Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड पराकोटीच्या अट्टाहासाची घातक परिणती!

पराकोटीच्या अट्टाहासाची घातक परिणती!

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देत असतात, पण त्यांनी स्वत: ते लक्षात घेतले असते तर त्यांच्यावर आज जी अवघड वेळ आली आहे ती आली नसती. मिर्झाराजे जयसिंग याच्यासमोर स्वराज्य गमावण्यापेक्षा शिवरायांनी त्याच्याशी तह करून सबुरीने घेतले आणि राज्य वाचवले. आज भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रभावी नेता आहे हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी नमते घेऊन परिस्थिती बदलण्याची वाट पाहायला हवी होती, पण त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पराकोटीचा अट्टाहास केला. त्याचीच आज घातक परिणती झालेली आहे.

सर्वसामान्य मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची अवस्था सध्या अतिशय केविलवाणी झालेली आहे. शिवसेनेतून यापूर्वीही असंतुष्ट नेते बाहेर पडले होते, पण त्यावेळी शिवसेनेचे असे नुकसान झाले नव्हते, मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले त्याचे स्वरूपच वेगळे असल्यामुळे ज्यांच्या ताब्यात शिवसेना होती, त्या उद्धव ठाकरे यांचे काही चालेनासे झाले आहे. कारण यापूर्वीचे नेते शिवसेना सोडून बाहेर गेले. त्यांनी स्वत:ची वेगळी संघटना किंवा पक्ष स्थापन केला. नाहीतर ते अन्य पक्षात सहभागी झाले, पण एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा करून शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतली.

अर्थात शिंदे यांनी हे सगळे धाडस केले आणि त्यांना त्यात जे यश आले त्यामागे महाशक्ती आहे हे उघड गुपित आहे. कारण शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये होते, त्यावेळी त्यांनी आपल्या मागे महाशक्ती आहे. त्यामुळे आम्हाला कुठली चिंता नाही, असे स्पष्ट केले होते. तोपर्यंत शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगून मी नाही त्यातली, म्हणणारे भाजपचे नेते यामागे आहेत हे स्पष्ट झाले. त्यामुळे शिंदेंच्या असंतोषाला वाट करून देऊन त्यांना बाहेर काढून गुवाहाटीपर्यंत घेऊन जाणे, त्यांनी पुढे काय करावे याची व्यूहरचना आखणे यामागे भाजपचा हात आणि डोके होते असे उघड होत गेले.

- Advertisement -

यातून भाजपने शिंदे यांच्या मदतीने राज्यात आपले सरकार स्थापन केले असले तरी ते किती खोटारडे आहेत हेही त्यांनी दाखवून दिले. इतकेच नव्हे तर विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून पहिले भाषण करताना शिंदे यांनी या सत्तांतरामागील सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे सांगितल्यावर फडणवीस खुदूखुदू हसत होते. त्याही पलीकडे म्हणजे त्यांनी तुमच्या नाकाखालून तुमचे सरकार घेऊन गेलो, असे उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे सुरुवातीला शिंदेंचे बंड म्हणजे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणणारे फडणवीस यांनी असे म्हणणे म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस होता. हे सारासार विचार करणार्‍या नागरिकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे भाजपने शिंदे यांच्या मदतीने आपले सरकार स्थापन करण्यात यश मिळवले, पण लोकांच्या मनातून मात्र ते उतरले आहेत, हे अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीतून त्यांना जी ऐनवेळी माघार घ्यावी लागली त्यातून दिसून आले.

खरी शिवसेना कुणाची याविषयीचा वाद आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिले. त्यामुळे आता शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना आली आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जे नेते आहेत, त्यांना ठाकरे गट असे संबोधावे लागत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पाहिले तर असे दिसून येईल की शिवसेनेची वाटचाल ही ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करता येणे अवघड आहे. कारण शिवसेनेला मानणार्‍या लोकांच्या मनावर तसाच पगडा आहे.

- Advertisement -

त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या ताब्यात दिलेली शिवसेना आणि शिवधनुष्य त्यांना किती काळ पेलवेल हे पाहावे लागेल. सध्या ठाकरेंना निष्प्रभ करण्यासाठी शिंदे यांना भाजपकडून सर्व प्रकारची मदत मिळत आहे. ती पुढे किती काळ चालू राहील, हाही एक प्रश्न आहे. कारण भाजपचे अमित शहा यांच्यासारखे केंद्रीय नेते राज्यातील सर्व पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपचे आवाहन करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तर प्रादेशिक पक्ष नकोच, असे सांगत आहेत, तर अशा स्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे काय भवितव्य असेल याची कल्पना केलेली बरी. कारण भाजपवाले आज जरी एकनाथ शिंदे यांना खांद्यावर घेऊन फिरत असले तरी ते दीर्घकाळ शिंदेंच्या पालखीचे भोई होऊन राहतील असे वाटत नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हातातोंडाशी आलेली राज्यातील सत्ता गेली. त्याला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी केलेली हातमिळवणी कारणीभूत होती हे खरे आहे. त्याचाच राग भाजपवाल्यांच्या मनात होता. तो त्यांनी शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांच्यावर काढला. भाजपने हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा वापर करून उद्धव ठाकरे यांना आज हतबल करून टाकले आहे. एखाद्या पक्षातील साधारण तिसर्‍या फळीतील नेता सगळा पक्ष हायजॅक करतो आणि मुख्य नेता हतबल होऊन पाहत राहतो. त्याला काहीच करता येत नाही. त्यातही आक्रमक असलेल्या शिवसेनेवर ज्या ठाकरे घराण्याची पकड होती, त्या ठाकरेंना आपल्या डोळ्यांदेखत आपली संघटना, आपले लोक, आपले चिन्ह हिरावले जात आहे हे अतियश हतबलतेने पाहावे लागत आहे.

ही उद्धव ठाकरे यांच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. भाजपने डाव साधला हे खरे असले तरी उद्धव ठाकरे यांचे काय चुकले हेही लक्षात घ्यावे लागेल. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून जो मान बाळासाहेबांना मिळत होता, केंद्रीय नेते मातोश्रीवर हजेरी लावत होते, तशी अपेक्षा आपल्याला करून चालणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. त्यामुळे जसा काळ बदलला तशी त्यांनी आपल्यामध्ये लवचिकता आणणे अपेक्षित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत राज्यात शिवसेना हा युतीतील मोठा भाऊ होता आणि भाजप हा छोटा भाऊ होता, पण बाळासाहेब यांचे देहावसान झाल्यानंतर आणि नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर आल्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी केंद्रात प्रथमच भाजपला बहुमत मिळवून देऊन एनडीएतील घटक पक्षांचे महत्त्व संपुष्टात आणले होते. या घटक पक्षांमध्ये शिवसेनाही होती. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या भक्कम पक्षांची अवस्था मोदींनी दयनीय करून टाकली होती. आता बाळासाहेब हयात नाहीत, मोदींच्या लाटेचा मोठा जोर आहे हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी आता आपण छोट्या भावाच्या भूमिकेत आहोत हे मान्य करायला हवे होते. भाजप आणि शिवसेना यांची गेल्या ३० वर्षांची युती असली तरी भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे तो आपला विस्तार करणार हे निश्चित होते.

कारण ते बाळासाहेब असतानाही अधूनमधून शतप्रतिशत भाजपचा नारा देत होते. भाजपकडे मोदींसारखा प्रभावी नेता आल्यानंतर त्यांनी राज्यातीलही आपली भूमिका बदलली. आता काळ बदलला आहे. त्यामुळे आपण शिवसेनेसमोर नमून वागायचे नाही. आता आपलाच मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी ठाम भूमिका घेऊन त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तोडली, पण त्यांना काही जागा कमी पडत असल्यामुळे शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागल्या. या निवडणुकीच्या प्रचारात मोदी-शहांना मुस्लीम शासकांच्या उपमा देणारे उद्धव ठाकरे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. पुढील पाच वर्षे कायम भाजपविरोधी भूमिका घेऊन सत्तेत राहिले. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती केली. त्यांचे म्हणणे होते की, अमित शहा यांनी बंद दाराआड आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, पण ते पाळायला ते तयार नाहीत.

आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे वचन दिले होते. ते आपल्याला पूर्ण करायचे आहे, असे उद्धव ठाकरे सांगत होते, पण आता भाजपची चलती आहे. तेव्हा आपण नमते घ्यायला हवे हे त्यांनी लक्षात घेतले नाही. उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या भाषणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देतात. शिवाजी महाराज हे अतिशय स्वाभिमानी होते, पण जेव्हा मिर्झाराजे जयसिंग याच्यासारखा औरंगजेबाचा बलाढ्य सरदार चालून आला तेव्हा त्याच्याशी तह करून राज्य वाचवणे महत्त्वाचे होते, हे त्यांनी लक्षात घेतले. त्याच्याशी लढून हाराकिरी करण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण राज्य नष्ट झाले असते. त्या तहात महाराजांना अनेक किल्ले आणि हक्क गमवावे लागले होते, पण महाराज त्यावेळी शांत राहिले. परिस्थिती बदलण्याची वाट पाहिली. जेव्हा परिस्थिती बदलली तेव्हा सगळे किल्ले पुन्हा मिळवले आणि आपला अंमल स्थापित केला.

भाजप आणि शिवसेनेने जरी युती केली होती तरी आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत याची दोन्ही पक्षांना कल्पना होती. भाजपकडे मोदी यांच्यासारखा करिश्मा असलेला नेता असल्यामुळे आपण त्यांच्याची संघर्षाची भूूमिका न घेता दमाने घ्यायला हवे. तसे न केल्यास आपले नुकसान होईल. कारण नेता आणि परिस्थिती बदलत असते. आज भाजपचे सगळे सामर्थ्य नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे, पण मोदी हे काही अमरपट्टा बांधून आलेले नाहीत. त्याचबरोबर राज्यात सत्ता आणण्याची ताकद भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे काही काळ भाजपसोबत तह करून मिळेल त्यात समाधान मानायला हवे होते. पुढे काळ बदलल्यावर आपला अंमल पुन्हा स्थापित करायला हवा होता.

काळ अवघड आल्यावर छत्रपती शिवरायांनाही तह करावा लागला होता हे लक्षात न घेता उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संबंध तोडून जे त्यांचे वैचारिक विरोधक होते, त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि तिथेच घात झाला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, पण शिवसेनेतील खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसैनिकांची प्रचंड कोंडी झाली. आज जे शिवसेनेतील मोठ्या प्रमाणात लोक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले आहेत, त्यांना उद्धव ठाकरे नकोत असे नाही, पण त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे झालेली कोंडी या मोठ्या फुटीला कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे यांनी पराकोटीचा अट्टाहास न करता सबुरीने घेतले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -