घरसंपादकीयओपेडसंघर्षाचे वारे वाहताना साहित्यिकांची जबाबदारी मोठी 

संघर्षाचे वारे वाहताना साहित्यिकांची जबाबदारी मोठी 

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे.  २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. यावर्षी अमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होत आहे. एकीकडे साहित्य संमेलनाचा माहोल सुरू आहे आणि त्याचवेळी राज्यात मराठा आणि इतर मागासवर्गातील समाजाच्या आरक्षावरून संघर्ष उभा राहिला आहे. तसेच समाजात जात, पंथ आणि धर्मवेड अधिक उंचावते आहे. माणसांपेक्षा या संस्था अधिक वरचढ ठरत आहेत. माणूस स्वस्त झाला आणि बकरा महाग झाला, असे आपले वर्तमान सांगत आहे. समाजात विविध कारणांवरून संघर्ष उभे राहत आहेत. माणसं मारली जात आहेत. संवेदना हरवल्याचे चित्र वारंवार भोवतालामध्ये दिसत आहे. अशा वेळी साहित्यिक आणि साहित्याची समाजमन जागवण्याची जबाबदारी अधिक वाढत आहे.

आपण जे बोलत आहोत त्यामुळे समाजात भेदाच्या भिंती निर्माण होत आहेत, हे ज्ञात असूनही स्वत:च्या स्वार्थाकरिता त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आपणच आपला आत्मघात करतो आहोत तरी पण त्याचे दु:खही वाटेनासे होत आहे. समाजाच्या भल्यापेक्षा माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा माणूस महत्वाचा वाटू लागतो आणि त्यात माणूसपण संपुष्टात येते आहे.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा भाव समाजमनातून हरवत चालला की साहित्याची अधिक गरज अधोरेखित होते. अशावेळी साहित्याने समाजात पेरणी करण्याची वाट चालण्याची गरज अधिक उंचावत जाते. समाजात साहित्याने जी पेरणी करायची असते ती वर्तमानात झालेली दिसत नाही. अशावेळी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाज मनावर विचारांचे अधिराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा साहित्य संमेलने म्हणजे केवळ मोठ्या खर्चाचे जंगी उत्सव ठरून राहतील.
समाज आणि साहित्य यांच्यात एक नाते असते. साहित्यातून माणसांची मस्तके घडवली जात असतात. जेव्हा पुस्तके मस्तके घडवतात, तेव्हा त्या समाजात लाचार माणसं घडत नाहीत. आज समाज आणि साहित्य यांचे नाते सैल होत चालले आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या वाढत्या उत्सवी स्वरूपाला आवर घालून संमेलने ही अधिकाधिक विचारमंथन करणारी ठरायला हवीत. नाही तर त्यांचा समाजहितैशी हेतू बाजूला राहील. जगाच्या पाठीवर निर्माण होणारे साहित्य हे कोणत्याही समाजासाठी जीवनसत्व पुरवत असते.
त्या जीवनसत्वामुळे समाजाचा विकास होत असतो. त्या साहित्यातून समाजाचे भरण आणि पोषण होत असते. त्यावरच समाजाची वैचारिक वृद्धी आणि समृद्धी होत असते. साहित्य कोणत्या प्रकारची पेरणी करते त्यावरच समाजाची वाटचाल अवलंबून असते. आज समाजातील वाढता संघर्ष आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली खालावत चाललेला संवाद, चर्चा, प्रतिक्रिया, मते व्यक्त करण्याचा दर्जा पाहिला की साहित्यिक आणि त्यांच्याकडून निर्मिल्या जाणार्‍या साहित्याची जबाबदारी अधिक अधोरेखित होत जाते.
त्यामुळे समाज उन्नत आणि अधिक संवेदनशीलतेच्या वाटेने घेऊन जायचा असेल, तर वर्तमानातील संमेलनांनी त्याला अनुसरून समाजमन जागवण्याची गरज आहे. यावेळी साहित्यिकांनी जागल्याची भूमिका अधिक प्रकर्षाने पार पाडण्याची गरज आहे. कारण समाजात सध्या ज्या संघर्षाच्या लाटा उसळत आहेत, त्याचे वादळात रूपांतर होऊन मोठे सामाजिक नुकसान होणार नाही, याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यावर सगळी सामाजिक जबाबदारी सोपवून चालणार नाही, तर अधिक परिपक्व आणि विचारशील समाजमन तयार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
साहित्याच्या माध्यमातून समाज जिवंत ठेवण्याचे काम घडत असते. समाजात चैतन्य भरण्याबरोबर समाजाला सुयोग्य संस्काराच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम साहित्य करत असते. साहित्य समाजाला अधिक संवेदनशील बनवत असते. साहित्यामुळे आत्मपरीक्षणाच्या दिशेचा प्रवास घडण्यास मदत होत असते. साहित्याशी नाळ जुळलेला समाज हा नेहमी आत्मपरीक्षणाच्या वाटेने जात असतो. त्यामुळे आपण जे काही करत आहोत त्याचा समाज, राष्ट्र, व्यक्तीच्या जीवनावर काही परिणाम होतो का? याचे सतत भान ठेवले जाते. त्यामुळे समाजात असे भान असल्यामुळे समाज अधिक गतीशील होण्याची शक्यता निर्माण होते.
अन्यथा स्वत:च्या पलीकडचा विचार निर्माण होत नाही. स्वार्थ हाच केंद्रस्थानाचा विचार असेल, तर तो समाजही प्रगती करू शकत नाही. समाजात स्वार्थाचा विचार जेव्हा बळावतो, तेव्हा साहित्यिकांनी अधिक जबाबदारीने समाजमन घडविण्यासाठी पुढे येण्याची गरज असते. आपले वर्तमान नेमके कसे आहे याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत. अलीकडे समाजमाध्यमांवर व्यक्त होणारी माणसं पाहिली तर आपले बरेच काही पेरायचे राहून गेले आहे असे वाटते. त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून समाजातील नेते, वरिष्ठांबद्दलचा आदरभाव कमी होत असल्याचे दिसते आहे. भाषेतील सौम्यता हरवली आहे.
सभांमधील भाषणांचा दर्जा, आरोप-प्रत्यारोपांतील भाषेच्या दर्जाबद्दल चिंता करावी, अशी परिस्थिती आहे. अशावेळी साहित्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते आहे. अधोगतीचा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा साहित्यानेच त्या प्रवासाची दिशा बदलायची असते. लोकप्रतिनिधी हे राजकीय आणि सामाजिक पातळीवर लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात. अलीकडच्या काळात सत्ता मिळविण्यासाठी अधिक आक्रमक होण्यावर भर दिला जात आहे. त्यातून एकमेकांवर टीका करताना आपली भाषा अधिक धारदार बनवण्याच्या नादात विधिनिषेध पाळण्याचे भान सुटत आहे, हे भान आणून देण्यासाठी अशा प्रवृत्तींना दोन शहाणपणाचे शब्द ऐकवण्याची जबाबदारी साहित्यिकांवर आलेली आहे.
साहित्याचा विचार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित करता कामा नये. साहित्यामुळे केवळ मनाला आनंद मिळतो असे नाही, तर मनाला घडविण्याचे कामही व्हायला हवे. साहित्यामुळे भाषेची जडणघडण होत असते. आज जागतिकीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात भाषेच्या होणार्‍या भेळपुरीचा विचार व्हावा. साहित्याने बदललेल्या जगाच्या सोबत नाते सांगत असताना भाषेच्या जडणघडणीचा विचार करायला हवा. आज भाषेत नवनवीन शब्दांची भर पडण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाची प्रगती, नवे संशोधन, जगात विविध क्षेत्रात होणारे बदल यांचा विचार करण्याची गरज आहे.
आज मात्र मराठी भाषेत नवनवीन शब्दांची भर पडण्याची गरज असताना इंग्रजी भाषेतील शब्द जसेच्या तसे वापरण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आपली भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकाची आहे. आज मराठी भाषेतील शब्दकोशांच्या निर्मितीचा वेग मंदावला आहे. नवीन शब्दांची भर फारशी पडत नाही. शब्द नव्याने येणार नसतील, तर भाषेचा समृद्ध होण्याचा प्रवास अडखळत सुरू राहतो. जगासोबत भाषेचा प्रवास होण्याची गरज असते. भाषेने नव्या संशोधनाशी जोडले जायला हवे. त्यातून भाषेच्या उपयोजनाचा विचार अधिक गंभीरपणे होत असतो. आज भाषेचा विचार पोट भरण्यासाठी तिचा  किती उपयोग होऊ शकतो, त्या अंगाने केला जातो. महाराष्ट्रातील मराठी माणसांची मुले इंग्रजी माध्यमात शिकण्याचे प्रमाण सुमारे २५ टक्के इतके आहे.
ही मुले मराठी भाषिक, मराठी संस्कृतीतील आणि मराठी मातीतील आहेत असे असताना त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकावे असे का वाटते, याचा विचार करण्याची गरज आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. तिच्या पोटात जगण्याची शक्ती सामावलेली आहे, ही धारणा समाजमनात रुजत आहे. मराठी भाषेतही पोट भरण्याची क्षमता येण्यासाठी साहित्यातून प्रयत्न होण्याची गरज आहे. आज ती क्षमता निर्माण केली गेली नाही, तर उद्या  मराठीचा उपयोग करणार्‍यांची संख्या कमी होण्याची शक्यता अधिक आहे. शेवटी भाषा साधक असतील, तर मराठी भाषेतील पुस्तके वाचली जातील. त्यामुळे भाषिक व्यवहार आणि भाषा समृद्ध होण्यासाठी भाषा अधिक ज्ञानमय होण्याची गरज आहे. ती वाट आपण चाललो नाही, तर भाषा जिवंत राहिली तरी साहित्याच्या प्रवासात अडथळे निर्माण होतील.
आज होत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये केवळ मराठी भाषा वाचविण्यासाठी ठराव करून सर्व प्रश्न सुटू शकतील, असे वाटत नाही. असे ठराव करून आपण केवळ जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करू,  मात्र त्यातून फार काही साध्य होणार नाही. त्यामुळे साहित्यातून भान देण्याची जबाबदारी पेलायला हवी. जगाचे ज्ञान मराठी भाषेत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी संमेलनाच्या माध्यमातून ठोस भूमिका घ्यायला हवी.
साहित्य संमेलनाचा उत्सव होत असताना वैचारिक मंथन घडावे यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. अन्यथा दरवर्षीप्रमाणे साहित्य संमेलने होत राहतील आणि भाषा हरत राहील. शेवटी संमेलनाच्या माध्यमातून काही विचारासाठीचे पेरले जाणार नसेल, तर फार काही साध्य होण्याची शक्यता नाही. काही दिवसांनी समाजही त्या प्रक्रियेत सहभागी होणार नाही. सामान्यांच्या जीवनाचा आणि वेदनांचा विचार संमेलनात होणार नसेल, तर ही संमेलने तरी काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -