घरसंपादकीयओपेड‘राज’कीय वारे कुठल्या दिशेने वाहणार?

‘राज’कीय वारे कुठल्या दिशेने वाहणार?

Subscribe

सध्या सोशल मीडियावर एका ‘राज’कीय बॅनरनं चांगलाच धुमाकूळ घातलाय. हे बॅनर/होर्डिंग आहे, अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं. महाराष्ट्रात नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्या, तरी त्या महायुतीच्या उमेदवारदेखील आहेत. त्यामुळं नवनीत राणा यांच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. या फोटोंसोबतच बॅनर असलेला एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हा फोटो आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष अद्याप तरी अधिकृतरित्या महायुतीचा घटक पक्ष झालेला नाही. असं असूनही नवनीत राणा यांनी राज ठाकरेंचा फोटो वापरल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होतंय. राज ठाकरेंची मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की महायुतीचा प्रचारच करणार, हे अद्यापही स्पष्ट नाही.

नवनीत राणा यांनी आपल्या फेसबुक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मतदारांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारं एक पोस्टर शेयर केलं होतं. या पोस्टरवरही महायुतीतील इतर नेत्यांसहीत राज ठाकरेंचा फोटो वापरण्यात आला होता. नवनीत राणा यांनी असं करण्यामागचं कारण काही लपून राहिलेलं नाही.

राज ठाकरेंच्या चेहर्‍याला असलेलं ग्लॅमर आणि त्यांची लोकप्रियता इन्कॅश करण्यासाठीच नवनीत राणांनी हे उद्योग केल्याचं वेगळं सांगायला नको, पण या निमित्तानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज ठाकरे यांना दिल्लीला बोलावून घेत त्यांची भेट घेतली होती, यावेळी झालेल्या चर्चेचं फलित काय, हे अद्यापही समोर आलेलं नाही. त्यामुळं या भेटीमागचा अमित शहांचा उद्देश नवनीत राणा यांच्यापेक्षा वेगळा होता की तोच? यावरही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात कुजबूज सुरू असल्याचं समजतं.

- Advertisement -

गेल्या महिन्यात १९ मार्च रोजी राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती. ही भेट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मध्यस्तीनं झाल्याचं म्हटलं जातं. या भेटीआधी दिल्लीत पोहोचलेल्या राज ठाकरेंना प्रसार माध्यमांनी विचारणा केली असता, मला बोलावलं, मी आलो, एवढंच संक्षिप्त उत्तर दिलं होतं. मात्र भेटीनंतर राज ठाकरे यांनी लगोलग मुंबई गाठली होती. मुंबईत परतल्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भेटीगाठी घेतल्या. नंतर आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी चर्चाही केली.

पण भेटीमागचं कारणही गुलदस्त्यातचं राहिलं. मध्यंतरी राज ठाकरेंची एक सभाही पुण्यात झाली. परंतु आताच मी सर्वकाही सांगणार नाही, पक्षाची भूमिका गुढीपाडव्याच्या सभेत जाहीर करेन, असं राज ठाकरे म्हणाले. तेव्हापासून या भेटीमागचा सस्पेन्स कायम आहे. अमित शहा-राज ठाकरे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण पुढं आलं नसलं, तरी मनसेचं इंजिन आता महायुतीच्या ट्रॅकवर जाणार असे अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून बांधले जाऊ लागले, राजकीय वर्तुळातील चर्चांना तर प्रचंड उधाण आलं.

- Advertisement -

राज्यातील महायुतीत आधीच भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भरीस भर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गर्दी झालेली असताना त्यातही जागावाटपाचं त्रांगडं सुटत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपानं चौथ्या भिडूचं काम काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावर देशात ४०० पारचं लक्ष्य समोर ठेवणारा भाजप हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेला जवळ करत असल्याचं म्हटलं गेलं. मनसे सोबत असल्यास राज ठाकरेंना मानणारा मराठी भाषिक मतदार आपसूकच महायुतीकडे वळेल.

त्याचा भाजपसह, एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना फायदाच होईल, खासकरून मुंबई-ठाणे-कल्याण, कोकण पट्ट्यातील अटीतटीच्या लढाईत एक-एक टक्का मतांची बेगमी उपयोगी ठरेल, असा अंदाज आहे. शिवसेनेतील बंडानंतर पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडं गेलं. असं असूनही राज्यभरातील शिवसेनेच्या कडवट मतदारांवर प्रभाव पाडण्यात एकनाथ शिंदे तितकेसे यशस्वी ठरल्याचं भाजपला वाटत नाहीय. राष्ट्रवादीला फोडून अजितदादांना सोबत घेतलं, तरी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना मिळणारी सहानुभूतीची लाट जराही कमी झालेली नाही. अशावेळी उद्धव ठाकरेंशी दोन हात करणारा विशेष म्हणजे खराखुरा ठाकरी चेहरा भाजपला हवा आहे. मनसेला महायुतीत घेण्यामागचा उद्देश हादेखील असू शकतो, असं म्हटलं जातं.

भाजपकडून मनसेला नाशिक आणि दक्षिण मुंबईतील जागा मिळणार अशा वावड्याही उठल्या. एवढंच काय दक्षिण मुंबईतील जागेसाठी मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांचा चेहराही झळकू लागला. या सगळ्या चर्चा, वावड्या आणि अपेक्षांच्या रेवड्यांमुळं मनसेचे कार्यकर्ते उत्साहित होऊन कामाला लागले, तर दुसरीकडं शिवसेना आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचं अवसान गळालं.

आधीच एक भाकरी दोघांनी वाटून घ्यायची ठरलेली असताना त्यात राष्ट्रवादीच्या रूपानं तिसर्‍याला वाटा द्यावा लागला, आता मनसेलाही आपल्यातला वाटा द्यायचा या कल्पनेनंच महायुतीतील नेत्यांच्या गळ्यात घास अडकू लागला. खासकरून दक्षिण मुंबई आणि शिवसेनेच्या जागेसाठी शिवसेना अडून बसलेली असताना आपल्या हक्काची जागा मनसेला द्यायची हा विचारच अस्वस्थ करणारा होता. यापेक्षाही एका उडत्या अफवेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांचा थरकाप उडाला, ही अफवा म्हणजे शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या हातून काढत ते राज ठाकरेंच्या हाती सोपवण्याचं.

शिवसेनेच्या काही आमदारांनी यावर अस्वस्थ मनानं माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या, पण अफवा त्या अफवाच. बंद दाराआडचं गुपित खरं किती खोटं किती? हे अमित शहा-राज ठाकरेंनाच ठाऊक, त्यातही भाजपचे चाणक्य अमित शहा बंद दाराआड खलबतं करण्यात किती पटाईत आहेत, हे सर्वजण जाणून आहेत. कारण शहा यांनी या अगोदर उद्धव ठाकरेंशीही बंद दाराआड चर्चा केली होती.

राज ठाकरेंनी आपले काका दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मराठी अस्मितेच्या मुद्यावर २००९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. पक्षाच्या झेंड्यात प्रतिकात्मकरित्या भगवा, निळा आणि हिरव्या रंगांचा समावेश करून समाजातील सर्व घटकांना आपलंसं करण्याचा संकल्प सोडला आणि महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट मांडली. परंतु मनसेला किंबहुना राज ठाकरेंना महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अफाट लोकप्रियता मिळवून दिली ती मराठी विरुद्ध परप्रांतीय मुद्याच्या राजकारणानं.

मुंबईत रेल्वे भरतीसाठी आलेल्या हिंदी भाषिक तरुणांना मनसे कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण आणि उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका यामुळं राज ठाकरे मराठी तरुणांच्या गळ्यातला ताईत ठरले. नोकरीधंद्यापासून समाजकारण आणि राजकारणात परप्रांतीयांची दादागिरी सहन न करण्याची भूमिका त्यांनी सातत्यानं आपल्या भाषणांतून मांडली. मराठी अस्मितेच्या मुद्यानच राज ठाकरेंच्या पदरात भरभरून दान टाकलं. मुंबई महापालिकेत २७ नगरसेवक निवडून आले. विधानसभेत १३ आमदार, तर नाशिकमधील मतदारांनी थेट महापालिकेची सत्ता राज ठाकरेंच्या हाती सोपवली, पण पुढं पक्षाला हे यश टिकवून ठेवता आलं नाही, मनसेच्या दुसर्‍या फळीतील नेते साथ सोडून गेले, पक्ष खिळखिळा झाला.

सातत्यानं भूमिका बदलणार्‍या राज ठाकरेंनी कधी ईडीच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली, तर कधी लोकसभा न लढवताच लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका केली, पण देशात मोदी लाटेनंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाच सत्तेचा राजमार्ग असल्याचं समीकरण रुळलं. त्यामुळं हिंदुत्वाची कास धरली नाही, तर मनसेला राजकारणात टिकाव धरणं कठीण असल्याची जाणीव राज ठाकरेंना झाली. यातूनच पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलून भाजपशी जवळीक करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं जातं. परप्रांतीयांना विरोध करणार्‍या मनसेला सोबत घेण्यास आधी भाजपचा तीव्र विरोध होता, मात्र मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारताच हा विरोध मावळला.

आजघडीला महाराष्ट्रात ४० हून अधिक जागांचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला राज ठाकरेंच्या करिष्म्याची आणि पक्ष, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज ठाकरेंना भाजपसारख्या मजबूत आधाराची गरज भासतेय. साठच्या दशकात मुंबईतील डावे-समाजवाद्यांचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसच्या छुप्या मदतीच्या पाठबळावर शिवसेना वाढली, राज्यभरात फोफावली. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट, शरद पवार गटाचा पाडाव करताना मराठीसह, ठाकरेंच्या हिंदुत्ववादी मतांमधली स्पेस भरून काढण्याची संधी राज ठाकरेंना दिसत असल्यास नवल नाही.

पण राज ठाकरेंची मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की महायुतीचा प्रचारच करणार, हे अद्यापही स्पष्ट नाही. महायुतीतला मनसेचा समावेश लोकसभेत की थेट विधानसभेत यावरही सस्पेन्स कायम आहे. आता तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर महायुतीतील मनसेच्या समावेशाचा निर्णय होईल, अशा वावड्या उठल्या आहेत. काहीही असो अमित शहा-राज ठाकरेंचा एकाच फ्रेममधील फोटो हा केवळ वातावरणनिर्मितीचे गिमिक ठरू नये, अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ही गोंधळलेली अवस्था गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेच दूर करतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -