घरसंपादकीयओपेडवर्षपूर्तीनंतरही रशिया-युक्रेन युद्धाची धग कायम

वर्षपूर्तीनंतरही रशिया-युक्रेन युद्धाची धग कायम

Subscribe

रशियासारखा बलाढ्य देश अवघ्या काही दिवसांतच युक्रेनसारख्या छोट्या देशाला नमवून त्याला आपल्या ताब्यात घेईल, असाच अनेकांचा अंदाज होता, परंतु युक्रेनने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर रशियाविरुद्ध संघर्ष करीत तो खोटा ठरवला. रशियाने सुरुवातीला युक्रेनमधील प्रमुख शहरांवर ताबा मिळविला, तरी युक्रेनच्या सैन्याने बर्‍याच भागातून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. रशियालाही आतापर्यंत युक्रेनवर आपले पूर्ण वर्चस्व निर्माण करता आले नाही. या संघर्षाच्या वर्षपूर्तीनंतरही युद्धाची धग मात्र कायम आहे.

४८ हजारांहून अधिक सैन्यांचा मृत्यू, १२ हजारांपेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा बळी, १६ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी, २ कोटींहून अधिक नागरिकांचे स्थलांतर आणि जवळपास ७५ लाख कोटींहून अधिकची वित्तहानी असे विध्वंसाचे भयानक चित्र जगाला दाखवणारे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या दोन्ही देशांमध्ये २४ फेब्रुवारी २०२२ पासून लष्करी युद्ध सुरू झाले. युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये सुरू झालेला विध्वंस किमान आता वर्षभराच्या अवधीनंतर तरी थांबावा, अशी इच्छा संपूर्ण जगाची आहे, परंतु असे असले तरी सध्याचे चित्र पाहता युद्धविराम लवकर होण्याची चिन्हे आताच्या घडीला तरी दिसत नाहीत. त्यामुळे केवळ रशिया आणि युक्रेनच नव्हे तर संपूर्ण जगभरावर चिंतेचे ढग कायम आहेत. हे युद्ध केव्हा थांबेल, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच असला तरी नव्या वर्षात हे युद्ध कसे थांबवता येईल यासाठी आता नव्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्ध थांबविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत, परंतु ते अयशस्वी ठरल्यानेच अनेकदा युद्धविराम झाल्यानंतरही युद्ध पुन्हा पुन्हा भडकण्याचे सत्र सुरूच आहे. रशियन आणि युक्रेनियन सैन्याच्या अधिकार्‍यांनी आतापर्यंत डझनभर बैठका घेतल्या आहेत. बेलारूसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकार्‍यांनी आपापल्या अटी आणि शर्थींसह चर्चा केली. अनेकदा त्या बैठका सकारात्मक ठरल्याचेही वृत्त होते. किमान आठवडाभरानंतर अथवा महिनाभरानंतर अथवा सहा, आठ महिन्यांनी तरी हे युद्ध थांबेल अशी चिन्हे वर्तविण्यात येत होती, परंतु अनेकदा कायमस्वरूपी युद्धविरामाऐवजी मर्यादित कालावधीसाठीच युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. यामुळेच की काय हे युद्ध संपण्याऐवजी अद्यापही सुरू आहे, अशी शंका उत्पन होत आहे.

- Advertisement -

कायमस्वरूपी युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी आधीपासूनच भर दिला असता तर आज कदाचित चित्र वेगळे असते, अशी खंत युक्रेनमधील काही वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांनी व्यक्त केल्याचे वृत्त अनेकदा काही परदेशी माध्यमांनी प्रसारित केले होते. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकार्‍यांनी कायमस्वरूपी युद्धविरामाऐवजी मर्यादित कालावधीसाठी युद्धविराम करण्यावर भर देत अनेकांमध्ये नाराजी उत्पन्न होण्यासाठी वाट मोकळी करून दिली, असे दाखलेही या वृत्तासोबत देण्यात येऊ लागले, परंतु यासाठी लष्करी अधिकार्‍यांना पूर्णपणे चुकीचे ठरवता येणार नाही. कारण युद्ध सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या प्रमुखांनी हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, अशी भावना काही युक्रेनमधील वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची होती, परंतु असे काही झाले नाही.

युद्ध थांबविण्याच्या चर्चेऐवजी दोन्ही देशांकडून एकमेकांना केवळ इशारा देण्याचे सत्र सुरू राहिले. यातूनच ठिणगी पडली आणि युद्धाला सुरुवात झाली. युद्ध सुरू झाल्यानंतरही ते थांबलेच नाही असा काही भाग नाही. दोन्ही देशांमध्ये झालेल्या सकारात्मक लष्करी चर्चेदरम्यानच्या युद्धविरामांवेळी युद्ध कदाचित कायमस्वरूपी थांबवताही आले असते. युद्धविरामादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भावनाही ठेवली. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामादरम्यान आपल्या देशांमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना जाऊ देण्यास मदत करणे, बंदी बनविण्यात आलेल्या सैनिकांना परत करणे आदी प्रकारचे सहकार्य करण्यात आले.

- Advertisement -

या काळातच आपल्यातील वाद सोडवून कायमस्वरूपी युद्धविराम करण्यावर भर देणे दोन्ही देशांकडून अपेक्षित होते, परंतु तसे झालेच नाही. कायमस्वरूपी युद्धविरामाऐवजी आपल्या सोयीस्कर मागण्यांनुसारच मर्यादित कालावधीसाठी युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. दोन्ही देशांकडून कायमस्वरूपी युद्धविराम या मुद्यावर भरच देण्यात आला नाही. कदाचित युद्ध सुरू ठेवण्याची मनाची तयारी या दोन्ही देशांकडून आधीपासूनच करण्यात आली होती की काय यामुळेच केवळ मर्यादित कालावधीसाठी युद्धविराम या मुद्यावरच चर्चेचे गुर्‍हाळ कायम सुरू राहिले आणि युद्ध काही काळानंतर पुन्हा सुरू झाले. गरज सरो आणि वैद्य मरो, या म्हणीनुसार मर्यादित कालावधीसाठीचा युद्धविराम संपताच दोन्ही देशांमध्ये युद्ध आणखी जोमाने सुरू झाले.

या युद्धाचा आतापर्यंत युक्रेनला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. तब्बल ५० लाख कोटींहून अधिकचे नुकसान या युद्धात युक्रेनचे झाले असून यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी युक्रेनला मोठा संघर्ष करावा लागणार याबाबत दुमत नाही. नुकसान केवळ युक्रेनचेच झाले आहे असे नाही. रशियाचेही या युद्धात फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून २५ लाख कोटींची वित्तहानी झाल्याची आकडेवारी आहे. याशिवाय दोन्ही देशांचे सैन्य आणि हजारो नागरिकांचा बळी आदींचा विचार करता हा विध्वंस थांबलाच पाहिजे. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांकडून यासाठी झालेले प्रयत्न पाहता हे युद्ध अल्पावधीत थांबेल असे वाटत नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही दोघांपैकी कोणीही देश माघार घेण्यास तयार नाही.

रशियासारखा बलाढ्य देश अवघ्या काही दिवसांतच युक्रेनसारख्या छोट्या देशाला नमवून त्याला आपल्या ताब्यात घेईल, असाच अनेकांचा अंदाज होता, पण तसे झाले नाही. रशियाने सुरुवातीला आक्रमण करत युक्रेनमधील काही प्रमुख शहरांवर ताबा मिळविला असला तरी काही शहरांमधून रशियाच्या सैन्याला पुन्हा माघार घेण्यास युक्रेनच्या सैन्याने भाग पाडले. रशियाही आतापर्यंत पूर्णपणे युक्रेनवर आपले वर्चस्व निर्माण करू शकलेला नाही, तर दुसरीकडे आपल्या हद्दीतून युक्रेनही रशियाच्या सैन्याला पूर्णपणे माघारी धाडण्यात यशस्वी ठरला नाही. दोन्हीकडून संघर्ष अद्यापही सुरूच असून वर्षपूर्तीनंतरही युद्धाची धग मात्र कायम आहे.

बलाढ्य मानल्या जाणार्‍या रशियाला वर्ष होत आले तरी युक्रेनवर पूर्णपणे विजय मिळवता आलेला नाही. रशियाने ठरवले तर एका रात्रीत तो युक्रेन गिळंकृत करेल, असा दावा अनेकांकडून करण्यात येत होता. प्रत्यक्षात युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनने कडवा संघर्ष केला आणि कदाचित त्याचेच फलित की काय आज वर्षभरानंतरही युक्रेन या युद्धात तग धरून आहे. एकट्या युक्रेनला हे कदापि शक्य झाले नसते, परंतु अनेक पाश्चिमात्य देशांनी मदत केल्यानेच युक्रेन या युद्धात रशियाविरूद्ध चिवटपणे प्रतिकार करत आहे. अमेरिकेसह विविध पाश्चिमात्य देशांनी आतापर्यंत युक्रेनला तब्बल ३० अब्ज डॉलरहून अधिकची मदत केली आहे. याच पाठिंब्याच्या जोरावर रशियाला प्रत्युत्तर देणे युक्रेनला शक्य होत आहे. त्यामुळेच या युद्धातून माघार घेणार नाही यावर युक्रेन ठाम आहे. पाश्चिमात्य देशांकडून मदत मिळते तोवर ठीक, परंतु त्यानंतर काय, याचाही विचार युक्रेनने करणे गरजेचे आहे.

युक्रेनमधील आपल्या विचारांच्या समर्थक बंडखोरांनी दावा केलेल्या शहरांव्यतिरिक्त पुढे चाल करून जाणे हे रशियाच्या लष्कराने युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काही काळानंतर थांबवले. आम्हाला संपूर्ण युक्रेनवर कब्जा करायचा नसून जेथपर्यंत आमच्या समर्थकांचे वर्चस्व आहे त्याच भूभागावर आपली सत्ता स्थापन करण्याचा रशियाचा अट्टाहास आहे, परंतु ती शहरे आता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी युक्रेनच्या लष्करानेही प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच संघर्ष होत असून हे युद्ध आता संपणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. युक्रेनने निशस्त्रीकरण करावे तसेच अमेरिकेच्या नाटो सैन्याचा सदस्य होण्यात सहभागी होऊ नये आणि क्रिमिया आमचा भाग मानावा, या मागण्या रशियाच्या आहेत, तर रशियाचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण चुकीचे असून या अत्याचाराला कदापि बळी न पडण्याचा पवित्रा युक्रेनने घेतला आहे. युक्रेन रशियाच्या मागण्या मान्य करण्यास कदापि तयार नाही.

आपली राष्ट्रीयता टिकवण्यासाठी लढत असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे, परंतु युद्धसंघर्षाऐवजी सामंजस्याने चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यावर भर देण्याकडे युक्रेनने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. युद्ध सुरू असले तरी संवाद घडवून ते थांबवण्यासाठीचे प्रयत्न होणे आता गरजेचे आहे. या युद्धाचे परिणाम या दोन्ही देशांसोबतच जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत महागाईची भर पडत असून आर्थिक मंदीला यामुळे निमंत्रण मिळत आहे. अशात हे युद्ध आणखी सहा महिने चालल्यास दोन्ही अर्थव्यवस्था कोसळून पडतील, ज्याचा फटका संपूर्ण जगाला बसेल. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबविण्यासाठी आता संपूर्ण जगाने प्रयत्न करायला हवेत. दोन्ही देशांपैकी कोण्या एका देशाच्या पाठीमागे उभे न राहता होणारा नरसंहार आणि वित्तहानी थांबविण्यासाठी जगातील सर्वांनी जोरदार प्रयत्न करायला हवेत.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -