Homeसंपादकीयओपेडडॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारतनिर्मितीचा ध्यास!

डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारतनिर्मितीचा ध्यास!

Subscribe

संवैधानिक मूल्यांचे संवर्धन होऊन ते जोपासले जावे, संविधान जनजागृती व्हावी याच राष्ट्रीय हेतूने संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन गावखेडा, वाडा, तांडा, तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर शासकीय यंत्रणांसोबतच संस्था संघटना, अगदी बालवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयात केलं जातं. मुंबईच्या वांद्रे येथील चेतना कॉलेज अनोख्या पद्धतीने हा उपक्रम राबवत आहे. चेतना कॉलेजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रा’च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा भारत निर्माण होण्यासाठी वैचारिक जागृती करण्यात येत आहे.

-प्रदीप जाधव

भारतात संविधान संस्कृती रूजावी यासाठी सर्वच पुरोगामी संस्था संघटना आग्रही असतात. कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत विविध जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग, प्रांत, भौगोलिक रचना, रूढी, परंपरा यांनी नटलेला खंडप्राय देश आहे. भारताच्या सामाजिक, धार्मिक राजकीय, सांस्कृतिक परंपरेचा विचार करता विशिष्ट धर्मप्रणाली जर लादली, तर तो इतर समूहावर अन्याय ठरणार आहे. भारतातील संसदीय लोकशाहीचा कारभार भारतीय संविधानानुसार चालतो. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक परिश्रमातून ३९५ कलमे आणि ८ परिशिष्ट असणारी जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना लिहिली.

संविधान सभेने भारतीय समाज रचनेचा अभ्यास करूनच संविधानास मान्यता दिली आणि भारतात अंमलात आणण्यासाठी देशाला समर्पित केले. भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रेम या पंचसूत्रीची शिकवण देते. संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने होते हे जगातील एकमेव संविधान आहे. त्यामुळे संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संविधानाने माणूस हा सर्वोच्च मानला असल्याने माणसाच्या उत्थानाचा जाहीरनामा यात समाविष्ट आहे. संविधान संस्कृती रुजल्यास भारताला आगामी काळात सर्वोच्च महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

संवैधानिक मूल्यांचे संवर्धन होऊन ते जोपासले जावे, संविधान जनजागृती व्हावी याच राष्ट्रीय हेतूने संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन गावखेडा, वाडा, तांडा, तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर शासकीय यंत्रणांसोबतच संस्था संघटना, अगदी बालवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयात केलं जातं. मुंबईच्या वांद्रे येथील चेतना कॉलेज अनोख्या पद्धतीने हा उपक्रम राबवत आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांपैकी चेतना कॉलेज एक अतिशय अग्रेसर नाव. शिक्षण महर्षी विधानसभा सभापती, सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी झटणारे, विचार मांडणारे आणि महाराष्ट्राला नवा आकार देऊ पाहणारे दिवंगत मधुकरराव चौधरी यांच्या चेतना एज्युकेशन ट्रस्टचं हे कॉलेज.

चेतना कॉलेजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र’ अध्यापक, विद्यार्थी एकत्रितपणे समाज प्रबोधन, परिवर्तनाचा वसा घेऊन विविध सामाजिक कार्यक्रम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा भारत देश निर्माण व्हावा यासाठीच याची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी प्रथमत: भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे. याप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होऊन ती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि अखंड भारत कायम अभेद्य राहावा यासाठी हे केंद्र आग्रही आहे.

वैश्विक पातळीवर समताधिष्ठित समाजरचना निर्माण व्हावी हा उद्देश महत्त्वाचा आहे. राष्ट्राला अभिप्रेत विवेकी समाजाची निर्मिती हे अतिशय महत्त्वाचं ध्येय आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण समाजाची गरज आहे. प्रा. आनंद देवडेकर यांच्या विचारमंथनातून साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना ७ जुलै २०१५ रोजी झाली. ‘संस्कार नीतीचे, संवर्धन संविधान संस्कृतीचे’ हे ब्रीद वाक्य धारण करून स्वयंस्फूर्तीने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थापन केल्या गेलेल्या या अध्यासनाने नीतीमूल्यांचे संस्कार केले आहेत. अध्यासन केंद्रात वाङ्मयाबरोबरच साहित्य, कला, क्रीडा त्याचबरोबर युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि नैतिक मूल्यांचे अधिष्ठान विकसित व्हावे त्यातून सद्गुनी, प्रभावी वक्तृत्व,आचरण शुद्ध असलेला चारित्रसंपन्न माणूस तयार व्हावा हा महत्त्वाचा उद्देश आहे.

महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांपैकी प्रा. आनंद देवडेकर गेल्या वीस वर्षांपासून सद्धम्म पत्रिका आणि सद्धम्म दिनदर्शिका प्रकाशित करीत आहेत. मासिक सद्धम्म पत्रिकेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. १ जानेवारी २०१८ साली भीमा कोरेगाव येथील शिरूर सणसवाडी येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. धम्म, धर्म सामाजिक चळवळीवर त्यांचा अभ्यास असून त्याचे भाष्यकार आहेत. सामाजिक भवताल त्याचा सखोल अभ्यास असल्याने पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत या उत्तरदायित्वाच्या भावनेतून ते कार्यरत असतात.

या अध्यासनाच्या वतीनं प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्याने’ आयोजित केली जातात हीसुद्धा एक मोठी उपलब्धी आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला साजेशा या स्मृती व्याख्यानमालेत आतापर्यंत अनेक नामवंतांनी हजेरी लावली आहे. सुहास सोनावणे, देवेंद्र उबाळे, डॉ. सुरेश माने, प्रा. उज्ज्वला आव्हाड, इंजि. कुलदीप रामटेके, मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीप्रकाश वाघमारे इत्यादी साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील विचारवंतांनी आपली विचारपुष्पे गुंफली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि दृष्टिकोनाचे अज्ञात पैलू उलगडून दाखविणारी ही स्मृती व्याख्याने अध्यासन केंद्राने लिखित पुस्तिकेच्या रूपानं जतन करून ठेवली आहेत.

अध्यासनाचे प्रवर्तक प्रा. आनंद देवडेकर यांच्या संपादकत्वाखाली ‘अध्यासन पत्रिका’ हे दर्जेदार वार्षिक मुखपत्र नियमितपणे प्रकाशित होत असते. या वार्षिकात प्रबोधनपर साहित्याबरोबरच अध्यासनाच्या वतीनं वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची माहिती व वृत्तांत शब्दबद्ध केलेला असतो. ६ डिसेंबर २०२२ च्या अध्यासन पत्रिकेच्या संपादकीयमध्ये प्रा. देवडेकर आरक्षणाच्या मुद्यावर लिहितात. आतापर्यंत केवळ कोणा एका समाजानेच आरक्षणाचा लाभ घेतलाय असं नव्हे, तर सर्वच शोषित वंचित घटकांतील लोकांना त्याचा लाभ मिळालाय. आपल्या उद्धारकर्त्यानं दिलेल्या या आरक्षित संवैधानिक हक्कांना धोका निर्माण झालेला दिसला की एखादा समाज त्या उद्धारकर्त्याप्रती असलेल्या कृतज्ञतेपोटी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतो.

बहुजन समाज देशाच्या एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्क्यांच्या आसपास असताना लाभार्थी म्हणून एखादाच समाज हिणवला जातो. का तर तो लढतो अन् इतर लाभार्थी जात समूहांच्या असहकारामुळे लढताना एकाकी पडतो. म्हणून लढणार्‍यांना असं एकाकी पाडण्यापेक्षा बहुजन जाती समूह एकजूट होऊन लढले तर आरक्षित प्रतिनिधित्वामागील तत्त्वामध्ये लुडबूड करण्याची हिंमत कोणी करणार नाही. त्यासाठी हवाय जनतेला संविधान साक्षर करणारा लोकजागर.

हा संविधान लोकजागर देशभरातील जनमानसात घुमला आणि रुजला तर लोक स्वतःहून म्हणतील, ‘माझं संविधान, माझा अभिमान!’ राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडतेसाठी अजून काय हवं? प्रा. गजानन डोंगरे ‘देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात’ या लेखात लिहतात.. राजकारण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देशात नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर एका नव्या वर्गाचा उदय झालेला दिसतो. राजकारणामध्ये काही राजकीय लोक आपले अस्तित्व टिकविण्यासाठी व विरोधकांवर वचक ठेवण्यासाठी आपल्याकडे गुंड प्रवृत्तीच्या लोकांची फौज राखीव ठेवत असतात. हेच लोक पुढे चालून आपल्या स्वार्थासाठी आपली गडगंज संपत्ती वापरून सत्ता मिळवत आहेत. काल जे पोलीस यांना हतकड्या घालून नेत असत त्याच हाताने या नव्या राजकारण्यांना पोलीस सलामी देत असतात.

२१ एप्रिल २०१८ रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी विचारसूत्रांतील अर्थनिर्धारणाची मीमांसा’ या विषयावर देवेंद्र उबाळे म्हणतात, समाज सुदृढ ठेवायचा असेल तर नीतीतत्त्वे अनिवार्य ठरतात. नीती म्हणजेच धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म’ अशी मांडणी केली. त्याहीपुढे जाऊन ‘केवळ नीती पुरेशी नसून ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे’, असे प्रतिपादन त्यांनी केले. नीती केवळ एका विशिष्ट समूहापुरतीच मर्यादित असली तर ती समाजविघातक ठरू शकते. चोरांमध्ये आपापसात नीती असते. व्यापार्‍यांत आपापसात नीती असते. एका जातीच्या माणसांत आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही नीती असते.

जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्याकरिता नीती पाळतो, तेव्हा ती नीती समाजविघातक असते, मात्र जेव्हा नीती सर्वसमावेशक असते व पवित्रता जोडली जाते, तेव्हा तिचे अनुसरण करण्याची जबाबदारी आणि मानसिकता तयार होते. नैतिक बंधनाचे पालन न केल्यास सामाजिक बदनामी होण्याचा धोका असल्यामुळे लोक नैतिक बंधनाचे काटेकोरपणे पालन करतात. अशा नैतिक बंधनाचे कुणीही उल्लंघन करीत नाही व नीती समाजहिताची बनते. नीती हा बाबासाहेबांनी धम्माचा मूलाधार मानला आणि नीतीला मानवी कल्याणाशी जोडले.

संविधान संस्कृतीत वैज्ञानिक कसोटी मान्य केली जाते, ज्यात रूढी परंपरा आणि चमत्कार बुवाबाजी नाकारून सामाजिक समता टिकण्यासाठी बंधुभाव, न्याय प्रस्थापित होण्यासाठी व्यसनमुक्त तणावमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त विषमता विरहित समाज रचना अपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आध्यासन केंद्राचा विस्तार जरी करता येत नसला तरी विद्यापीठाने सर्वच महाविद्यालयातून असा उपक्रम राबवल्यास त्याचा सर्वांना फायदाच होईल. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला भारत साकार होऊ शकेल.