घरसंपादकीयओपेडकाँग्रेस एकटी लढली आणि ‘एकटी’ पडली!

काँग्रेस एकटी लढली आणि ‘एकटी’ पडली!

Subscribe

कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विजयानंतर काँग्रेसमध्ये अतिआत्मविश्वासाचा एक गंड तयार झाला होता. तो रविवारी गळून पडला. काँग्रेसच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना झाली. आप, तृणमूल काँग्रेस, जनता दल (यूनायटेड), राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा सोळा ते सतरा पक्षांचा आघाडीत समावेश आहे, मात्र काँग्रेसने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सहकार्‍यांना सोबत न घेता एकट्यानेच लढवल्या. एकट्यानेच लढवल्याने आज काँग्रेस ‘एकटी’ पडली आहे.

ससा आणि कासवाची शर्यत सर्वांना माहीत आहे. ससा वेगाने धावातो आणि कासव हळुहळू चालत डोंगर सर करत असते. कासवाचा वेग पाहून ससा हिरव्यागार झाडाच्या थंडगार सावलीत एक डुलकी घेऊन पुढे निघू असा विचार करतो, आणि ही आयडियाची कल्पना अंमलातही आणतो. कासव कितीही थकले असले तरी, हळुहळू न थांबता चालत राहते. न थांबता चालत राहिल्याने गती मंद असली तरी कासवाचा विजय होतो. ही गोष्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे, काँग्रेसचा तीन राज्यात झालेला पराभव. मागील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला होता. यंदाही आपणच जिंकणार, जनतेमध्ये राहुल गांधींची आँधी आहे. भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटकातून दिसून आला आहे. केंद्र सरकारविरोधातील नाराजी हिमाचलमध्ये समोर आली आहे.

मोदी आणि भाजपविरोधात जनतेत राग आहे. असे काँग्रेसचेच नेते काँग्रेसच्याच नेत्यांना सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चर्चेप्रमाणे सांगत राहिले. आत्ममुग्धता, आत्मसुखात राहून काँग्रेसने तीन राज्ये गमावली आहेत. या पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया तर ससा आणि कसावाच्या गोष्टीला अधिक पक्की करणारी ठरते. नाना पटोले म्हणतात, २०१८ मधील निवडणुकीत आम्ही विजयी झालो होतो, मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. आता राजस्थान, मध्य प्रेदश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपा विजयी झाली आहे, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार. कोणत्याही व्यक्तीने किती आशावादी असावे, याचे उदाहरण द्यायचे झाले तर आता नाना पटोलेंचे द्यावे लागेल. आशावाद म्हणून त्यांचे वक्तव्य योग्य आहे, पण शर्यत जिंकण्यासाठी फक्त आशावादी असून चालत नाही, तर सातत्याने प्रयास करत राहावे लागतात.

- Advertisement -

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही तिन्ही हिंदी भाषिक राज्ये आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी या राज्यातील विजय हा काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांचे मनोबल वाढवण्यासाठी तर भाजपला कोणीही हरवू शकत नाही, या भाजप नेत्यांच्या गर्वहरणासाठी आवश्यक होता. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विजयानंतर काँग्रेसमध्ये अतिआत्मविश्वासाचा एक गंड नाही म्हटले तरी तयार झाला होता, तो फुगा या विधानसभा निवडणुकीने फोडला आहे. काँग्रेसच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना झाली. दिल्लीतील आप, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, बिहारमधील जनता दल (यूनायटेड), राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, महाराष्ट्रीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी, दक्षिणेतील डीएमके, डावे पक्ष असे विविध सोळा ते सतरा पक्षांचा आघाडीत समावेश आहे, मात्र काँग्रेसने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला. एकट्यानेच लढल्याने आज काँग्रेस ‘एकटी’ पडली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून काँग्रेससोबत लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा अंगावरील झुरळ झटकावे तसे काँग्रेस नेत्यांनी विशेषतः मध्य प्रदेशातील स्थानिक नेत्यांनी समाजवादी पक्षाला दूर झटकले होते. तेव्हाच अखिलेश यादव यांनी म्हटले होते की, जर आम्हाला आधीच सांगितले असते की इंडिया आघाडी ही फक्त लोकसभेसाठी आहे, तर आम्ही लोकसभा निवडणुकीवेळीच यांच्यासोबत जायचे की नाही, याचा विचार केला असता. आम्हाला वाटले होते की इंडिया आघाडी सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र येऊन लढणार आहे. काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करणे हेदेखील प्रमुख कारण राहिले आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे माजी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडून इतरांना सोबत घेऊन लढण्याची मानसिकता दिसलेली नाही, तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत की सचिन पायलट हे निवडणुकीच्या शेवटापर्यंत काँग्रेस नेते ठरवू शकले नाही. कोणताही वाद हा वेळीच सोडवला गेला पाहिजे, मात्र काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा वाद त्यांनी शेवटपर्यंत चिघळत ठेवला. या वादाचं झालेलं गँग्रीन काँग्रेसला पराभवाच्या रूपाने समोर आलं आणि अखेर राजस्थानसारखं मोठं राज्य काँग्रेसने गमावलं. राहुल गांधी, प्रियांका गांधी हे मेहनत करत आहेत, मात्र स्थानिक नेते हे पक्षाचे ध्येय धोरण, कार्यक्रम जनतेपर्यंत नेण्यात पुरते अपयशी ठरत असल्याचे या निकालावरून दिसले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा ससा झाला, अतिआत्मविश्वास काँग्रेसला नडला आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समाजवादी पक्षाची ओळख आहे. याची माहिती काँग्रेस नेत्यांनाही आहे. असे असूनही हिंदी भाषिक राज्यात त्यांनी समाजवादी, आरजेडी, जेडी(यू), आप यांना सोबत घेतले नाही. प्रादेशिक पक्षांना वगळून इंडिया आघाडीचे अस्तित्व काय असू शकते, हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना वगळून इंडिया आघाडी विजयी होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगितले आहे. उत्तर भारतात भाजपचा वरचष्मा असल्याचे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील भाजपच्या विजयाने सिद्ध झाले आहे. हिंदी भाषिक राज्यांचे महत्त्व यासाठी की येथे लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.

यामध्ये विधानसभा निवडणूक झालेल्या तीन राज्यांमध्ये राजस्थानमध्ये २५, मध्य प्रदेशात २९, छत्तीसगडमध्ये ११ जागा लोकसभेच्या आहेत. यापैकी राजस्थानमध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजप विजयी झाली होती. मध्य प्रदेशात २९ पैकी २८ जागा मिळाल्या होत्या. छत्तीसगडमध्ये ११ पैकी ९ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये तेलंगणा हे दक्षिणेतील राज्य जोडल्यास तिथे लोकसभेच्या १७ जागा आहेत, त्यापैकी चार जागांवर भाजपला यश मिळाले होते. म्हणजे रविवारी निकाल जाहीर झालेल्या चार राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण ८२ जागा आहेत, त्यापैकी ६६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. भाजपला लोकसभेत बहुमत असले तरी अजून राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे अनेक कायदे करत असताना त्यांना इतर पक्षांची मनधरणी करावी लागते. आता भाजपच्या राज्यसभेतील जागाही या विजयामुळे वाढणार आहेत.

काँग्रेसने मोठ्या जल्लोषात पाटणा, बंगळूरु आणि मुंबईमध्ये बैठका करत इंडिया आघाडीची स्थापन केली, मात्र लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेतले नाही. यावर संजय राऊत यांनी बोट ठेवले आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना सोबत घेतले असते, तर काँग्रेसची कामगिरी यापेक्षा चांगली राहिली असती. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादीचे काही भागात वर्चस्व आहे. त्यांना सोबत घेऊन काँग्रेस लढली असती, तर काँग्रेसला एवढा मोठा फटका बसला नसता. काँग्रेस प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यास अजूनही तयार दिसत नाही. राऊत म्हणाले, तीन राज्यांच्या पराभवातून काँग्रेसने एक धडा घेतला पाहिजे की, इंडिया आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजे.

मग त्या निवडणुका विधानसभेच्या असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरील. एक टीमवर्क म्हणून काम केले पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्रात युतीत असलेला वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत येण्यासाठी काँग्रेसला वारंवार चर्चेचे आवाहन करत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यासाठी अनुकूलता दर्शवत असले तरी राष्ट्रीय पातळीवर यासाठी काही घडत आहे, असे दिसत नाही. उत्तर प्रदेशातील मायावती यांची बहुजन समाज पार्टी आणि नव्याने उभे राहू पाहात असलेला चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मीदेखील अजून इंडियातून बाहेर आहे. उत्तर भारतातील या दोन्ही पक्षांनी मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसला अनेक जागांवर झटका दिला आहे. प्रादेशिक पक्षांसोबतची काँग्रेसचा हा दुरावा त्यांना लोकसभेच्या या सेमी फायनलमध्ये महागात पडला आहे.

येत्या सहा डिसेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याबाबत त्यांनी सर्वाधिक चर्चा करण्याची गरज आहे. इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाचे त्यांच्या त्यांच्या राज्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्यानुसार त्यांना जागावाटप होणे आवश्यक आहे. त्यावरही आतापासूनच चर्चा करून मार्ग काढला गेला पाहिजे. कारण आता लोकसभा निवडणुकीसाठी मार्चमध्येच आचारसंहिता लागू होईल असे काही नाही. जानेवारीमध्ये राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे यापुढे जर काँग्रेस पुन्हा एकट्याने लढली तर आतासारखीच ‘एकटी’ पडेल हे निश्चित.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -