उद्धवजी खोके, बोके म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

मुख्यमंत्री म्हणून कामांचा व्याप भरपूर असतो. पण आमदारांकडे दुर्लक्षित करण्याची ठाकरे यांची १०० टक्के चूक होती. कामे झाली नाही तरी मुख्यमंत्री भेटले वा अधिकार्‍यांना तेवढा संदेश गेला तरी आमदारांसाठी ते पुरेसे असते. शिवसेनेच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांचाच आधार होता. त्यातूनच हे आमदार शिंदे यांच्याजवळ अधिक गेले. उद्धव ठाकरे यांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसती. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात जे गेले ते पैशाने विकत घेतलेत किंवा बाकीच्यांना ईडी, सीबीआय आणि आयटीची भीती घातली याचा बागुलबुवा करण्यापेक्षा आपले काय चुकले, याचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावा लागेल.

देशातील कुठल्याही निवडणुका या केवळ पैशाने नाही तर लोकांमुळे जिंकता येतात. लोक भरभरून मतदान करतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात. सध्या वेबसीरीजचा जमाना आहे. १९७५ च्या आणीबाणीनंतर देशातील राजकारण बदलले आणि यानंतर ज्या राजकारण्यांनी मतदारांना भुरळ घातली त्यांच्या राजकीय जीवनावर आधारित काही वेबसीरीज सध्या सर्वत्र पाहिल्या जातात. त्यापैकी सर्वात महत्वाच्या व्यक्तीरेखा म्हणजे इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, जयललिता आणि नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित एका वेबसीरीजमध्ये नरेंद्र मोदींच्या तोंडी असलेला डायलॉग सध्या महाराष्ट्रात तंतोतंत लागू पडतो, तो म्हणजे इलेक्शन पैसो से नही तो लोगोंसे जिते जाते है… याचाच अर्थ निवडणुका पैशाने नाही तर लोकांमुळे जिंकता येतात.

सध्या सतयुग नसून कलियुग सुरू आहे. त्यापेक्षा कपटयुग, हिसाब करण्याचे युग, अपमान झाल्यास त्याचा सव्याज परतफेड करण्याचा काळ आहे. त्यामुळे सारं काही पैशाने विकत घेता येते किंवा धाकधपटशाहीने सार्‍याच माणसांना आपलेसे करता येते असे नाही. काही माणसे ही नात्यात, कुटुंबात, कंपनीत, पक्षात अथवा एखाद्या विचारसरणीत दुर्लक्षित, महत्व कमी झाल्यास, घुसमट झाल्यास किंवा अन्याय झाल्यास वेगळा मार्ग पत्करतात. काही जण सारं काही सोडून लांब दूरवर कुठे निघून जातात, तर काहीजण आहे त्याच ठिकाणी रडत कढत आयुष्य काढतात, तर काही जण संधीच्या शोधात असतात. संधी मिळाल्यास मग ती शत्रूकडेही का असेना अथवा आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे का असेना त्या गटात, कुटुंबात, कंपनीत सहभागी होतात. त्यामुळे तुमच्याकडून एखादा नेता, कर्मचारी किंवा अधिकारी जेव्हा दुसर्‍याकडे जातो तेव्हा केवळ पैसा हाच विषय नसतो. अपमान, घुसमट, अनुल्लेख, महत्व न देणे आणि अन्याय करणे यासारख्या गोष्टीही सत्तांतर करण्यास, पक्ष बदलण्यास महत्वाची भूमिका बजावतात.

२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्याला आज १०० दिवस पूर्ण झालेत. शिवसेनेतील ४० आमदार, १२ खासदार, शेकडो नगरसेवक, डझनवार जिल्हाप्रुमख, काही नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, माजी महापौर, शाखाप्रुमख, पदाधिकारी आणि हजारोंनी शिवसैनिक राज्यभरातून एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. ‘मातोश्री’चा हात सोडून शिंदेंचा हात धरण्यात या सगळ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय जादू केली असेल, असा विचार केल्यास पटकन लक्षात येते ते म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे सर्वांना वेळ देतात.

सकाळपासून दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत हजारो लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणणे, आपुलकीने चौकशी करणे, खांद्यावर हात ठेवणे ते सेल्फी काढायला वेळ देतात. प्रत्येकाच्या सुख-दु:खात समरस होतात. जे मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी ९०० दिवसांत केले नाही ते शिंदे यांनी केवळ १०० दिवसांत करून दाखवल्याने आता ‘मातोश्री’वरील शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारीही शिंदेंकडे आकर्षित होत आहेत. त्यात चंपासिंह थापा आणि मोरेश्वर राजे यांचा समावेश असल्याने सर्वसामान्य शिवसैनिकही गोंधळात पडला आहे. गद्दार, ५० खोके, ओके सरकार, बाप पळवणारी टोळी असे टोमणे वारंवार मारल्यानंतरही शिंदे यांच्याकडे जाणार्‍यांचा ओघ कमी होताना काही दिसत नाही.

हीच मुख्यमंत्री शिंदे यांची जमेची बाजू ठरू शकते. शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिले जातं. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीनंतर २० जूनच्या रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले आणि गुजरात, गुवाहाटी, गोवा करीत आपल्यासोबत ४० शिवसेनेचे आणि १० सहयोगी आमदार ठेवले आहेत. शिवसेनेत मुख्यमंत्र्यांनंतर क्रमांक दोनचे मंत्री, महत्वाचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारले तो शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. आज १०० दिवस होत आले तरी शिवसेना त्यातून काही सावरलेली नाही. आज केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेची अधिकृत निशाणी धनुष्यबाण कुणाकडे जाईल याबाबत सुनावणी सुरू आहे, तर खरी शिवसेना कुणाची याबाबतही सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी घेत आहे.

शिवसेनेत बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक दिग्गजांनी शिवसेना सोडली आहे. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आमदारही फोडले होते. छगन भुजबळ हे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले पहिले नेते आहेत. १९९१ मध्ये आठ आमदारांना सोबत घेऊन छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते. १९९१ ला बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत छगन भुजबळ यांचे मतभेद झाले आहेत. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. सुरुवातीला ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. ज्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर टीका झाली. नारायण राणे हे शिवसेनेतले दुसरे दिग्गज नेते आहेत ज्यांनी शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच जय महाराष्ट्र केला होता.

उद्धव ठाकरे तसंच त्यांच्या काही सहकारी लोकांना विरोध करत नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला धोक्यात असल्याची चर्चा झाली. तसंच नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आजही कायम आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे सोडत नाहीत. भुजबळ, राणेंनंतर शिवसेना सोडणारे तिसरे दिग्गज नेते राज ठाकरे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. मात्र पक्षात सातत्याने डावललं जात असल्याने नाराज होऊन २००५ मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजुबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचा संस्कार आमच्यावर झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सामील होण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपसोबत आम्ही जाऊ अशी भूमिका घेतली. त्यानंतर ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथही एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर शिंदे गटाकडून आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. भारतीय जनता पक्ष अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. आमचीच खरी शिवसेना असल्याने धनुष्यबाण चिन्ह मिळावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाची आणि ठाकरे गटाची सुनावणी सुरू आहे.

उद्धव ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेते तोंडाने जरी हिंदुत्ववादाचा उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात ते हिंदुत्वविरोधात कृती करत आहेत, असे शिंदे वारंवार आपल्या भाषणात उल्लेख करतात. तर शिंदे हे केवळ प्यादे असून यांना शिवसेनेविरोधात नाचवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे शिवसेनेत भांडण लावून आपण मज्जा बघण्याचा कार्यक्रम भाजपचे नेते बघत असले तरी त्यांना जास्त काळ अशी मजा बघता येणार नाही. शिवसैनिक पेटून उठेल आणि आमचा पक्ष, चिन्ह पळवण्याचा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असे वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना राज्यातून सत्तेबाहेर फेकली गेली.

आगामी मुंबई, ठाणे, केडीएमसीसह राज्यातील १५ महानगरपालिका निवडणुकीत आता शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमाविल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्याच्या राजकारणात मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले, पण एकालाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. यापूर्वीची अनेक बंडे शिवसेनेने मोडून काढली किंवा तेवढे नुकसान झाले नाही. पण शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना सत्तेबाहेर फेकली गेली हे नक्की. आगामी मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आता शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे. कारण शिंदे गट हा शिवसेना पक्ष म्हणूनच दावा करीत असल्याने आगामी काळात कायदेशीर लढाई सुरू आहे.

शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीचे मंत्री वा आमदारांमध्ये एकच कॉमन तक्रार असायची व ती म्हणजे उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. गेल्या अडीच वर्षांत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाची दारे आमदारांनाही बंद होती. कोरोना काळामुळे निर्बंध होते, पण नंतरही ठाकरे फारसे कोणाला भेटत नसत. मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांची भेट कित्येक दिवस मिळत नव्हती. सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस आदी बहुतांश मुख्यमंत्री मंत्रालयात असल्यावर दुपारी एक तास फक्त आमदार, खासदारांसाठी राखीव ठेवत. कोरोनामुळे ठाकरे हे मंत्रालयात येत नव्हते. वर्षा किंवा मातोश्रीची द्वारे बंद होती. यातूनच आमदारांमध्ये नाराजी वाढत गेली आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे बंड जन्माला आले. निधीवाटपावरून स्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते. पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे बहुधा दुर्लक्ष केले असावे. त्यातूनच आमदारांमधील नाराजी वाढत गेली.

विधानसभा निवडणूक भाजपसोबत एकत्रित लढूनही निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सत्तास्थापन करणे हेच मुळी शिवसेनेतील अनेकांना रुचले नव्हते. कारण काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने समझोता केल्याचे चित्र निर्माण झाले होते. मराठवाड्यात आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्याशिवाय मते मिळत नाहीत, असे शिवसेना पदाधिकार्‍यांचे म्हणणे असते. शिवसेनेचा मूळ गाभा हा हिंदुत्वाच्या मुद्यावर अवलंबून आहे. त्याच्याशी तडजोड केल्यास काँग्रेससह राष्ट्रवादीला फायदा होण्याची जास्त भीती शिवसेनेच्या आमदारांना, खासदारांना होती. तसेच शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांना भाजपशी युती केल्याशिवाय पुन्हा खासदार होणे अशक्य वाटत असल्यानेच ४० आमदारांनंतर १२ खासदार शिंदे गटात सामील झाले. भाजपशी युती करावी या शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या दाव्यात स्वार्थ अधिक दडलेला आहे. सध्या देशात भाजपची हवा आहे. तर राज्यातील आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढू, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून मांडली जात होती. भाजपबरोबर युती केल्यास फायदा अधिक आहे हे या आमदारांनी ओळखले होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात अशा इफ्तार पार्ट्यांच्या आयोजनावर शिवसेनेकडूनच टीका होत असे, मात्र दोन्ही काँग्रेसशी घरोबा केल्याने शिवसेनाही इफ्तार पार्ट्यांचा आनंद घेऊ लागली. एकनाथ शिंदेंसारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या कडव्या कार्यकर्त्याला ते रुचणे शक्य नव्हते, पण उद्धव व आदित्य हे पिता-पुत्र आपल्याच मस्तीत धुंद होते. उद्धव ठाकरेंच्या याच हिंदूविरोधी कारभाराला वैतागून, जनतेच्या मनातली भावना ओळखून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी विचारधारेपासून भरकटलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, एकनाथ शिंदे बंड करू शकतो याची तब्बल चार वेळा माहिती स्वत: शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. गृहखात्याच्या गुप्तचर खात्याकडून चार ते पाच वेळा माहिती देऊनदेखील उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीच हालचाल झाली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले, त्यामुळे राज्यातील सरकार पडले.

सरकार पडण्याला एकनाथ शिंदे यांचे बंड जितके कारणीभूत आहे तितकेच आपल्याच पक्षातील आमदारांना ठाकरे यांनी हलक्यात घेतल्याने हे घडले. वारंवार ज्यांना जायचे त्यांनी जा… शिवसेनेत बंड करून कुणी मोठा झाला नाही… कायम मी आणि कुटुंबाच्या बाहेर शिवसेना नावाचा पक्षही आहे याचा विसर मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे यांना झाला होता. मुख्यमंत्री म्हणून कामांचा व्याप भरपूर असतो. पण आमदारांकडे दुर्लक्ष करण्याची ठाकरे यांची १०० टक्के चूक होती. कामे झाली नाही तरी मुख्यमंत्री भेटले वा अधिकार्‍यांना तेवढा संदेश गेला तरी आमदारांसाठी ते पुरेसे असते. शिवसेनेच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांचाच आधार होता. त्यातूनच हे आमदार शिंदे यांच्याजवळ अधिक गेले. उद्धव ठाकरे यांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसती. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात जे गेले ते पैशाने विकत घेतलेत किंवा बाकीच्यांना ईडी, सीबीआय आणि आयटीची भीती घातली याचा बागुलबुवा करण्यापेक्षा आपले काय चुकले, याचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावा लागेल. तरच दुभंगलेल्या आणि विस्कळीत झालेल्या शिवसेनेला नवी उभारी देता येईल.