घरसंपादकीयओपेडदीक्षाभूमीवरील गर्दीला लोकशाही आणि मानवतावादाची चिंता!

दीक्षाभूमीवरील गर्दीला लोकशाही आणि मानवतावादाची चिंता!

Subscribe

राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या सभांचा धुरळा उडालेला होता. गर्दीचे उच्चांक मोडणारे, गर्दी निष्ठावंतांची की, भाड्याची असे आरोप प्रत्यारोपांच्या आरोळ्या मुंबईतल्या वातावरणात कानठळ्या बसण्यापर्यंत दिल्या जात होत्या. एसटी बसेस, वाहन रांगा, दुचाकींची रॅली, लोकल ट्रेनमधून माणसं भरभरून आणली जात होती. प्रसारमाध्यमांवर परस्पविरोधी नेत्यांच्या झुंजी लावल्या जात होत्या. सीमोल्लंघन, विरोधकरुपी रावणाचं दहन, राजकीय म्यानातून परस्परविरोधी विचारांच्या तलवारी उपसल्या जात होत्या. दोन्ही गटांकडून पूर्ण ताकदीने एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात असताना तिकडे नागपुरात दीक्षाभूमीवर लोकशाही आणि मानवतावादाची चिंता वाहणारी गर्दी जमली होती.

– संजय सोनावणे
नागपूरच्या दीक्षाभूमीवरील गर्दी महामानवाला वंदन करणार्‍यांची होती. हे वंदन, हा माणसांचा वेग नागपूरमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या चाकांचा होता. या ठिकाणी बायाबापडे, वयोवृद्ध, महिला, मुले, पुरुष दरवर्षी येतात. कोट्यवधींची पुस्तके खरेदी करतात. दीक्षाभूमीवर नतमस्तक होतात आणि आपापल्या घरी निघून जातात. ही गर्दी वाहनं भाड्याने घेऊन आणलेली नसते, या गर्दीसाठी जेवणावळी झडत नाहीत. या गर्दीची चर्चाही वृत्तमाध्यमांवर होत नाही. मात्र ही गर्दी दरवर्षी न चुकता येतेच. अशीच गर्दी सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरही होते. ही गर्दी राजकीय स्वरुपाची नसते, विचार ऐकण्यासाठीही आलेली नसते. या गर्दीला राजकीय टीकांमध्ये होणार्‍या आरोपांबाबत खरं खोटं ठरवायचं नसतं. मग ही गर्दी का होते? कुठून येते?
ही गर्दी आपला सामाजिक स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येते. बुद्धाच्या करुणामय भेटीसाठी येते. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येते आणि धम्माचे पुस्तकरुपी दान घेऊन निघून जाते. यंदाही दीक्षाभूमीवर जवळपास पाच कोटींहून अधिक किमतीच्या पुस्तकांची विक्री झाल्याची बातमी दसर्‍याला उशिराने दाखल झाली. ही गर्दी गुरुवारीही कायम होती. पुस्तकांची खरेदी विक्री जोरदार सुरू होती. हातात संविधान घेतलेल्या आणि संसदेकडे जाणार्‍या मार्गाने बोटांची दिशा दाखवणार्‍या महामानवाला वंदन करण्यासाठी ही गर्दी दरवर्षी नागपूरमध्ये होते. या गर्दीला शस्त्रपूजनात रस नसतो. 14 ऑक्टोबर 1956 नंतर या गर्दीने आपली ढोरं सोलणारी परंपरागत हत्यारं टाकून दिली आणि हातात लेखणी घेतली. या पाटी पेन्सील आणि लेखणीच्या वहीसोबतच ओघानं पुस्तकं येणारच होती. या गर्दीचं एकच हत्यार असतं, पुस्तकं आणि लेखणीचं….या गर्दीला आत्मियता असते ती महामानवाने साकारलेल्या संविधान नावाच्या सर्वात मोठ्या पुस्तकाविषयी…म्हणूनच ही गर्दी कायद्याची भाषा करते आणि कायद्यानुसारच वर्तन करते. कायदे मोडण्याची भाषा, संसदीय लोकशाही ही गर्दी धाब्यावर बसवायला मुळीच तयार नसते. राजकीय चिखलफेकीत या गर्दीला रस नसतो, मात्र देशातल्या लोकशाहीची काळजी करणारी ही गर्दी असते.
शिवतीर्थावरील भाषणात त्याच दिवशी पक्षप्रमुखांकडून भारतातील लोकशाहीविषयी चिंता व्यक्त केली जाते, मात्र ही चिंता कितपत गंभीर आहे याची समज राजकीय चिंतानिष्ठांना बिलकूल नसते. कुठल्याही परिस्थितीत आपलं माणूसपण आणि आपल्या मतदानाचा अधिकार कुणाच्याही पायाशी कुठल्याही परिस्थितीत वाहता कामा नये, हा धडा दीक्षाभूमीनं दिलेला असतो, त्यातून हुकूमशाहीचा मार्ग प्रशस्त होण्याच्या धोका दीक्षाभूमीवर होणार्‍या गर्दीनं त्याआधीच समजून घेतलेला असतो. मुंबईतल्या राजकीय सभेमध्ये हा धोका जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातो. भावनिकता हा भूक आणि गरीबीला पर्याय कधीही नसतो? एवढी साधी समज ही गर्दी जमवणार्‍यांमध्ये नसते. मात्र ही समज ज्यांना असते, अशांची गर्दी नागपुरात झाल्यानं सत्तेच्या पलिकडेही मानवता आणि माणूसपणाच्या स्वाभिमानाची परंपरा राजकीय सभांच्या मुंबईतल्या धुराळ्यातही नागपूरमधून जपली जाते. ही गर्दी दुसर्‍या दिवशीही संपलेली नसते, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणार्‍यांना सत्तेपेक्षा लोकशाही आणि मानवतावादाची चिंता असते, हे दुसर्‍या दिवशीही अधोरेखित होते.
म्हणून नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. त्यानंतर अकोला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हा ‘सामाजिक स्वातंत्र्यदिन’ साजरा केला जातो. अकोल्यात दुसर्‍या दिवशी लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास असलेल्यांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन राज्यकारभार चालवणार्‍यांकडून आणि भारतीय लोकशाहीचे गोडवे गाणार्‍या माध्यमांकडूनही दीक्षाभूमीच्या गर्दीकडे दुर्लक्ष केले जाते, कारण या गर्दीत आरोप प्रत्यारोप, शक्तीतुर्‍याचे जंगी सामने रंगणारे नसतात. चिखलफेक नसते, मुठीत दाबलेली हत्यारं चमकवण्याची अहमहमिका नसते. मात्र इथं जे हत्यार असतं, त्या हत्याराने जगाचा इतिहास बदललेला असतो. हा सामना रक्त सांडणारं हत्यार आणि कागदावर शाईनं अक्षरं उमटवणारं हत्यार यांच्यात असा थेट असतो. दीक्षाभूमीवर महाकारुणी बुद्ध असतो, बुद्धाला रक्त, आरोप, चिखलफेक अशा कुठल्याही हत्यारांची गरजच नसते. बुद्ध माणसाच्या मनात सत्य रुपात असतो आणि मनातल्या सत्याला कुठल्याही हत्याराने संपवता येत नाही. सत्य, सत्याच्याकडेच आकृष्ट होते. हे जनतेच्या मनातलं सत्य मतदानाच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळायला हवे, त्यामुळे मी बोलतो तेच सत्य…बाकी झूठ, हे बिंबवण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून होत असतो. मात्र सत्ता आणि सत्य यात महदअंतर असतं. हे अंतर ज्या गर्दीला समजतं, अशांची गर्दी दीक्षाभूमीवर होते. लोकशाहीचे सत्य दूषित करण्यासाठी निराशावाद जोपासण्याचे प्रयत्न सत्तेकडून कायम केले जातात. त्यातूनच लेखणीपेक्षा तलवार भारी हे सत्तेकडून शिकवलं जातं. लोकशाहीत तलवारीच्या भीतीला स्थान नसते, तलवारीची ही भीती कायम राहावी म्हणून महामानवाने बोट दाखवलेल्या लोकशाहीच्या मार्गाबाबत संभ्रम पसरवले जातात. या मार्गाबाबत कायम अविश्वासाचे वातावरण तापत ठेवले जाते.
बाबासाहेबांच्या चळवळीबाबत नकारात्मक विचार करताना त्यात जास्तीत जास्त निराशावाद कसा जोपासला जाईल, देशातील कायदा आणि राज्य घटनेवरचा विश्वास उडण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्याची पुरेपुर आणि जाणीवपूर्वक काळजी सत्तेतल्या गटांकडून घेतली जाते. त्यातूनच हिंसेला प्रोत्साहन दिले जाण्याचा प्रयत्न केला जातो. वर्तमान परिस्थितीची गरज भासवून हिंसक क्रांतीचे समर्थन करत बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धांच्या सर्वसमावेशक नैसर्गिक समतेच्या विचारांची शकले पाडण्याचे काम त्यांचेच नाव घेऊन केले जात असेल तर प्रज्ञा, शील, करुणेवर आधारित बाबासाहेबांच्या विवेकवादी चळवळीसमोर आव्हान उभे राहिले आहे. बाबासाहेब कधीच संपलेले नसतात.. तो सर्व प्रकारच्या शोषणाला संपवणारा विचार आहे, हा विचार त्यांच्या असंख्य पुस्तकांतून, लेखनातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे बाबासाहेब आज असते तर हा नकारात्मक विचार घातक ठरणारा आहे. त्यामुळे कुठल्याही विषारी हिंसक वादाचे समर्थन होणार नाही, यासाठी चळवळीच्या शिलेदारांनी दक्ष राहायला हवे, असे सांगितले असते. बाबासाहेब कायम आपल्यातच आहेत. त्यांच्या विचारांचे विश्लेषण व्हायला हवे, मग अखिल मानवतावादाच्या भूमिकेतून ते जर टीकात्मकही असेल तरी हरकत नाही. मात्र, त्याचा तथ्य आणि सत्य या तत्त्वावर प्रतिवाद करण्याची तयारी आंबेडकरांच्या चळवळीतील अनुयायांनी ठेवायला हवी. त्यासाठी बाबासाहेबांच्या समग्र लेखनाचा अभ्यास वाढवणे ही सगळ्यांचीच गरज बनली आहे.
या विचारांच्या आंदोलनातून मानवी समतेचे धम्मातील सत्यच समोर येण्यासाठी पूरक स्थिती निर्माण होईल. परंतु, बाबासाहेबांच्या चळवळीचे नाव घेऊन संबंधितांनी जात, धर्म, वर्ग, लिंग, अलगतावाद आणि आर्थिक फरकातील विभाजनातील कारणाच्या कुठल्याही गटवादी सिद्धांताचा पुरस्कार करताना किंवा मत मांडताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्धांच्या सर्वसमावेशक मानवी मूल्यांना धक्का लावता कामा नये. जगातला कुठलाही तात्त्विक वाद, इतिहास, स्वातंत्र्य, हक्काधिकारांची चळवळ आणि हिंसक, अहिंसक क्रांतीचा विचार करताना तो डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी दाखवलेल्या मार्गावर जाणार्‍या बुद्धांच्या शिकवणीतील कसोटीवरच पडताळून पाहावा, त्यातला खरेखोटेपणा तिथल्या तिथे सिद्ध होईल. निदान समग्र समाजबदलाचे क्रांतीकारी स्वप्न पहाणार्‍या चळवळीशी संबंधितांनी तरी हा मार्ग सोडता कामा नये.
बाबासाहेब आज नाहीत त्यामुळे त्यांचा मार्ग न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सद्यस्थितीत पुरेसा नाही, त्या काळाच्या तुलनेत आजच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थितीत मोठा बदल झाला आहे. असा केला गेलेला विचार आत्मघात आणि विनाशाच्या मार्गावर नेणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार कुठेही निघून गेलेला नाही, किंवा तो जुनाही झालेला नाही, कारण तो सत्य आणि तथ्यावर आधारीत आहे. त्याला धम्माच्या मध्यममार्गाचे अधिष्ठान आहे. तो मूळ मानवाच्या हिताचा, कल्याणाचा विचार आहे. ज्याची सुरुवात मंगलकारक, मध्य मंगलकारक आणि अंत्यही मंगलकारक असाच आहे. गरज आहे ती बाबासाहेबांच्या असंख्य पुस्तकांच्या पानातून हा विचार आत्मसात करण्याची.
शस्त्रसज्जता किंवा आत्मरक्षा ही हिंसेची आवश्यकता असू शकते, विश्वाला शांतीचा संदेश देणार्‍या बुद्धांनाही कौशल्यपूर्ण शस्त्रकला अवगत होतीच. मात्र, त्याच्या वस्तुनिष्ठ आवश्यतेबाबत सद्सद्विवेकाचा मार्ग म्हणूनच धम्माचे प्रयोजन करण्यात आले. एखाद्या घटनेची हिंसा, सैन्यबळ किंवा शस्त्रकला आवश्यकता असू शकते, मात्र ती एकूणच मानवी जगण्याची गरज किंवा जीवनाचा पाया होता कामा नये. त्यामुळे मानव पशुतुल्य बनून जाईल. अशी दीक्षाभूमीने प्रवर्तन केलेल्या धम्माची भूमिका आहे. त्यामुळेच बुद्धांची जगातील ओळख ही त्यांच्या शांतीचा संदेश देणार्‍या धम्मामुळे आहे. त्यांच्या शस्त्रकौशल्य सज्जतेमुळे नाही, त्यामुळे आंबेडकरी विचार रक्तापाताशी संबंधित क्रांतीचा मार्ग नाकारतो. अंगुलीमालाचे प्रवर्तन बुद्धांनी याच मानवी जीवनाचे सत्य आणि अहिंसेच्या बळावर केले होते. युद्धकलेच्या बळावर नव्हे.
त्यामुळेच सर्व प्रकारच्या शोषणाचा, अन्यायाचा प्रतिकार करताना अन्यायाला पूरक अशा भविष्यातील स्थितीचे बीज बाबासाहेबांनी रक्तविहिन क्रांती केलेल्या इथल्या मातीत जाणता-अजाणता आपल्या हातून रोवले जात नाही ना, याची सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून डोळसपणे काळजी घेतली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या क्रांतीचा विचार पेरणार्‍या कारवायांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या मानवमुक्तीच्या चळवळीवरील ही जबाबदारी आणखीनच वाढली आहे. सत्तेसाठी हिंसेची भीती दाखवणार्‍यांना आणि हिंसेचे समर्थन करणार्‍या गर्दीला दीक्षाभूमीवरील झालेली पुस्तकांची गर्दी हेच उत्तर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -