घरसंपादकीयओपेडफुटीच्या अंध:कारात शिवसेनेकडून वंचितच्या प्रकाशाचा शोध!

फुटीच्या अंध:कारात शिवसेनेकडून वंचितच्या प्रकाशाचा शोध!

Subscribe

राज्यात गेल्या दशकभरात राजकीय उलथापालथ खूप झाली. ‘न भूतो न भविष्यती’ अशी राजकीय समीकरणे जुळली. अर्थातच त्यामागे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे भाजपाच होता, हे स्पष्टच आहे. आताही शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडसारख्या काही संघटनांनी पुढे येऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता चर्चा सुरू आहे ती, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याची. ही आघाडी राजकीय गणिते बदलू शकेल का? कारण शिंदे गट फुटल्यामुळे पुढील निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेला आता नव्या मित्रांची तीव्रतेने गरज भासत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना आपण दोघे नातू म्हणून भावनिक साद घातली आहे.

राज्यात गेल्या दशकभरात राजकीय उलथापालथ खूप झाली. ‘न भूतो न भविष्यती’ अशी राजकीय समीकरणे जुळली. अर्थातच त्यामागे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे भाजपाच होता, हे स्पष्टच आहे. आताही शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडसारख्या काही संघटनांनी पुढे येऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता चर्चा सुरू आहे ती, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याची. ही आघाडी राजकीय गणिते बदलू शकेल का? कारण शिंदे गट फुटल्यामुळे पुढील निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेला आता नव्या मित्रांची तीव्रतेने गरज भासत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना आपण दोघे नातू म्हणून भावनिक साद घातली आहे.

2014 मध्ये मोदी लाटेत अनेक दिग्गजांचा सुपडा साफ झाला. राज्यासह देशातही भाजपाचा बोलबाला राहिला. विधानसभेच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपाची 25 वर्षांची युती तुटली. सत्तास्थापनेसाठी भाजपाला 23 जागा कमी पडल्या, शिवसेनेने ताणून धरल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याची तयारी दर्शविली. मोदी लाट, युती तुटणे आणि राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका नाट्यमय होती. राज्य विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकत्र येत औटघटकेचे सरकार स्थापन केले, तर दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. यातसुद्धा एक दखल घेण्यासारखे एक नवे राजकीय समीकरण बनले होते. ते म्हणजे, वंचित बहुजन आघाडी. भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबे़डकर यांनी ही आघाडी स्थापन केली आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी या आघाडीसमवेत युती केली. 2019च्या वेळी देखील या तिन्ही घटना तर्काच्या पलीकडील होत्या.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव कितपत राहील, याबाबत काही जणांच्या मनात साशंकता होती, पण 2019 च्या लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात या आघाडीचा प्रभाव जाणवला. या वंचित बहुजन आघाडीचा फटका सर्वाधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे बड्या नेत्यांना वंचित आघाडीमुळे विजयापासून वंचित राहावे लागले. या निवडणुकीत या आघाडीला 14 टक्के मते मिळाली. त्यात आघाडीचे सुमारे असे 15 उमेदवार होते, त्यांच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. या 15 उमेदवारांना 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळाली. सांगलीत भाजपाचे संजयकाका पाटील विजयी झाले. त्यांना 5 लाख 8 हजार 995 मते मिळाली. दुसर्या स्थानी स्वाभिमानी आणि काँग्रेसचे विशाल प्रकाशबापू पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 आणि तिसर्या स्थानी वंचित आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मते मिळाली, तर सोलापुरात 5 लाख 24 हजार 985 मते मिळवून भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य विजयी झाले, तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार 377 आणि वंचित आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार 7 मते मिळाली. नांदेडला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निसटता पराभव झाला. भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर 4 लाख 86 हजार 806 मते मिळवून विजयी झाले, तर अशोक चव्हाण (काँग्रेस) यांना 4 लाख 46 हजार 658 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 मते मिळाली.

विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती झाली. वंचित बहुजन आघाडीमुळे 288पैकी 32 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गमवाव्या लागल्या. या 32 जागांवरील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 5 हजार ते 10 हजार मतांनी पराभूत झाले, तर वंचितच्या उमेदवारांना 10 हजारांहून अधिक मते मिळाली होती. वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, डॉ. कल्याण काळे, ज्योती कलानी, राजीव देशमुख, विजय भांबळे यांना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसला. त्यातच शिवसेनेत मोठी फूट पडून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिंदे गटाच्या पाठीशी भाजपा आहे. हीसुद्धा अलीकडची नाट्यमय घटना. शिवसेनेतील या बंडामुळे राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने बदलण्यास सुरुवात झाली आहे. काही संघटनांनी, विशेषत: भाजपाच्या विरोधातील संघटनांनी शिवसेनेच्या उद्धव गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांचा समावेश होता. अलीकडेच प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण समारंभात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठीवर आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना साद घालत, ‘शिवशक्ती’ आणि ‘भीमशक्ती’ एकत्र येण्याचे संकेत दिले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेबरोबरच आगामी इतर निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेला अशा पाठबळाची गरज आहे. म्हणूनच त्यांनी त्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना साद घातली. प्रकाशजी, आता आपण एकत्र आलो आहोत, आतापर्यंत बाबासाहेब आणि बाळासाहेब यांच्या फोटोंना अभिवादन करायचो. आता दोन नातू एकत्र आले आहेत. कुटुंब एकत्र आले आहे. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीदेखील युतीचा प्रस्ताव दिल्यास आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत, असे म्हटले आहे.

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्याबाबत आम्ही यापूर्वीदेखील अनेकदा प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर. आर. पाटील यांनी याविषयी आंबेडकरांशी चर्चाही केली होती. आताही आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तथापि, या दोन्ही आघाड्यांचे समीकरण जुळून येणे, वाटते तितके सोपे नाही. मुळात वंचित बहुजन आघाडीपासून एमआयएमने फारकत घेतली आहे. वंचित आघाडीबरोबरची युती एमआयएमने तोडली आहे. एमआयएमचा प्रभाव संपूर्ण राज्यभरात नसला तरी, काही मतदारसंघांमध्ये आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन विकास आघाडीच्या नावे नोंदवला गेलेला हा एकमेव विजय ठरला. त्यामुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची आता कामगिरी होईल का? दुसरी गोष्ट म्हणजे, प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. त्यांचे अजिबात पटत नाही. वेळप्रसंगी प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधायची असल्यास राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकर यांच्याशी वाटाघाटी करताना नमते घ्यावे लागणार आहे, पण 2014 ला भाजपाला पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका आणि 2019चा बहुचर्चित शपथविधी लक्षात घेता, हे कितपत शक्य आहे, हा एक प्रश्न आहे.

काँग्रेसची कथाही वेगळी नाही. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला कायम भाजपाची ‘बी’ टीम म्हणून हिणवले आहे. विशेषत: 2019 च्या निवडणुकांनंतर ही टीका तीव्र झाली होती. आताही प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरही टीका केली आहे. ही यात्रा म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. यातून विधायक काम होत असल्याचे दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहेत. ते भाजपाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी कितपत जुळवून घेईल, हा प्रश्नच आहे. त्यातही हा निर्णय होणार दिल्लीत. त्यामुळे तीही एक अडचण आहेच.

भाजपाविरोधात सर्वांनीच कंबर कसली आणि आपापसातले वैचारिक, सैद्धांतिक (?) मतभेद बाजूला ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले तर, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होऊ शकते. कारण शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे आणि त्यासाठी वंचित आघाडीसह बाकीचे घटक पक्ष शिवसेनेला पूर्ण पाठिंबा देऊ शकतील. भाजपानेदेखील गेली सुमारे 25 वर्षे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला खाली खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाला 150 जागांचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार यात शंकाच नाही, पण नंतरच्या निवडणुकांबाबत काय? लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक (मध्यावधी सुद्धा) असो, चर्चेचे घोडे अडू शकते ते जागावाटपावरून! कारण महाविकास आघाडी निवडणूक निकालानंतर अस्तित्वात आली. त्यामुळे हे तीन पक्ष एकमेकांसाठी किती जागा सोडतील, हा प्रश्न आहेच. त्यात मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर वंचित आघाडीदेखील फार तडजोड करेल, ही शक्यता कमीच आहे. प्रत्येकाची मनीषा ही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करण्याची आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांची बेरीज झाली तरी, ती राजकीय गणित बदलू शकेल का? हे येणारा काळच सांगू शकेल. तूर्तास, सगळा खेळशक्यतांचाचआहे

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -