घरसंपादकीयओपेडदेशाच्या प्रगतीत विविध क्षेत्रातील महिलांचे मौलिक योगदान !

देशाच्या प्रगतीत विविध क्षेत्रातील महिलांचे मौलिक योगदान !

Subscribe

आज नागरी क्षेत्रात स्त्रिया अधिकारिणी बनून पुढे आल्या. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत इ. विविध क्षेत्रांत स्त्रियांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या अन् सर्वच पदावर महिला सक्षमतेने कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत ३० टक्के जागा राखीव असल्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करतच आहेत, पण देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आयएएस, आयपीएस होऊन नागरी सेवा करणार्‍या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करीत आहेत.

– वंदना जाधव 
मध्ययुगात स्त्रियांची स्थिती अधिकच चिंताजनक होती. तिच्या शिक्षणाची दारे बंद होती. विवाहाचे वय जेमतेम आठ-नऊ वर्षे. विधवा विवाहास परवानगी नव्हती, पण पती निधनानंतर स्त्रिया सती जात. स्त्रिया कौटुंबिक व सामाजिक बंधनांनी जखडल्यामुळे त्या पुरुषी वर्चस्वाखाली भरडल्या जात. आधुनिक काळात (सन १८१८) इंग्रजांमुळे भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे बदल झाले. लोकहितवादी राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी कर्वे आदी समाजसुधारकांनी संस्कृतीतील वाईट चालीरीती मोडीत काढल्या.

महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, पुरुषासमान महिलेला दर्जा मिळवण्यासाठी पुनर्विवाह, अस्पृश्यता, स्त्रियांना स्वतंत्र व शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. समाजातील अनेक अनिष्ट रूढी बंद केल्या. इ. स. १८८० ते १९३० या काळात भारतात महिला आंदोलनाला यश आले. राष्ट्रीय विकासात महिलांना स्थान मिळाले. म्हणून भारत छोडो, सविनय कायदेभंग, स्वदेशी अभियान, असहकार आंदोलन अशा अनेक चळवळींमध्ये महिला अग्रेसर राहिल्या. महिलांचे स्थान उंचावण्यासाठी डॉ. मुठथूलक्ष्मी रेड्डी, डॉ. अ‍ॅनी बेझंट, लेडी टाटा, मागरिट काझीन अशा अनेक कर्त्या महिलांनी महिला विकासासाठी तर सरोजिनी नायडू यांनी मानवाधिकारासाठी प्रयत्न केले. १९३७ सालाच्या निवडणुकीत ४१ जागा महिलांना राखीव ठेवल्या.

- Advertisement -

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामजिक क्षेत्रात काम करण्यास स्त्रिया कार्यक्षम आहेत हे सिद्ध झाले. कारण स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांबरोबरीनेच पुरुषार्थ गाजवला व स्त्रीला एक नवा दर्जा प्राप्त करून दिला. त्यामुळेच स्त्रियांनी राजकारणातील प्रवेश, परदेशी मालावर बहिष्कार, असहकार आंदोलनात मोठा सहभाग घेतला. वेळप्रसंगी तुरुंगवासही पत्करला. आधुनिक काळात मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया विविध क्षेत्रांत काम करू लागल्या. वारसा हक्क कायदा (१९५६), बहुपत्नीत्वाची चाल बंद झाली. विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्याचा हक्क प्राप्त झाला. हुंडाबंदी तसेच वेश्याव्यवसाय, बलात्कारविरोधी कायदा असे अनेक कायदे आल्यामुळे स्त्रीजीवन सुलभ झाले.

स्त्री जीवनात एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला मनाचा प्रकाश. फुले, आगरकर आणि कर्वे यांच्या अथक परिश्रमातून तिच्यासाठी शिक्षणाची उघडलेली कवाडे आणि उंबरठ्याबाहेर पाऊल टाकण्याचे मिळालेले स्वातंत्र्य. पाटी-पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्पकाळात विद्यापीठाच्या विविध परीक्षाही पार केल्या. आज तिने एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात नैपुण्य मिळवून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आजच्या काळात महिला उच्चशिक्षित होऊन मोठमोठ्या पदांवर नोकर्‍या करू लागल्या. कला, नाटक, चित्रपट, जाहिरात, सौंदर्य, औद्योगिक, शासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रांत ज्ञानाच्या व आत्मविश्वासाच्या बळावर महिला स्वतःला सिद्ध करत यशस्वीरित्या कामगिरी पार पाडत आहेत.

- Advertisement -

आज नागरी क्षेत्रात स्त्रिया अधिकारिणी बनून पुढे आल्या. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत विविध क्षेत्रांत स्त्रियांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या अन् सर्वच पदावर महिला सक्षमतेने कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात ३० टक्के जागा राखीव असल्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करतच आहे, पण देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आयएएस, आयपीएस होऊन नागरी सेवा करणार्‍या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करीत आहेत. उदा. नीला सत्यनारायण, लीना मेहेंदळे, चंद्रा अय्यंगार, मीरा बोरवणकर इ. आजच्या काळात पोलीस क्षेत्रातही कितीतरी महिला पोलीस शिपाई ते पोलीस इन्स्पेक्टर, कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातही स्वतः सिंधुताई सपकाळ, अपर्णा रामतीर्थकर, साधना आमटे, प्रकाश आमटे, मेधा पाटकर अशा कितीतरी महिलांनी विशेष कामगिरी केली आहे. अलीकडे गावोगावी महिला मंडळे व बचत गटाच्या माध्यमातूनही अनेक कार्ये पार पडली जातात.

पूर्वी घरकाम करणे, स्वयंपाकाची कामे करणे, भाजीपाला विकणे इ. कामे करणे कमी प्रतीचं मानलं जायचं, पण सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील शिक्षित, अशिक्षित, गरजू स्त्रिया स्वयंपाकाची कामे, मुले सांभाळणे, पाळणाघर चालवणे, मेस चालवणे, भाजी-पोळी केंद्र, हॉटेल व्यवसाय, शिवणकाम करणे, गरजू पेशंटची नर्स म्हणून शुश्रुशा करताना दिसतात. आजमितीला स्त्रिया त्यांचे सुप्त गुण हेरून विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मार्गदर्शन घेऊन तर कधी डिजिटल माध्यमांच्या यू ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामचा आधार घेतात व त्यांच्या बकेट लिस्टमध्ये असणार्‍या सुप्त इच्छांची स्वप्नपूर्ती करताना दिसतात. ज्या स्त्रिया शिक्षित आहे, परंतु काही कौटुंबिक अडचणींमुळे स्वतःच करियर करू शकल्या नाहीत, अशा स्त्रिया या संधीचं सोनं करत बुटिक टाकणं, ब्युटी पार्लर टाकणं, ऑनलाईन कपड्यांचा व्यवसाय करणे, गायनाचे क्लास घेणे, चित्रकला, डान्स, स्विमिंग, झुब्बा, योगाचे क्लास, जिम ट्रेनर, नोकरी, ऑर्गेनिक फळभाज्या विकणे, ठिकठिकाणी व्याख्यान म्हणून जाणे व जनजागृती करणे इ. कामे करताना स्त्रिया दिसतात.

सामाजिक कार्य करतानाही कधी श्रमदान, अन्नदान, ज्ञानदान तर कधी आर्थिक मदत करताना दिसतात. आपला पाककृती आस्वाद सर्वांना मिळावा म्हणून काही महिला घरगुती फराळाचे चटपटीत पदार्थ करून विकणे, गर्दीच्या ठिकाणी गाडा लावून गरमागरम चटपटीत पदार्थ स्वतः तयार करून विकणे, घरगुती मिरची मसाले, उन्हाळ्याचे पदार्थ तयार करून विकणे, रसवंती गृह चालवणे, रिक्षा चालवून व्यवसाय करणे, ब्युटी पार्लर चालवणे इ. व्यवसाय करून महिला कुटुंबासाठी अर्थार्जन करताना दिसतात. ढोलपथक, लेझिम, क्रीडा क्षेत्र, योगाक्षेत्र, स्विमिंग, कत्थक इत्यादी क्षेत्रात इतर मुलामुलींना मार्गदर्शन करून अर्थार्जन करताना दिसतात. काही स्त्रिया राजकारण, अर्थकारणात स्वतःला सिद्ध करतात. थोडक्यात स्त्रियांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय की वयोगट कुठलाही असो दुर्दम्य इच्छाशक्ती अन् अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यक्ती आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर यशस्वी होऊन स्वतःला सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजात आदर्श ठेवण्यात पात्र ठरेल.

आज स्त्रीच्या वेशात आणि राहणीमानातही खूप जास्त बदल झालाय. तिची भाषाशैली बदललीय. शिक्षणाने विचारांची प्रगल्भता वाढलीय. ज्ञानाने ती समृद्ध झालीय. आत्मविश्वासाने व निर्भयपणे ती सर्वत्र वावरते व आपली मते घरात व समाजाच्या उंबरठ्यावर परखडपणे मांडताना दिसत आहे. काम करताना सुलभ जावं म्हणून तिने गरजेनुसार आपल्या पोशाखात बदल केला आहे. २४ तास साडी चोळीतच न राहता तिने सलवार कुर्ता, पँट शर्ट, वनपिस इ. पोषाखांची निवड केलेली दिसते. स्वतःच्या ‘स्व़’बद्दलही ती जास्त जागृत होऊन ती गरजेनुसार आहारात, मानसरोगतज्ज्ञ,

स्त्रीरोगतज्ज्ञ, योग शिक्षिका, फिटनेस पाईंट, अथर्ववेद तज्ज्ञ, होमिओपॅथी तज्ज्ञ इ.शी संपर्क करून आपलं शरीर व मन कसं सदृढ आणि निरोगी ठेवता येईल याकडे तिचा कटाक्ष आहे. व्यक्तिमत्त्व कसं जास्तीत जास्त खुलवता येईल त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी ती सहभागी होते. स्त्रीविषयक कायदे, स्त्री सुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या व उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांची माहिती करून घेण्यात ती तरबेज झालीय. स्वरक्षण करता यावं यासाठी कराटेचं मार्गदर्शन, नियमित चालणे व व्यायाम, सदृढ शरीरयष्टी मजबूत ठेवण्याविषयी आजची स्त्री जागृत आहे.

आज स्त्रीने एक सत्य जाणले आहे. आता ती आर्थिकदृष्ठ्या व ज्ञानासाठी कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. ‘तदेनत् अर्धद्विदल भवती !’ स्त्री-पुरुष समान आहेत, असं संस्कृत वाचनात सांगितलं आहे आणि तिच्या कृतीतून तिने सिद्ध केलंय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं, लिंगभेद कामाच्या काळात विसरून झोकून देऊन काम करणं, निर्भयपणे घरात आणि समाजात वावरताना निर्णय प्रक्रियेत हिरिरीने सहभागी होणे इ. गोष्टी आजची स्त्री आवर्जून करते. घरात सर्व नाती सांभाळण्यात ती कर्तव्यदक्ष, अपार कष्ट करण्याची तयारी आणि सहनशीलता या त्रिसूत्रीमुळे यशस्वी होतीच, पण स्त्रीला संधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ज्ञान मिळवण्याच्या सर्व सीमा पार करत ती विचारांनी समृद्ध आणि कृतिशील होऊन कर्तव्यदक्ष, अचूक निर्णय क्षमता, अपार कष्ट अन् कायम शिकत राहण्याचा ध्यास इ. गुणांमुळे तिने समाजातील विविध क्षेत्रांत आपलं विशेष नैपुण्य दाखवून यशस्वी कामगिरी करून सर्वांनाच अचंबित करून टाकलंय.

यत्र नार्यस्तु उज्जैन ते पूज्यंते।

याचा अर्थ जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे देवतांचा वास असतो. दिवसेंदिवस विज्ञानात होणारी प्रगती व बदलत्या तंत्रज्ञानाचा वेध घेत भविष्यातही स्त्रियांनी ही अशीच उत्तोरोत्तर प्रगती करून भारत जगाच्या पाठीवर उच्च स्थानावर गणला जाण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, अशी सदिच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -