घरसंपादकीयओपेडनेहरूंच्या बदनामीचा कोळसा किती काळ उगाळणार?

नेहरूंच्या बदनामीचा कोळसा किती काळ उगाळणार?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा भाजपला बहुमत मिळवून देऊन केंद्रात सरकार स्थापन केल्यावर त्यांनी १४ ऑगस्टला फाळणीचा भयस्मृती दिन पाळायला सुरुवात केली आहे. खरेतर त्या आठवणी इतक्या भयानक आहेत की आता त्या आठवण्याची कुणाची इच्छा नाही, पण भाजपचा या विषयीचा पवित्रा पाहता ती भाजपची राजकीय गरज होऊन बसली आहे की काय असे वाटू लागते. या १४ ऑगस्टला भयस्मृती दिनी भाजपने पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फाळणीचे खापर फोडणारा व्हिडीओ जारी केला. त्यातून फारसे काही साध्य झाले अशातला भाग नाही, पण नेहरूंच्या बदनामीचा कोळसा भाजपवाले किती काळ उगाळणार आहेत, असा एक प्रश्न उपस्थित होतो.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने १४ ऑगस्टला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पाकिस्तानचे निर्माते महमदअली जिना यांच्यासमोर कसे झुकले, त्यामुळे देशाची फाळणी कशी झाली, हे दाखवणारी चित्रफित प्रसारित केली. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वर्षापासून १४ ऑगस्ट हा फाळणी भयस्मृती दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याच दिवशी नेहरूंचा कमकुवतपणा दाखवणारी ही चित्रफित दाखविण्यात आली. त्यावरून असा अंदाज येऊ शकतो की दरवर्षी जेव्हा हा फाळणी भयस्मृती दिन पाळला जाईल, तेव्हा पंडित नेहरू यांच्याविषयी अशीच चित्रफित काढून त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे दिसते.

देशाच्या फाळणीच्या प्रक्रियेत केवळ पंडित नेहरूंचा हात नव्हता. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते महात्मा गांधीही होते. तसेच सरदार वल्लभभाई पटेल असे अनेक नेते होते. त्यामुळे फाळणीचे खापर एकट्या नेहरूंच्या डोक्यावर फोडणे किती योग्य आहे, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण त्यावेळी नेहरू हे काही हुकूमशहा नव्हते. त्यामुळे समजा नेहरूंचे काही चुकले असेल तर त्यावेळी अन्य नेत्यांनी सामूहिकपणे त्यांचा विरोध का केला नाही, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भाजपने प्रसारित केलेल्या या चित्रफितीला अर्थातच लोकांकडून फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही, पण काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या चित्रफितीला प्रत्युत्तर देताना भाजपकडून फाळणीच्या वेळच्या कटू आठवणींचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हटले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा दिला होता. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी, घराणेशाहीची राजवट. त्यातून देशाला मुक्त करायचे असेल तर देशाला काँग्रेसमुक्त करावे लागेल. त्यामुळेच तुम्ही भाजपला मत द्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी हे गुजरातचे विकास पुरुष होते. ते तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग निवडून आले होते. देशविदेशातून विकासाचे गुजरात मॉडेल पाहण्यासाठी लोक गुजरातला भेट देत होते. त्यामुळे आपल्याला पंतप्रधानपदाची संधी दिली तर मी गुजरातप्रमाणे भारताचा विकास करून दाखवेन, असे वचन मोदी लोकांना देत होते, तर दुसर्‍या बाजूला मोदींचा सामना करू शकणारे नेतृत्व काँग्रेसकडे नव्हते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वय झाले होेते.

राहुल गांधी मोदींपेक्षा लहान होते. त्याचसोबत यूपीए-२मधील बरेच मंत्री भ्रष्टाराच्या प्रकरणात अडकले होते. त्यात पुन्हा संसदेवरील हल्ल्यातील कटाचा सूत्रधार अफजल गुरू आणि मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाब यांना गुन्हे सिद्ध होऊनही पोसण्यात येत होते. मुस्लीम मतदारांचे भावनिक लांगुलचालन करण्यात येत होते, पण त्यातून लोकांच्या मनातील हिंदुत्ववादाची तीव्रता वाढू लागली होती. काँग्रेसच्या या दुर्बलतेचा फायदा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नव्या दमाच्या नेत्याला मिळाला. त्यामुळे मोदींच्या प्रचारसभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळून भाजपला पहिल्यांदाच केंद्रात बहुमत मिळाले. मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेला मोठा प्रतिसाद मिळाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुतांश काळ केंद्रात सत्तेत राहणार्‍या काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष होण्याइतक्या जागाही जिंकता आल्या नाहीत.

- Advertisement -

काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधींनी मोदींचा इतका धसका घेतला की त्यांनी काहीही केले तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बोहल्यावर आपण चढणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी हे पद हंगामी स्वरूपात सांभाळत आहेत. एकूणच काय तर काँग्रेसला सध्या नेता नाही, अशी अवस्था झालेली आहे. काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष नसल्यामुळे त्यांचा विरोधक असलेल्या भाजपचे बळ अधिकच वाढले आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर भाजप अधिक मजबूत होताना दिसत आहे. आता उरलीसुरली काँग्रेस संपून गेली तर आपल्यापुढे कुठलेच राजकीय आव्हान उरणार नाही, असे भाजपला वाटत आहे. काँग्रेस हा घराणेशाहीवर आधारलेला पक्ष आहे, तर भाजप हा लोकशाहीवर आधारित पक्ष आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येत असली तरी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना त्यांच्याच पक्षातील इच्छुकांचा कसा सामना करावा लागला हे माहीत असेल.

देशाच्या फाळणीपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत ज्या काही समस्या आहेत, त्याला गांधीजी आणि नेहरू हेच कसे जबाबदार आहेत, याचेच पालुपद भाजपकडून लावण्यात येत होते. अलीकडच्या काळात यातून महात्मा गांधीजींची सुटका झालेली दिसत आहे. कारण गांधीजींवर होणारी टीका कमी झालेली आहे. कारण आपली जरी बहुमताची सत्ता आली तरी राजघाटावर गांधीजींच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे भाजपवाल्यांच्या लक्षात आलेले आहे. कारण महात्मा गांधीजी हे जागतिक मान्यता मिळवलेले नेते आहेत. त्यांच्यावर टीका केली तर त्यातून आपलेच नुकसान होईल याची भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना कल्पना आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचे धाडस केले तरी नोटांवरील महात्मा गांधीजींची प्रतिमा बदलण्याचे धाडस केलेले नाही. भापजची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासून महात्मा गांधीजी वर्ज्य होते. त्यांना गांधीजींच्या मवाळवादी धोरणातून देशाला स्वातंत्र्य मिळेल असे वाटत नव्हते. त्यामुळे गांधीजींचा मवाळवाद हा त्यांच्यासाठी तसा थट्टेचा विषय असे, पण हिटलरमुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. जगभर साम्राज्य असणारे ब्रिटन जेरीला आले. हिटलरपासून वाचण्यासाठी त्यांना अमेरिकेला गयावया करून युद्धात उतरवावे लागले. हिटलरचा पाडाव झाला, पण अमेरिकेचे जागतिक पातळीवर वजन वाढले.

ब्रिटनच्या वसाहतींमधून स्वातंत्र्य चळवळी जोर धरू लागल्या होत्या. भारतातही तीच परिस्थिती होती. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अपेक्षेपेक्षा भारताला अगोदर स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संघाला म्हणावा तसा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेता आला नव्हता. त्यामुळेच ते शल्य त्यांच्या मनात आहे. हेच शल्य संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्येही आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपला दोन वेळा बहुमत मिळवून दिले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान हाती घेतले, पण हाच तिरंगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयावर देश स्वतंत्र झाल्यावर बरीच वर्षे लावला जात नव्हता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत आले तेव्हा संघाला उपरती झाली. त्यानंतर संघाने मुख्यालयावर भगव्यासोबत तिरंगा फडकवायला सुरुवात केली.

भाजपची बहुमतातील सत्ता केंद्रात आल्यानंतर भाजपचे नेते पंडित नेहरू यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या योगदानाविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत, पण जेव्हा पंडित नेहरू आणि इतर नेतेमंडळी स्वातंत्र्यासाठी लढा देत होते, अगदी शाळा कॉलेजातील मुले-मुली आपल्या छातीवर गोळ्या झेलत होते, तेव्हा आपले पूर्वसुरी काय करत होते, या प्रश्नाचे उत्तर आजच्या भाजपच्या नेत्यांना सापडणे अवघड आहे. पंडित नेहरू यांनी कारावासात असताना ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. नेहरूंचे शिक्षण विदेशात झालेले होते. त्यावेळी युरोप आणि अमेरिकेमध्ये आधुनिक विचारांपासून ते यंत्रसामुग्रीपर्यंत नवी क्रांती झालेली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगात होणार्‍या नव्या बदलांना देश चांगल्या प्रकारे कसा सामोरा जाईल, नवी आव्हाने कशी पेलता येतील, त्यासाठी पहिले पंतप्रधान झालेल्या नेहरूंनी आधुनिक विचार देशामध्ये रुजवला आणि त्याच वेळी केवळ धार्मिक गोष्टीत समाजाला गुंतवून न ठेवता देशाला नव्या युगाची नवी दिशा दाखवली. नेहरूंनी आधुनिक शिक्षण संस्था, विज्ञान संशोधन संस्था, आधुनिक उद्योग यांची पायाभरणी केली. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे मोठी धरणे नेहरूंनी बांधली. त्याच बळावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या योजना रचल्या आहेत. केवळ भावनिक उमाळा येऊन देशाची प्रगती होत नसते. त्याला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड असावी लागते. आज आधुनिक दूरसंपर्क साधने आणि वाहतूक साधनांमुळे जग एक जागतिक खेडे झाले आहे. जगात सहज कुठेही संपर्क साधता येतो. भारताने गेल्या ७५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक उच्चशिक्षित भारतीय लोक जगातील विविध देशांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. एका अर्थाने हे सगळे जगभर पसरलेले लोक म्हणजे विस्तारित भारत आहे.

आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी पंडित नेहरूंवर सडकून टीका केली होती, पण जेव्हा नेहरूंचे देहावसान झाले, त्यावेळी त्यांच्या दै. ‘मराठा’मध्ये देशासाठी नेहरूंचे काय योगदान होते हे सांगणारी अग्रलेखांची मालिका प्रसिद्ध केली होती. पुढे ‘सूर्यास्त’ या नावाने ती पुस्तकरूपात संकलित करण्यात आली. भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात अणूचाचण्या केल्या, तेव्हा त्यांनी हे आम्हाला शक्य झाले, कारण अणूसंशोधन संस्थांचा पाया पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी घातला होता, असे म्हणून नेहरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त केली होती.

महमदअली जिना यांच्यापुढे नेहरू तोकडे पडले. त्यामुळे देशाची फाळणी झाली, असे भाजप नेते म्हणत असतील तर त्यासाठी त्यांना त्यावेळची परिस्थिती काय होती याचा विचार करावा लागेल. देशाची फाळणी होणे याचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही, पण त्यावेळी जिना आणि मुस्लीम लीग यांना सर्वपक्षीयांनी आणि सर्व जनतेने का विरोध केला नाही, याचा विचार व्हायला हवा. जिनांच्या जहालवादापुढे अवघा देश दुबळा का झाला होता, याचा विचार व्हायला हवा. गेली ७५ वर्षे आपण इवल्याशा पाकिस्तानशी झगडत आहोत. भारताकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने सैन्य आणि शस्त्रसामुग्री असून पाकिस्तानवर जरब निर्माण करण्यात आपण कशामुळे कमी पडत आहोत, याचा नेहरूंना दोष देणार्‍यांनी विचार करायला हवा. भाजपचे दोनाचे २०० खासदार बनवून ज्यांनी भाजप आघाडीची सत्ता केंद्रात आणली ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पाकिस्तान भेटीवर गेले होते, तेव्हा त्यांनी जिनांच्या थडग्यासमोर डोके टेकले आणि जिना सेक्युलर होते, असे जाहीर वक्तव्य केले होते.

त्यावेळी संघ आणि भाजपच्या नेत्यांना त्यावर काय बोलावे हे कळणे अवघड होऊन बसले होेते. १४ ऑगस्ट फाळणी भयस्मृती दिनाचे पालन करून आणि फाळणीसाठी नेहरूंना जबाबदार धरून भाजपला आता काँग्रेसला संपवायचे आहे हे स्पष्ट आहे, पण त्या स्मृती आता कुणालाच नकोत. काश्मिरातील ३७० कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठे कार्य केले आहे यात शंकाच नाही, पण महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत एक उच्च स्थान आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांना डावलता येणार नाही. सुरुवातीला महात्मा गांधींना नाकारणार्‍या भाजप नेत्यांना त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावे लागते. आधुनिक भारताची पायाभरणी नेहरूंनी केलेली आहे हे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर कितीही दोषारोप केले तरी पुसता येणार नाही. त्यामुळे त्यांनी नेहरूंच्या बदनामीचा कोळसा कितीही उगाळला तरी त्यामुळे त्यांचेच हात काळे होणार आहेत.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -