घरसंपादकीयओपेड‘एकनाथा’चा पुनर्प्रवेश, विजयाचा ‘प्रसाद’

‘एकनाथा’चा पुनर्प्रवेश, विजयाचा ‘प्रसाद’

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकासने विशेषत: राष्ट्रवादीने आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते ते एकनाथ खडसे यांच्याकडे. खडसेंच्या रुपाने महाविकासचा सभागृहातील आवाज बुलंद होईल यात शंकाच नाही. परंतु हे एकमेव कारण खडसेंवर लक्ष केंद्रित करण्याचे असू शकत नाही. यापूर्वी महाविकासच्या १२ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दरवाजा उघडलेला नाही. त्याचे प्रमुख कारण हे एकनाथ खडसेच असल्याचे बोलले जाते. त्यांचे नाव मागे घेतल्यास कदाचित राज्यपाल ‘प्रसन्न’ होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर खडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवून राज्यपालांनी रोखून धरलेल्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडावी हा देखील उद्देश राष्ट्रवादीचा दिसतो.

आंधळ्या भरवश्याला
दगा फटका टळत नाही
हवेतच बाण मारल्याने
ग्राऊंड रिअ‍ॅलिटी कळत नाही..
हळूहळू घरात घुसत
नंबर एकला पाणी पाजते
पत्नी, संपत्ती, मतपत्रिका
नंबर दोनचीच गाजते..
रामदास फुटाणे यांनी दुसर्‍या पसंती क्रमावर केलेली ही वात्रटिका.. सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या वात्रटिकेला पुन्हा उकळी फुटली नसेल तर नवल! या निवडणुकीत स्वकियांच्या मतांचे गणित जुळत नसतानाही लाड यांना विजयाचा ‘प्रसाद’ मिळाला आणि जगतापांची ‘भाई’गिरी संपुष्टात आली. एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचा दरवाजा उघडला जाणे ही बाब महाविकाससाठी महत्वाची ठरली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना धोबीपछाड केले, हे मान्यच करावे लागेल. निवडणुकीत राजकीय तत्वाचाच विजय झाला हे पुन्हा एकदा दिसून आले.

कभी कभी लगता है की अपूनही भगवान है.. सेक्रेड गेम या वेबसिरिजमधील गणेश गायतोंडे या पात्राचा हा डायलॉग.. प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने मिळणार्‍या यशामुळे गायतोंडे स्वत:ला परमेश्वर समजायला लागतो. अशीच काहीशी अवस्था सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे. राज्यसभेचे आकडे जुळत नसतानाही त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि त्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास इतका वाढला की, त्यांनी विधानपरिषद निवडणुकीचेही मैदान मारले. यावेळी त्यांनी केवळ अपक्षांनाच नव्हे तर काँग्रेससारख्या पक्षातील मतदारांनाही सावज केले. म्हणजे फडणवीस काहीही चमत्कार करु शकतात यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील मातब्बर नेतेही अशा निवडणुकांत गर्भगळीत होत असल्याचे चित्र दिसून आले. खरेतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन मोठे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यासमोर कोणतीही अडचण उभी राहायलाच नको. त्यातल्या त्यात या महाविकास आघाडीतील जे नेते आहेत त्यांचा महाराष्ट्रातील राजकीय अनुभव आणि वजन पाहता कुणीही नामोहरम करण्याचा विचारही मनात यायला नको होता. परंतु असे असतानाही प्रत्येक वेळी भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांना कामाला लावते, त्यांचा घाम काढते, त्यांची दमछाक करते. राज्यसभा निवडणुकीत तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हेच टार्गेट होते. परंतु मोर्चेबांधणीत भाजपची गडबड झाली आणि संजय राऊत काठावर उत्तीर्ण झाले.

- Advertisement -

संजय पवारांना मात्र वाचवण्यात महाविकासला अपयश आले. ज्या अपक्षांच्या जोरावर महाविकास आघाडीने सत्तेची मोट बांधली त्याच अपक्षांनी ऐन निवडणुकीत घोडेबाजारात सामील होत भाजपला मतदान केले हे स्पष्ट आहे. राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांची परतफेड करायची यासाठी विधान परिषद निवडणुकीत विशेष काळजी घेण्यात आली. विधानपरिषदेच्या आखाड्यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, सचिन अहिर, रामराजे निंबाळकर, चंद्रकांत हंडोरे, एकनाथ खडसे, आमशा पाडवी यांनी सहजपणे विजयाची माळ सहजपणे गळ्यात पाडून घेतली. मात्र भाई जगताप यांची मेहनत पाण्यात गेली. काँग्रेसमधीलच अंतर्गत विरोधकांचा त्यांच्या पराभवात सिंहाचा वाटा असावा असे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. केवळ काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतील प्रमुख तिनही पक्ष ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या तत्वाने राजकारण करत असल्याचे दिसून आलेे. दुसर्‍या पक्षातील उमेदवारांना वाचवण्यात त्यांना फारसा रस दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्वपक्षातील उमेदवारांना जिंकून देण्यातही यापैकी काहींना रस नसतो, हे विशेष.

राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीत कुटनिती, षडयंत्र आदी बाबींवर वारेमाप बोलण्यात आले. विरोधकांनी एकमेकांच्या राजकीय संस्कृतीवर यथेच्छ तोंडसुख घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची कुप्रथा आताच रुजायला लागल्याचे दावे नेत्यांनी केले. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघता प्रत्येक वेळी कुटनितीचा अवलंब करण्यात आलेला आहे. मते काठावर असतील तर ती वाढवण्यासाठी ‘साम- दाम- दंड- भेद’ या तत्वाचा वारंवार वापर करण्यात आलेला आहे. या संदर्भात दिवंगत विलासराव देशमूख यांचा किस्स्याची आठवण झाली. विलासराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती हे अनेकांना आठवतही नसेल. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना कात्रजचा घाट दाखवत शिवसेना – भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आले होते.

- Advertisement -

विलासराव देशमुख यांचा त्यांचेच होम ग्राऊंड असलेल्या लातूर मतदारसंघात शिवाजीराव कव्हेकरांकडून पराभव झाला होता. त्यानंतर मार्च १९९६ मध्ये विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे विलासरावांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विलासरावांनी बंडखोरी करत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची लढत एक्साईजचे माजी अधिकारी लालसिंग राठोड यांच्याबरोबर रंगली होती. विलासराव हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असले तरी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांचा पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करत होते तर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विलासरावांचे जिवलग मित्र गोपीनाथ मुंडे हे विलासरावांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. विलासरावांना पहिल्या पसंतीची १९ तर लालसिंग राठोडांना साडे एकोणीस मते होती. लालसिंग राठोड आणि विलासराव देशमुखांना अनुक्रमे २४६८ आणि २४०९ मते होती. राठोडांना असलेल्या अधिकच्या ०.५९ म्हणजेच अर्ध्या मतामुळे विजयी घोषित करण्यात आले आणि विलासराव देशमुखांचा पराभव झाला. हे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे बंडखोर केवळ अपक्षच नसतात तर बडे नेतेही असू शकतात. त्यामुळे सांप्रद काळात तरी राजकारणाच्या घसरत्या नितीमत्तेवर बोलण्याचा कुणाला नैतिक अधिकार नाही.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकासने विशेषत: राष्ट्रवादीने आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते ते एकनाथ खडसे यांच्याकडे. खडसेंच्या रुपाने महाविकासचा सभागृहातील आवाज बुलंद होईल यात शंकाच नाही. परंतु हे एकमेव कारण खडसेंवर लक्ष केंद्रित करण्याचे असू शकत नाही. यापूर्वी महाविकासच्या १२ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दरवाजा उघडलेला नाही. त्याचे प्रमुख कारण हे एकनाथ खडसेच असल्याचे बोलले जाते. त्यांचे नाव मागे घेतल्यास कदाचित राज्यपाल ‘प्रसन्न’ होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर खडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवून राज्यपालांनी रोखून धरलेल्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडावी हा देखील उद्देश राष्ट्रवादीचा दिसतो. खडसेंच्या निमित्ताने राष्ट्रवादीने उत्तर महाराष्ट्रातील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. भाजपच्या चार आमदारांपैकी सुरेश भोळे आणि संजय सावकारे हे आमदार खडसे यांचे समर्थक मानले जात आहेत. खडसेंची ताकद वाढवल्यास भविष्यात हे दोन आमदारही त्यांच्यासोबत येऊ शकतात. खडसेंचा प्रभाव हा केवळ जळगाव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आहे. अजूनही भाजपमधील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते खडसेंचे चाहते आहेत. परंतु खडसेंचेच राजकीय भविष्य आधांतरीत असल्याने त्यांच्या पाठीशी कोण उभे राहणार? म्हणूनच खडसेंचे बळ वाढवून त्या माध्यमातून राष्ट्रवादीला आपली ताकद वाढवायची आहे. जे आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेशित झालेत त्यांना या पक्षाने मानाचे पान दिले आहे. यात कपिल पाटील, डॉ. भारती पवार, उदयनराजे भोसले, धनंजय महाडीक, प्रसाद लाड, नारायण राणे यांचा समावेश होतो.

दुसरीकडे महाविकासला बाहेरुन आलेल्यांचा ‘विकास’ करताच आलेला नाही. खडसेंनाही राजकीय पर्नवसनाची वाट पाहवी लागली. त्यामुळे बाहेरुन आलेल्यांची फळी काहीशी नाराजी आहे. ही नाराजी खडसेंच्या माध्यमातून दूर करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतो. सलग ४० वर्ष संसदीय राजकारणाचा अनुभव असलेले खडसे जेव्हा सभागृहात येतील तेव्हा ते भाजपला फाडून काढण्याच्यात तयारीत असतील ही काळ्या दगडावरच्या रेषेसारखी आहे. त्यामुळे खडसेंना ‘अ‍ॅक्टिव्ह’ करण्याची गरज केवळ राष्ट्रवादीचीच नाही, तर शिवसेना आणि काँग्रेसचीही आहे. एकूणच विधानपरिषदेच्या आखाड्यात सर्व रणनितींचा वापर करण्यात आला. आपली हक्काची मते फुटू नयेत म्हणून ‘साम, दाम, दंड, भेद’चा वापर करण्यात आला. त्यामुळे अपेक्षीत उमेदवार निवडून आले. कुणाला जिव्हारी लागेल अशी हाराकीरी झाली नाही. म्हणूनच ‘कालचा गोंधळ बरा होता’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

‘एकनाथा’चा पुनर्प्रवेश, विजयाचा ‘प्रसाद’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -