घरसंपादकीयओपेडविवाहबाह्य संबंध आणि मुलांची होणारी हेळसांड!

विवाहबाह्य संबंध आणि मुलांची होणारी हेळसांड!

Subscribe

विवाहबाह्य संबंध असणारे पती-पत्नी आणि त्यामुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनात उद्भवणार्‍या समस्या, त्यातून होणारा त्रास, बदनामी, मानहानी, मानसिक तणाव, आर्थिक नुकसान यावर आजपर्यंत आपण अनेक लेखांमधून चर्चा केली आहे. या लेखात आपण खासकरून विवाहबाह्य संबंध असणार्‍या महिलांच्या मुलांची किती आणि कशी फरपट होते, त्यांची मुलं हकनाक किती भरडली जातात आणि बालपणीच्या किंवा किशोर वयाच्या मुलामुलींच्या मानसिकतेवर, संस्कारांवर, करिअरवर आईच्या अशा वागणुकीचा किती विपरीत परिणाम होतो हे एका सत्य घटनेचा आधार घेऊन सांगणार आहोत.

आजही आपल्या समाजात पुरुषाने कोणतीही चूक केली, विवाहबाह्य संबंध ठेवले तर ते सांभाळून घेतले जाते. वडिलांनी असे चुकीचे कृत्य केले तरी मुलांना मानसिक त्रास होतोच, पण जर मुलांच्या आईने असं चुकीचं पाऊल टाकलं, आईने जर पती असूनसुद्धा परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवले तर ते मुलांना स्वीकारणे खूप अवघड असते. आपली आई घटस्फोटिता अथवा विधवा असताना जरी तिने स्वतःची शारीरिक, मानसिक गरज म्हणून, आधार म्हणून दुसर्‍या पुरुषासोबत संबंध ठेवले तरी मुलं ते कधीच मनापासून स्वीकारू शकत नाहीत हे शाश्वत सत्य आहे. एकवेळ आपल्या आईने उजळ माथ्याने दुसरा विवाह केला तर मुलं थोडीफार तरी समजून घेऊ शकतात आणि त्या दुसर्‍या पुरुषाला वडिलांचं स्थान देऊ शकतात. कारण ते समाजमान्य आणि कायदेशीर असतं.

आई जर स्वत:च्या मुलांना वेळ, प्रेम आणि न्याय देण्यापेक्षा तिच्या अनैतिक संबंधांमध्ये गुरफटून राहत असेल, मुलांना जबरदस्तीने असे संबंध स्वीकारायला भाग पाडत असेल तर मुलांच्या बालमनावर खूप गंभीर परिणाम होतो आणि त्यांचं पुढील जीवन विस्कळीत होऊ शकतं. आईच्या अशा वागणुकीमुळे मुलांना समाजात मान खाली घालायला लागते. मित्रमैत्रिणींमध्ये कमीपणा वाटतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

एकतर आईवडिलांनी घटस्फोट घेतला असल्याने किंवा वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे मुलं प्रचंड दुखावलेली असतात. एकटी पडलेली असतात. अशा परिस्थितीत आईलाच मुलांच्या आयुष्यातील वडिलांची कमतरता भरून काढण्याशिवाय पर्याय नसतो. घरातील इतर कितीही जवळील सदस्य मुलांवर प्रेम करीत असतील, त्यांची जबाबदारी घेत असतील, त्यांना जीव लावत असतील, हवं नको बघत असतील तरी आईची जागा कोणीही घेऊ शकत नसतं. अशा वेळी स्वत:च्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्त्रीने कोणत्याही दुसर्‍या पुरुषाशी संबंध प्रस्थापित केले, मुलांना ते समजले, ते प्रमाणाबाहेर वाढले, राजरोस असे संबंध आई ठेवत असेल, चारचौघात हे चुकीचे संबंध माहिती होत असतील आणि मुलांना ते स्वीकारायला भाग पाडले गेले तर मुलांवर केलेला हा खूप मोठा अन्याय असतो. आपल्या सोयीसाठी, आपल्याला गरज आहे म्हणून, समोरील परपुरुषाला आपण हवे आहोत म्हणून, आपला आर्थिक फायदा होतो म्हणून जर कोणीही महिला आपल्या मुलांप्रति तडजोड करीत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. आपल्या मुलांजवळ कोणी आपल्या चरित्र्याबद्दल विचारणा अथवा चर्चा केली, आपल्याबद्दल अपशब्द वापरले तर त्यांनी काय करायचं यावर आईने गंभीर विचार करणे गरजेचे असते.

अनेकदा महिलांना वाटतं आपण ज्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत ती व्यक्ती आपल्या मुलांनाही सांभाळून, समजावून घेण्याच्या पात्रतेची आहे, तो आपल्या मुलांना पण जीव लावतोय, त्यांना हवं नको बघतोय. त्यामुळे मुलांना यात काही वावगं वाटणार नाही. समोरील परपुरुष विवाहित असो, स्वतःच्या बायको-मुलांसोबत राहणारा असो, अथवा त्याच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या असोत, तो घटस्फोटित असो अथवा त्याची पत्नी हयात नसेल तरी आपल्या मुलांसाठी ही व्यक्ती परकी आहे, त्यांच्यात कोणतंही कायदेशीर अथवा रक्ताचं नातं निर्माण होऊ शकत नाही हे महिलांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

सुमनताई (काल्पनिक नाव) त्यांच्या मुलीची राधा (काल्पनिक नाव) तक्रार घेऊन समुपदेशनाला आल्या होत्या. सुमनताईचं म्हणणं होत राधाच्या पतीचं पाच वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं आणि त्यानंतर राधा तिची दोन छोटीशी मुलं घेऊन माहेरी राहायला आली. मुलगा पाचवी आणि मुलगी आठवीमध्ये शिकत होती. राधा माहेरी राहायला लागल्यावर तिची भेट मयुर (काल्पनिक नाव) या विवाहित माणसासोबत झाली आणि त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊन अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सुमनताईचा आग्रह होता की आम्ही तुझं रितसर दुसरं लग्न लावून देतो, पण तू असा चुकीचा मार्ग निवडू नकोस. राधा आधीच पतीच्या निधनामुळे खचलेली असल्याने मयुरने तिला त्यावेळी जो आधार दिला, तिच्या गरजा पूर्ण केल्या, अल्पावधीतच तिच्या मुलांना लळा लावायचा प्रयत्न केला त्यामुळे राधा योग्य निर्णय घेऊ शकली नाही आणि या प्रकरणात खूप वाहवत गेली.

आजमितीला राधा मयुरच्या इतकी आहारी गेलेली आहे की स्वतःच्या दोन्ही मुलांना सतत आईच्या भरवशावर टाकून ती मयुरसोबत वेळ घालवत असते. मयुर विवाहित असल्यामुळे तो त्याच्या फॅमिलीच्या सर्व आशा अपेक्षा जबाबदार्‍या व्यवस्थित पूर्ण करतोय. मयुरचे कुटुंब राधाचा प्रचंड तिरस्कार करते, पण मयुरला मात्र घरातल्या सगळ्यांनी सांभाळून घेतले आहे. मयुरची बायको, मुलगा त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्याच्या आणि राधाच्या प्रकरणाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. राधा त्यांच्या खिजगणतीतही नाही.

मयुरचा व्यवसाय हा फिरस्तीचा असल्यामुळे त्याला अनेकदा बाहेरगावी जावं लागतं. त्यामुळे राधाला मयुर स्वतःच्या सोयीने, लहरीने, मर्जीने हवं तेव्हा कुठेही फिरायला घेऊन जाणे, तिला कितीही दिवस बाहेरगावी घेऊन फ़िरणे, हॉटेलवर घेऊन राहणे असं वागत असतो. राधाला मयुरचं हे वागणं प्रेम वाटतं. तो आपल्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही, त्याला आपली खूप गरज आहे अशी तिची समजूत आहे, म्हणून तो म्हणेल तेव्हा म्हणेल तिथे ती ताबडतोब धावत सुटते. मी राधाला कित्येक वेळा समजावलं की, तू मयुरचा विषय सोडून दे, तो विवाहित आहे, तो तुझा वापर करतोय, मुलांकडे लक्ष दे, स्वत:चं करिअर घडवं, पण ती अजिबात ऐकत नाही.

सुमनताईच्या म्हणण्यानुसार त्यांना या वयात दोन नातवंड सांभाळणं, त्यांचं आजारपण, अभ्यास, खाणंपिणं, शाळा, शिकवण्या ही धावपळ एकटीला झेपत नाही. राधा कधीही जमेल तसं एक-दोन दिवस येऊन मुलांना भेटून जाते. त्यांना खाऊ, पैसे, कपडे आणून देते, त्यांच्याशी फोनवर बोलते, चौकशी करते. तरीही ही मुलं आईचा वेळ मिळावा म्हणून खूप तळमळत असतात. कधी कधी राधा मुलांना मयुरसोबत बाहेरही घेऊन जाते, मुलांना हिंडवते फिरवते. तिला वाटतं मुलांना यातून आनंद मिळेल. मुलांच्या आयुष्यातील वडिलांची कमतरता भरून निघेल, पण मुलं घरी येऊन सांगतात आम्हाला करमत नाही. मयुर काकांचं आणि आईचं एकत्र राहणं आम्हाला आवडत नाही. ते दोघे आम्हाला सोडून कुठेही फिरायला किंवा कामाला निघून जातात. आम्ही असतानाही दोघे वेगळ्या रूममध्ये असतात. आम्हाला आई म्हणून तिचा वैयक्तिक वेळ मिळतच नाही.

सुमनताई सांगत होत्या, राधाची अपेक्षा असते मुलांनी मयुरसमोर खूश राहावं, आनंदी राहावं, त्याचा आदर करावा, त्याचा स्वीकार करावा, पण मुलांना ते शक्य होत नाही. मुलं मयुरला भेटून घरी आल्यावर बुजलेली असतात, अबोल झालेली असतात. मनमोकळे वागत बोलत नाहीत. सुमनताईंना ते पाहवत नाही. मुलांना आईची सारखीच आठवण येते. तिच्या हाताने बनवून तिने खाऊ घालावं, आपल्याला झोपवावे, गप्पा माराव्या, आपल्यासोबत खेळावं, आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी आईने यावे, आपला अभ्यास घ्यावा, आजारी पडलो तर आई आपल्यासोबत असावी, या माफक अपेक्षा राधा एक आई म्हणून पूर्ण करू शकत नव्हती, हे सांगताना सुमनताईंना अश्रू अनावर झाले होते. मुलांच्या आयुष्यातून बाप तर निघून गेला. त्यांच्या आईने तरी असं वागू नये. मयुरच्या अधीन राधाने जाऊ नये. राधाने राजरोस रीतसर लग्न करावे. तिच्या मुलांना घेऊन नवीन प्रपंच थाटावा हीच सुमनताईंची अपेक्षा होती.

राधाला मयुर प्रकरणातून बाहेर काढले तरच ती मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकेल. असाही त्यांच्या या संबंधांना काहीही अर्थ नाही, काही भविष्य नाही. मुलं जरी राधाला तोंडावर बोलून दाखवत नसली तरी मुलांना मयुरसोबत खूप कोंडल्यासारखं वाटतं, असं सुमनताईंचं म्हणणं रास्त होतं. एखादी जन्मदाती आई केवळ स्वतःच्या आर्थिक, शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मुलांना वेठीला कसं धरू शकते. भविष्यात ही मुलं राधाला जाब विचारतील. राधाची मुलगी तरुण झाल्यावर अशाच चुकीच्या मार्गाला जाईल ही भीती सुमनताईंना वाटत होती. या ठिकाणी राधाला मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आणि समुपदेशन आवश्यक होतं आणि त्याला ती कितपत प्रतिसाद देते हे आता पाहायचं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -