काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर वंचितही चालते मग मनसे का नाही?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची राजकीय आघाडी चालते आणि आता तर वंचित बहुजन आघाडीबरोबरदेखील शिवसेनेने युतीची घोषणा केली आहे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीदेखील शिवसेनेला चालते, मग असे असताना हिंदुत्वाचाच एक भाग असलेली आणि मराठी माणसाचीच दुसरी संघटना असलेली राज ठाकरे यांची मनसे मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी अथवा हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांना बरोबर आलेली का चालत नाही, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी मराठी माणसाला देणे अपेक्षित आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेने तिच्या पारंपरिक राजकीय विचारसरणीमध्ये जे काही आमूलाग्र बदल केले आहेत ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या खरंच किती अंगवळणी पडले आहेत हे समजण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांची वाट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहावी लागणार आहे, तथापि असे असले तरीदेखील सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात एक प्रश्न उभा राहतोच तो म्हणजे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले राजकीय पक्ष आघाडी करण्यासाठी चालतात आणि आता तर वंचित बहुजन आघाडी या चौथ्या घटक पक्षाचीदेखील या आघाडीत भर पडली आहे. असे असताना पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचाच एक भाग समजल्या जाणार्‍या राज ठाकरे यांच्या मनसेचाच विटाळ कशासाठी? याचे उत्तर खरेतर मराठी माणसाला मिळाले पाहिजे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा केली. या घोषणेचे स्वागत केलेच पाहिजे याचे प्रमुख कारण म्हणजे केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरातील तळागाळातील बहुजन समाज हीच खरेतर शिवसेनेची आजवरची हुकमाची व्होट बँक आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची राजकीय व्होट बँक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि एक डझनहून अधिक खासदार त्याचप्रमाणे नगरसेवक, पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आहेत. एखाद्या महापालिकेत एक नगरसेवक अथवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एक आमदार आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी काय काय अग्निदिव्य करावे लागते हे जर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी बंडाळीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणून घेतले असते तर पक्षाचा प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्याच्याच पक्षाचे मंत्री, ४० आमदार, डझनवरी खासदार हे पक्ष नेतृत्वाला सोडून गेले नसते.

शिवसेनेला पक्षांतर्गत बंडाळी ही काही नवीन गोष्ट नव्हती, मात्र शिवसेनेची धुरा जोपर्यंत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती तोपर्यंत त्यांचा करिष्मा हा बंडखोरांचा निभाव लागू देत नव्हता. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वर्गीय बाळासाहेबांचा वारसा जरूर आहे, तथापि बाळासाहेबांसारखा करिष्मा नक्कीच नाही. आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासारखे अत्यंत ताकदवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. दुसरीकडे देशाचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी प्रचंड मोठी शक्ती उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहे. तर तिसरीकडे ठाकरे यांच्या कुटुंबीयांपैकीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये स्वतःची प्रतिमा स्वकर्तृत्वाने उजळून दाखवण्याची सुवर्णसंधी आयती चालून आली आहे.

आगामी काळामध्ये शिवसेनेसमोरची ही सर्वात मोठी आव्हाने आहेत आणि राज ठाकरे अथवा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील स्वकर्तृत्वावर अथवा स्वबळावर जेवढी गर्दी खेचू शकतात तेवढी गर्दी खेचणारे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सध्या तरी हातावर मोजता येतील की नाही याचीदेखील शंका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करून राज्याचे मुख्यमंत्री झाले असले तरीदेखील त्यांची निवडणूक जिंकण्याची स्वतःची अशी एक शैली आणि रणनीती आहे. केवळ निष्ठेच्या बळावर आता नगरपालिकेतील साधे नगरसेवकही निवडून येत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या उदार मनोवृत्तीच्या नेतृत्वाची उणीव ही शिवसेनेला आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनादेखील यापुढे प्रत्येक निवडणुकीत भासल्याशिवाय राहणार नाही.

दोनच दिवसांपूर्वी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यामध्ये पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन मातब्बर नेत्यांची जी काही एक केमिस्ट्री जुळून आली आहे ती विलक्षण आहे. तिचा जर विचार केला तर या समीकरणाला छेद देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ज्या काही राजकीय तडजोडी करत आहेत त्या अद्याप तरी तेवढ्या सक्षम आणि ताकदवर दिसत नाहीत, असंच म्हणावं लागेल. नाही म्हणायला शिवसेना नेते संजय राऊत, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि त्याचबरोबर सुषमाताई अंधारे, चंद्रकांत खैरे आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जरी आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असले तरीदेखील एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मास लीडरची कमतरता ही शिवसेनेत मोठी लक्षवेधी ठरत आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो तसेच अन्य प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा तर मुंबई महापालिका हातात असणे ही आता भाजपची राजकीय गरज तर आहेच, मात्र त्याहीपेक्षा जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर राजकीय खच्चीकरण करायचे असेल तर मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेच्या हातातून खेचून काढणे हे भाजपचे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यापुढचे प्रमुख टार्गेट आहे आणि ज्या ताकदीने भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी मैदानात उतरत आहे ते लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हान हे अत्यंत खडतर असे आहे.

खरेतर अशा परिस्थितीत कोणत्याही राजकीय नेत्याने स्वत:च्या घरात तरी दोन पक्ष होऊ नयेत याची काळजी घेतली असती आणि त्यानंतरही जर दोन पक्ष निर्माण झाले तर हेच दोन पक्ष मराठी माणसांच्या हितासाठी तरी का होईना एकत्र कसे येतील यासाठी निश्चितच प्रयत्न केले असते, मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची राजकीय आघाडी चालते आणि आता तर वंचित बहुजन आघाडीबरोबरदेखील शिवसेनेने युतीची घोषणा केली आहे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीदेखील शिवसेनेला चालते, मग असे असताना हिंदुत्वाचाच एक भाग असलेली आणि मराठी माणसाचीच दुसरी संघटना असलेली राज ठाकरे यांची मनसे मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी अथवा हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांना बरोबर आलेली का चालत नाही, या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही कधी त्यांना का वाटत नाही.

प्रकाश आंबेडकर हे निश्चितच अत्यंत प्रखर बुद्धिवादी आणि झुंजार नेते आहेत त्याबद्दल वादच नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीचा जो लाभ मिळण्याची शक्यता आहे तो वंचित बहुजन आघाडीलाच अधिक मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण निवडून येण्यासाठी जी काही एक राजकीय बेरीज करावी लागते, मतदान पदरात पाडून घेण्यासाठी ती निश्चितच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डबल इंजिन सरकार सत्तेवर आहे. परवाच्या पंतप्रधानांच्या मुंबईतील दौर्‍यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्याचे हे डबल इंजिन सरकार नजीकच्या भविष्यकाळात ट्रिपल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याची घोषणा केली आहे. हे ट्रिपल इंजिन म्हणजे अर्थातच मनसेप्रमुख राज ठाकरे हे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरेतर यामधील चाणक्य आहेत. ती चाणक्य नीती वापरूनच भाजपने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून लावले.

ज्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना आणि शिवसेनेचे नेते सदैव पाण्यात पाहत होते त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोहरा उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळा केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरच एकनाथ शिंदे यांचे प्रबळ आव्हान उभे केले. त्यामुळे नजीकच्या काळात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांनाही अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे या लढाईचा निकाल काय लागतो यावरच २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील राजकीय गणिते आणि समीकरणे अवलंबून राहणार आहेत.