घरसंपादकीयओपेडधार्मिक नाशिकचे ‘हनी-मनी ट्रॅप’ कनेक्शन!

धार्मिक नाशिकचे ‘हनी-मनी ट्रॅप’ कनेक्शन!

Subscribe

पाकिस्तानमध्ये अराजक वाढल्यापासून या देशाने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला लक्ष्य केल्याचे दिसते. थेट युद्ध करून पायावर धोंडा मारून घेण्यापेक्षा पाकने आता सुंदर तरुणींच्या माध्यमातून भारतातील लष्करी अधिकार्‍यांना जाळ्यात अडकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर हे याच कटाचा भाग ठरले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात संरक्षण क्षेत्राशी संबंधित ‘हनी’ आणि ‘मनी’ ट्रॅपसह अन्य काही घटना पुढे आल्या आहेत. त्यांचे ‘नाशिक कनेक्शन’ ऐकून हादरा बसतो. मुंबई, पुणे, नागपूरच्या तुलनेत भौगोलिकदृष्ठ्या अतिशय छोट्या असलेल्या नाशिकचे अशा घटनांशी कनेक्शन का जोडले जाते याचा घेतलेला हा धांडोळा...

द्राक्ष आणि रुद्राक्ष… कांदा ते बांधा… मिसळ नगरी ते वाईन कॅपिटल आणि तंत्रभूमी ते यंत्रभूमी…असा प्रवास करणार्‍या नाशिकने गेल्या ५० वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. कुंभमेळ्यासाठी लौकिक असलेल्या या नगरीचे धार्मिक महत्त्व अजूनही टिकून आहे. मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकची अलीकडे तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगती झाली आहे. होळी असो वा रंगपंचमी, संक्रांत असो वा दिवाळी, नाशिकने आपले वेगळे असे सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवले आहे. म्हणूनच सुसंस्कृत शहर म्हणून नाशिककडे बघितले जाते. अर्थात नाशिकमधील पॉझिटिव्ह गोष्टींवर जितकी चर्चा होती, किंबहुना त्यापेक्षा अधिक निगेटिव्ह बाबी अधिक प्रकर्षाने प्रकाशझोतात येतात. यात कधी नाशिकचा कांदा रडवत असतो, तर कधी तडे गेलेली द्राक्षे आपले दु:ख व्यक्त करीत असतात.

कधी भाव पडल्याने टोमॅटोचा ‘लाल चिखल’ व्यवस्थेला जाब विचारतो, तर कधी व्यवस्थेतील ‘खरे’ अधिकारी ‘खोट्या’ कारनाम्यांमुळे चर्चेत येतात. कधी त्र्यंबकेश्वर मंदिराला दाखवलेली धूप ‘आग ओकते’ तर कधी आगीत खाक झालेली बस खासगी ट्रॅव्हल्सचे वाभाडे काढते. बहुतांश बर्‍या-वाईट घटना-घडामोडींचे केंद्रस्थान झालेले नाशिक म्हणूनच चर्चेत असते, मात्र राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित घटनांशी जेव्हा नाशिक ‘कनेक्ट’ होते, तेव्हा मात्र नाशिकचा अभिमान बाळगणारे चिंतेत पडतात. अशा वेळी देशाच्या संरक्षणाशी संबंधित असलेल्या संस्थांमधील उच्चशिक्षित शास्त्रज्ञ आपले कर्तव्य कसे काय विसरतात, ते देशाला धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती देऊन कसे काय मोकळे होतात, असे प्रश्न सामान्य नागरिकाला पडत आहेत.

- Advertisement -

‘हनी ट्रॅप’च्या प्रकरणाशी संबंधित ही सुरक्षितता असो वा ‘मनी ट्रॅप’शी संबंधित. नाशिकमध्ये असे काय आहे ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या चर्चांमध्ये नाशिकचा आवर्जून उल्लेख होतो, असा प्रश्न नाशिकमध्ये न राहणार्‍यांना पडू शकतो. वास्तविक नाशिकमध्ये संरक्षणाशी संबंधित अनेक आस्थापना आहेत. भारतासह अनेक देशांना नोटांची छपाई करून देणारी नोट प्रेस नाशिकला आहे. जवळच असलेल्या ओझरमध्ये लढाऊ मिग विमानांची निर्मिती करणारा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल कारखाना आहे. देवळाली कॅम्प परिसरात डीआरडीओसारख्या महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, स्कूल ऑफ आर्टिलरी, एअर फोर्स स्टेशन, आर्मी स्कूल, मध्यवर्ती कारागृह, पोलीस प्रशिक्षण केंद्र, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय आदी बाबींमुळे नाशिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नेहमीच ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरते. त्यामुळे बहुसंख्य राष्ट्रीय मुद्यांशी नाशिक कनेक्शन असते.

असेच एक कनेक्शन जोडणारे प्रकरण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबतीत सध्या चर्चेत आहे. निवृत्तीला अवघे ६ महिने बाकी असताना डॉ. कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये फसले. ६ महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याच हनी ट्रॅप प्रकरणात नागपूर येथील वायुसेना कर्मचारी निखिल शेंडे याचे नावही पुढे आले आहे. कुरुलकरला शेंडेच्या मोबाईलवरून मेसेज आल्याचे तपासात उघड झाले आहे. पाकिस्तानी हेर झारा ही निखिलच्या नंबरवरून कुरुलकरला मेसेज करायची. झाराने निखिलचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे.

- Advertisement -

यासंदर्भात एटीएसने त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाईल क्रमांक पाठविले आहेत. त्याद्वारे तपास करण्याची सूचना केली आहे. नाशिकमध्ये देवळाली कॅम्प येथे डीआरडीओसारख्या संस्था असल्यामुळे तिथे या दोन मोबाईलचा वापर कोणाकडून केला गेला आहे का, यादृष्टीने एटीएस तपास करीत आहे. यापूर्वीही असे प्रकार येथे घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल कंपनीतील ४१ वर्षीय दीपक शिरसाठ नावाचा असिस्टंट सुपरवायझर पाकिस्तानी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला होता. या कर्मचार्‍याने मिग-२१ एफएल, मिग-२१ एम, मिग-२१ बीआयएस, मिग-२७, सुखोई-३० फायटर जेट, के-१३ मिसाईल यांसारख्या महत्त्वपूर्ण जेट आणि मिसाईलबद्दलची गोपनीय माहिती आणि फोटो पाकिस्तानमधील हसीना नावाच्या एका तरुणीला पाठवले होते.

हसीना पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सीशी (आयएसआय) संबंधित होती. हसीनाने जानेवारी २०१९ मध्ये सोशल मीडियावर दीपकशी मैत्री केली. काही महिन्यांनंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या मुलीने दीपकचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याच्याबद्दल सगळी माहिती घेतली. या मुलीने दीपकच्या मदतीने एचएएलच्या आत काय चालतं याची माहिती घेतली, पण तिला आतले फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती हवी होती. त्यामुळे तिने दीपकसोबत ऑनलाईन अश्लील गोष्टी करायला सुरुवात केली. त्या मुलीने दीपकचे फोटो, व्हिडीओ काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दीपकने भीतीपोटी ६ महिन्यांपर्यंत हसीनाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतरही माहिती पुरवणार होता, पण त्याआधी एटीएसला माहिती मिळाली आणि त्याला अटक केली गेली.

एचएएल ही कंपनी भारतातील लढाऊ विमाने बनवणारी कंपनी असल्याने तिथे अतिशय गोपनीय पद्धतीने काम केले जाते. जेणेकरून इतर देशांना या लढाऊ विमानांची खासगी माहिती मिळू नये. असे असतानाही ६ महिन्यांपासून कंपनीचा एखादा कर्मचारी गोपनीय माहिती पाकच्या हेरांना पुरवतो ही बाब आपल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली. यातून आपली संरक्षण सिद्धता व सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाचे पितळ उघडे पडते. यावरून लक्षात येते की पाकिस्तानच्या युद्धनीतीत बदल झाला आहे. नाशिकमधील घटनेतून भारतीय विमानांची कशा प्रकारे तयारी, कोणती विमाने-तंत्रज्ञान वापर होतो, देशांंतर्गत गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहेत, अशा प्रकारच्या माहितीची जमवाजमव पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ करीत आहे हेच स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावत असल्याचे सांगतानाच नाशिकला अशा हनी ट्रॅपपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. एका पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारचा इशारा देणे ही बाब नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत धोक्याची घंटा मानावी, पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जाताना दिसत नाही. कारण तसे केले असते तर हनी ट्रॅपच्या घटना घडताना दिसल्या नसत्या. त्यांना वेळीच चाप लावता आला असता.

यापूर्वीदेखील नाशिकमध्ये हेरगिरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २००९ मध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित लालबाबा फरीद उर्फ बिलाल आणि हिमायत बेग या दोन हेरांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडे महाराष्ट्र पोलीस अकादमीचे काही फोटो होते. तसेच त्यांच्या नाशिकमधील घरी स्फोटके सापडली होती. या स्फोटकांवर लष्कर-ए-तोयबाची नावे होती. म्हणजेच पोलीस अकादमीची रेकी करून त्यांना ही अकादमीच उडवून द्यायची होती. या सार्‍या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. तसेच येथील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलचे फोटो काढून एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने पाकिस्तानला पाठवल्याची घटनाही दोन वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. या ठिकाणच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची संपूर्ण माहिती त्याने पाकिस्तानला पुरवली होती. या प्रकरणात संबंधिताला अटक करण्यात आली. वास्तविक लष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडला.

गेल्या वर्षी नाशिक शहरातील लष्करी हद्दीत ड्रोनने रेकी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या परिसरात ड्रोन उडवण्यात आले होते. नाशिकच्या लष्करी हद्दीत हा प्रकार दुसर्‍यांदा घडल्याने खळबळ उडाली होती, तर त्याआधी गांधीनगर परिसरातील आर्टिलरी सेंटर परिसरात ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर संरक्षण विभाग, पोलीस, इंटेलिजन्स टीम आणि अँटी टेररिझम ब्रँचकडून तपास सुरू करण्यात आला. या घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक शहरात काही महिन्यांसाठी ड्रोनवर बंदी घालण्यात आली होती. अर्थात केवळ ड्रोनवर बंदी घालून चालणार नाही. सुरक्षा व्यवस्थेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा झारा, हसीना यांसारख्या पाकिस्तानी तरुणी सोशल मीडियाद्वारे सुरक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर प्रेमाचे जाळे टाकत राहतील. त्यात मदनधुंद मासे अडकतच राहतील.

धार्मिक नाशिकचे ‘हनी-मनी ट्रॅप’ कनेक्शन!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -