काय कोकणातली झाडी, काय डोंगार, काय खड्ड्यांनी भरलेले रस्ते, अरारा!

कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते लवकर खराब होतात. हे कारण वर्षोनुवर्षे आपल्या तोंडावर मारले जात आहे. आपणही ते कारण खरे मानून गप्प बसतो. रस्ते बांधकामाचे तंत्र प्रगत झालेले असल्याने पावसाचे कारण सपशेल तकलादू आहे. पावसाचे अतिप्रमाण आणि वाढती अवजड वाहतूक लक्षात घेऊन यापुढे कोकणातील रस्त्यांची बांधणी झाली पाहिजे, याकडे अनेकदा प्रसारमाध्यमांसह जाणकारांनी लक्ष वेधले आहे. परंतु टक्केवारीचे गणित जुळविण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य बर्‍याचदा सुमार दर्जाचे असते. त्यामुळे पावसाची संततधार लागली की लगेचच रस्ते खड्डेमय होऊन जातात.

खड्ड्यांशिवाय कोकणातील प्रवास ही कल्पनाच कुणाला मान्य होणार नाही! विशेषतः जूनपासून पुढे पाच महिने काय तो पाऊस, काय ते खड्डे, अशी एकंदरीत परिस्थिती असते. गेल्या ८-१० दिवसांपासून कोकणात पावसाचे धुमशान सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांनी आपला ‘दर्जा’ सिद्ध करून दाखविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यांवरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. अर्धा तासाचा प्रवास असला तरी खड्डेमय रस्त्यातून त्याची वेळ अनिश्चित झाली आहे. रस्त्यांचे हे दरवर्षीचे दुखणे आहे. यावर कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी कोणता अवतार जन्मायचाय हे कळेनासे झाले आहे. प्रवासी आणि वाहन चालक निमूटपणे रस्त्याची दुरवस्था (गोड) मानून घेऊन प्रवास करीत असल्याने संबंधित यंत्रणा बेफिकीर आहेत. लोकप्रतिनिधींबद्दल तर बोलायलाच नको. (due to heavy rainfall mumbiker face potholes issue on road)

दर्जेदार रस्ते हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. इतर मूलभूत सुविधांच्या कारणांप्रमाणे रस्ते सुस्थितीत नसल्याने परदेशी प्रकल्प महाराष्ट्रातून परत गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. रस्ता ही बाब आपल्याकडे कधीच गंभीरपणे घेतली गेलेली नाही. रस्ते कामात मलिदा कसा लाटता येईल, याबाबत मात्र संबंधित कायम गंभीर राहिलेले आहेत. काय म्हणे तर कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते लवकर खराब होतात. हे कारण वर्षोनुवर्षे आपल्या तोंडावर मारले जात आहे. आपणही ते कारण खरे मानून गप्प बसतो. रस्ते बांधकामाचे तंत्र प्रगत झालेले असल्याने पावसाचे कारण सपशेल तकलादू आहे.

पावसाचे अतिप्रमाण आणि वाढती अवजड वाहतूक लक्षात घेऊन यापुढे कोकणातील रस्त्यांची बांधणी झाली पाहिजे, याकडे अनेकदा प्रसारमाध्यमांसह जाणकारांनी लक्ष वेधले आहे. परंतु टक्केवारीचे गणित जुळविण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य बर्‍याचदा सुमार दर्जाचे असते. त्यामुळे एरव्ही गुळगुळीत किंवा चकाचक असणारे रस्ते पावसाची संततधार लागली की लगेचच खड्डेमय होऊन जातात. यंदाही तीच परिस्थिती आहे. अंतर्गत रस्ते तर इतके खराब आहेत की या रस्त्यांचे काम करणारे कंत्राटदार, अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यांना कुणीतरी न्यायालयात खेचले पाहिजे. राज्य मार्गांचीही अशीच अवस्था आहे.

पावसाचा सामना न करू शकणारे महामार्ग राष्ट्रीय दर्जाचे कसे असू शकतात, असा सवाल अनेकदा उपस्थित होतो. कोकणातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यांनी व्यापून गेला आहे. प्रवाशांचे प्रवासाचे वेळापत्रक बिघडत आहे. नोकरदार कामावर वेळेत पोहचू शकत नाहीत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनाही उशिरा शाळेत पोहचल्याने गुरुजींचे बोल ऐकावे लागत आहेत. वाहनांचे नुकसान होण्याबरोबर इंधनाचीही नासाडी होत आहे. मुनष्य तास, इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरुस्ती याची गोळाबेरीज केली तर दररोज काही कोटी रुपये ‘खड्ड्या’त जात आहेत. याची खर तर संबंधित यंत्रणांना लाज वाटली पाहिजे. पण कोकण आणि मुसळधार पाऊस हे नाते घट्ट झालेयं ना&

चार दिवसांपूर्वी ठाण्यात घोडबंदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वार तरुणाचा हकनाक बळी गेला. ठाणेकर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची लगेचच गंभीर दखल घेत असा प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याची, आणि दुर्दैवाने काही घडलेच, तर अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याची तंबी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही तत्परता इतर रस्त्यांबाबतही दाखवावी. यापूर्वी महामार्गांवरील खड्ड्यांनी अनेक निरपराधांचे बळी घेतले आहेत. त्यावेळीही अशीच इशारेबाजी झाली. यातून सुधारणा काहीच घडलेली नाही. वाहनांना खड्ड्यांतून रस्ता शोधावा लागतो म्हणजे नेमके काय, याचा अनुभव यावेळी येत असतो. अवजड वाहने कित्येकदा खड्ड्यात रुतण्याचे प्रकार घडतात.

यामुळे वाहतूक कोंडी होते आणि वादविवादही होतात. वाहन निर्मिती तंत्रज्ञान प्रगत झाले असल्यामुळे मल्टी अ‍ॅक्सल ट्रक, ट्रेलर अशी वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने आली आहेत. शेकडो टनांची वाहतूक क्षमता असणारी वाहनेही आहेत. भविष्यात अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने रस्त्यांच्या दर्जाकडे आताच लक्ष द्या, असे तज्ज्ञ वारंवार सांगत आले आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते टिकतात म्हणून महामार्गांना या काँक्रीटचा साज चढवला जात असला तरी अशी कितीतरी ठिकाणे आहेत की जेथे रस्ता समपातळीत नाही, याकडेही आता लक्ष वेधले जात आहे. अर्थात ठेकेदार आणि अधिकारी हेच रस्ते बांधकाम तंत्रज्ञानातील सर्वश्रेष्ठ जाणकार असल्याने इतरांनी लक्ष वेधले तरी त्याकडे लक्ष दिले जाणार नाही.

रस्ते बांधकामाच्या इतिहासात बहुधा विशेषत्वाने नोंद होण्याची शक्यता असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास नकोसा झाला आहे. अनेकजण याचा उल्लेख ‘खतरनाक प्रवास’ असा करीत आहेत. या मार्गावर छोट्या-मोठ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे काम वेळेत होईल, असे वायदे अनेकवेळा देऊनही हा मार्ग खर्‍या अर्थाने पूर्ण होण्यास अजून दोन ते तीन वर्षे लागतील, असा कयास आहे. एका महत्वाच्या मार्गाचे असे भिजत घोंगडे एक तप पूर्ण होत आले तरी पडून राहणे हे संबंधित यंत्रणांना शोभादायी नाही. या मार्गावरील प्रवास वेळखाऊ झाला असल्याने आता विविध राजकीय पक्षांची, संघटनांची पत्रकबाजी, इशारेबाजी सुरू होईल. खड्ड्यांतून झाडाच्या फांद्या रोवून मिरवून घेण्याची हौसही यानिमित्ताने भागवून घेतली जाईल.

प्रसारमाध्यमांतून यांना प्रसिद्धीही मिळेल. दरवर्षीचा हा कार्यक्रम ठरून गेलेला आहे. एरव्ही रस्त्याचे होणारे काम योग्य किंवा दर्जेदार आहे की नाही, याकडे ढुंकुनही पाहिले जात नाही. टक्केवारीमुळे काम करणारे ठेकेदारही निर्धास्त असतात. खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांसह वाहन चालकांच्या उद्विग्न आणि गमतीशीर प्रतिक्रिया यावर व्हिडिओ प्रसिद्ध करता येतील. मुंबई-गोवा महामार्गाचे बरेचसे काम बाकी असताना वाहनचालकांच्या स्वागतासाठी टोल नाके सज्ज होत आहेत. खड्ड्यांतून झाडाच्या फांद्या खोवण्याचे कार्यक्रम करण्याऐवजी जोपर्यंत हा मार्ग पूर्ण आणि तोही दर्जेदार होत नाही तोपर्यंत एक रुपयाही टोल म्हणून देणार नाही, ही भूमिका घ्यावी. दर्जाहिन रस्त्यांवरील टोल वसुली ही चक्क वाटमारी आहे, असे कुणी म्हटले तर त्याला दोष दिला जाऊ नये.

गणेशोत्सव जवळ आला की सर्व ठिकाणच्या रस्त्यांना ठिगळं लावण्याचे काम सुरू होते. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा उतारा वापरला जातो. कोकणातील मुंबई-गोवा मार्गावर चक्क पेव्हर ब्लॉक आहेत. काँक्रिटीकरणाऐवजी पेव्हर ब्लॉकचाच रस्ता करून टाकावा, म्हणजे वाहन ‘नाचत-नाचत’ त्यावरून जाईल आणि प्रवाशांनाही मनमुराद आनंद घेता येईल! सध्या प्रवासी खड्ड्यांतून चक्क होडीच्या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. गणेशोत्सव आला की रस्त्यांवरील खड्ड्यांची तीव्रता जाणवायला सुरुवात होते. मग मंत्रालयातून मंत्री धावत येतात. इतर लोकप्रतिनिधीही येतात. भर पावसात या सर्वांनी रस्त्याची पाहणी केली म्हणून कोण कौतुक होतं! प्रत्यक्षात या मंडळींना रस्ते तंत्रज्ञानातील ओ की ठो माहीत नसते. अधिकारी, ठेकेदार सांगणार त्यावर हे माना डोलविणार आणि मग आल्यासारखे काही तरी आदेश बजावून निघून जाणार! गेली अनेक वर्षे रस्ते पाहणीचा फार्स सुरू आहे. किंबहुना, सर्वांना तो पाठ झाला आहे. वाहन मालकांकडून रस्ते कर घेतला जात असेल तर त्याला दर्जेदार रस्त्यांचे जाळे उपलब्ध झालेच पाहिजे.

कोकणातील रस्त्यांचे दरिद्रीपण केव्हा जाईल, हे कुणालाही माहिती नाही. कोकण हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कोकणातील पर्यटनाचा आनंद घेतात. यात गड पर्यटन आहे, समुद्र पर्यटन आहे, पावसाळी पर्यटन आहे. आता शासनाने मोठे मन करून खड्डे पर्यटनही सुरू करावे. कदाचित मुसळधार पावसामुळे कोकणात याला भरपूर वाव आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गांवरील पर्यटनाला वेगवेगळा दर्जा देण्यात यावा. जमलंच तर ठिकठिकाणी खड्डे महोत्सवाचे आयोजनही करावे. म्हणजे भाषणबाजी करण्याची हौस असलेल्यांना अनायसे आणखी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.

बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी कोकणातील खड्ड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू, या वाक्याचा भाषणात न चुकता उल्लेख करावा. म्हणजे ठेकेदारही खूश होऊन दर्जेदार साहित्याची मागणी आपोआप कमी होईल. खड्डे पर्यटनाची जाहिरात आंतराष्ट्रीय पातळीवरसुद्धा झाली पाहिजे. त्यात रस्त्यावरून होडीच्या प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येण्याचे निमंत्रण दिले तर उत्सुकतेपोटी हजारो परदेशी पर्यटक कोकणात दाखल होतील आणि देशालाही रगड परकीय चलन मिळेल. संगीत खुर्चीसारखा संगीत खड्डे हा खेळ खेळविता येईल. पावसाळ्यात ठप्प होणारे स्थानिक व्यवसायही यानिमित्ताने बहरतील! एरव्ही खड्ड्यांची वाटणारी आपत्ती सर्वांसाठी इष्टापत्ती ठरेल. प्रवासी, वाहनचालकही मग खड्ड्यांचा मनमुराद आनंद घेतील. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर रस्त्यांवरील खड्डे सर्वांसाठी कसे डोकेदुखी ठरत आहेत, याचा अंदाज येईल.

बांधकाम खात्याचा अनुभव असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच रस्त्यांना झळाळी येईल, असे समजण्याचे कारण नाही. शासकीय काम एका ठराविक चौकटीतून चालत असल्याने रस्त्यांसाठी लगेचच भरघोस निधी येईल, असेही नाही. मात्र रस्ता कोणताही असो, त्याचा दर्जा योग्यच असला पाहिजे, असा निर्धार नव्या शासनाने करावा. तासन्तास प्रवासी आणि वाहनचालक रस्त्यातच अडकून पडणार असतील तर ते निश्चितच प्रगतीचे लक्षण मानता येणार नाही. खड्ड्यांमुळे बळी जाणार नाहीत यासाठी रस्त्याचा दर्जा उच्च प्रतिचा असला पाहिजे. मनुष्य तासांची हानी, इंधनाची नासाडी, वाहनांची नासधूस हे सर्व राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. सुमार दर्जाच्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचे प्रसंग सारखे-सारखे उद्भवत असल्याने रुग्णवाहिका त्यात अडकून रुग्णाच्या प्राणावरही बेतण्याची शक्यता असते. रस्त्यांबाबत शासनाने गंभीर व्हावे, अन्यथा त्यातून नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ऊठसूठ सर्वांना गृहित धरण्याची सवय मोडण्याची गरज आहे.