अलीकडेच मुंबईच्या सायन रेल्वेस्थानकात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला जीव गमवावा लागला. काही दोन-तीन अपवाद सोडले, तर मुंबईतील रेल्वेस्थानके कायम गजबजलेली असतात. संध्याकाळी तर ती गर्दीने फुलून जातात. त्यामुळे गजबजलेल्या रेल्वेस्थानकांवर कोणाचा ना कोणाचा तरी धक्का लागतोच. कधी-कधी मुद्दामहून मारला जातो, हे जरी सत्य असले तरी, अजाणतेपणी धक्का लागतोच. सायन रेल्वेस्थानकावरही तेच झाले. धक्का लागल्याने संतापलेल्या महिलेने एका तरुणाला छत्रीने मारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याच्या मागे असलेल्या तिच्या पतीने जोरदार कानशिलात लगावल्याने तो तरुण धडपडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्याला तोल सावरता आला नाही आणि तो धडपडत ट्रॅकवर जाऊन पडला. त्याचवेळी लोकल ट्रेन आली आणि तो बिचारा तरुण नाहक जीवानिशी गेला. मन सुन्न करणारी ही घटना प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली. पोलिसांनी त्या पती-पत्नीला अटक केली. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच, पण जीव गमावलेल्या त्या तरुणाच्या कुटुंबाचे काय?
सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे, पण त्याच्या आहारी बहुतांशजण गेले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोशल मीडियाने जगाच्या या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत सर्वांना कनेक्ट केले, पण घरातल्यांना, आसपासच्यांना, मित्रांना अजून कनेक्ट केलेले नाही. मित्राच्या खांद्यावर हात टाकून, चला चहा पिऊन येऊ या, असे सांगणे… चहा पिता पिता खळखळून हसत एकमेकांना टाळ्या देणे… हे चित्र आता दुर्मीळ झाले आहे. चहाच्या टपरीवर गेले तरी, प्रत्येक जण आपल्या हातातील मोबाईलमध्ये मान खुपसून बसलेला असतो. शेजारी बसलेल्या मित्रापेक्षा दुसरीकडे कुठेतरी असलेला मित्र, मैत्रीण, आप्त याच्याशी त्याचा संवाद सुरू असतो. बहुधा यातूनच कोरडेपणा, दिखाऊपणा निर्माण होत असावा.
मागे एकदा, प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांचे एक सुंदर वाक्य वाचनात आले होते. आजकाल लोक ‘लाफ्टर क्लब’मध्ये जाताना दिसतात. याचाच अर्थ आता जीवनातील निखळ हास्याचे क्षण यायचे कमी झाले आहेत. म्हणूनच हास्य क्लबची गरज भासू लागली आहे का, अशा आशयाचे ते वाक्य होते. याचा खरोखरीच शांतपणे आणि गांभीर्याने सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर कितीही व्यक्त होत असलो तरी, प्रत्यक्षात आपल्या भावना, आपल्या जीवनातील रस काही वेगळाच असतो, असे वाटू लागले आहे. सोशल मीडियावरील जग हे आभासी आहे आणि त्याच्या प्रेमात अनेकजण पडले आहेत. सर्वात धोकादायक म्हणजे, ही संख्या वाढतच चालली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘मनीचे गुंजन’ फारसे राहिलेले नाही. बहुसंख्य-अल्पसंख्य, ही विचारसरणी विरुद्ध ती विचारसरणी, ही जात विरुद्ध ती जात असे द्वंद्वच जास्त पहायला मिळते. काही पोस्टचा हेतू शुद्ध असला तरी, अनेकदा त्यातून वेगळा अर्थ काढला जातो, तर काही पोस्ट फक्त डिवचण्यासाठीच असतात. यातूनच भावनिक ओलावा कमी होऊन एक प्रकारची कट्टरता निर्माण होत असावी, असे वाटते.
प्रत्येकाला चुकीची का होईना पण ठाम मते असावीत, असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे सांगतात. समोरचा कायम चूकच आणि आपण बरोबर हा दाखवण्याचा अट्टाहास काहींचा असतो. हीच भूमिका संबंधित व्यक्तीच्या भावभावनांवर अप्रत्यक्षपणे का होईना परिणाम करून जात असावी. अन्यथा प्रेमाची कोमलता पुसली जाऊन क्रूरतेची कठोरता पहायला मिळाली नसती. दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरण, मीरा रोडचे सरस्वती वैद्य प्रकरण हे अशाच कोरडेपणातून घडले आहे आणि याच कोरडेपणातून क्रूरतेची परिसीमा गाठली गेली.
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहते. वाट आणि उतार गवसेल तसे. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणनूच आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनेच जात राहू. मुक्कामाचे जे ठिकाण निश्चित करू तिथेच पोहोचू, ही शाश्वती नाही, असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटले आहे, पण हे वास्तव कोणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच, माणसातील क्रौर्याची परिसीमा पहायला मिळते. दिल्लीत साक्षी या अल्पवयीन मुलीवर तिच्या कथित प्रियकराने चाळीस वार करून तिची हत्या केली, तर अलीकडेच एकतर्फी प्रेमातून बारा वर्षांच्या मुलीला एका मुलाने भोसकल्याची घटना कल्याणमध्ये घडली. त्याआधी पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एमपीएससीच्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केला होता, मात्र सजग नागरिकांमुळे सुदैवाने ती मुलगी बचावली. यातून हाच मुद्दा अधोरेखित होतो की, आता नकार पचविणेसुद्धा जड होत चालले आहे. सोशल मीडियाच्या जंजाळात सोशिकपणा हरवत चालला आहे. सोशल मीडियाने दुसर्यांच्या खासगी आयुष्यात आणि घरातही डोकवायला शिकवले. एखाद्याने आपल्या कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, तर त्याच्या घरात वा गळ्यात दिसणारी वस्तू आपल्याकडे आणण्याचाही विचार सुरू होतो. त्यात ईएमआयची सुविधा असली तर, ती वस्तू लगेच येतेदेखील. हे सर्रास होत नसले तरी, हे वास्तव नाकारता येणार नाही, पण मध्यंतरी आलेल्या कोरोनाने याला गालबोट लावले. कोविड महामारीच्या दु:स्वप्नातून सर्व जग बाहेर आले असले तरी, त्याच्या खाणाखुणा अद्याप पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. या महामारीचा अनेकांना फटका बसला. या धक्क्यातून अनेकजण अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. जीवनातील कोरडेपणात या परिस्थितीची भर पडली आणि रस्ते बिकट होत गेले.
मुंबईतच नव्हे, तर सर्वत्रच माणूस चिंतांनी वेढलेला दिसत आहे. हातातल्या मोबाईलमध्ये तो गुंतलेला दिसत असला तरी, मघाशी म्हटल्याप्रमाणे ती आभासी दुनिया आहे. त्याचा फोलपणा सर्वांनाच माहीत आहे, पण तो मान्य करायला अनेकजण तयार नाहीत. परिणामी, संवेदनशीलपणा, सहनशीलता, सोशिकपणा कमी होत चालला आहे, असे दिसते. कौटुंबिक न्यायालयाची आकडेवारी हेच दर्शवते. कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार 30 टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होत आहेत. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर तासंतास होणारी चॅटिंग नवरा-बायकोच्या नात्यांवर संक्रांत आणत आहे. यामुळे होणारे भांडण हे थेट घटस्फोटाला कारण ठरत आहे, तर जोडीदाराने अन्य स्त्री वा पुरुषाचा फोटो लाईक केला, त्याला कमेंट केली तरी, त्यावरून भांडण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना महामारीने लहान मुलांच्या हातीदेखील मोबाईल दिले. पाल्यांच्या शिक्षणाचे घोडे अडू नये, यासाठी पालकांनीदेखील त्यांची ही गरज कशीबशी भागवली, पण मुलांच्या हाती तेव्हा जो मोबाईल आला, तो हातातून सुटलाच नाही. त्यामुळेच युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेनेदेखील याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. प्रत्यक्ष शिक्षणपद्धती राबविण्याचा सल्ला युनेस्कोने दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बान्सी गावाने 18 वर्षांखालील मुलांच्या हाती मोबाईल देण्यास मनाई करण्याचा ठराव करून या दिशेने एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे.
विज्ञानाच्या प्रगतीला कोणी नाकारू शकणार नाही, पण ती कशाप्रकारे आणि किती स्वीकाराची हे मात्र आपल्या हाती आहे. कृष्णाची महती त्रिकालाबाधित आहे. अर्जुनाच्या डोळ्यांवरचे ममत्वाचे पटल दूर करण्याचे काम त्याने केले. नंतर अर्जुनाला काही सांगावेच लागले नाही. हे पटल दूर करण्यासाठी अठरा अध्याय. ‘पटल’ दूर करणे म्हणजे नक्की काय? आज आपण चष्म्याच्या दुकानात जातो. दुकानदार वेगवेगळ्या नंबरच्या काचा बदलत राहतो. केव्हातरी समोरची अक्षरे लख्ख दिसतात. आपण थांबायला सांगतो. डाव्या डोळ्यानंतर उजवा. तो नंबर कदाचित वेगळा असतो; पण सगळी प्रोसेस तीच. हे झाले चर्मचक्षूंच्या बाबतीत; पण हीच शास्त्रज्ञांच्या प्रतिभेची देणगी! एक शास्त्रज्ञ असतो. बाकी सगळे चष्म्याचे दुकानदार असतात. मग चष्मे फॅशनेबल करायचे. त्याचे नाते चेहर्याशी. पण नजरेचे काय? तिची सोयरीक असते अंतचक्षूंशी; ज्ञानचक्षूंशी! तिथपर्यंत शास्त्रज्ञ पोहोचलेले नाहीत म्हणूनच जेवढी लोकसंख्या तेवढे अंतचक्षू. ती नजर सुधारण्यासाठी किती काचा लागतील, किती नंबर्स असतील हे सांगता येणार नाही, असे व. पु. काळे यांनी ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकात म्हटले आहे. सोशल मीडियाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. संवाद सुकर होण्यासाठी संशोधकांनी सर्वसामान्यांच्या हाती मोबाईल दिला, पण सोशल मीडियामुळे संवाद बाजूला राहून वादाला खतपाणी दिले जात आहे, असेच काही घटना दर्शवितात.