देवेंद्रे रचिला पाया, एकनाथ झालासी कळस..

दिंड्या पताकांच्या साक्षीनं अवघ्या महाराष्ट्रात विठुनामाचा गजर सुरू आहे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या आषाढीनिमित्त भक्तीचा हा सोहळा अपूर्व उत्साहात रंगलाय..बरंका माऊली, तुम्ही जरी विठुरायाच्या गजरात तल्लीन असला तरी घरी परतल्यावर तुम्हाला सत्तेची पालखी कुणी भलत्यानेच उचलल्याचं लक्षात येईल. ती कुणी उचलली, का उचलली, कशी उचलली ‘याची देही, याची डोळा’ अनुभूती आम्ही सगळ्यांनी घेतलीय. पण दमल्या पावलांना विश्रांती घेताघेेता तुम्हालाही विरंगुळा मिळावा म्हणून हा प्रपंच..

माऊली, तुम्हाला ठाऊकच असेल, हयातभर ज्यांना टोकाचा विरोध केला त्या दोन पक्षांशी उद्धव महाराज मुंबईकरांनी अडीच वर्षांपूर्वी हातमिळवणी केली होती.. माऊली, बघा किती ही सहिष्णुता.. किती हा सात्विकपणा.. निरागसपणा.. मनात ना मित्र गमावण्याची सल ना शत्रूला कवटाळण्याची भीती..

‘तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण।
तया त्रिभुवन अवघें खोटें ॥’

त्यावेळी सत्ता स्थापनेची अखेरची ‘प्रदक्षिणा’ घालून पादुका मुख्य मंदिरात विसावण्यासाठी ठेवण्याचं नियोजन झालं खरं; या प्रदक्षिणेत दमलेले वारकरी रात्रीच्या समयी थोडे काय ते विसावले, या बेसावध क्षणीच अजित महाराज बारामतीकरांना सोबत घेत देवेंद्र महाराजांनी आपुली पताका रोवली..

पहाटेच्या समयी झोपली प्रजा
जागविले राजा,
राज्याभिषेकाची सोय लाऊनिया॥

पण हे सुख मानवणं दिसतंं तितकं सोपं नव्हतं.. काहीच दिवसांत होत्याचं नव्हतं झालं.. ‘काका मला वाचवा’चा टाहो ऐकू आला. राजा पुन्हा एकदा आपल्या सैन्यात दाखल झाला.. मग उद्धव महाराजांनी परमार्थ साधीला.. नैसर्गिक, अनैसर्गिक युती असा विचार करत वेळ न दवडता विरोधकांशी सलगी केली. त्याची परिणती म्हणजे राज्याभिषेकाचा सोहळा थाटात पार पडला.

उद्धव महाराजांनी अडीच वर्षं पालखीची धुरा सांभाळली.. लौकीकार्थानं या दिंडीच्या वाटेत कमालीचे खाच-खळगे होते.. अधूनमधून यांच्या पालखीतही ‘स्वबळा’चा गजर होत होता.. अशावेळी उद्धव महाराजांनी ठाकरी शैलीत ठणकावून सांगितलं, ‘आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. आम्ही भलत्या-सलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी आमुचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू.’ म्हणायला उद्धव महाराजांचा हा बाणा ‘श्रवणीय’ होता. पण ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ ही शिकवण आम्हाला मिळालीय ना महाराज.. तशी अनुभूती मात्र कुणाला आली नाही. मग कोण कसे करणार ‘पादुका पूजन’? पण त्यानंतर जे घडलं त्यावर तुमच्या कानांनाही विश्वास बसणार नाही.

संताचिये पायी हा माझा विश्वास।
सर्वभावे दास झालो त्यांचा॥

पण इथं असं नाही हो. विश्वासराव पानिपतात गेले यावर या मंडळींचा थोर विश्वास आहे. त्यामुळे विश्वासाला जागणं वगैरे काय असतं हे यांना ठाऊकच नाही. हे घडण्याचं कारण काय? कारण आधीची सत्तारुपी माऊली विठ्ठल बनून स्तब्ध उभी होती. अडीच वर्षाच्या अविश्रांत परिश्रमानंतरही माऊली प्रसन्न व्हायला तयार नव्हती. ती ‘वार’कर्‍यांना भेट द्यायला तयारच नव्हती.. आता तुम्हीच सांगा विठुमाऊलीची आणि तुमची भेट झाली नाही तर तुम्हाला करमणार का? मग हे या बापुड्याला का कळू नये.. खरं सांगू का माऊली, मंदिरातला विठ्ठल चांगला आहे हो.. पण त्याच्या भोवतीचे बडवे त्याला काही सुचू देत नाही.. झोपेतून उठवण्यापासून रात्री झोपवून देण्यापर्यंत तिच चार-पाच डोकी त्यांच्या जवळपास असतात, मग कसं काय ‘वार’कर्‍यांनी मन मोकळं करावं?

ठेविले साहेबा। तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे। असंतोषपण॥

असं म्हणत प्रत्येकानं मुखवाणी आवरती घेतली. पण हे फार काळ कसं सहन केलं जाईल हो. एकीकडे आपल्यांना परकं करणं सुरू होतं तर दुसरीकडे या गाफिलीचा फायदा अन्यच कुणी घेत होतं.. सगळ्याच अडगळीत गेलेल्या जुन्या पालख्या छान सजवण्यात आल्या होत्या. ‘समते’ची पालखी पुन्हा एकदा रंगात आली.. बारामतीच्या पालखीचाही ‘भाव’ वाढला होता. कधी दिल्लीश्वरांच्या दरबारी ही पालखी दर्शन देऊन येई तर कधी मातोश्री चरणी.. या भेटींवर चर्चा झडत राहिल्या आणि आम्ही या चर्चा वर्तमानपत्रात फक्त वाचत राहिलो. त्यातून बोध मात्र काही घेतला नाही. अशातच काही दिवसांपूर्वी ‘मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन’चा गजर पुन्हा सुरू झाला. हा गजर इतका निनादला की उद्धव महाराजांच्या कानठळ्या बसल्या.. त्यांनी कानात बोटं घालून डोळेही मिटून घेतले. डोळे उघडले तर काय, सत्तेची खुर्चीच गायब होती. ‘पालखी पलटी आणि भोयी फरार..’ संतश्रेष्ठ एकनाथ महाराज ठाणेकरांनी पुढाकार घेत सारा डाव उधळून लावला. सुरतेच्या दिशेने त्यांनी पळ काढला. सोबत तब्बल ४०-४५ शिलेदारांनाही नेले..

अंधाचे सांगाती मिळालेसे अंध।
सुख आणि बोध काय तेथे॥

इकडे दरबार रिता झाला. अवघे चार-पाच शिलेदार तेवढे वाणगीदाखल शिल्लक राहिले. ज्यांना तहासाठी तिकडे धाडलं तेही तिकडचेच बनून राहिले. ज्यांनी एकट्या पडलेल्या माऊलीला पाहून अश्रू ढाळले, ते दुसर्‍या कंपूत एकनाथ महाराजांचा जयघोष करू लागले. कारण काय?

‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥’, याची अनुभूती ‘वार’कर्‍यांनी एकनाथ महाराजांच्या वर्तनातून घेतली होती. म्हणूनच त्यांनी या वादळात स्वत:ला स्वाधीन करुन दिलं. हिंदुत्वाची विसावणारी पताका पालखीच्याच भोयींनी उचलून नेली. नव्हे ती उंचावली.. उंचावलीच नव्हे ती चक्क रोवली. माऊली, हाच तर होता दिंडी सोहळ्याचा पहिला पडाव. सुरतेला.. बोला ‘विठ्ठल, विठ्ठल’..

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥

भेदाभेद-भ्रम अमंगळ म्हणजेच भेदाभेद हा भ्रम आहे, तो अमंगल आहे, याचा विसर पाडण्यात देवेंद्र महाराज नागपूरकर

कमालीचे यशस्वी झाले माऊली.
‘राजकीय पटाला, सारं कसं माफ
पातकांचा धनी, मन तयाचं साफ।
बलशाली रिंगणी, रोजची जातात
धर्म आणि राजकारण सोबतीच खातात॥’

पालखीचे भोयी सुरतेत पोहोचले आणि राजकारणाच्या पंढरीत म्हणजे मुंबापुरीत आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्माच्या उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन झाले. खेळ १५ ते २० दिवस बेहद रंगला.. टाळ-मृदंगाच्या निनादाप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचा गजर होत होता. ‘हिंदुत्व फॉरेव्हर’चा गजर सुरुच होता. हिंदुत्व कशाबरोबर खातात हे ज्याला माहीत नाही, तोही हिंदुत्वाच्या गप्पा करू लागला. या रिंगण सोहळ्यात आता पालखीचे धनी बदलले जातील, असं स्पष्ट चित्र दिसू लागलं. पण याच काळात संशयकल्लोळही सुरू झाला. निर्मळ मनं कलुषित झाली.

नाही निर्मळ जीवन। काय करील साबण॥
तैसे चित्त शुद्धी नाही। तेथे बोध करील काई॥

या तुकोबांच्या वचनाशी कुणाला काहीही देणं-घेणं नव्हतं. पुन्हा फंदी फितुरी नको म्हणून पालख्या गुवाहाटीला हलवल्या.. हा गुवाहाटीचा सोहळा म्हणजेच दिंडी सोहळ्याचा दुसरा पाडाव म्हणावा महाराज…

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’चा निनाद गुवाहाटीच्या डोंगर दर्‍यांमध्ये निनादला.. त्याचं लोण आख्ख्या महाराष्ट्रात पसरलं.. पण याच संवादात त्यांनी जी व्यथा मांडली त्यावर मात्र कुणीही चर्चा केली नाही माऊली.. असो, तिकडे मंडळी निसर्गाचा आस्वाद घेण्यात व्यस्त होती आणि इकडे माऊली एकटी पडल्यानं त्रस्थ होती.. या चिमण्यांनो परत फिरा म्हणत साद घालण्यात आली.. पण त्याला दाद मात्र मिळाली नाही. जिथं काळीज गुंतलंय, तिथं जायलाच बंदी घातली तर घालमेल कशी होते हे दोघांकडच्यांना समजलं तर असेल ना महाराज. पण व्यक्त कुणी झालं नाही. इकडं न्यायदेवतेच्या दर्शनासाठी फेर्‍या सुरू झाल्यात.. आमची पालखी असली, त्यांची नकली हे सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू झाली. तिकडे वारकर्‍यांची संख्या मोजून दाखवली जाऊ लागली.

बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण।

म्हणजे कितीही खटपटी, उलाढाली केल्या तरी दुसर्‍यास त्रास देण्याची बुद्धी बाळगू नये. देवेंद्र महाराज या काळात मुखपट्टी बांधून होते. गनिमी काव्याने ते सत्तेच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचले माऊली..
कर्म करिसी तरी कर्मठचि होसी। परी निष्कर्म नेणसी कर्मामाजी।

कर्म करताना निष्कर्म होणे हेच कर्माचे अंतिम साध्य आहे. याचे पालन न केल्याने देवेंद्र महाराजांचा घात झाला. मन शुद्ध नसल्यानं दिल्लीश्वरांनी ऐनवेळी पालखीचा धनी बदलला. एकनाथ महाराजांचं नाव अचानक पुढे आलं. ते सांगण्याची जबाबदारी देवेंद्र महाराजांवर आली. पण तरीही पक्षाच्या दिंडीपुढे नतमस्तक होत त्यांनी एकनाथांचं नाव धनी म्हणून जाहीर केलं. पालखीवर नियंत्रण आपण बाहेरुन करू असंही त्यांनी सांगून टाकलं. पण दिल्लीकरांना तेही मान्य नव्हतं. त्यांनी चक्क एकनाथ महाराजांची सेवा करण्यासाठी देवेंद्र महाराजांना उपपद बहाल केलं. हा घोर अपमानही त्यांनी निपचित सहन केला. त्यादरम्यान, गुवाहाटीच्या पालख्या गोव्यात येऊन स्थिरावल्या होत्या. हा पालखीचा तिसरा आणि महत्वाचा पाडाव होता महाराज..

असो, आता वारीचा पुढचा पाडाव सुरू आहे. आता पुन्हा एकदा भगवी पताका घेऊन राज्यातील नवे ‘वार’करी दंड थोपटून आनंदसरींची अनुभूती घेताहेत. सर्वत्र ‘खुर्चीनामा’चा जागर होतोय.. नव्याने पुढील प्रवासासाठी ही मंडळी निघाली.. विधानसभा अध्यक्षपद, बहुमत असे सगळे अडथळे दूर करत ही मंडळी उन्मादात पुढे जातेय.

‘राजकीय महत्वाकांक्षा आहेसी बोलक्या
सत्ता दिंडीत प्रत्येकाच्या पालख्या..’

सत्तेच्या दिंडीचा हा सोहळा बघताना सामान्य वारकरी पुरता मेटाकुटीला आलाय. माझ्या मताला कुठेही किंमत नाही ही भावना त्याच्या ठायी रुजू लागलीय. महाराज, एक मात्र सांगतो, ही सत्तादेवीची पालखी भल्याभल्यांची दमछाक करतेय. होऊ दे दमछाक.. पण जनतारुपी आम्हा वारकर्‍यांचं नशीब तरी त्यातून बदलावं.. झेंडेकरी बदलतात.. झुल धरणारे बदलतात.. पण या बापुड्या वारकर्‍यांचं प्राक्तन मात्र बदलत नाही. खुर्चीनामाचा गजर या सार्‍यांच्याच तोंडी अव्याहतपणे सुरू असतो. या गजरात सामान्य वारकर्‍यांचं भजन-कीर्तन विरुन जातं.. त्याचा आवाज आसमंतापर्यंत पोहोचतच नाही. त्याचा आवाज सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचत नाही. विठुमाऊली, आजवर तोंड लपवत फिरणारे पालखीचे भोई आषाढीला येतील तुमच्या दर्शनाला. येऊ द्या.. आम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला त्यांच्या चेहर्‍यात रस, ना त्यांच्या पताकांच्या रंगात.. त्यांना सांगून टाका

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा। परि नाहीं दशा साच अंगीं॥

म्हणजे काय तर, वाघाचं पांघरुन घेतल्यावर वाघासारखं दिसता येतं, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. असा खोटा आव आणणार्‍याची लगेचच फजिती होते. अशी फजिती होईल म्हणा तुमची. म्हणून माथे ठिकाणावर ठेवा म्हणा.. नाही तर म्हटलंच आहे,

‘भले तरि देऊं कासेची लंगोटी।
नाठाळाचे माथी हाणू काठी..!’
बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..