घरसंपादकीयओपेडराजकारणात काही सांगता येत नाही, म्हणूनच सगळे गॅसवर!

राजकारणात काही सांगता येत नाही, म्हणूनच सगळे गॅसवर!

Subscribe

भाजपने राज्यात एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सत्ता आणली खरी, पण त्यामुळे सत्तेत सहभागी झालेले सगळेच अस्वस्थ आहेत. शिंदे यांच्यासोबत स्थिर सरकार असताना शरद पवारांना शह देण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित पवार यांना सोबत घेतले, पण आम्ही त्यांना तसे वचन दिले नव्हते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार आहे पण मुख्यमंत्रीपद नाही म्हणून फडणवीसही अस्वस्थ आहेत. ठाण्यात एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले की, काही सांगता येत नाही, म्हणून आम्ही गॅसवर असतो. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता सगळेच गॅसवर आहेत अशी स्थिती आहे.

राज्यात नुकत्याच विविध भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे दोन मित्रपक्ष असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची सरशी झालेली दिसली. आम्ही राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर एकचा पक्ष झाल्याचा दावा करत भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला, तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट शांत होते. कारण त्यांना म्हणावा तसा सूर सापडला नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी हातमिळवणी केली म्हणून भाजपची सत्ता राज्यात आली. आपल्यासोबत अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना आणल्यानंतर भाजपच्या नेत्यांना मोठा आनंद झाला. त्यामागे एक मुख्य कारण होते ते म्हणजे अजितदादांना आपल्याकडे खेचून भाजपने राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते शरद पवार यांची ताकद कमी करण्यात यश मिळवले आहे.

कारण २०१९ची विधानसभा निवडणूक आपण सहज जिंकू असे भाजपला वाटत होते, तसेच राष्ट्रवादीचे बलशाली नेते फोडून आपल्याकडे घेण्यात भाजपने यश मिळवले होते. अशा वेळी शरद पवारांनी राज्यात प्रचाराची एकाकी झुंज देऊन मोठ्या प्रमाणात जागा जिंकून आणल्या होत्या. शिंदे यांना आपल्यासोबत घेऊन भाजपने उद्धव ठाकरे यांना कमकुवत केले, तसेच भाजपने अजितदादांना सोबत घेऊन पवारांची ताकद कमी केली. महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर शरद पवारांना कमजोर करणे महत्त्वाचे आहे हे भाजपवाल्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी सरकारच्या स्थैर्यासाठी तशी आवश्यकता नसताना अजित पवार यांना आपल्यासोबत घेतले.

- Advertisement -

राज्यातील सरकारकडे बहुमत आहे. अगदी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारच्या स्थैर्याला धोका नाही, तर मग त्यांना माझी गरज काय, असा प्रश्न अजितदादा विचारत असत. त्यामुळे मी भाजपसोबत कशाला जाऊ, मी तुम्हाला बॉण्ड पेपरवर लिहून देऊ का, असे दादा पत्रकारांना त्राग्याने विचारत असत. आज जर पत्रकारांनी दादांना विचारले, भाजपसोबत आपण जाणार नाही, असे बॉण्ड पेपरवर लिहून द्यायला तयार असणारे तुम्ही भाजपमध्ये कसे काय गेलात, तर त्याचे उत्तर अजितदादा देऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री होणे अजित पवारांची महत्त्वाकांक्षा आहे. ती शरद पवारांसोबत राहून पूर्ण होत नाही, त्यामुळे ते भाजपसोबत गेले हे उघड गुपित आहे. कारण त्याशिवाय ते भाजपसोबत जाण्याचे काही ठोस कारण नाही.

ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार गटावर सरशी मिळवली आहे. त्याचसोबत एकनाथ शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. भाजपने शिंदे आणि पवार यांच्यासोबत केलेली हातमिळवणी ही काही त्या दोघांना मोठे करण्यासाठी केलेली नाही, तर त्यांच्या मदतीने सरकार स्थापन करता यावे यासाठी आहे हे काही वेगळे सांगायला नको. शिंदे आणि पवार हे वरचढ झाले तर ती आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण त्यामुळे भाजपला दुय्यम स्थान घेऊन समाधानी राहावे लागणार आहे.

- Advertisement -

अजित पवार यांना भाजपने सोबत घेतले असले तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला नव्हता, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशा मावळल्या आहेत. त्यात पुन्हा एका कार्यक्रमात अजित पवार शरद पवारांना भेटून त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. आपल्या आमदारांना कमी निधी दिला जात आहे, तर त्याच वेळी शिंदे गटाच्या आमदारांना जास्त निधी दिला जात आहे, अशी तक्रार अजितदादांनी अमित शहा यांच्याकडे केली. दादा अमित शहांसमोर काकुळतीला आले, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

फर्स्ट कम फर्स्ट या बेसिसवर एकनाथ शिंदे हे भाजपला जास्त जवळचे आहेत. कारण शिंदे यांनी अगोदर बंड केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. यामुळे त्यांना न्याय देणे ओघानेच आले. अर्थात अजितदादा हे सरकारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्याही सहकार्‍यांना चांगली खाती देण्यात आली. इतकेच नव्हे तर अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे शिंदे यांच्या गोटातील आमदारांमध्ये नाराजी पसरली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वत: पंतप्रधान मोदी यांना सहकुटुंब दिल्लीत जाऊन भेटून आले होते. इतकेच नव्हे तर ते काही दिवस आपल्या गावी गेले होते. आता अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे यामागे काहीतरी अंतर्गत अस्वस्थतेचे कारण असणार यात शंका नाही.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपले ‘अच्छे दिन’ येत असल्याचे दिसत असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढत आहे. कारण त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही जिंकायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला पोषक परिस्थिती निर्माण होण्याची भाजप वाट पाहत आहे. अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा भाजप नेत्यांनी जो धसका घेतला आहे, यापासून ते कुठलीच निवडणूक सहजासहजी घेण्यास तयार होत नाहीत. कितीही युती आणि आघाड्या झाल्या तरी तिकीट वाटप हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आणि गटांसाठी कळीचा मुद्दा ठरतो. तिकीट मिळण्यासाठीच सगळी धडपड सुरू असते.

सध्या शिंदे यांच्याच गटातील शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम ज्या पातळीवर जाऊन एकमेकांची मानहानी करत आहेत, त्यावरून तिकिटाचे महत्त्व आणि महात्म्य काय असते ते दिसून येेते. आपल्यानंतर आपली मुलेबाळे यांची राजकारणात रुजवात व्हायला हवी, असाच बहुतेक राजकीय नेत्यांचा कल असतो. कारण आता राजकारण ही समाजसेवा न राहता तो एक व्यवसाय होऊन बसला आहे. आपले जे धंदे सुरू आहेत, त्यांना संरक्षण देण्यासाठी ती एक आधारभूत यंत्रणा होेऊन बसलेली आहे. त्यामुळेच लोकशाहीचे नाव सांगत नवे संस्थानिक तयार होत आहेत. हे नवसंस्थानिकीकरण आपल्याला अन्य लोकशाही देशांमध्ये दिसत नाही. रेगन, थॅचर, क्लिंटन, ओबामा यांचे वारसदार राजकारणात दिसत नाहीत.

केंद्रीय सत्तेचा वापर करून भाजपने राज्यात सत्ता आणली खरी, पण पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याचे त्यांना धाडस होताना दिसत नाही. एक कारण म्हणजे भाजपने विरोधकांच्या मागे लावलेला चौकशीचा ससेमिरा आणि हे विरोधक भाजपमध्ये सामील झाले की त्यांची थांबवलेली चौकशी हे सगळे लोक पाहत आहेत. त्यामुळे भाजपने जनमनातील विश्वास गमावलेला आहे, याची भाजप नेत्यांना कल्पना आहे. तसेच ब्रिटनच्या म्युझियममध्ये असलेली छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे आणण्यामागे भाजपचा किती प्रामाणिकपणा आहे हेही लोकांना कळते.

ही वाघनखे एकाच ठिकाणी ठेवता येतील, ती प्रदर्शन करण्यासाठी फिरवता येणार नाहीत, तसेच काही कालावधीनंतर ती म्युझियमला परत करावी लागणार आहेत. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे आपल्यासोबत आल्यामुळे आपली ताकद वाढली असे वाटत आहे, पण त्यांनी अस्तित्व वेगळे ठेवलेले आहे. त्यामुळे हे दोन गट जसे बळकट होतील तसे निवडणुकीच्या वेळी तिकिटांवरील त्यांची दावेदारीही तितकीच बळकट होणार आहे. त्यामुळे त्यांना सामावून कसे घ्यायचे हे भाजपसमोर आव्हान असेल. सत्ता तर मिळाली, पण मुख्यमंत्रीपद हे पाहुण्यांना बहाल करावे लागत आहे ही भाजपची वेदना आहे, पण ती कळ सोसून त्यांना पुढे चालावे लागत आहे.

भाजपकडे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोन पर्याय आहेत. अजितदादा आणि शरद पवार गट यांच्यातील सख्य पाहता आणि पवारांची संयुक्त कुटुंब पद्धती पाहता अजित पवार हे परत गेले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहज सामावून घेतले जाऊ शकते, पण एकनाथ शिंदे यांची परिस्थिती तशी नाही. त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथील एका कार्यक्रमात सोमवारी आपली ‘मन की बात’ सांगताना म्हटले की, राजकारणात काही सांगता येत नाही, काहीही होऊ शकते. म्हणून आम्ही गॅसवर असतो. शिंदे यांचे हे वाक्य अगदी बरोबर आहे. कारण राजकारणासारखे अनिश्चित क्षेत्र दुसरे कुठलेही नाही.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -