Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड खरंच राम मंदिराला ५० वर्षांनंतर धोका आहे का?

खरंच राम मंदिराला ५० वर्षांनंतर धोका आहे का?

Subscribe

अयोध्येत श्रीरामांचे मंदिर उभारण्यासाठी हिंंदू समाजाला अनेक वर्षांचा संघर्ष आणि प्रतीक्षा करावी लागली. ज्या ज्या वेळी तिथे पुन्हा मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तो उधळून लावण्यात आला. भाजपच्या निवडणूक कार्यक्रमात राम मंदिराचा विषय होता. त्यावरच त्यांनी केंद्रातील सत्ता मिळवली. आता राम मंदिर लवकरच पूर्णत्वास येईल. पण देशात लोकसंख्येचा धार्मिक असमतोल झाला तर आज बांधलेल्या राम मंदिराला ५० वर्षांनंतर धोका आहे, अशी शंका एका हिंदुत्ववादी नेत्याने व्यक्त केली आहे, त्याचा विविध अंगाने केलेला ऊहापोह.

एका बाजूला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम २०२४ सालापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यक्त करत असतानाच आक्रमक हिंदुत्वाविषयी नेहमीच चर्चेत असलेले आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिराच्या भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. भारतातील लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल, असे धक्कादायक विधान तोगडिया यांनी नुकतेच नागपूर येथे केले. तोगडिया जेव्हा लोकसंख्येचे असंतुलन म्हणतात, तेव्हा त्यांनी विशिष्ट धर्माचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा कुठल्या धर्माच्या लोकांच्या दिशेने आहे, हे काही वेगळे सांगायला नको. राम मंदिर ४५० वर्षे म्हणजे २५ पिढ्यांच्या बलिदानानंतर उभारण्यात यश येत आहे. या सरकारने काशी-मथुरा मंदिर निर्माणासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करायला हवा, त्यात त्यांना यश मिळेल, अशी आशाही तोगडिया यांनी व्यक्त केली आहे.

भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या हा नेहमीच हिंदुत्ववादी नेत्यांचा टीकाचा, चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिलेला आहे. या देशाची मुस्लिमांची संख्या वाढत गेली तर जगात एकमेव हिंदुबहुल असलेल्या या देशाचे काय होणार, महाभारत काळात शकुनीमामाचे राज्य असलेला अंधार म्हणजेच आजचा कंदाहर हा प्रदेश आज अफगाणिस्तानात आहे. पुढे याच देशातील अहमदशहा अब्दालीने भारतावर आक्रमण करून त्यात पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला. ब्रिटिशांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा हिंदू-मुस्लीम या संघर्षातून भारतापासून अगोदर पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेश हे दोन भाग वेगळे झाले आहेत. ती दोन्ही मुस्लीम राष्ट्रे आहेत, त्या देशांमध्ये फारसे कुणी मुस्लिमेतर नाहीत. पाकिस्तान तर त्याच्या जन्मापासून भारताचा द्वेष करत आलेला आहे. त्यांच्या द्वेषाला त्यांनी नेहमीच हिंदू-मुस्लीम असाच रंग दिलेला आहे. इतकेच नव्हे तर लाल किल्ल्यावर हिरवा झेंडा फडकवण्याची ते स्वप्ने पाहत आहेत.

- Advertisement -

भारतामध्ये मुस्लीम सोडले तर इतर धर्मीय नसबंदी करतात, पण मुस्लीम धर्मीय धार्मिक गोष्टींचा आधार घेऊन ते टाळतात. त्यामुळे मुस्लिमांची संख्या वाढत जात आहे. याला अर्थातच उच्च शिक्षित मुस्लिमांचा अपवाद आहे. कारण जे मुस्लीम लोक शिकलेले आहेत, ते स्वत:हून कुटुंब नियोजन करतात. कारण मर्यादित कुटुंब असले तर आपण मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो, त्यांचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करू शकतो, त्याची त्यांना कल्पना असते. इतकेच नव्हे तर केरळसारख्या राज्यामध्ये जिथे शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिक्षण हा समाजप्रबोधनाचा उत्तम पर्याय आहे, पण हे शिक्षण आधुनिक पद्धतीचे असणे गरजेचे असते. कारण पारंपरिक किंवा धार्मिक शिक्षण असेल तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे धार्मिक शिक्षण देणार्‍या अनेक मदरशांचे आधुनिकीकरण होण्याची गरज आहे.

आज भारतात मुस्लिमांची संख्या ही पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. एखाद्या प्रदेशावर आपली हुकुमत गाजवायची असेल तर मोठे संख्याबळ हा महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे आपल्या जातीचे, धर्माचे, पंथांचे, विचारसरणीचे लोक, आपल्याला मानणारे लोक कसे वाढत जातील, असाच प्रमुख नेते मंडळीचा प्रयत्न असतो. राजकीय पक्ष, धार्मिक संघटना याला अपवाद नाहीत. पण संख्याबळाबरोबर कुठल्याही समाजाची गुणवत्ताही वाढणे आवश्यक असते. कारण ती जर वाढली नाही तर मूठभर लोक मोठ्या लोकसंख्येवर राज्य करू शकतात. कारण आजची परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश ही मुस्लीमबहुल राष्ट्रे असली तरी त्यांची काय अवस्था आहे. केवळ धार्मिक आधारावर द्वेष करणे सुरू ठेवले तर त्याची काय परिणती होते. त्याची ती उदाहरणे आहेत. त्यामुळे पुढील काळात आपल्या धर्माची लोकसंख्या वाढवून आम्ही सगळा भारत आपल्या ताब्यात घेऊ असे म्हणणे कितपत पटणारे आहे, हा एक प्रश्न आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर भारतातील अनेक हिंदू धर्मिय लोक उच्च शिक्षणासाठी आणि नव्या संधी शोधण्यासाठी विदेशात जात असतात. अनेक हिंदू जगातील विविध देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. अमेरिकेत हिंदूंची लक्षणीय लोकसंख्या आहे. मागील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भारतीय मुळाच्या सुमारे ३५ उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यात विजयी झालेल्यांची संख्याही चांगलीच आहे. सुमारे दोनशे वर्षे भारतावर राज्य करणार्‍या इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत. ज्या आयर्लंडशी ब्रिटनचे कायमच वाकडे राहिले, त्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेच्या प्रशासनामध्येही अनेक भारतीय वंशाचे विशेषत: हिंदू लोक आहेत. त्यामुळे खरे तर जगभर पसरलेला हा विस्तारित भारत आहे. त्यात उजव्या आणि डाव्या विचारसरणीचे लोक असले तरी त्यातही अयोध्येत जे राम मंदिर होत आहे, त्याला समर्थन असणार्‍या जगभरातील हिंदूंची संख्या मोठी आहे.

अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरमधील ३७० कलम आणि तिहेरी तलाक याला काँग्रेसने केंद्रीय सत्तेत असताना कधीच हात घालण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्याला काँग्रेसची भित्री मानसिकता आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मते कारणीभूत होती. मुस्लीम महिलांच्या हिताचा असलेला पोटगीचा कायदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थगित केला. यावरून काँग्रेसची एकूणच मानसिकता दिसून येते. राम मंदिराचा प्रश्न गेली अनेक शतके पडून आहे. त्या ठिकाणी हिंदू शासकांनी इतक्या वर्षात श्रीरामांचे मंदिर का बांधले नाही, याला विविध कारणे आहेत. दिल्लीतून भारतावर राज्य करणार्‍या मुस्लीम शासकांची लोकांवर इतकी जरब आणि दहशत होती की, श्रीरामांचे मंदिर उभारण्याचा कुणी विषय काढत नसावा.

जो देश हिंदूबहुल आहे तिथे त्यांच्या आराध्य दैवताचे भंग केलेले मंदिर पुन्हा बांधण्याचे धाडस होऊ नये, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. तसेच ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, तिथेही मंदिरासाठी अनेक वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागतो, याला काय म्हणावे, असे अन्य कुठल्या देशात होणार नाही. भाजप जसा पुढे येऊ लागला, तसे त्यांनी काँग्रेस ज्या विषयांबाबत कच खात आहे, जे विषय देशातील बहुसंख्य हिंदूंच्या अस्मितेचे आहेत, ते हाती घेतले. त्यात वरील तीन विषय होते. मुस्लिमांमधील तिहेरी तलाक रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलेले आहे.

सध्या भारताची वाढणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. ती इतकी वेगाने वाढत आहे की, लवकरच भारत लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनलाही मागे टाकेल. जर मुस्लिमांची संख्या या देशात वाढत असेल त्याला उत्तर देण्यासाठी हिंदूंनीही जास्त मुले जन्माला घालावीत, असे आवाहन काही हिंदुत्ववादी नेते करत असतात. पण हिंदू लोक ते मनावर घेतील, असे वाटत नाही, कारण एका मुलाला व्यवस्थित शिक्षण देणे किती अवघड आहे, याची त्यांना कल्पना आहे. पण दुसर्‍या बाजूला अल्पशिक्षित मुस्लीम असा विचार करताना दिसत नाही. खरे तर आज लोकसंख्या नियंत्रणाचा सर्वच भारतीयांनी विचार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी.

अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. हिंदुत्ववादी नेत्यांना जशी वाढत्या मुस्लीम लोकसंख्येची भीती वाटते, तशी त्यांना सुप्तपणे वाढणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसाराची भीती वाटते, कारण ख्रिस्ती मिशनरी अतिशय गोडी गुलाबीने प्रामुख्याने हिंदूना धर्मांतर करण्यास भाग पाडतात. त्यातून महाराष्ट्रात अलीकडे धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यात लव्ह जिहादवरही बंदी घालावी, अशीही मागणी होती. या गोष्टी तशा अवघड आहेत, कारण आता व्यक्तिस्वातंत्र्य सगळ्यांना आहे. त्याला कायद्याचा आधार आहे. इस्लामी कट्टरवादी लोक त्यांची सत्ता असलेल्या भागात काय करू शकतात हे बामियानमधील बुद्धमूर्तींवर गोळ्या झाडून ठिकर्‍या उडवल्या तेव्हा दिसून आले. त्यावेळी शांततावादाचा मार्ग दाखवणार्‍या बुद्धांच्या मूर्तींवर गोळ्या झाडल्या जात असताना सगळे जग हतबल होऊन पाहत होते. त्यामुळे धार्मिक कट्टरवाद काय करू शकेल याचा काहीच अंदाज नसतो. जसे अफझलखानाने वाटेतील हिंदू मंदिरांमधील मूर्ती फोडून हिंदूंचे खच्चीकरण केले. आक्रमकतेपुढे शांततावादाचा बळी गेलेला आहे, हेच आजवरचा इतिहास पाहिल्यावर दिसते.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -