Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड जातीयतेच्या विळख्यात विद्यार्थ्यांची गळचेपी?

जातीयतेच्या विळख्यात विद्यार्थ्यांची गळचेपी?

Subscribe

दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने आयआयटी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आयआयटी मुंबईतील दस्तक आणि इतर संघटनांनी जातीय भेदभावातून आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे. जातीय भेदाभेदाच्या आधारे उच्च जातीतील विद्यार्थी, काही प्राध्यापक हे दलित, आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण करतात. यामुळे हे विद्यार्थी आत्महत्येचे बळी ठरत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. यातील तथ्य चौकशीअंती समोर येईलच, परंतु एखाद्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसमधील कलुषित वातावरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर एक सुदृढ समाज उभारणीच्या दृष्टीनेही घातक ठरावे, हे धक्कादायक आहे.

एरव्ही वाहनांच्या रहदारीमुळे गजबजलेला आयआयटी मुंबईचा परिसर सोमवारी निषेधाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. आयआयटी पवईच्या कॅम्पसबाहेर शेकडो आंदोलक जमून आयआयटी मुंबईच्या प्रशासनाविरोधात या निषेधाच्या घोषणा देत होते. दर्शन सोलंकीला न्याय द्या, लपवाछपवी बंद करा, अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत होत्या, तर अनेकांच्या हातात जातीवाद बंद करा, जस्टीस फॉर दर्शन सोलंकी, संस्थानिक हत्या सहन करणार नाही, अशा घोषणा लिहिलेले बॅनर्सही झळकत होते. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येप्रकरणी आयआयटी पवईच्या प्रवेशद्वाराजवळ विविध संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, डीवायएफआय, आरपीआय, भीम आर्मी, सीआयटीयू, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि रोहिदास समाज संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणाव निर्माण झाला होता. या झटापटीनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. खरे तर याआधी आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनीही याप्रकरणी आंदोलन केले होते, परंतु या आंदोलनाची आयआयटी प्रशासनाकडून म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी विविध संघटनांनी मिळून हे उग्र आंदोलन केले.

- Advertisement -

दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी दोषींविरोधात अ‍ॅक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, आयआयटीने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, या समितीत कॅम्पसबाहेरील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा, नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि दर्शन सोलंकीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलक ऐकण्यास तयार नाहीत, असे दिसल्यानंतर अखेर आयआयटी प्रशासनाने चर्चेची तयारी दाखवून भीम आर्मीच्या पदाधिकार्‍यांशी बातचीत करून त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तेव्हा कुठे आंदोलकांमधील रोष कमी झाला.

आयआयआयटी प्रसासन आणि पोलीस ही आत्महत्या व्यक्तिगत तणावातून झाल्याचे भासवून वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे. आयआयटी मुंबईतील दस्तक आणि इतर संघटनांनीदेखील जातीय भेदभावातून आत्महत्या झाल्याचा दावा केला होता. जातीय भेदाभेदाच्या आधारे उच्च जातीतील विद्यार्थी, काही प्राध्यापक दलित, आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण करतात. यामुळे हे विद्यार्थी आत्महत्येचे बळी ठरत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. यातील तथ्य चौकशीअंती समोर येईलच, परंतु एखाद्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसमधील कलुषित वातावरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर एक सुदृढ समाज उभारणीच्या दृष्टीनेही घातक ठरावे, हे धक्कादायक आहे.

- Advertisement -

भारतात कालसुसंगत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणार्‍या अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे आहेत. यामध्ये तंत्रशिक्षण देण्याच्या बाबतीत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)चा अत्यंत वरचा क्रमांक लागतो. देशातील विविध शहरांमध्ये एकूण २३ आयआयटी आहेत. त्यापैकी पवईतील आयआयटी मुंबई ही नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज येथील मोजक्या जागांसाठी येतात. येथे उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी हमखास यशाची शिखरे पादाक्रांत करतो, असा आजवरचा अनुभव आहे. असेच स्वप्न उराशी बाळगून मूळच्या अहमदाबाद येथील दर्शनने मुंबई आयआयटीत प्रवेशासाठी अर्ज केला होता. महापालिकेत कामाला असलेले वडील रमेश सोलंकी, घरकाम करणारी आई तरलीकाबेन आणि बहीण जान्हवीसोबत दर्शन मणीनगर येथील महापालिकेच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहायचा. परिसरात दिवसभर गोंधळ असल्याने दर्शन रात्रभर गॅलरीत बसून अभ्यास करायचा. दहावीत ८३ टक्के गुण मिळवल्यानंतर त्याला आयआयटी मुंबई खुणावू लागले.

पहिल्या प्रयत्नात कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश न मिळूनदेखील दर्शन नाउमेद झाला नव्हता. त्याने पुन्हा प्रयत्न केले. दुसर्‍या प्रयत्नात त्याला केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाल्याने तो अत्यंत आनंदी होता. बी. टेक.(केमिकल इंजिनिअरिंग) च्या पहिल्या वर्षाचे शिक्षण सुरू होऊन अवघे ३ महिने होत आले होते. १२ फेब्रुवारीला सोलंकी कुटुंबाच्या कानी उद्ध्वस्त करून टाकणारी बातमी पडली. अवघ्या १८ वर्षांच्या कोवळ्या दर्शनने आयआयटी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. दर्शन आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत १६ क्रमांकाच्या वसतिगृहातील ८०२ क्रमांकाच्या खोलीत रहात होता. सकाळच्या सुमारास वसतिगृहाच्या परिसरात अचानक काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली. त्यावेळी तेथील कर्मचार्‍यांना दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याला तात्काळ आयआयटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्याने प्राण सोडले. या घटनेनंतर मृत दर्शनच्या बहिणीने माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आला आहे, असा दावा करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करताच या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले.

दर्शन मागासवर्गीय समाजातील असल्याचे समजल्यावर त्याच्या सोबतच्या विद्यार्थ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. सोबतच्या विद्यार्थांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. त्याने त्याच्याशी होत असलेल्या भेदभावाच्या घटनांचा काही वेळा उल्लेख केला होता. तू येथे फुकटात शिकतो, तर आम्ही भली मोठी फी भरून शिक्षण घेतो, असे टोमणे मारायला सुरुवात केल्याचे दर्शनने आपल्याला सांगितल्याचा दावा त्याच्या बहिणीने केला. कोणीतरी दर्शनच्या डोक्यावर पाठीमागून वार करत त्याचा जीव घेतला असावा, अशी शंकाही तिने उपस्थित केली, तर दर्शन फोनवरून पूर्वीप्रमाणे मोकळेपणाने संवाद साधत नव्हता. तो माझ्यापासून काहीतरी लपवत असल्याचे मला जाणवायचे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे, त्यामुळे दर्शनला मानसिक त्रास देणार्‍यांना हुडकून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी दर्शनच्या वडिलांनी केली आहे. दर्शन सोलंकीला जातीभेदावरून त्रास झाल्याची कोणतीही तक्रार आली नसल्याचे आयआयटी प्रशासन आणि पवई पोलिसांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी असाच प्रकार मुंबईतील नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात घडला होता. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्‍या डॉ. पायल तडवीने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या तीन सिनिअर्सनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. मूळच्या जळगावच्या पायलने दुर्गम भागातील आदिवासींची वैद्यकीय सुविधांसाठी होणारी परवड पाहिली होती.

म्हणूनच डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते. आपल्या पहिल्याच शिष्यवृत्तीमधून कुष्ठरोगग्रस्तांना मदत केल्यावर डॉ. पायल तडवीनं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पायलने मिरज-सांगली येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिला टोपीवाला महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला होता, परंतु शिक्षण सुरू असतानाच आदिवासी समाजातून आलेल्या डॉ. पायलला दर्शनप्रमाणेच मानसिक त्रास सहन करावा लागला. एवढेच नाही, तर आपल्याला होत असलेल्या त्रासाची तिने पत्राद्वारे लेखी तक्रारही करूनही तिच्यावर आत्महत्येची वेळ आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील रोहीत वेमुला प्रकरणही यापेक्षा वेगळे नाही.

अनेक गरीब घरातील मुले केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर समाजाचा उत्कर्ष करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन उच्च शिक्षणाचा मार्ग अवलंबतात. फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वकष्टाने, जिद्दीने उच्च शिक्षण घेतले. समतेचा विचार पोहोचवण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. सामाजिक विकास फक्त शिक्षणातूनच होऊ शकतो. रोजगाराभिमुख शिक्षण, कौशल्याधिष्ठीत शिक्षण यावरच समाजाचा विकास अवलंबून आहे, असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. उच्च शिक्षणात नवनवीन आव्हाने समोर येत आहेत. आगामी काळात आपल्या विद्यापीठांना ग्लोबल विद्यापीठांशी स्पर्धा करायची आहे.

त्यासाठी विद्यापीठांनी अधिक सक्षम होणे आवश्यक असताना जातीयतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये होणारा भेदभाव हा अशा नामांकित शैक्षणिक संस्थांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासतो. वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजातूनच एखादी व्यक्ती याच खोलीची खिडकी किलकिली करून प्रकाशाचा शोध घेऊ पाहतो आणि त्याच्यावरच असा आघात होतो. हा आघात केवळ एखादी व्यक्ती वा त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित राहात नाही, तर तो संबंध समाजालाही हादरवून टाकतो. म्हणूनच अशा घटनांना गांभीर्याने घेत भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी शैक्षणिक संस्थांनी लपवाछपवीची भूमिका सोडून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जातीभेदाच्या प्रश्नावर जनजागृती करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करावा. सामाजिक अभिसरणातून बदलांना सामावून घेणारा समाज घडविण्याचे कार्य करावे.

- Advertisment -