Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय ओपेड बेपत्ता तरुणींचं राज्य ‘द महाराष्ट्रा स्टोरी’

बेपत्ता तरुणींचं राज्य ‘द महाराष्ट्रा स्टोरी’

Subscribe

पुरोगामी महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री का होऊ नये, या प्रश्नानं जोर धरलेला असताना दुसरीकडे याच राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाल्याची बातमी पुढे आली आहे. राज्यात दररोज सुमारे ७० मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक माहिती राज्य महिला आयोगाने पुढे आणली आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट गाजत असतानात ‘द महाराष्ट्रा स्टोरी’चं काय? या बेपत्ता मुली नक्की जातात कुठे यावर टाकलेला प्रकाशझोत..

‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील दाव्यानुसार केरळ राज्यात ३२ हजार तरुणींचे धर्मांतर करण्यात आले आहे. या दाव्यामुळेच हा चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. ३२ हजारांच्या आकड्याला आधार काय, असा प्रश्न एकीकडे विचारला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातून केवळ एकाच महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात तब्बल २२०० मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत बाब पुढे आली आहे. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १८१० इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणार्‍या मुलींच्या संख्येत ३९० ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींच्या आकडेवारीचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. त्यांची नोंद अपहरणाच्या केसमध्ये केली जाते, तर १८ वर्षांवरील मुली आणि महिला बेपत्ता झाल्यास, तशी तक्रार आल्यास पोलिसामध्ये त्याची नोंद केली जाते.

मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीचं आमिष दाखवून शोषण करणं अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय. २०२२ ची मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलीस रेकॉर्डवरील १ हजार ६९५ मुलींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. मग या मुलींचं काय झालं? असा प्रश्न मनी येतो. महत्त्वाचं म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. नाशिकमध्ये तर चार महिन्यात ६३५ तरुणी आणि २३१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. हे केवळ महाराष्ट्रातच होतंय असंही नाही. एनसीआरबीच्या अहवालानुसार, ५ वर्षांमध्ये गुजरातमध्ये तब्बल ४१ हजार ६२१ महिला बेपत्ता झाल्या आहेत. मुली गुजरातच्या असो, केरळच्या असो वा महाराष्ट्राच्या, त्या बेपत्ता होणं ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेल्या काही महाठगांकडून काही हजारांत मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याच्या घटनाही उघडकीस आलेल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील वयात येणार्‍या मुलींना हेरून नोकरीच्या आमिषाने शहरी भागात नेणे व तेथे कुंटणखान्यावर अवघ्या २० ते २५ हजारांत विक्री करण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. पळवलेल्या मुलींना परराज्यात आणि परदेशात पाठवण्याचं प्रमाणही मोठं आहे. परदेशातून मुलींना परत आणण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असते. त्यामुळे या मुली एकदा परदेशात विकल्या गेल्या की, त्यांची मुक्तता होण्याची शक्यता कमीच असते. कुंटणखान्यांसह मसाज पार्लर आणि तत्सम व्यवसायात वाढलेल्या मुलींची संख्या बघता हरवलेल्या मुली नक्की कुठे जात असतील याचा अंदाज येतो.

मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत. १४ ते १७ या वयात शारीरिक बदल होतात. सोशल मीडिया, चित्रपटांमधील हिरोगिरीच्या आकर्षणाचा मुला-मुलींवर परिणाम होतो. नेहमीच गुटख्याचा तोब्रा भरलेली, जंगली जनावरासारखे केस वाढवलेली, शर्टची बटणं उघडी ठेवणारी, अंगात मांस नसूनही छातीचा सांगाडा पुढे ताणून चालणारी आणि सतत शिव्यांची लाखोली वाहणारी गुंड, मवाली प्रवृत्ती असलेल्या मुलांच्या प्रेमाच्या जाळ्यात त्या सहज ओढल्या जातात. यात चित्रपटांचा हात फार मोठा आहे. किरकोळ काम करणारा वा कामच न करणारा एखादा ‘दगडू’ तिच्या मागे लागतो आणि तिही त्याला प्रतिसाद देते हे विशेष. ज्याला दमडी कमवण्याची अक्कल नाही, अशा मुलांबरोबर संसार कसा फुलणार याचा जराही विचार या मुलींच्या मनाला शिवत नाही याचं आश्चर्य वाटतं. या मुलांमध्ये असं काय असतं ज्यावर या मुली जीव ओवाळून टाकतात? ‘मला माझ्या घरातील समजून घेत नाही, इतकं माझा बॉयफ्रेंड मला समजून घेतो’, हे सर्वसामान्य मत बहुसंख्य मुली आपल्या मैत्रीणींकडे व्यक्त करत असतात.

- Advertisement -

ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणं तिला जपलं, वाढवलं त्यांचा किंचीतही विचार दुसर्‍याचा हात धरून पळून जाताना या मुलीच्या मनात येत नाही. तिनं चुकीच्या मार्गाला लागू नये या काळजीपोटी तिला थोडंफार दरडावलं तर तो मुलींना मोठा अन्याय वाटायला लागतो. घरातील लोक अचानकपणे नकोसे होतात. आई-बापाच्या हतबलतेची तिला पूर्णत: कल्पना असते. किंबहुना, याच हतबलतेचा फायदा उचलत ती त्याच्याबरोबर पळून जाते. बरेचदा आई-वडिलांचे मुलांकडे होणारं दुर्लक्ष ही बाबही मुली पळून जाण्यास कारणीभूत ठरते. कामासाठी बाहेर पडल्यानंतर काही आई-वडिलांचं त्यांची मुलं काय करतात याकडे लक्ष नसतं. कामावरून आल्यानंतर सतत मुलांवर ओरडणं, चिडचिड करणं यामुळे मुलं पालकांपासून दूर जातात. तसेच पालकांकडे मुलं मन मोकळं करीत नाहीत. घरी असलेले काही आई-वडीलही त्यांच्याच नादात असतात.

पूर्वी एकत्र असताना घरातील सर्व सदस्यांच्या गप्पा-टप्पा होत, पण आता जेव्हा घरात सदस्य एकत्र असतात तेव्हा प्रत्येकजण मोबाईलमध्ये घुसलेला असतो. मुलं-मुलींबरोबर पालकही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत आहे. अशा वेळी मुली प्रेमाचा आधार शोधण्यासाठी चुकीचे खांदे निवडतात. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे कुटुंबीय पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचं टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणार्‍या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणं शक्य होत नाही. खरं तर अजाण वयात पळून गेलेल्या मुलींचे संसार किती टिकतात याचाही विचार होणं गरजेचं आहे. वयात येण्याआधीच मुलाकडे पळून गेलेली मुलगी लपवली जाते. ती जशी १८ वर्षांची पूर्ण होते त्या दिवसापासून तिला आभाळही ठेंगणं होतं, पण हा आनंद अल्पकाळ टिकणारा असतो. प्रेमाची धुंदी उतरून नव्याचे नऊ दिवस संपतात आणि परिस्थितीचे चटके तिला बसायला लागतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

माहेरच्यांनी तिच्यासाठी दरवाजे कायमचे बंद केलेले असतात आणि सासरच्यांचा छळ तिच्या सहनशीलतेपलीकडे जातो. ज्यानं तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं त्याचंही वय समजदारपणा दाखविण्याइतकं नसतं. त्यामुळे अशा ‘अर्ध्या हळकुंडात धुतलेल्या’ लोकांकडून तिला अमानुष वागणूक मिळायला लागते. अखेर तिला आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. कमी वयात प्रेमविवाह करणार्‍यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक असतं, ही बाब कोणताही समुपदेशक सांगू शकेल. बर्‍याच प्रकरणांमध्ये तिला जगण्याची इच्छा असतानाही घरातील मंडळी तिचा छळ करून मारतात. काही प्रकरणात तर ऑनर किलिंगचाही संशय असतो. ‘सैराट’ चित्रपटात रंगविल्या गेलेल्या कथानकातून सकारात्मक बोध घेण्यापेक्षा त्याचे अंधानुकरण करण्याकडे तरुणाईचे वेड दिसून येतं.

आंतरधर्मीय विवाहांच्या बाबतीतही अनुभव फारसे चांगले नाहीत. जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले तरुण-तरुणी एकत्र येतात तेव्हा त्यांना अ‍ॅडजेस्टमेंट करणं अतिशय जिकरीचं होतं. भाषा, पेहराव, अन्न यापासून तर सण, श्रद्धा, देव, मानसिकता हे सारंच बदलून जातं. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यांसह अन्य धर्मांच्या चालीरिती, प्रथा-परंपरा अतिशय वेगवेगळ्या आहेत. विवाह बंधनात अडकताना मन मोठं करून केवळ माणूस म्हणून विचार होत असला तरी त्यानंतर मात्र मुलाकडच्या चालीरिती अवलंबाव्या लागतात. अशी अतिशय बोटावर मोजण्याइतकीच उदाहरणे आहेत की, ज्यात मुलींना तिच्या आधीच्या धर्माप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. ज्या ठिकाणी असं स्वातंत्र्य मिळतं, तिथं त्यांची संसारवेल अतिशय आनंदानं फुलते, पण जिथं असं स्वातंत्र्य नाही, तिथं मुलीची काही काळातच घुसमट होते. अशांची संख्या अधिक असल्याने आंतरधर्मीय विवाहांना घरातून विरोध होतो.

महत्वाचा मुद्दा म्हणजे, बेपत्ता झालेल्या अथवा अपहृत महिला, मुलींच्या तपासाचं काम ज्या पोलीस व्यवस्थेकडे आहे, त्यांच्याकडून ते अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्याचा पाठपुरावाही योग्य पद्धतीनं होत नसल्यानं या केसेस प्रलंबित राहतात. राज्यभरात असे प्रकार होऊ नयेत म्हणून ‘निर्भया’ पथकाची नियुक्ती केली, परंतु या पथकाचं काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचं दिसतंय. काही प्रकरणांत घरी परतलेल्या तरुणींची नोंद होत नाही. राजकीय पुढारी अशा प्रकरणांत पोलिसांवर दबाव टाकतात, हा मुद्दाही येथे टाळून चालणार नाही.

बहुतांश प्रकरणांत पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करायचा असतो, परंतु पुढारी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणतात. त्यात जो ऐकणार नाही, त्याच्या बदलीमागे ही मंडळी लागतात. एकदा तपासी अधिकार्‍याची बदली झाली की, प्रकरण धूळ खात पडते. पोलीस विभागात अतिशय अपुरे मनुष्यबळही तपासाच्या विलंबास कारणीभूत ठरते. पुरेसे मनुष्यबळ असल्यास हरवलेल्या वा पळवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी मोठी टीम तयार करता येईल. पिटा अ‍ॅक्टनुसार ग्रामीण आणि शहरी पोलिसांच्या पातळीवर स्वतंत्र समिती गठित करता येईल. पोलीस ठाण्यांमध्ये समुपदेशकांची संख्याही वाढवता येईल. असं झालं तर भविष्यात ‘द महाराष्ट्रा स्टोरी’ चित्रपट काढण्याची गरज भासणार नाही!

बेपत्ता तरुणींचं राज्य ‘द महाराष्ट्रा स्टोरी’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -