घरसंपादकीयओपेडशेत जळताना बुजगावण्यासारखं पाहत राहू नये!

शेत जळताना बुजगावण्यासारखं पाहत राहू नये!

Subscribe

‘जळत्या दशकाची लोकगाथा’ या कवितासंग्रहातून प्रा. मोरे यांनी अनेक प्रश्न वाचकांसमोर आणि समाजासमोर उभे केले आहेत. सामाजिक ऋण विसरलेल्यांच्या जाणिवा बोथट झाल्या असल्या तरी, सामाजिक संवेदना जिवंत असणार्‍यांची संख्या कमी नाही. अख्खं रान जळत असताना उघड्या डोळ्यांनी केवळ बुजगावण्यासारखं पाहत राहणं हे ज्यांना मान्य नाही त्यांच्या रांगेतले कवी प्रा. प्रशांत मोरे. भवताल पाहताना बिघडलेला सामाजिक समतोल आणि स्वास्थ्य राखण्यासाठी प्रसंगी सामाजिक विकृत प्रवृत्तींवर हल्ला करणार्‍यांपैकी असल्याने जेव्हा जेव्हा कुटुंब, समाज, राष्ट्र यावर आघात होतो, तेव्हा मात्र ते उद्विग्न होऊन आपल्या गीत, कवितेच्या माध्यमातून अपप्रवृत्तींवर घणाघात करतात. आजची समाजाची परिस्थिती पाहता खेड्यापाड्यात रोजगारची काही साधनं उपलब्ध नाहीत. शेतकर्‍यांच्या मुलांची लग्न जमत नाहीत, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे, तो कवितेतून मांडला आहे.

-प्रदीप जाधव

साहित्याच्या संस्कारातून माणूस पर्यायाने समाज घडवत असतो. समाजमन, समाजभान तयार करण्याचा साहित्यातील प्रभावी प्रकार म्हणजे कविता, गाणी, शाहिरी, पोवाडा, जलसा. सामाजिक विकृतींवर आघात करण्यासाठी इतर साधनं अपुरी पडतात, तेव्हा कविता आणि गाण्यांचा आधार घेतला जातो. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं ‘सौ सोनारकी एक लोहारकी’. विकृती वेगवेगळ्या प्रकारची असते. मानसिक, बौद्धिक, शारीरिक त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक. विकृती माणसाला मानसिक गुलाम बनवते.

- Advertisement -

कवीच्या शब्द सामर्थ्यातून त्याच्या तळमळीतून, पोटातून ओठावर आलेल्या प्रक्रियेतून कविता अधिक प्रभावी परिणामकारक असते. कविता पाण्यालाही आग लावते आणि आगही विझवते. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना कवी असं म्हणतो,‘बघता बघता चवदार तळ्याला आग लागली’. पेटलेल्या वणव्यावर फवारा मारण्याचं काम कविता करत असते. आपल्या बोलण्यातून व्यक्त होण्यातून संवादातून विसंवाद न होता माणसं जोडली गेली पाहिजेत. म्हणजेच आपली वाचा आणि भाषा सम्यक असावी. समाज विघातक विकृत प्रवृत्तींवर घणाघात करण्याचं काम अनेक साहित्यिक, कवी करत आहेत.

त्यापैकीच एक महत्त्वाचं नाव लोककवी प्रा. प्रशांत मोरे. प्रा. प्रशांत मोरे प्रसिद्ध कवी, गायक. ज्यांनी आईच्या मायेच्या अर्थात ‘आई एक महाकाव्य’ या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांच्या पहाडी आवाजात आईची महती ऐकताना काळीज चर्रर होतं. पाषाण हृदयी माणूससुद्धा आपल्या नयनातील अश्रूंना वाट मोकळी करून देतो. आईच्या कविता ऐकताना बापालाही रडवणारा वेगळाच गीतकार, संगीतकार. वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवर त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांपर्यंत ‘आई एक महाकाव्य’ या कार्यक्रमात सतत मग्न असणारे प्रा. प्रशांत मोरे यांच्या आतापर्यंत विविध प्रकारच्या साहित्यकृती प्रसिद्ध असून प्रचंड लोकप्रिय आहेत.

- Advertisement -

वेदना सातारकर हजर सर! (सहा आवृत्त्या), कबीराचं देणं (सात आवृत्त्या), ही वस्ती सस्ती हाय पोरा (चार आवृत्त्या), अभिवादन बा भीमा (दोन आवृत्त्या), माय अर्थात आईच्या कविता-खंड पहिला (चार आवृत्त्या), माय अर्थात् आईच्या कविता-खंड दुसरा (दोन आवृत्त्या), समझो पीर पराई, गाणं शतकानुशतकाचं, वास्तवाच्या डोहातील प्रतिबिंब हे त्यांचं साहित्य. त्यांच्या कविता आणि गायनाच्या अनेक सीडी प्रसिद्ध असून सन्मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. ‘जळत्या दशकाची लोकगाथा’ हा अत्यंत गाजलेला काव्यसंग्रह.

आता आपल्या देशात महिलाही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या कुठेही मागे नाहीत, तरीही काही समाजात, कुटुंबांमध्ये स्त्री जन्म हा दुःखद मानला जातो. परिणामी मुलींचं प्रमाण कमी असल्याचं चित्र दिसतं. लिंगभेद कायद्याने गुन्हा असला तरी, वारस म्हणून मुलगाच जन्माला यावा अशीच धारणा काही समाजामध्ये आहे. सोनोग्राफीद्वारे लिंग तपासणीला कायद्याने कडक शिक्षा आहे. अशी चाचणी करणारे आणि करून घेणारेही आहेतच.

गर्भधारणा झाल्यानंतर मुलगाच हवा या हव्यासापोटी, जर मुलगी असेल, तर जन्मालाच येऊ द्यायचं नाही किंवा जन्मताच नकोशी म्हणून मारून टाकायची, असेही प्रकार घडत आहेत. अर्थात अजूनही समाजामध्ये अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आहेत. हुंडा हा एक जीवघेणा प्रकार असून त्यालाही भविष्यात सामोरं जावं लागतं. कवी प्रशांत मोरे यांनी ‘तुझ्या जगण्याच्या वाटेवर’ या कवितेतून समाजाचं वास्तव चित्र समोर आणलं आहे.

ते आपल्या कवितेत लिहितात, तुझ्या जगण्याच्या वाटेवर पेरलेले काटे पोटामधी वाढताना दुःख वेदनाच भेटे. पोरीचा जन्म मानती विटाळ, तुझे कळताच लिंग मायबाप उदासीन होतो, पोटामध्येच तुझा जीवनांत करण्यासाठी मायबाप सरसावतो. आता कणखर होऊन समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुलाच संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी कवी सल्ला देतो….

तुझ्या दु:खाच्या साथीला तुझी तूच साक्षीदार
किती साहिला जुलूम आता जाब तू विचार
पुरे झाला हा जोगवा पुरे झाला ना तमाशा
तुझ्या न्याय हक्कासाठी ऊठ ठरव तू दिशा!

आजची समाजाची परिस्थिती पाहता साधारण गावाकडे खेड्यापाड्यात रोजगाराची काही साधनं उपलब्ध नाहीत. अपुरी शेती तिही हंगामी आणि जुगारी आहे. शेतकर्‍यांच्या मुलांची लग्न जमत नाहीत, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेच लोक आता गावाकडून शहरात येऊ लागले आहेत. नोकरी धंद्याच्या निमित्ताने उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने आपण शहरात आलो आहोत. शहरी परिस्थितीत जुळवून घेत जगण्यासाठी दिवसभरात नको ती कुत्तरओढ करावी लागते. शहरात राहताना एखादा रूम किंवा फ्लॅट विकत घेतला असेल त्याचे कर्जाचे हप्ते आणि मेंटेनन्स भरताना नाकीनऊ आलेला असतो.

त्यामुळे बर्‍याचदा दोघं उभयतांना नोकरी करावी लागते, ती नोकरी सरकारी निमसरकारी किंवा खासगी क्षेत्रातली असते. कधी कधी रात्रपाळीही करावी लागते. त्यामुळे दिवस आणि रात्र याच्यातला फरक बर्‍याचदा कळत नाही. तरीही मात्र जे लोक गावात राहतात त्यांना शहरातल्यांचा हेवा वाटत असतो. ताणतणाव स्वीकारून मरणाच्या दारातून गर्दीतून प्रवास करताना घरी आलो तर आपला, अशी अवस्था असतानासुद्धा गावाकडच्या आई-वडिलांना शहरात राहणार्‍या मुलांची कीव येते. आम्हाला गावाला ठेवून ही मुलं जीवाची चैन, भौतिक सुख भोगतात.

त्यांना आई-वडिलांचा विसर पडला आहे, असं वाटतं. अशा आई-वडिलांना ‘आई म्हणाली कुकाचा रंग’ या कवितेत आपल्या भावना व्यक्त करतात. विशेषकरून सुनांच्या बाबतीत मात्र सासूची वेगळीच मतं असतात. त्याला या कवितेतून त्यांनी उत्तर दिलं आहे. नोकरी करणार्‍या स्त्रियांची काय अवस्था असते यावर कवी लिहितो, कामावरून थकून-भागून लोकलला लटकते, गायीसारखी हंबरून मुलं, स्कूलबॅगसह काखेत घेते, किती उशीर होणार आहे घरी यायला? मोबाईलवर बोलते. दिवसरात्रीला विश्रांती देत कर्तव्य निभावते. घरी आल्यावर पुन्हा रहाट गाडगं सुरूच असतं. सतत राबत असते अविश्रांत. कवी म्हणतो…

मी आईला म्हणालो, दोन दिवस महानगरात ये
उभी आडवी नांगरताना सूनबाई पाहून घे!

अनेक वर्षे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पेटला असून मराठीच्या अस्मितेसाठी अनेकांनी संघर्ष केला तरीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुटत नाही. मधल्या काळात केंद्र सरकारनेही मध्यस्थी केली असली तरी त्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघाला नाही. कवी प्रशांत मोरेंची मराठीची अस्मिता, मराठीवर असणार्‍या प्रेमापोटी ते विठ्ठल या कवितेतून विठ्ठलाला साकडं घालत आहेत. विठ्ठला! तुझं आता विटेवर काय काम? दहशतीचा थरकाप होतो, येतो अंगातून थंडा घाम.

ऊठ विठ्ठला चल आता बेळगावात जाऊ भावडांनाच बघ, कसे मारताहेत भाऊ. तू कानडी मी मराठी आता तुझं-माझं भांडण. इतक्या लवकर विसरून गेलास का जनाबाईंचं दळण कांडण? ‘कानडा राजा पंढरीचा’ म्हणत तुला आपलंसं केलं तू कळलास आम्हाला आणि घोडं चंद्रभागेत मेले, आसपास सारी भक्तमंडळी तुझी मराठीच होती तेव्हा तुला सांग ना का वाटली नाही भीती? कवितेचा शेवट करताना अगदी भावनिक होऊन लिहितात….

पंढरीच्या वाटेवरती कानडी आता दिसत नाही ?
माय मराठीचा जागर आता तुलाही सोसत नाही?
वेस सोडून आत येताच मनमानी चालू
अस्मितेसाठी बोललो जरी म्हणताहेत गोळ्या घालू.
या कवितेतून कवीने अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे.

जे जे स्वतःला समजलं ते ते इतरांना सांगणं म्हणजे शहाणा समाज करणे होय. कवी प्रशांत मोरे समाजाला शहाणं करण्यासाठी कवितेच्या माध्यमातून गावोगाव फिरत असतो. पायाला भिंगरी बांधल्यागत धावत सुटला आहे माणसांना एका धाग्यात बांधण्यासाठी. या काव्यसंग्रहात एकूण ८७ कविता असून सर्वच कविता हृदयाला भिडणार्‍या, अस्वस्थ करणार्‍या आहेत.

कवी भरत दौंडकर आपल्या प्रस्तावनेत लिहितात, वाचनालयाच्या कपाटात कोंडून आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सजवून मराठी भाषा ही कधीच ज्ञानभाषा होणार नाही, हे या कवीला समजले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो लोकांनी या कवीच्या कविता काळजात सजवून ठेवल्या आहेत. मलपृष्ठावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि ज्येष्ठ चित्रकार भ. मा. परसावळे यांच्या अभिप्रायाने कवितेची उंची अधिक वाढली आहे.

=कवी – प्रा. प्रशांत मोरे
=प्रकाशक – सई प्रकाशन
=मूल्य २०० रुपये, पृष्ठे १०५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -