घरसंपादकीयओपेडचित्रपटांमधून जात आणि आरक्षणाचे उमटलेले प्रतिबिंब!

चित्रपटांमधून जात आणि आरक्षणाचे उमटलेले प्रतिबिंब!

Subscribe

समाजात आरक्षणाचा विषय फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे चित्रपटांतही आरक्षणाचा विषय अधूनमधून येत असतो. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधून जात आणि आरक्षण विषयाला हात घातला आहे. दलितांवरील अत्याचाराला चित्रपटातून वाचा फोडण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आले आहे. बॉम्बे टॉकिजने १९३६ मध्ये ‘अछूत कन्या’ची निर्मिती केली होती. अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात देविका राणी यांनी दलित मुलीची भूमिका साकारली होती. दलितांना कसे अत्याचार सहन करावे लागतात ते यात दाखवण्यात आले होते. अशाच काही चित्रपटांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

-आशिष निनगुरकर

सध्या ओटीटीचा जमाना आहे. नवे विषय, नवी मांडणी रसिकप्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या सर्वत्र ‘आरक्षण’ हा एकच विषय गाजतोय. सगळीकडे आरक्षणाच्या विषयाने जोर धरलेला आहे. बॉम्बे टॉकिजपासून प्रकाश झा, सत्यजित रे ते अगदी बासू चटर्जीपर्यंत अनेकांनी आपल्या सिनेमांमधून ‘आरक्षण’ विषय मांडला आहे. भोपाळमधील एस. एम. टी. कॉलेजमध्ये प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन) नावाचा एक तत्त्वनिष्ठ प्राचार्य असतो. त्याच्या हाताखाली अनेक मुले तयार झालेली असतात. यापैकीच एक दीपक कुमार (सैफ अली खान) असतो. जातीयवादामुळे त्याला नोकरी मिळत नाही म्हणून प्रभाकर त्याला आपल्या कॉलेजमध्येच तात्पुरती नोकरी देतात.

- Advertisement -

प्रभाकर यांची मुलगी पूर्वी (दीपिका) दीपक कुमारच्या प्रेमात आहे. सुशांत (प्रतीक बब्बर) हा त्यांचा मित्र आहे. याच दरम्यान मंडल आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागू होतात. त्यामुळे सरकारी संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण वाढवले जाते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एका समाजात असंतोष तर दुसर्‍या समाजात जल्लोष निर्माण होतो. सगळीकडे याचे पडसाद उमटतात. याचा चित्रपटातील या भूमिकांवर काय आणि कसा परिणाम होतो ते प्रकाश झा यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. प्रेक्षकांनाही प्रकाश झा यांच्या आरक्षणाची ही कथा प्रचंड आवडली होती, मात्र मध्यंतरानंतर चित्रपटाने वेगळा मार्ग पत्करल्याने मूळ आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहून तो टिपिकल हिंदी चित्रपट झाला होता.

दलितांवरील अत्याचाराला चित्रपटातून वाचा फोडण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आले आहे. बॉम्बे टॉकिजने १९३६ मध्ये ‘अछूत कन्या’ची निर्मिती केली होती. अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात देविका राणी यांनी दलित मुलीची भूमिका साकारली होती. दलितांना कसे अत्याचार सहन करावे लागतात ते यात दाखवण्यात आले होते. बिमल रॉय यांनीही ‘सुजाता’मध्ये दलित मुलीवर होणार्‍या अत्याचाराची कथा मांडली होती. यात नूतनने मुख्य भूमिका साकारली होती. सत्यजीत रे यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ‘सद्गती’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात ओम पुरी आणि स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिका होत्या. यातही दलित दाम्पत्याची होणारी परवड सत्यजित रे यांनी मांडली होती.

- Advertisement -

त्यानंतर असा विषय फक्त तोंडी लावण्यापुरता अनेक निर्मात्यांनी घेतला होता, परंतु त्यात प्रामाणिकपणा नव्हता. कौटुंबिक चित्रपट बनवण्यात बासू चटर्जी यांचा हातखंडा होता. त्यांनीही ‘चमेली की शादी’ या चित्रपटात विनोदाची पखरण करीत जातीपातीतील भेदभावाचा मुद्दा मांडला होता. अनिल कपूर, अमृता सिंह आणि अमजद खान अभिनित या चित्रपटात दोन जातींमधील तरुण-तरुणीची प्रेमकथा मांडण्यात आली होती. हसत खेळत बासू चटर्जी यांनी समाजातील या दोषावर बोट ठेवले होते. शाम बेनेगल यांनी अंकुर चित्रपटातही शबाना आझमी आणि अनंत नाग यांना दलित दाम्पत्याच्या भूमिकेत समोर आणले होते. या दोघांना समाजात कशा प्रकारे अन्याय सहन करावा लागतो आणि त्यावर ते कशी मात करतात ते बेनेगल यांनी टोकदारपणे मांडले होते. प्रिया तेंडुलकरचीही यात मुख्य भूमिका होती.

समाजात घडते त्याचे प्रतिबिंब चित्रपटात खरोखर उमटते का? याचा विचार केला तर चित्रपट हा समाजातील घडणार्‍या गोष्टींवरच अवलंबून असतो. भारतीय चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नेहमी समाजाचा आडोसा घेऊन ‘आम्ही जे दाखवतो (हिंसा, कामुकता, विकृती, विनोद) ते समाजात असते म्हणून’ असा दावा करीत असतात. सर्व हिंदी चित्रपट प्रेम, प्रेमविवाह याभोवती गुंफलेले असतात. प्रत्यक्षात भारतीय समाज प्रेम व प्रेमविवाह यांना किती किंमत देतो? म्हणजे चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन भारतीय युवक-युवती प्रेमविवाह करीत सुटतात असे मुळीच म्हणता येत नाही. थोडक्यात प्रेरणा चित्रपटाची असो की समाजाची माणूस एक रंजक, कल्पक, काल्पनिक कथानक बघत असतो. त्याच्या प्रभावाची कक्षा काही व्यक्तींपुरती मर्यादित असते. सबंध समाज बदलण्याची चित्रपटाची कुवत, ध्येय आणि शक्यता नसतेच.

रक्त, टिळा, कुंकू, नवस, वाण, चुडा, देवी, महिमा आदी विषयांभोवती फिरणारे कितीतरी मराठी चित्रपट आले. श्रद्धा, अंधश्रद्धा यात अत्यंत फिकट फरक असलेली कथानके पाहून त्यांना कोणी का आक्षेप घेतले नाहीत? कारण उघड आहे, चित्रपट अंधश्रद्धा बळकट करीत नाहीत. त्याची कारणे वेगळी असतात. ‘आरक्षण’ चित्रपट न पाहताच त्याला आक्षेप घेणार्‍यांच्या मनात चित्रपट या माध्यमाच्या खूप अवास्तव मोजपट्ट्या दिसतात. ‘अछूत कन्या’ फार जुना चित्रपट झाला. अलीकडे ‘चाची ४२०’ (दलित- सवर्ण प्रेमविवाह), प्रेमरोग (विधवा विवाह), गुलामी (अस्पृश्यता), हुतूतू (भ्रष्टाचारी राजकीय पिता), गुलाल (जातीय प्रदेश निर्मिती व विद्यार्थी राजकारण), क्या कहना (कुमारी माता), उड्डान (अत्याचारी बाप), आमीर (दहशतवाद), रोड टू संगम (हिंदू-मुस्लिम ताणतणाव) असे अनेक चित्रपट ज्वलंत विषयांवर येऊन गेले.

आपण फँड्री, बबन, कोर्ट, ख्वाडा, सैराट किंवा झुंड यांसारखे सिनेमे बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?… सगळं शांत! का बरं असं? का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठी इतकाच मर्यादित असतो. आम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं. त्यात एक डायलॉग होता-जात नाही ती जात! जात दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतूद करून या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करून दिल्या आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो! पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमूद करण्याची गरजच काय होती? याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. एकवेळ तुम्ही कष्ट करून पैसा मिळवू शकता, श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरिबी दूर करू शकता, पण जात? अहं-कितीही प्रयत्न करा, ती तुम्हाला कधीच बदलता येत नाही! आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती. त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे.

ऑफिसात काम करत असताना ते एका चपराशाला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो. यावेळी आंबेडकरांचं पद-त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किमतीचं नसतं. तसं तो स्पष्टपणे बोलूनही दाखवतो. असा एकच नाही तर अनेक प्रसंग आंबेडकरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मूळ धरत गेली, पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं, असा प्रश्न पडतो. कारण त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तीच आहे, पूर्वी होती तशीच! बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत! त्यांचा धर्म बदल झाला, जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहिली. अनेक चित्रपट जातधर्मावर आधारित होते, परंतु त्यांना विशेष यश मिळाले नाही. वर उल्लेखित हे चित्रपट मात्र एकदा अवश्य पाहावेत असेच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -