केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने केलेल्या पाहणी सर्वेक्षणात देशातील विद्यार्थी विज्ञान विषयाला भविष्याच्या दृष्टीने महत्त्व देत नसल्याची बाब समोर आली आहे. जगात ज्ञानसामर्थ्यासाठी विज्ञान संशोधनाला पसंती दिली जात आहे. आपल्याकडे शिक्षणातून विज्ञान संशोधनाची पेरणी होत नसल्याचे समोर आले आहे. याउलट कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. शिक्षणात विज्ञानाकडे होणारे दुर्लक्ष ही बाब अधिक चिंताजनक म्हणायला हवी. जगाच्या पाठीवर असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण प्रगती करत असलो तरी कोणत्याही देशाचे ज्ञानाचे सामार्थ्य हे नेहमीच विज्ञानातील मूलभूत संशोधनावर अवलंबून असते.
आज आपल्याला जगात मानाचे स्थान प्राप्त करायचे असेल तर विज्ञानाकडे आणि त्याचबरोबर वैज्ञानिक संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. गेली अनेक वर्षे नोबेलसारख्या पुरस्कारावर भारतीय ठसा उमटू शकले नाहीत. आपण विज्ञानाकडे आणि विज्ञान संशोधनाकडे फारसे गंभीरपणे पाहत नाही हे वारंवार समोर आले आहे. संशोधनाची दृष्टी आणि त्यासाठीची प्रतिष्ठा, राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याशिवाय आपल्याला प्रगतीची पावले टाकता येणार नाहीत. आज त्यासंदर्भात गंभीरतेने विचार करत पावले टाकली गेली तर त्याची फळे चाखण्यासाठी काही दशके प्रतीक्षा करावी लागणार आहे, मात्र ही वाट आज तरी कठीण दिसते. यामुळे आपल्या महासत्तेच्या दिशेने होणार्या प्रवासाच्या वाटेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
देशातील विविध राज्यात अकरावी, बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाकडे असलेल्या नोंदीनुसार उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा विचार करता त्याकडे आपण किती गंभीरपणे पाहायला हवे हे अधोरेखित करणारे आहे. देशातील विविध राज्यांचा विचार करता पश्चिम बंगालमध्ये १३.४२ टक्के, पंजाबमध्ये १३.७१ टक्के, हरियाणात १५.६३ टक्के, गुजरात राज्यात १८.३३, तर झारखंडमध्ये २२.९ टक्के विज्ञान विषयाला पसंती दिली आहे. त्याचवेळी गुजरात राज्यात कला शाखेला ८१.५ टक्के, बंगालमध्ये ७८.९४ टक्के, पंजाबमध्ये ७२.८९ टक्के, हरियाणा ७६.७६ टक्के व राजस्थानमध्ये ७१.२३ टक्के विद्यार्थ्यांनी कला शाखेला प्राधान्य दिले आहे.
एकीकडे जगात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे. आपल्या देशातही त्याबद्दलचा विचार केला जात आहे. दुसरीकडे काही राज्यात मात्र विज्ञान विषयाला पसंती दिली जात असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे. तामिळनाडूमध्ये १.५३ टक्के, तेलगंणामध्ये २.०१, आंध्र प्रदेशमधील २.१९ टक्के विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली आहे. आपल्याच देशातील विविध राज्यांमध्ये असणारी ही विषमता का निर्माण झाली याचा विचार करण्याची गरज आहे. यामागे शैक्षणिक अभ्यासक्रम, सामाजिक, राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे का याचा विचार करायला हवा. अर्थातच ही विषमता अत्यंत चिंताजनक म्हणायला हवी. आज जगात माहिती तंत्रज्ञानाचे साम्राज्य उंचावत आहे.
आपणही ती वाट चालत आहोत, मात्र देशात विशुद्ध विज्ञानाची कास धरत संशोधनाची वाट चालण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आपल्या देशातही विज्ञान संशोधनात काही काळ काम घडले आहेच. आजही ती वाट चालली जात आहे. कधीकाळी बोस, सी. व्ही. रमण, सत्येन बोस, मेघनाद साहा, निर्मल साहनी, होमी भाभा, चंद्रशेखर अशी काही नावे आपल्या देशातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत गौरवाने घेतली जात. आज या परंपरेचा आलेख खालावत चालला आहे. देशातील विविध संशोधन संस्थांमध्ये आजही अनेक पदे रिक्त आहेत. त्या जागा भरल्या जात नाहीत आणि त्याचवेळी या क्षेत्राकडे विद्यार्थी का फिरकत नाहीत याचा विचार करायला हवा.
आपल्याकडे बुद्धिवान असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी इंजिनीअरिंग, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेत असतात. अर्थात आपल्याकडील आयआयटीआय, आयआयएमसारख्या काही संस्था आणि तेथे शिकणार्या विद्यार्थी व पदव्यांना प्रतिष्ठा आहे. या संस्थांमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना जगभरात मोठी मागणी आहे. त्या विद्यार्थ्यांना जगभरात मोठी प्रतिष्ठादेखील आहे. एकीकडे तंत्रज्ञानाला महत्त्व आणि प्रतिष्ठा मिळत असताना विज्ञान संशोधन क्षेत्रात तसे चित्र दिसत नाही. ही वाट काही मूलभूत संशोधनाची नाही. विज्ञान आणि विज्ञान संशोधनाचा विचार करताना ज्ञान हेच मूल्य असते असे मानले जाते. त्यामुळे जिज्ञासेची वाट चालणारी माणसं विज्ञानाच्या संशोधनाची वाट चालू शकतील.
विज्ञान संशोधनाची वाट चालताना तात्काळ यश मिळवण्याचा तो काही मार्ग नाही. त्यासाठी अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागतात. या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन कार्यरत राहावे लागते. विज्ञानाची वाट चालणार्या माणसाच्या मनात कायमच अस्वस्थतेची वाट जपली जाते. तो नेहमीच असमाधानी असतो आणि त्याचबरोबर पैशांचा मोहही त्याला असत नाही. याउलट माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर पदवी मिळविणारी माणसं विज्ञान संशोधनाच्या वाटेने जाणार्यापेक्षा निश्चितच समाधानी आणि निवांत राहू शकतात. त्यामुळे विज्ञान, संशोधनाची वाट म्हटले तर कठीणच असते. आज जगाच्या पाठीवर जे जे राष्ट्र प्रगत आहे, ज्यांचे सामर्थ्य प्रस्थापित आहे त्यामागे केवळ विज्ञानातील मूलभूत संशोधनाचे सामार्थ्य कारणीभूत आहे.
अमेरिका आज जगात महासत्ता म्हणून प्रस्थापित आहे. त्यामागे विज्ञानाचे सामर्थ्य हेच कारण आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये होणार्या संशोधनाचा विचार करता आपल्या देशातील विद्यापीठांमधील संशोधनाची संख्या, त्यांचा दर्जा यावरही प्रश्नचिन्ह आहे. आपले शालेय शिक्षण आणि येथील उच्च शिक्षणातही संशोधनाच्या अंगाने फारसे काही पेरले जात नाही. जगाच्या पाठीवर पहिल्या २०० विद्यापीठांच्या यादीत आपले एकही विद्यापीठ येत नाही. पिसासारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत भारत शेवटीच असतो. हे कशाचे निर्देशक मानायचे? आपल्याकडे विज्ञान आणि संशोधनासाठी लागणारी विचारदृष्टीची पेरणी करण्यात आपण कमी पडत आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
आईन्स्टाईन यांनी शिक्षणाचा अर्थ सांगताना म्हटले होते की, स्वातंत्र्य आणि तर्कशुद्धता म्हणजे शिक्षण. आज शिक्षणात स्वतंत्र विचाराची वाट चालणारी माणसं कमी होत चालली आहेत. तर्काचा विचारही फारसा जीवन व्यवहारात डोकावताना दिसत नाही. माणसं जेव्हा तर्काचीही वाट चालत नाहीत, तेव्हा अंधश्रद्धेचा विचार अधिक दृढ होत जातो. आज आपल्या शिक्षणात स्वातंत्र्याची वाट चालण्यासाठीची प्रक्रिया आणि तर्काचा विचार फारसा प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. उच्च शिक्षणातही त्यासाठी फारसे काही घडताना दिसत नाही.
आपल्याकडे स्मरणावर आधारित असलेली शिक्षण व्यवस्था स्वातंत्र्यानंतर उभी राहिली आहे. त्या परंपरेची वाट चालणे आपल्याला अधिक हितावह वाटत आले आहे. नव्या वाटा चालताना जड जात आहे. त्या वाटा म्हणाव्या तितक्या सोप्या नाहीत. कष्टाच्या आणि यशासाठी प्रतीक्षा करायला लावणार्या आहेत. आपल्याला तात्कालिक यशाची अधिक ओढ आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत बदल करण्याचा प्रयत्न झाला तरी तो बदल स्वीकारण्याची मानसिकता समाजमनात प्रतिबिंबीत होत नाही.
आपल्याकडे आजही विद्यार्थ्यांच्या मनातील विचार बाहेर काढण्यात फारसे यश आले नाही. सृजनाचा विचार आणि कल्पनेच्या भरार्या मारण्याला शिक्षणात फारसे स्थान नाही. विज्ञान प्रदर्शन, इनस्पायर प्रदर्शन करत असलो तरी त्यात विद्यार्थ्यांचे सहभागाचे प्रमाण फार नाही. त्याचबरोबर त्यात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांचा खरोखर आंतरिक सहभाग आहे का याचाही शोध घेण्याची गरज आहे. अनेकदा शिक्षणात सहभागी नसला तरी एखादा विद्यार्थी नवे काही करत आहे. तो एखादी संशोधनाची वाट चालत असला तरी त्याचा संशोधनाचा विचार जगात स्वीकारला जातो. किंबहुना तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तिथली व्यवस्था काम करत जाते.
आपल्याकडे ती पावले चालताना दिसत नाही हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. त्या दिशेने प्रवास घडण्यासाठी बाह्य व्यवस्था पुरेशी मदत करत नाही. आपल्याकडे एचएमटी तांदळाची जात शोधणार्या खोब्रागडे यांना किती संकटांचा सामना करावा लागला हे आपण वाचले की संशोधनाची वाट किती बिकट आहे हेच समोर येते. खरंतर अशा माणसांचा, विद्यार्थ्यांचा शोध शिक्षण व्यवस्थेने आणि येथील विज्ञानाच्या वाटेचा प्रवास करणार्यांनी घेण्याची गरज आहे. आपण जोवर संशोधनाला प्राधान्य, संशोधकांना प्रतिष्ठा आणि विद्यार्थी जिज्ञासा शिक्षणात जोपासत नाही तोवर मूलभूत संशोधनाची वाट चालणारी माणसं मिळणं कठीणच आहे. महासत्तेची वाट ही संशोधनाच्या प्रक्रियेतून जाते हेही लक्षात घ्यायला हवे.