– प्रदीप जाधव
माणसाला जिवंत राहण्यासाठी पुरेसं आणि पौष्टिक अन्न आवश्यक आहे. अर्थात दररोज आपण जे खातो ते किती पौष्टिक, कॅलरीज मिळतात हा संशोधनाचा विषय असला तरी, शरीर जगविण्यासाठी आणि पोटातील आग विझविण्यासाठी पोटभर अन्न गरजेचं आहे. आपल्याकडे साधारणपणे सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण अशा प्रकारची किमान खाण्याची वेळ ठरलेली आहे. सर्वांनाच पोटभर मिळतंच असं नाही, काहींना एक किंवा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. सुदृढ राहण्यासाठी जन्मानंतर बालपणापासून सकस दूध आणि पुढे आहार अतिमहत्त्वाचा असला तरी, मागास समाजात बहुसंख्य माताच कुपोषित असल्याने सकस दूध देऊ शकत नाहीत. परिणामी सुदृढ बालकांऐवजी कुपोषितांचे प्रमाण अधिक ही प्रजासत्ताक भारताच्या अमृत महोत्सवी वर्षातील शोकांतिका. शासन गर्भवती मातेवर खर्च करीत आहे, ते पैसे गर्भवती स्वतःवर खर्च करते की कुटुंबासाठी हेही तपासलं पाहिजे. श्रम, कष्ट करण्याची इच्छा असूनही हाताला काम, रोजगार मिळत नाही, पर्यायाने पैसा येत नाही म्हणूनही पोटभर खाऊ शकत नाही. त्यामुळे उपासमारी हे विदारक सत्य आहेच.
आपल्याच देशात पिण्याचे पाणी परदेशातून मागवणारे लोक आहेत, त्यांच्या एका दिवसाच्या पाण्यावर जितका खर्च होतो त्यापेक्षा कमी खर्च काही कुटुंबाच्या महिनाभराच्या रेशनवर होऊ शकतो. डाएट म्हणून कमी खाणारे तर खायलाच नाही म्हणून असेल त्यावर भूक भागवत पाणी पिऊन पोट भरणारे लोकही भारतात आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजाही आपण भागू शकत नाही मग जगायचं का? कसं? आणि कशासाठी? अशा अनेक प्रश्नांनी भयभीत असल्याने लोक कुटुंबासह आत्महत्येकडे वळलेले आपण पाहिलेले आहेत. पापी पेट का सवाल है. माणूस पोटाचा गुलाम आहे असं म्हटलं जातं. म्हणून मग पोट भरण्यासाठी काही लोक अनैतिक धंदे, व्यवसाय करतात, परंतु काही लोक आणि जात-जमाती अत्यंत स्वाभिमानी असून उपाशी मेलो तरी चालेल पण अवैध मार्गांचा अवलंब करत नाहीत. भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्चपदी आदिवासी महिलेची नेमणूक केल्याने सर्व प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
आदिवासींच्या उत्थानासाठी काही संस्था, संघटना कार्यरत आहेत. काही लोक पूर्णवेळ कार्यकर्ते होऊन आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे आदिवासींच्या मतांवर निवडून येतात त्या समाजासाठी कुठलाही प्रश्न संसद, विधानमंडळात मांडत नाहीत ते मात्र राष्ट्रप्रेमी ठरतात. अर्थात आत्ताची राजकीय परिस्थिती अशी आहे की, जाब विचारणार्यांची जीभ कापली जाते किंवा जिभेला कायमचा लगाम घातला जातो. आंदोलनाची दिशा भरकटली जाते हे सत्य असलं तरी आंदोलकांना चिरडलं जातं, त्यांचा खून केला जातो. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी असलेल्या मुलाचं काय झालं हे ज्वलंत उदाहरण पुरेसं आहे. कोणताही लढा अधिक तीव्र होऊन उग्र रूप धारण केल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम होत असतात हे जरी सत्य असलं तरी त्याला शासन यंत्रणा आणि समाजव्यवस्था तितकीच जबाबदार आहे. स्वाभिमानाची, अस्तित्वाची आणि पोटातील आग शमवणार्यांची लढाई ही शतकानुशतके सुरूच आहे. विकासाच्या नावाखाली गोरगरीब आदिवासींच्या जमिनी घेतल्या जातात, त्यांना पुरेसा मोबदला दिला जात नाही. अनेक महामार्ग हे आदिवासींच्या खेड्यापाड्यातून जात असताना त्यांच्या झोपड्या तोडल्या, घरे उद्ध्वस्त झाली त्याचाही त्यांना मोबदला दिला नाही. विधिमंडळात, संसदेत आवाज पोहचत नाही. रस्त्यावरचा आक्रोश बहिर्या सरकारी यंत्रणांच्या कानावर पडत नाही.
आदिवासींच्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने अत्यंत तळमळीने ते वयाच्या 68 व्या वर्षीही सतत लढा देत आहेत. बाबूलाल नाईक स्वत: आदिवासी साहित्यिक कार्यकर्ते असल्याने प्रत्येक प्रसंग आणि घटना मानवी दृष्टिकोनातून तपासून अभ्यासूनच मांडलेल्या आहेत हे त्यांच्या कादंबरीचं खास वैशिष्ठ्य आहे. अन्नासाठी भटकून उपाशी राहून भुकेचा आगडोंब काय असतो याचं विदारक चित्र बाबूलाल नाईक यांनी चोखंडभर भाकरीच्या माध्यमातून डोळ्यावर झापडं पांघरणार्या राष्ट्रीय प्रेमाच्या गप्पा मारणार्या ढोंगी समाजाचे डोळे उघडले आहेत. बाबूलाल नाईक शासनाच्या नोकरीतून निवृत्त होऊन समाजसेवेच्या ध्येयाने झपाटलेले लेखक. त्यांनी 1989 साली धुळे, नंदुरबार ते गुजरात राज्यात होणार्या सरकारी स्वस्त धान्य तस्करीबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून विधानसभेपर्यंत आवाज उठविला. 1996 ते 1999 या तीन वर्षांच्या कालावधीत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण मंडळ, पुणे या आदिवासी विकास मंत्रालयाच्या अधिकारात चाललेल्या संस्थेत राज्यस्तरीय सदस्यपदी काम केलं आहे. 20 ऑक्टोबर 1999 ते 10 डिसेंबर 1999 च्या दरम्यान गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील अतिदुर्गम क्षेत्राचा दौरा करून त्या राज्यातील आदिवासी विकास योजनांची पहाणी, तपासणी, अभ्यास करून महाराष्ट्र शासनाला अहवाल पुरविला. कुपोषणा संदर्भात 2006 साली त्यांनी कुपोषण केवढे क्रौर्य हे पुस्तक लिहिलं. सातपुडा पर्वतातील रूढी, परंपरा, सण, उत्सव, खाद्यवस्तू आणि सरकारी स्वस्त धान्य गैरव्यवहारांचा अभ्यास करून अश्रू सातपुड्याचे कादंबरी लिहिली. त्यानंतर आधार टेंभली, मुठ मुठ माती या कादंबर्यांमधून आदिवासींचं सत्य चित्रण त्यांनी रेखाटलं आहे.
खानदेशातील नंदुरबार परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्या कारणाने तापी खोरे, गोमाई, सातपुडा या प्रदेशातील तळागाळातील भुकेल्या माणसांच्या संसाराला चतकोर भाकरीची सोय नाही. त्यामुळे लाचार होऊन वर्षातील आठ महिने गुजरात, मध्य प्रदेशात ऊस तोडणीच्या कामासाठी शेतात दगडाची चूल मांडून उपजीविका करत असतात. मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये कुडांच्या गळक्या झोपड्यांमधून हालअपेष्टा भोगणार्या आदिवासींच्या भयानक उपासमारीतून कादंबरीची सुरुवात होते. व्यावसायिक डॉक्टर ज्याप्रमाणे पेशंटची वाट बघतो त्याप्रमाणे गावात एखादा मृत्यू होण्याची साबळ्या वाट बघत असतो. मयतासाठी खड्डा खोदणे हे त्याचं काम. मयतावर असणारे सामान, नवीन कपडे त्याला मिळतात. त्यावर तो खूश होऊन जगत असतो. या ऊस तोडणी कामगारांकडे उच्च समाज तुच्छ नजरेने पाहतो. श्रीमंतांच्या मुलांची वाकडी नजर मात्र या कामगारांच्या सुंदर गरीब मुलींवर असते. श्रीमंत कुटुंबातील पुण्यात शिकणारा मुलगा आपल्याच घरी धुणीभांडी काम करणार्या जमवंतीवर बलात्कार करतो. श्रीमंतांना जणू अधिकारच असतो गरिबांची अब्रू लुटण्याचा अशा आविर्भावात ते जगत असतात. कारण न्याय निवाडा करणारे पंचही त्यांचेच. समाजातील म्होरके, दलाल यांच्यावर पैसे फेकले की तेही फितूर होतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे गावातील पंच मात्र मुलीवर अन्याय होऊनही श्रीमंत मुलाच्या बाजूने निर्णय देतात. दरम्यान मुलीचे आईवडील ऊस तोडण्याच्या कामासाठी गुजरातला गेलेले परत येतात, तेव्हा त्यांना याचा धक्का बसतो. ते आपल्या मानसिक धक्क्यातून सावरू शकत नाहीत. बाप दारूच्या आहारी जातो आणि मरण पावतो. काही दिवसांनी औषधोपचारासाठी पैसे नसल्याने मुलीचा भाऊही मरण पावतो. गर्भवती जमवंती बाळंतीण होते ती एका गोंडस राजबिंड्या मुलाला जन्म देते. आता प्रश्न पडतो की मुलाच्या जन्माची नोंद कोण करणार. अधिकारी नोंद घ्यायला तयार नाहीत. कारण मुलाला बाप नाही. पीडित मुलीला न्याय मिळत नाही. खायला अन्न नाही म्हणून संघर्ष तर न्यायासाठी लढा.
भाकरीसाठी हंगामी कामगार म्हणून गुजरात, मध्य प्रदेशात जे जातात त्यांचा भीषण अपघात होऊन कित्येक जण मृत्युमुखी पडतात. त्याची शासन दरबारी नोंद नाही. चोखंडभर भाकरीसाठी सहन कराव्या लागणार्या यातनांचं वास्तव चित्र ही कादंबरी अधोरेखित करते. कादंबरी वाचताना अंगावर शहारे येतात, पोटात वीतभर खड्डा पडतो. जनावरापेक्षाही हीन वागणूक या इथल्या समाजव्यवस्थेने आदिवासींवर लादलेली आहे. तरीही इथल्या शासन व्यवस्थेला आणि माणुसकीचे गोडवे गाणार्या मानवतावाद्यांना वेदना होत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे.
लेखक – बाबूलाल नाईक
प्रकाशक-अथर्व पब्लिकेशन्स,धुळे.
पृष्ठे -208, मूल्य 395 रुपये