घरसंपादकीयओपेडजिवंत माणसांचे प्रश्न आणि निर्जीव राजकारण!

जिवंत माणसांचे प्रश्न आणि निर्जीव राजकारण!

Subscribe

अधिवेशन सुरू असताना लव्ह जिहादचा विषयावर सभागृहाबाहेर वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतो. महिलेच्या रॅलीतील महिलेच्या कथित आक्षेपार्ह वर्तनाने माध्यमांचे रकाने जाणीवपूर्वक भरले जातात. महापुरुषांच्या स्मारकांच्या खर्चिक अशा देदीप्यमान स्मारकांच्या उभारणीची चर्चा होते, हे भावनिक राजकारण जगण्याच्या प्रश्नापेक्षा महत्वाचे आहे. भावनिक राजकारणात जिवंत माणसांपेक्षा महापुरुषांचे किंवा राजकारण्यांचे प्रतिकात्मक पुतळे महत्वाचे असतात. शेतकरी, कामगार, नोकरदार नावाच्या जिवंत माणसांचे प्रश्न निर्जीव पुतळ्यांकडे वळवणे भावनिक राजकारणात सोपे असते.

सत्तेसाठीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची पातळी जास्तीत जास्त खालच्या स्तरावर कशी जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी विशेष अभ्यासक्रम शिकवणारी विद्यापीठे उभारण्याची गरज निर्माण झालेली आहे. यात समाजमाध्यमांतून जास्तीत जास्त दिशाभूल करणारी वक्तव्ये, चित्रिफीती, लेखन प्रसिद्ध कसे होईल, यासाठीही विशेष अभ्यासक्रम ठरवण्याची आवश्यकता आहे. वाढती महागाई, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत हजाराच्यावर झालेली आहे. यामागेही उदात्त अशी भावना आहे, ती लक्षात घ्यायला हवी, गोरगरिबांच्या घरात ‘चूल पेटवण्याचे’ पुण्यकर्म या माध्यमातून होत असल्याने त्याला होणारा विरोध अनाठाई आहे.

इंधनदरवाढीमागेही सत्ताधार्‍यांची अशीच उदात्त भूमिका आहे. अधिवेशन सुरू असताना लव्ह जिहादच्या विषयावर सभागृहाबाहेर वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतो. महिलेच्या रॅलीतील महिलेच्या कथित आक्षेपार्ह वर्तनाने माध्यमांचे रकाने जाणीवपूर्वक भरले जातात. महापुरुषांच्या स्मारकांच्या खर्चिक अशा देदीप्यमान स्मारकांच्या उभारणीची चर्चा होते, हे भावनिक राजकारण जगण्याच्या प्रश्नापेक्षा महत्वाचे आहे. भावनिक राजकारणात जिवंत माणसांपेक्षा महापुरुषांचे किंवा राजकारण्यांचे प्रतिकात्मक पुतळे महत्वाचे असतात. शेतकरी, कामगार, नोकरदार नावाच्या जिवंत माणसांचे प्रश्न निर्जीव पुतळ्यांकडे वळवणे भावनिक राजकारणात सोपे असते.

- Advertisement -

सरकारी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. त्यात राज्यातील सामान्य नोकरदार, शेतकरी, कामगार भरडला जात असताना सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्ष, रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याची गरज आहे. नागरिकांना भावनिक मुद्यांचा अनेस्थेशिया दिल्यावर रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांची वेदना बोथट होते, हा अनुभव राजकारण्यांना कित्येक दशकांचा आहे. त्यासाठी समाजमाध्यमांवरील कथित चित्रिफीतींच्या बातम्यांनी वृत्त माध्यमांच्या वेळेचा अवकाश भरावा लागतो, राजकीय विरोधाची पातळी व्यक्तीगत मुद्यांवर आणून नागरिकांना लोकशाहीच्या भ्रमात ठेवणे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी लव्ह जिहाद, धार्मिक अस्मिता आदी मुद्दे माणसांच्या जगण्यामरण्यापेक्षा महत्वाचे आहेत. महिलांवरील व्यक्तीगत दोषारोप हे आणखी एक साधन, त्यासाठी चित्रफीतींच्या चर्चांनी समाजमाध्यमांचा आणि प्रसारमाध्यमांचाही अवकाश भरता येतो. आंदोलनांचा देखावा उभा करण्याची गरज असते, भावनिक आंदोलनांना जनाधार असतो, मग नापिकी, अवकाळी, शेती, पाणीटंचाई, महागाई आदी वेदना नाहीशा झाल्याचा भ्रम हवाहवासा वाटतो.

शेतकर्‍यांची थकलेली पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत देण्यात येईल, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी विधानसभेवर धडकण्याच्या तयारीत आहेत. पीक विमा कंपन्या आणि शेतकर्‍यांमधील वाद लोकशाहीच्या स्थापनेपासूनचा आहे. देशातील धान्य काळाबाजाराचा प्रश्नही दरवर्षीच्या अधिवेशनासाठी नवा नसतो. जळगावमधील तांदळाच्या साठेबाजीचे सभागृहात उपस्थित झालेले एक प्रकरण हे हिमनगाचे टोक असते. अवकाळीचे संकट नैसर्गिक आपत्ती मानली तरी कांदा, भाजीपाल्याचे मातीमोल दर आणि साठेबाजी हा विषय माणसांच्या कृतीचा परिणामच आहे. नाशिकमधून आदिवासी, शेतमजूर, शेतकर्‍यांचा मोर्चा निघाला. यातील शेतकर्‍यांच्या मागण्या आणि प्रश्न दरवर्षी निर्माण होणारे असून अस्मानीच्या संकटात दिलासा आणि सुलतानीच्या आरिष्टाला रोखण्याची शेतकर्‍यांची मागणी यंदाही आहेच.

- Advertisement -

रास्तभाव, कृत्रिम टंचाई, साठेबाजी, धान्याचे ठरवून दर पाडणे या गोष्टी अस्मानी संकटाचा परिणाम नसतात. याशिवाय सातबार्‍यावर नावाचा प्रश्न, अपात्र जमिनीचे दावे, वीज, पाणी वाटप, केंद्राच्या योजनांची रखडलेली अंमलबजावणी, गायरान जमिनीचा प्रश्नही कायम आहे. कांदा, द्राक्ष हमीभाव आणि निर्यात धोरण, धान्य टंचाईमुळे साठेबाजीचा प्रश्न उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दाखल झालेला असताना अवकाळीने त्यात भर घातली आहे. शेतकर्‍यांचे हे प्रश्न जुनेच असताना त्यावर कित्येक दशकांनंतरही धोरणात्मक तोडगा निघालेला नाही किंवा जाणीवपूर्वक काढला गेलेला नाही. शेती आणि शेतकर्‍यांचे हे प्रश्न जुनेच आहेत. शेतकर्‍याने हे दुष्टचक्र स्वत: भेदायला हवे, असा सूर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा आहे. जातीय आणि धार्मिक आधारावर मतदान करणार्‍या शेतकर्‍यांना हमीभाव मागण्याचा अधिकार उरतो का, असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.

या प्रश्नातील जातीय आणि धार्मिक विषयाला जोडूनच भावनिक मुद्यांचा विषयही सोबत आहेच. धार्मिक भावना आणि जातीय विषयांमुळे जगण्याचे प्रश्न दूर सारले जातात. राजकारणात सत्ता टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हेच हवे असते, त्यामुळेच राजकीय रॅलीमधील आक्षेपार्ह वर्तनाला जाणीवपूर्वक सातत्याने समोर आणले जाते. यात एखाद्या महिलेचे नाव असेल तर माध्यमांकडूनही त्याला खतपाणी घातले जाते, लव्ह जिहाद, नातेसंबंधावर प्रश्न उपस्थित करून कथित आक्षेपार्ह वर्तनावरून एकमेकांवर केली जाणारी चिखलफेक नवी नाही. याआधीही त्याचे कित्येक अध्याय झालेले आहेत. हे कमी म्हणून महापुरुषांविषयी वातावरण तापवणारी वक्तव्ये केली जातात. महापुरुषांच्या विचारांना मात्र सोयीस्कररित्या बगल दिली जाते. त्यांच्या विचारातून जनतेचे कसे भले होईल, यामध्ये नेते मंडळींना फारशी रुची नसते. राजकीय पोळी भाजणे हा एकमेव हेतू असतो.

आंदोलनात एकच पुतळा आठ ते दहा वेळेस चेहरा बदलून नव्याने जाळता येईल. नवा पुतळा घेण्याची अजिबात गरज नाही, याशिवाय जाळण्यासाठीच्या काही खास पुतळ्यातून रोमहर्षक फटाक्यांची आतषबाजीही होईल, त्यामुळे आंदोलनात दिवाळीचा आनंद मिळेल. तसेच खास पुतळ्यांना झोडण्यासाठी खास जोडेही तयार करून मिळतील. काही पुतळे वैशिष्ठ्यपूर्ण असून त्यांना जोडे मारल्यास पुतळ्यातून नका रे, नका रे, नका रे…असे केविलवाणे आर्जव ऐकू येईल, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पुतळ्यावर विजय मिळवल्याचा आनंद मिळेल. कपडे फाडणे, धोतर फेडणे आदी पुतळ्यांमध्ये विशेष सुविधाही मागणीनुसार करून मिळेल. ज्यांचा पुतळ्याचा प्रतिकात्मक निषेध करायचा आहे. त्या पुतळ्याला प्रदान करण्यासाठी पाच पन्नास ठेवणीतल्या खास आंदोलनातील शिव्या, लाखोल्या वेगळ्या शिकवल्या जातील, त्यासाठी येताना शंभर पानी एकेरी वही घेऊन यावे, (एकेरी शिव्यांसाठी एकेरी वही तर दुहेरी शिव्यांसाठी दुरेगी वही) लागेल. या शिव्यांचा वापर आंदोलनाशिवाय इतर ठिकाणी केल्यास नियमभंगाची कारवाई केली जाईल. पुतळा फुकून टाकण्याआधी घ्यावयाची विशेष काळजी… हा विशेष शॉर्टटर्म कोर्सही शिकवला जाईल. त्यामुळे बॅनरवरील चेहर्‍याला झोडण्याआधी कोणाला झोडायचेय आणि कोणाला नाही, हा होणारा गोंधळ थांबवता येईल.

काही वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने साकारलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यांवर प्रतिकात्मक असा गोळीबारही करता येईल. त्यावेळी अशा प्रतिकात्मक पुतळ्यांमधून प्रतिकात्मक जखमा होऊन प्रतिकात्मक रक्त वाहण्याची सुविधा करून मिळेल. या पुतळ्यातील रक्ताचा रंग आणि आंदोनकर्त्यांच्या रक्ताचा रंग एकच नसल्याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल. काही यांत्रिकी पद्धतीने बनवलेल्या पुतळ्यांना जोडे मारले जात असताना किंवा पेटवले, वार केले जात असताना असे पुतळे माणसासारखे पळून जाण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांना पुन्हा पकडून दामटवून एकाच ठिकाणी पुन्हा बांधता येईल, असे पुतळे जिवाची भीक मागतील, त्यातून मिळणारा अवर्णनीय आनंद लुटता येईल. यातून दंगलकाळात किंवा खरोखरंच जिवंत माणसं कापण्याची, जाळण्याची रंगित तालीमही होईल, ज्यामुळे प्रत्यक्ष कृतीचा सरावही करता येईल, याशिवाय जाणीवपूर्वक अवमानकारक वक्तव्ये कशी करावीत याच्या १०१ पद्धती हा डिप्लोमा कोर्सही घेतला जाईल. यानंतरच्या दुसर्‍या टर्ममधील अभ्यासक्रमात वक्तव्यांवरून घुमजाव हा विशेष जोड अभ्यासक्रमही शिकवला जाईल….अर्थाचा अनर्थ करणे, मी तसे बोललोच नाही, माध्यमांनीच विपर्यास केला आदी विधानांचा वापर यात शिकवला जाईल.

पक्ष बदलासाठी अस्मिता, कारणांची मांडणी, मूळ विचारधारा, धर्मनिष्ठा आदी विषय अशा संस्थांमध्ये शिकवले जातील. अस्मितेमध्ये जातीय, धार्मिक, सामाजिक, लैंगिक फरकानुसार अस्मितेचे क्रॅश कोर्सही घेतले जातील. पक्षाची मूळ विचारधारा आपल्या राजकीय हेतूने कशी वळवावी, याचीही माहिती दिली जाईल. कारणांची मांडणी शिकवताना व्यक्तीगत आणि सत्तेचे हेतू मतदारांच्या ध्यानात येऊच नयेत, याचीही विशेष काळजी कशी घ्यावी हे शिकवले जाईल. ‘पक्षबदलाच्या समर्थनासाठीची व्यवच्छेदक कारणे’ अशा कुठल्याशा विचारी शीर्षकाखाली हा अभ्यासक्रम घ्यायला हरकत नाही. खोके, पेट्यांच्या नव्या भाषेचा शब्दसंचय वाढीस लागावा हा उद्देशही या अभ्यासक्रमाचा असेल. त्यासाठी तातडीने मराठी भाषेच्या राजकीय शब्दकोशासाठी समिती नेमण्याची गरज असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट व्हावे, राजकीय मंडळींच्या सत्तेच्या सर्वोच्च वादातील आपलीच बाजू ही संविधानाच्या सुरक्षेची बाजू असल्याचे पटवून देण्यासाठीचे आवश्यक आक्रमक विचार शिकवले जातील, मग मूळ संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, नागरिकांचा विकास याला बगल देता येईल. राजकीय नैतिकता शिकण्याचा काही प्रश्नच उरणार नाही. सामान्य माणसांचे प्रश्न हे एक राजकीय इंधन झालेले आहे, त्यावर नेते मंडळी आपले राजकारण सुसाट पळवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -