घरसंपादकीयओपेडमहामार्गांवरील बेशिस्त वाहतुकीचे जीवघेणे दुष्परिणाम !

महामार्गांवरील बेशिस्त वाहतुकीचे जीवघेणे दुष्परिणाम !

Subscribe

एकेकाळी वेळेची बचत करणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अपघातांची वाढती संख्या व नियमित होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना आता नकोसा वाटू लागला आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गांवरील वेग मर्यादाच हटवण्याचे संकेत दिले होते. जेणेकरून भविष्यात देशभरात तयार होणार्‍या विविध महामार्गांवरून वाहनांना सुसाट जाता येऊ शकेल. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) लावण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने निर्देश दिले आहेत.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक-कारच्या भीषण अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चांचा विषय ठरू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी 1४ ऑगस्ट रोजी मुंबईत एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बीड येथून निघाले होते. ते पहाटे 5 वाजेच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्यानजीकच्या माडप बोगद्याजवळ आले असता त्यांची कार एका अज्ञात ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी जोरदार होती की मेटे यांच्या फोर्ड एन्डेव्हर या दणकट कारच्या डाव्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. गंभीर बाब म्हणजे अपघातानंतर सुमारे तासभर विनायक मेटे यांना मदत मिळू शकली नाही, असा आरोप मेटे यांच्या वाहन चालकाने केला आहे. अपघातानंतर सुरूवातीला 100 क्रमांकावर फोन करूनही फोन उचलण्यात आला नाही. फोन उचलल्यानंतर समोरुन योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मदतीसाठी रस्त्यावर झोपूनही कुणी वाहन थांबवले नाही, असा आरोप मेटे यांच्या वाहन चालकाने केला आहे. अखेर मेटे यांना एका टेम्पो चालकाच्या मदतीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय उपचारांमध्ये सुरूवातीचा तासभर अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच त्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हटले जाते. या कालावधीत रुग्ण वा अपघातग्रस्ताला तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. परंतु या गोल्डन अवरमध्ये कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत मेटे यांना मिळू शकली नाही. मेटे यांच्यावर वेळेत उपचार झाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचवता आले असते. परंतु वेळ निघून गेल्यानंतर आता जर तर ची भाषा काही उपयोगाची नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीतूनही फार काही निष्पण्ण होण्याची शक्यता नाही.

मागील 25 वर्षांहून जास्त काळ सार्वजनिक, राजकीय जीवनात घालवलेल्या व्यक्तीला जर आपत्कालीन स्थितीत मदत मिळू शकत नसेल, तर अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य व्यक्तीचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज अनेक अपघात होत असतात. या अपघातांमध्ये महिन्याकाठी शेकडो जणांचे प्राण जातात. कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त होतात. परंतु केवळ आकडेवारी नोंदवण्यापलिकडे या अपघातांची साधी दखलही प्रशासकीय पातळीवरून घेतली जात नाही, हे कटू वास्तव आहे. म्हणूनच तर महामार्गानजीक ट्रॉमा केअर रुग्णालये बांधण्याची अनेकदा घोषणा होऊनही अद्याप या संकल्पना केवळ कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.

- Advertisement -

जुना मुंबई-पुणे महामार्ग हा ब्रिटिश काळात बांधलेला होता. एका बाजूला देशाची आर्थिक राजधानी मुंबई तर दुसर्‍या बाजूला राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे. शहरीकरणाचा वेग वाढू लागल्यावर या दोन्ही शहरातील संपर्क व्यवस्था सुधारण्याची अत्यांतिक गरज भासू लागली. 1998 साली राज्य शासनाने मुंबई-पुण्यातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन द्रुतगती महामार्गाचा घाट घातला. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर नव्या महामार्गाचे काम सुरू झाले आणि 2000 साली महामार्गाचा पहिला टप्पा तर 2002 साली ९४.५ किमी लांबीचा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रत्येक दिशेने ३ अशा एकूण ६ मार्गिका आहेत. तर महामार्गावर एकूण ६ बोगदे आहेत. द्रुतगती महामार्गावरील वाहनांना बाहेर पडण्यासाठी ९ फाटेदेखील आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे एकेकाळी मुंबई-पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ ते अडीच तासांवर आला आहे. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी बहुतांश खासगी वाहने, एस.टी. बस, खासगी परिवहन बस तसेच मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा आवर्जून वापर करतात. आजच्या घडीला देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची ओळख बनली आहे. या महामार्गावरून दररोज अंदाजे 60 हजार वाहने ये-जा करत असतात. आठवड्याच्या अखेरीस, सलग लागून येणार्‍या सुट्ट्या आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये तर महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होते. येथील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दोन-दोन तास वाहने एका जागीच उभी असतात. यावरून या दोन शहरांतील वर्दळीचा अंदाज येऊ शकेल. जेव्हापासून हा द्रुतगती महामार्ग वापरात आला तेव्हापासूनच कमी-अधिक प्रमाणात होणार्‍या अपघातांमुळे हा महामार्ग सतत चर्चेत राहिला आहे. 2012 साली प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात निधन झाले होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक त्यांच्या कारला अपघात झाला होता. तेव्हाही महामार्गावरील सुरक्षेसंदर्भात तसेच वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एखादी प्रसिद्ध व्यक्ती किंवा एकाच वेळी अनेकांनी अपघातात प्राण गमावल्यास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग चर्चेत येतो. तशीच चर्चा आताही सुरू आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलिसांची गस्त, टोलनाक्यावर वाहनांची नोंद ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचवण्याची व्यवस्था असूनही नेमकी गरजेच्या वेळीच यंत्रणा बिनकामाची ठरते. त्यात हलगर्जीपणा हे एक मोठे कारण आहे. तर दुसरे म्हणजे वेगाची मर्यादा आणि लेनची शिस्त न पाळणे ही देखील अपघाताची प्रमुख कारणे ठरतात. अवजड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग, वाटेत बंद पडणारी वाहने, वाहन थांबल्यानंतर सावधगिरीचा इशारा देणारी लाइट न लावणे, बंद पडलेल्या ट्रकच्या बॅकलाइट चालकांकडून न लावल्यास अंधारातील वाहने या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना वेळीच दिसत नाहीत आणि अपघात होतात, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक ही देखील अपघाताला निमंत्रण देणारी इतर कारणे आहेत.

मुंबई-पुणे महामार्गाची रचना 120 किमी वेगाने वाहने धावू शकतील, अशी करण्यात आली असली, तरी महामार्गावर प्रत्यक्षात हलक्या चारचाकींसाठी प्रति तास 80 ते 100 किमी तर घाटात प्रति तास 50 किमी अशी वेग मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. परंतु या वेग मर्यादेपेक्षाही जलद गतीने वाहने महामार्गावरून धावत असतात. 2019 मध्ये बेदरकार वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली. त्यानुसार आता वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांकडून 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तरीही वाहन चालक वेग मर्यादेला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते.

- Advertisement -

साधारणत: 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकार्‍यांच्या मदतीने महामार्गावर 2 चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमध्ये द्रुतगती महामार्गावरुन धावणार्‍या कार आणि हलक्या मोटार वाहनांसाठी घालून दिलेल्या गती मर्यादेनुसार खालापूर ते उर्से टोल प्लाझा दरम्यान ५५ कि.मी.अंतर कापण्यासाठी किमान ३६ मिनिटे लागत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर वेग मर्यादेचे उल्लंघन टाळण्यासाठी खालापूर ते उर्से टोल प्लाझा दरम्यानचे ५५ कि.मी.अंतर 36 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करणार्‍या वाहन चालकांना वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारणी सुरू झाली. कारण हे अंतर पार करण्यासाठी 36 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला याचाच अर्थ वाहन चालकाने वेगाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होते. हायवे सेफ्टी पेट्रोल (एचएसपी) चे पोलीस अशा बेदरकार वाहन चालकांवर सातत्याने लक्ष ठेवून असतात. दोन टोल प्लाझा दरम्यानच्या प्रवासाची वेळ पडताळण्यासाठी वाहनचालकांकडील पावती व मजकूर संदेशांची तपासणी करून कारवाई करण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली आहे. एचएसपी टीमकडे वेगवान वाहने आधुनिक स्पीड गनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एक टीम खंडाळा येथे तर दुसरी टीम द्रुतगती महामार्गावर वडगाव येथे तैनात केलेली असते. दिवसा द्रुतगती महामार्गावर वेगाने जाणार्‍या वाहनचालकांना ते सहज पकडू शकतात. दिवसा सीसीटीव्हीच्या माध्यमातून वेगावर लक्ष ठेवणे, स्पीड गन तैनात करणे आणि वाहने रोखणे सोपे आहे, परंतु रात्रीच्या वेळी मात्र हे धोकादायक ठरते. कारण रात्रीच्या वेळी वेग मर्यादेचे उल्लंघन करण्यासोबतच बहुतेक वाहने मार्गिका सोडून बाहेर जात असतात. त्यामुळे अशा वाहनांना अटकाव घालणे कठीण जात आहे. परिणामी या बेशिस्तीमुळेच द्रुतगती महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मार्गिका सोडून बाहेर जाणार्‍या वाहनांची एकूण अपघातातील टक्केवारीही मोठीच आहे. द्रुतगती महामार्गावर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी मार्गिका आखून दिलेल्या आहेत. परंतु त्या मार्गिकांचा वापर न करता एका मार्गिकेतून दुसर्‍या मार्गिकेत प्रवेश करून नियमांचे उल्लंघन करण्यात अवजड वाहनांचे चालक पुढे असतात. त्याशिवाय मद्यपान करून वाहन चालवणेदेखील अपघातांना करणीभूत ठरतात. महामार्ग पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला असून २६५ गंभीर जखमी झाले. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये झालेल्या २०० अपघातात ८८ जणांचा मृत्यू झाला होता. तर चालू वर्षातील पहिल्या 6 महिन्यांत १०३ अपघातामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला, तर ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

एकेकाळी वेळेची बचत करणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अपघातांची वाढती संख्या व नियमित होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना आता नकोसा वाटू लागला आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गांवरील वेग मर्यादाच हटवण्याचे संकेत दिले होते. जेणेकरून भविष्यात देशभरात तयार होणार्‍या विविध महामार्गांवरून वाहनांना सुसाट जाता येऊ शकेल. तर दुसरीकडे मेटे यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) लावण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने निर्देश दिले आहेत. पुढील वर्षभरात ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकते, असे म्हटले जात आहे. प्रशासनाने वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कितीही इंटेलिजंट यंत्रणा उभारल्या तरी जोपर्यंत वाहन चालक वेग मर्यादेचे पालन करण्यासोबत वाहतुकीची स्वयंशिस्त इंटेलिजंटपणे पाळत नाही, तोपर्यंत हे अपघात होतच राहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -