घरसंपादकीयओपेडराजकारणाचा तुंबलेला नाला कसा साफ होणार!

राजकारणाचा तुंबलेला नाला कसा साफ होणार!

Subscribe

महाराष्ट्रासह देशात राजकारणाने जी काही पातळी गाठलीय ते पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी या राजकारणाला नाल्याची उपमा दिली असावी. त्यांना हा नाला साफ करायचा असला तरी ते त्यांचे एकट्या-दुकट्याचे काम नाही. या नाल्यात सडक्या विचारांचा आणि भ्रष्टाचारामुळे घसरलेल्या वैचारिक पातळीचा इतका ‘गाळ’ साचलाय की माहिमच्या मिठी नदीतील गाळ परवडला, असे म्हणावे लागेल. त्यामुळे राजकारणाच्या नाल्याची सफाई वाटते तेवढी सोपी नाही आणि कदाचित राज ठाकरे यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला याची कल्पना नक्कीच असेल.

अलीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राजकारणाचा तुंबलेला नाला झाल्याचे म्हटले आहे. राज हे स्पष्टवक्ते किंवा रोखठोक बोलणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राजकारणाचा नाला (गटार या अर्थाने असावा) झालाय असे सांगत त्यांनी एकप्रकारे आजच्या राजकीय बजबजपुरीच्या मर्मावरच बोट ठेवले आहे आणि म्हणून त्यांनी व्यक्त केलेले मत अगदी बरोबर आहे. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर हा नाला साफ करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला आणि शिवाय तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच या, असे आवतण दिलेले नाही. राज ठाकरे यांची भाषणे बर्‍याचदा डोळ्यात अंजन घालणारी असतात.

राजकारणात अचूक टायमिंग साधण्याची कला त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रासह देशात राजकारणाने जी काही पातळी गाठलीय ते पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी या राजकारणाला नाल्याची उपमा दिली असावी. त्यांना हा नाला साफ करायचा असला तरी ते त्यांचे एकट्या-दुकट्याचे काम नाही. या नाल्यात सडक्या विचारांचा आणि भ्रष्टाचारामुळे घसरलेल्या वैचारिक पातळीचा इतका ‘गाळ’ साचलाय की माहिमच्या मिठी नदीतील गाळ परवडला, असे म्हणावे लागेल. त्यामुळे राजकारणाच्या नाल्याची सफाई वाटते तेवढी सोपी नाही आणि कदाचित राज ठाकरे यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला याची कल्पना नक्कीच असेल.

- Advertisement -

राजकारणात पेच-डावपेच असावेत, पण ते इतक्या खालच्या पातळीवरही नेले जाऊ नयेत की सर्वसामान्य माणसाला किंवा अगदी राजकारणापासून अलिप्त असलेल्या माणसालाही ते किळसवाणे वाटावेत. पुरोगामी आणि प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात गेल्या ९-१० महिन्यांपासून जे काही राजकारण सुरू झालेय ते शिसारी आणणारे आहे. एखादा पक्षच हायजॅक होत असेल तर राजकारणात आपले काय काम, असे तरुण पिढीला वाटले तर त्यात त्यांची चूक नाही. महाराष्ट्राने एकापेक्षा एक दिग्गज नेते पाहिले आहेत. त्यांचे राजकारणातील स्थान विशेष अधोरेखित झाले आहे. त्यांचे राजकीय डावपेच अनेकांना कोड्यात टाकणारे असत किंबहुना त्याची आजही चवीने चर्चा होत असते.

खिलाडूवृत्तीचे हे नेते एखादा पक्ष पळविण्यापर्यंत कधी पोहचले नाहीत. आज तशी परिस्थिती नाही. गेल्या काही वर्षांत राजकारण हा पैशांचा खेळ झाला आहे. पैसा असेल तरच माणूस राजकारणात येऊ शकतो ही वस्तुस्थिती राज ठाकरे यांना माहीत आहे. पैशामुळे राजकारणात नीतीमूल्ये पाळण्याचे दिवस संपले आहेत. एखादा नेता सकाळपर्यंत एखाद्या पक्षात असतो आणि संध्याकाळी तो दुसर्‍या पक्षात गेलेला असतो हे पाहण्याचे सध्याचे दिवस आहेत. सत्ता आणि संपत्ती या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. सत्तेत नसणारेही गडगंज आहेत. ही करामत कशी होते यावर संशोधन झाले पाहिजे म्हणजे इतरांना किंवा राजकारणात येऊ इच्छिणार्‍यांना त्यापासून प्रेरणा मिळेल!

- Advertisement -

राजकारणात ज्याचा आदर्श घ्यावा असा एकही नेता या घडीला समोर दिसत नाही. जे आहेत त्यांना पद्धतशीरपणे डावलून अडगळीत टाकण्यात आले आहे. आजची तरुण पिढी विचार करणारी आहे. त्यांना अशा गोष्टी पचनी पडत नाहीत. त्यामुळे राजकारणात येण्यापासून ते दूर आहेत. तरुणांनी राजकारणात यावे ही राज ठाकरे यांची अपेक्षा योग्य असली तरी प्रस्थापितांपुढे या तरुणांचा टिकाव कसा लागू शकेल, यासाठी त्यांनी एखादा ‘राजमंत्र’ द्यावा. राजकारणात गॉडफादर या शब्दाचा भलताच दबदबा आहे. ज्याला गॉडफादर मिळाला त्याचे नशीब फळफळलेच म्हणून समजा! तुमची पात्रता, लायकी नसली तरी या गॉडफादरमुळे तुम्हाला तुमच्या गुडघ्याला हात लावून नमस्कार करणारे जागोजागी भेटतील. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गॉडफादर भेटल्यामुळे नशीब उजळलेले नेते पहावयास मिळतात. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके नाही तर अगदी किरकोळ प्रमाणात लायकी किंवा पात्रता असणारे तरुण त्यांना भेटलेल्या गॉडफादरमुळे नाव कमावून आहेत. गॉडफादरचा महिमा ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत क्वचित पोहचतो.

निवडणूक लढविणे पैशाशिवाय अशक्य आहे. साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे म्हटले तरी खिशात लाख दोन लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक पैसे असावे लागतात. स्वाभाविक त्याच्या पुढच्या निवडणुका (उदाहरणार्थ, तालुका पंचायत समिती ते लोकसभा) निव्वळ पैशांचा खेळ (की तमाशा?) असतो. राजकारणाचा जो नाला झालाय त्याला येऊन मिळणार्‍या अनेक उपनाल्यांपैकी एका नाल्यातून निवडणुकीतील अपप्रवृत्तींचा गाळ येतो. या कारणामुळेच आजची निवडणूक सर्वसामान्यांची राहिलेली नसल्याचे म्हटले जाते. सुशिक्षित तरुण-तरुणी या निवडणुकीच्या बजबजपुरीत स्वतःला झोकून देण्यास राजी नाहीत. आमचा वापर फक्त घोषणा देण्यापुरता आणि सभेनंतर सतरंजा उचलण्यापर्यंतच होईल, ही तरुणाईची ठाम भावना आहे आणि कोणता असा पक्ष आहे की तेथे जाऊन या तरुणाईला वैचारिक मेजवानी मिळणार आहे? तू अमक्याचा, तो तमक्याचा ही राजकारणातील ओळख असते असे म्हटले तर ते चुकीचे नाही. राजकारणात जाऊन नुकसानच अधिक झाले असे सांगणारे जागोजागी आहेत. ते राजकारणाच्या नाल्यात स्वत:ला कलंकित करून घेण्यास तयार नाहीत. अशांना सन्मानाने पुन्हा राजकारणात येण्याचा एखादा ‘राजमार्ग’ही राज ठाकरे यांनी सुचवावा.

कालौघात राजकारणात बदल घडला आहे. हा बदल इतक्या खालच्या पातळीवर पोहचेल असे कुणाला कधी वाटले नसेल. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे वाक्य मोठ्या खुबीने वापरून आपली तुंबडी भरून घेणार्‍यांचे उदंड पीक आलेले आहे. जी तरुणाई आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचा आटापीटा करते त्यांच्यावर निवडून आलेला उमेदवार विरोधी पक्षाला जाऊन मिळाल्याचे पाहणे नशिबी येते. अशावेळी तरुण पिढी कुणाच्या भरवशावर राजकारणात येईल, याचे उत्तर राज ठाकरे यांच्याकडेही नसेल. आता तर हद्दच झाली आहे. चौकशांचा ससेमिरा टाळण्यासाठी बेडकालाही लाजवतील अशा उड्या अन्य पक्षात मारल्या जात आहेत. असे बाजारबुणगे नेते तरुणांचे आदर्श होऊ शकणार नाहीत. राजकारणात येऊ इच्छित असलेल्या तरुणांना सन्मानाने वागविण्यात येईल याचीही खात्री नसते. कारण दर्जा खालावलेल्या विद्यमान राजकारणात राजकारण्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि त्यांची हाजी-हाजी करणार्‍यांनी इतकी गर्दी केलीय की कर्तृत्व असणारे तरुण मागेच राहत आहेत. निवडणूक लागली की तिकीट देताना आपला भाऊ, मुलगा, मुलगी यांचा विचार प्राधान्याने केला जात असतो. यावर इतरांना खर्च पेलवणारा नाही, तितकी लोकप्रियता नाही, अशा वाक्यांची पेरणी नेत्यांचे भक्तगण पद्धतशीरपणे करीत असतात.

देशातील राजकारणात अशी शेकडो कुटुंबे दाखविता येतील की ती परंपरागत राजकारणी कुटुंबे वाटावीत. यात पात्रता नसणारेही आहेत. निवडणुकीचे तिकीट वाटप असो, महत्त्वाची जबाबदारी असो, फक्त आणि फक्त कुटुंबाचा आणि जवळच्या गणगोतांचा विचार केला जातो. देशाच्या राजकारणाने असेही पाहिले आहे की, लायकी असलेले नेते ऐनवेळी डावलले जातात, खुशमस्करे पुढे जातात. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल. तेव्हा नेत्यांचे आप्त-स्वकीय तिकीट वाटपात कसे बाजी मारून जातात ते पहावयास मिळेल. त्यावेळी तळागाळात जाऊन पक्षासाठी काम करणार्‍या, रक्त आटवणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही. त्याचा केवळ कामासाठी वापर केला जातो.

राजकारण कोळून प्यालेल्या राज ठाकरे यांना राजकारणात तरुणाई का येत नाही याची कारणे चांगली अवगत असणार! तरुणांनी राजकारणाचा नाला साफ करण्यासाठी आपल्याला सोबत करावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा असली तरी तरुणांना राजकारणात येण्यासाठी सुरक्षित वाटावे असे वातावरण आज नाही. घराणेशाही, पैसा यात बहुतांशी नेते गुरफटले गेले असल्याने ‘राजकारणाचे काही खरे नाही’ अशी मानसिकता कित्येक तरुणांची आहे. राजकारणाचा नाला नक्कीच साफ झाला पाहिजे. कारण जे काही चाललेय त्याची नोंद करून घेण्यास कदाचित इतिहासही कचरेल! नीतीमूल्ये ढासळलेल्या राजकारणात आशादायक वाटावे असे चित्र तूर्त तरी दिसत नाही. सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची राजकारण्यांची तयारी आहे. त्यामुळे राजकारणाचा नाला साफ करताना राज ठाकरे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यांची सफाई मोहीम अनेकांच्या पचनी पडणार नाही. अनेकजण त्यांना सबुरीचा सल्लाही देतील, पण पातळी खालावलेल्या राजकारणाचा तुंबलेला नाला साफ झालाच पाहिजे, नव्हे ती काळाची तातडीची गरज आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना आपण सुयश चिंतुया!

राजकारणाचा तुंबलेला नाला कसा साफ होणार!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -