे. सातत्याने डेटा अपडेशन हा या प्रणालीचा मुख्य आत्मा आहे. मात्र लाँचिंग ३० नोव्हेंबर २०२२ असं असल्यानं त्यानंतरच्या घटनांची माहिती या प्रणालीत मिळेलच अशी खात्री आतातरी नाही. त्यावर काम सुरू आहे. इथं लेखाच्या स्वरुपात माहिती दिली जातेय. मात्र त्याला सर्जनशीलतेची जोड आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी संवेदनेची जागा घेण्याची सुरुवात खूप आधी झालीय, चॅट जीपीटी हे त्याचं मोठं पाऊल आहे. संगणकाला कमांड देऊन चित्रं किंवा स्केच स्वरुपात मूर्तिचं ढोबळ रेखाटन, उंची, रुंदी, लांबी टाकल्यावर दगडात कोरीव काम केलेली मूर्ती यंत्रातून बाहेर पडेल, असं तंत्र विकसित झाल्याचं एका तुषार मोलेश्वरी या चित्रकार मित्रानं दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं.

चित्रांच्या बाबतीतही तेच त्यात प्रत्यक्ष कॅनव्हास बोर्डवर चित्रकाराकडून येणारे चित्रातले पोत किंवा फटकारे शक्य नसतील, मात्र बहुसंख्य समुदायाला अभ्यासपूर्ण डिटेलिंग जाणून घेण्यात उत्सुकता नसते. चित्रात काढलेला हत्ती, खर्‍याखुर्‍या हत्तीसारखा दिसतोय ना, एवढंच महत्वाचं, कामातला रियाझ आणि मानवी जाणिवांची रंगसंगती अनेकदा महत्वाची नसते. इथं लेखनाच्या बाबतीतही तेच होण्याची शक्यता आहे. मानवी संवेदनेशिवाय कला साकारली जात नसते, कृत्रिम बुद्धीमत्तेतून ही संवेदनाही आत्मसात केली जाण्याची ही सुरुवात आहे. चॅट जीपीटीमुळे येत्या काळात गुगल विस्मृतीत गेल्यास नवल नाही. जसं याहू, आर्कूट विस्मृतीत गेलं. जीमेलमुळे रेडीफ इतिहासजमा झालं, तसंच होण्याची शक्यता आज तरी नाकारता येत नाही. चॅट जीपीटीमुळे पत्रकार, लेखक, शिक्षक, कंटेन्ट रायटर्स आदी नोकर्‍या धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लेखनाच्या क्षेत्रात माहितीपेक्षा विश्लेषणावर भर देणं ही आजच्या काळाची गरज बनलीय.

चॅट जीपीटीमधून हजारो डेटा कलेक्शन, सॉर्टींगमधून येणारी माहिती लेख, जे काय असेल ते, हे त्यामागील डेटाबेसवर अवलंबून आहे. तर डेटाबेसच्या सद्सद्विवेक बुद्धीचं प्रमाण काय असेल, याचा बेस फक्त माहिती असेल तर ठीक, मानवी मदत, सहकार्य, संवेदनेचा अभास धोकादायक होणार नाही का, बरं जाणिवांंचं काय, खर्‍या मानवी मनाच्या जाणिवांचा दिलासा देणारा त्याचा आभास खोटा नसेल का, तेही हरकत नाही, पण निसर्ग, निखळ जीवांच्या जाणिवा, माणूसपण आणि त्या त्या समकाळाचा परिणाम, बुद्धी, घ्राणेंद्रियांना जे सत्य वाटतं किंवा मानलं जातं, त्याचं काय होईल, काळानुसार आऊटडेटेड झालेल्या गोष्टींबाबत मशीनकडून काय प्रयोजन असेल कितपत अपेक्षा ठेवायची, का फक्त इन्फर्मेशन म्हणून एक टूल असेल…पूर्णपणे टूलवर विसंबून राहता येईल का, सद्सद्विवेक बुद्धी माणसालाच वापरावी लागेल, का आणखी काय होईल. बरेच प्रश्न आहेत, पण हे सगळं सकारात्मक असेल असंच वाटतंय…एक मात्र खरं माहिती मिळवण्याच्या परंपरागत जुन्या पद्धती बंद होतील नव्या पद्धती सातत्याने बदलत जातील. माहितीच्या दर्जाची परिमाणं बदलतील, त्याला लिंक, कोडवर्डची नवी भाषा मिळेल. ही भाषा जगण्याचा भाग होईल. ती झिरपत कुटुंब, समाज, संस्कृती आणि भवतालही व्यापून टाकेल, त्यामुळे विचार समजण्याचे प्रयोजन माध्यमात होणारा बदल टाळता येणार नाही.

हा लेख लिहीत असताना समाजमाध्यमांवर माहिती मिळाली की, चॅट जीपीटीला एका विषयावर कविता करण्याचा आदेश वापरकर्त्यांकडून पाठवण्यात आला, तर प्रणालीनं एक कविता लिहून पाठवली. ही कविता आशयरुप, संवेदना आणि मानवी जाणिवेच्या पातळीवर काहीशी खरी उतरल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगलेली होती, मानवी जाणिवा यंत्राच्या ताब्यात जाणं सुरू झालंय का, जर ते तसं असेल तर त्याचा टोकाचा परिणाम काय असेल, राहून राहून रजनीचा रोबोट नावाचा सिनेमा आठवतोय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -