घरसंपादकीयओपेडमुंबईला स्पेशल ‘सीपी’ची आवश्यकता काय?

मुंबईला स्पेशल ‘सीपी’ची आवश्यकता काय?

Subscribe

महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्याचे ५ वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एक शिंतोडादेखील उडू शकलेला नाही, हेच त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचे सर्वात मोठे प्रमाणपत्र म्हणावे लागेल आणि त्यामुळेच फडणवीस यांच्यासारखे अत्यंत कार्यक्षम स्वच्छ चारित्र्याचे गृहमंत्री असताना आणि विवेक फणसळकर यांच्यासारखे तुल्यबळ अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना सरकारला मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्याची गरज अचानक का भासली, याचेही उत्तर सरकारने देण्याची गरज आहे.

मुंबई ही जशी महाराष्ट्राची राजधानी आहे, तशीच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे. त्याचबरोबर जगाच्या पातळीवर मुंबईला उच्च दर्जाचे स्थान आहे. त्यामुळेच या मुंबई नगरीची ओळख जागतिक पातळीवरील नावाजलेले शहर अशीच आहे. साहजिकच मुंबई महानगराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जी जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे ती लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्तपदाला केवळ देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ज्येष्ठ आयपीएस अधिकार्‍यांमध्ये आयुष्याच्या उतारवयात तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा सन्मान पदरी पडावा अशी मनोमन सुप्त इच्छा असतेच असते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.

गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने मुंबईसाठी प्रथमच विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण केले आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. देवेन भारती हे महाराष्ट्र पोलीस दलातील तडफदार पोलीस अधिकारी आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे देवेन भारती यांचे या नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदनच करायला हवे, तथापि मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करून राज्य सरकारने एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या मुंबई पोलीस आयुक्तांवर अविश्वास व्यक्त केल्याची चर्चा यानिमित्ताने मुंबई पोलीस दलात सुरू झाली आहे.

- Advertisement -

मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे पोलीस दलातील अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. फणसळकर हे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असून पोलीस दलात त्यांचा स्वतंत्र दरारा आहे. गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्याबरोबरच पोलिसांची सर्वसामान्य प्रतिमा अधिकाधिक स्वच्छ कशी राखता येईल याकडे फणसळकर यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्यामुळेच फणसळकर यांच्यासारखे ज्येष्ठ अनुभवी आयपीएस अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर असताना नव्या विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्याची गरज का भासली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुंबई महानगर हे संपूर्ण जगाला आकर्षित करणारे शहर आहे. येथे आलेला गरिबातला गरीब माणूसदेखील रात्री उपाशीपोटी झोपत नाही, ही मुंबईची खरी ओळख आहे. मुंबईच्या मोहजालाचे जसे आकर्षण तमाम भारतीयांना असते तसेच ते जगभरातील पर्यटकांनादेखील आहे. मुंबई जशी अंबानी, अदानी, टाटा यासारख्या श्रीमंतांची नगरी म्हणून ओळखली जाते, तशीच ती गोरगरीब कष्टकरी, चाळकरी, कामगार, श्रमिक आणि हातावर पोट असणार्‍या तळागाळातील जनतेचे पोट भरणारी नगरी म्हणून ओळखली जाते. मुंबई ही जशी मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाची नगरी आहे, तशीच ती आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा रोवणारी बॉलिवूड नगरीदेखील आहे. दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन गेले आणि मुंबईच्या धरतीवर उत्तर प्रदेशमध्ये त्याच दर्जाचे बॉलिवूड उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेचे स्वागतच करायला हवे. उत्तर प्रदेशमध्ये मुंबईप्रमाणेच दुसरे बॉलिवूड झाले तर त्याचा सिने क्षेत्रातील मंडळींना निश्चितच आनंद होईल, तथापि बॉलिवूड ते बॉलिवूडच. कारण याच मुंबईतील बॉलिवूडने या देशाला आणि जगालादेखील अमिताभ बच्चन यांच्यासारखा महानायक दिला हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे मूळ उत्तर प्रदेश असून अमिताभ बच्चन यांना महानायक होण्यासाठी अखेर मुंबईलाच यावे लागले हे लक्षात घेण्याची गरज आहे. अगदी बड्या उद्योगपतींची नावे जरी घेतली तरी अंबानी, अदानी, टाटा यांनादेखील मुंबईने जागतिक पातळीवर नेले. मुंबईतील मराठी माणसांना नेहमी अन्य प्रांतातील व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांच्यावरून नेहमी ऐकवण्यात येते.

तथापि या अन्य प्रांतातील व्यापारी व्यावसायिक आणि उद्योजक यांनादेखील त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी मुंबईचाच आश्रय घ्यावा लागतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मुंबई हे त्यामुळेच जगातील एकमेव महानगर असे आहे की ज्यामध्ये देश, विदेशातील कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही प्रांताच्या मंडळींना सामावून घेण्याचे सामर्थ्य आहे. ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि श्रम करण्याची तयारी आहे अशा कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्याचे सोने करण्याच्या अनंत सुवर्णसंधी या मायावी नगरीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच केवळ मराठी माणसालाच नव्हे तर देश-विदेशातील प्रत्येकाला मुंबईच्या या मायावी रूपाचे आकर्षण हे असतेच असते. हे सर्व सांगण्यामागचे प्रयोजन म्हणजे मुंबईवरून दर पाच-दहा वर्षांनी निवडणुका आल्या की जो काही राजकीय धुरळा उडत असतो त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले तरी मुंबईचे जगाच्या पातळीवरील महत्त्व हे कालही अबाधित होते, आजही अबाधित आहे आणि उद्याही अबाधित राहणार आहे.

मुंबईचे आकर्षण हे जसे सधन आणि श्रमिक वर्गाला आहे, तसेच ते आता आणि पूर्वीदेखील गुन्हेगारी जगतालाही मोठ्या प्रमाणावर होते आणि आजही आहे. त्यामुळेच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम असो, छोटा शकील असो की अगदी भायखळ्यातील अरुण गवळी असो. मुंबईवर आणि मुंबईतील गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गुन्हेगारी टोळ्यांमधील स्पर्धा गँगवॉर हे यापूर्वीदेखील मुंबई नगरीने अनुभवले आहे. २६-११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबई शहर हे जागतिक पातळीवर अतिरेक्यांच्याही हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईतील गुन्हेगारी हा काही नव्या संशोधनाचा विषय नाही. मुंबईत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून लोक येत असल्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी हादेखील एक सर्वसामान्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय असतो. अगदी कोरोनासारख्या टाळेबंदीच्या काळातही मुंबईतील गुन्हेगारीमध्ये तब्बल २६ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन असो, कोरोना महामारी असो, अतिरेकी हल्ला असो की अन्य कोणतेही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकट असो, मुंबईतील गुन्हेगारी ही काही थांबत नसते. त्याशिवाय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र मुंबईत असते आणि त्यामुळे मुंबईत घडणार्‍या राजकीय घडामोडींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व असते. त्याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि जागतिक पातळीवर मुंबईतील आर्थिक घडामोडींना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आर्थिक क्षेत्रातील उलथापालथींमुळे मुंबईतील समाज जीवनावर अनुकूल प्रतिकूल असे परिणाम होत असतात. या सार्‍या घडामोडींचे पडसाद हे अखेरीस मुंबई पोलिसांनाच निस्तरावे लागत असतात आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांचे मुंबईकरांच्या दृष्टीने असलेले महत्त्व अबाधित आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ अशा ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मात्र या काळातही त्यांना मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्त असे एखादे पद निर्माण करावे असे त्यावेळी वाटले नाही, मग आताच जानेवारी २०२३ मध्ये अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती मुंबईवर उद्भवली की ज्यामुळे मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्याची गरज भासली. याचे सर्वसामान्य जनतेचे समाधान होईल असे उत्तर संबंधितांकडून मिळणे गरजेचे आहे. मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीच राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना मुंबईतून दर महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. अखेरीस उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांना यावरून पायउतार व्हावे लागले आणि ईडीच्या कचाट्यात अडकून काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले आहेत. तथापि जेव्हा मुंबईचे एक पोलीस आयुक्तच शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप करतात त्यावरून मुंबई पोलिसांच्या एकूणच तत्कालीन कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या.

राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय आणि सामाजिक जीवनात अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रामाणिक राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ ते २०१९ अशी सलग ५ वर्षे महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्याचे मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा एक शिंतोडादेखील उडू शकलेला नाही, हेच त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचे सर्वात मोठे प्रमाणपत्र म्हणावे लागेल आणि त्यामुळेच फडणवीस यांच्यासारखे अत्यंत कार्यक्षम स्वच्छ चारित्र्याचे गृहमंत्री असताना आणि विवेक फणसळकर यांच्यासारखे तुल्यबळ अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना सरकारला मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्याची गरज अचानक का भासली, याचेही उत्तर सरकारने देण्याची गरज आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -