घरसंपादकीयओपेडअनिल जयसिंघानी प्रवृत्ती फोफावलीच कशी?

अनिल जयसिंघानी प्रवृत्ती फोफावलीच कशी?

Subscribe

अनिल जयसिंघानी काही वर्षांपासून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच तत्कालीन उच्च पोलीस अधिकारी तसेच सनदी अधिकारी यांच्याशी चांगल्या प्रकारे सलगी राखून होता. त्यामुळेच तो गुन्हेगार असतानादेखील त्याला थेट गृहमंत्रालयातून पोलीस संरक्षण देण्यात आले होते. आता सर्वात मुख्य मुद्दा आहे तो उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याची पत्नी अमृता फडणवीस, अनिल जयसिंघानी आणि त्याच्या मुलीच्या ट्रॅपमध्ये कशी काय फसली हा आहे. जयसिंघानी प्रवृत्ती फोफावायला कोण कारणीभूत आहे, याचाही विचार व्हायला हवा.

अनिल अर्जुन जयसिंघानी आणि अनिक्षा अनिल जयसिंघानी या बापबेटीने राज्यातल्या भल्या भल्यांच्या झोपा उडवल्या आहेत. राज्यात तसेच राज्याबाहेरदेखील तब्बल १७ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या अनिल जयसिंघानी याच्या आजवरच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये विविध राजकीय नेत्यांपासून ते नामवंत सनदी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचादेखील समावेश आहे. प्रश्न अनिल जयसिंघानी याचा नसून लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत अथवा जे काही दोष आहेत, याचा पुरेपूर दुरुपयोग करणार्‍या प्रवृत्तीचा हा खरा प्रश्न आहे. जयसिंघानी हा काही एका रात्रीत उभा राहिलेला नाही.

गेले जवळपास तीन दशकाहून अधिक काळ तो हेच करत आला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो की अनिल जयसिंघानी आणि याच्यासारखी प्रवृत्ती या समाज व्यवस्थेमध्ये अनिर्बंधपणे फोफावतेच कशी? राजकीय नेत्यांना सनदी अधिकार्‍यांना अथवा अगदी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनादेखील अनिल जयसिंघानी हे लागतातच कशाला? त्यातल्या त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष, चतुर, मुसद्दी तसेच स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून ओळखले जातात. तरीही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या पत्नीपर्यंत अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हे पोहचलेच कसे, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पत्नीला हाताशी पकडून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्याचे यामागे कारस्थान होते की काय, अशीही चर्चा आहे.

- Advertisement -

साधारणपणे गेली २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ अनिल जयसिंघानी हा केवळ उल्हासनगरातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात तसेच मुंबईतदेखील कुख्यात क्रिकेट बुकी म्हणूनच परिचित आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अनिल जयसिंघानी क्रिकेट बुकी म्हणून उदयास आला अशातला काही भाग नाही. कारण राज्यात १९९५ ते ९९ तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानादेखील जयसिंघानी क्रिकेट बेटिंगच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताच. अनिल जयसिंघानीचे वडील हे उल्हासनगरात ‘चिंगारी’ नावाचे इंग्रजी भाषेतील साप्ताहिक त्याकाळी काढत असत. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व बर्‍यापैकी होते. त्यामुळे त्यांचे ठाणे जिल्ह्यातील सनदी अधिकारी अथवा पोलीस खात्यातील अधिकारी यांच्याशी निकटचे स्नेहसंबंध जुळले. आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांशी दोस्ताना करताना त्यांना इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कामाला यायचे.

अनिल जयसिंघानीने वडिलांचा कित्ता पुढे सुरू ठेवत त्याला स्वतःच्या साप्ताहिकाची जोड दिली. वडिलांचे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगले संबंध असल्यामुळे अनिललादेखील सरकारी आणि पोलीस वर्तुळात अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण करता आली. पोलीस खात्यामध्ये कोणाशी संबंध ठेवावेत, कोणाशी वाढवावेत याचे पक्के भान अनिलला सुरुवातीपासूनच होते. स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांशी चांगली गट्टी जमल्यानंतर हळूहळू अनिलने ठाणे मुंबई या कार्यक्षेत्रातदेखील त्याचा दबदबा कसा निर्माण होईल याचा प्रयत्न केला. आयपीएस अथवा आयएएस अधिकार्‍यांशी सलगी करण्यासाठी तो त्यांना महागड्या भेटवस्तू देत असे. त्यामुळे पहिल्या एक-दोन भेटीमध्येच अधिकारी त्याचे घनिष्ठ मित्र बनत असत. बर्‍याच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना तो क्रिकेट बुकिंग संदर्भातली आपली माहिती पुरवत असे. त्याचा उपयोग संबंधित पोलीस अधिकार्‍यांना कारवाई करण्यासाठी अथवा रेड टाकण्यासाठी होत असे. अनिलने दिलेली माहिती खरी निघत असल्यामुळे वरिष्ठांचा त्याच्यावरील विश्वास हळूहळू वाढत गेला.

- Advertisement -

तर या ओळखींचा उपयोग करत अनिलने क्रिकेट बेटिंगमध्ये स्वतःचे मोठे प्रस्थ केवळ उल्हासनगरातच नव्हे तर मुंबई महाराष्ट्र परिसरात निर्माण केले. हळूहळू त्याचा कार्यविस्तार वाढत गेला आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट बेटिंगला कायदेशीर मान्यता असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि मग त्याने इंग्लंडमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आपले लक्ष बनवत त्यांच्या माध्यमातून तो येथील क्रिकेट बेटिंग इंग्लंडवरून ऑपरेट करू लागला. हे सर्व करत असताना अर्थातच त्याला सरकारी पातळीवर मोठ्या मदतीची गरज भासायची, मात्र सनदी अधिकार्‍यांशी असलेली सलगी अशावेळी त्याच्या कामाला यायची. क्रिकेट बेटिंगच्या माध्यमातून त्याने अक्षरशः कोट्यवधींची माया जमा केली. कधीकाळी उल्हासनगरातील एक साधा क्रिकेट बुकी असणारा अनिल जयसिंघानी अल्पावधीतच क्रिकेट बेटिंगमधील आघाडीचा अंडरवर्ल्ड क्रिकेट बुकी झाला. त्याचा हा प्रवास कोणाही सामान्य माणसाचे डोळे दिपून टाकणारा आहे.

अर्थात, सनदी अधिकार्‍यांना, राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढत असताना अनिलने त्यांचे पुरावे तयार करण्याचे पद्धतशीर कारस्थान सुरू ठेवले. त्यामुळे एखाद्या अधिकार्‍याने अथवा राजकीय नेत्याने जर का एकदा त्याच्याशी सलगी केली आणि त्यानंतर जर का त्याने सांगितलेले काम केले नाही तर अशांना पुरावे दाखवून आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून स्वत:चे काम करून घेण्याचे विकृत कसबदेखील त्याने आत्मसात केले होते. त्यामुळे उल्हासनगरातील अथवा ठाण्यातील बडे बडे नेते अनिल जयसिंगानीच्या भानगडीत कधी पडत नसत. उल्हासनगरचे अनभिषिक्त सम्राट पप्पू कलानी यांचा विरोध असतानादेखील राष्ट्रवादीच्या एका राज्यस्तरीय बड्या नेत्याने अनिल जयसिंघानीला उल्हासनगर महापालिकेत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळवून दिली होती आणि त्यामध्ये तो निवडूनदेखील आला होता. उल्हासनगरच्या राजकारणावर पप्पू कलानीचा जबरदस्त पगडा असतानाचा तो काळ होता, मात्र कलानींच्या विरोधाला न जुमानता थेट वरून तिकीट आणण्याची त्याची धमक होती हे उल्लेखनीय आहे.

यामध्ये सांगण्याचा मुद्दा हा की अनिल जयसिंघानी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच तत्कालीन उच्च पोलीस अधिकारी तसेच सनदी अधिकारी यांच्याशी चांगल्या प्रकारे सलगी राखून होता. त्यामुळेच तो गुन्हेगार असतानादेखील त्याला थेट गृहमंत्रालयातून त्या काळामध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. अर्थात, यामध्ये सर्वात मुख्य मुद्दा आहे तो उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याची पत्नी अनिल जयसिंघानी आणि त्याच्या या ट्रॅपमध्ये कशी काय फसली याचा आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जे काही सांगितले त्यानुसार अनिक्षा जयसिंगानी आणि अमृता फडणवीस यांची ओळख २०१६-१७ या काळातील आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. अत्यंत करड्या शिस्तीचे आणि स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे ओळखले जातात. असे असताना एका अंडरवर्ल्ड क्रिकेट बुकीची मुलगी अमृता फडणवीस यांच्या इतक्या जवळ कशी काय पोहचली हा मूळ प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या मनामध्ये जर उपस्थित झाला तर त्यात गैर काय?

देवेंद्र फडणवीस हे २४ तास ऑन अलर्ट मोडवर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय जीवनात काही प्रमाणात सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांच्याकडूनदेखील कळत नकळत अशी चूक होणे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी घातक ठरू शकते. अर्थात अनिल जयसिंघानी अथवा त्याच्या मुलीने काही करण्याअगोदरच देवेंद्र फडणवीस यांनी त्याची पोलखोल केली हे योग्यच केले असे म्हणावे लागेल. तथापि, महाराष्ट्र ज्यांच्याकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो अशा देवेंद्र फडणवीस यांनी तरी किमान यापुढे अधिक दक्ष आणि सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत गढूळ अवस्थेत आहे. अशा वेळेला कोणत्याही गोष्टीचे खापर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचे कडवे राजकीय विरोधक असले तरी ते शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि बाळासाहेबांची शिकवण पाठीत वार करण्याची नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पाठीत वार करणारे नेते नाहीत. त्यांचे जे मतभेद अथवा मनभेद असतील तर ते खुलेपणाने जाहीरपणे मांडून भांडणारे नेते जरूर आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर फोडण्याऐवजी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनिल जयसिंघानी प्रकरण घडवण्यामागे नेमके घरभेदी कोण आहेत याचा जर शोध घेतला तर त्यांचे भविष्यात होणारे नुकसान त्यांना नक्कीच टाळता येऊ शकेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -