घरसंपादकीयओपेडपुरुषांच्या मेंदूतील बलात्कारी प्रवृत्तीचा काळा किडा!

पुरुषांच्या मेंदूतील बलात्कारी प्रवृत्तीचा काळा किडा!

Subscribe

गुंगीचं औषध देऊन पाच कोरियन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचा उद्योजक बालेश धनखर याला न्यायालयानं दोषी ठरवलं. सिडनी शहराच्या अलीकडच्या इतिहासातील ‘सर्वात निर्दयी बलात्कारी’ असं न्यायालयानं त्याचं वर्णन केलंय. बालेश अतिशय हुशार म्हणून ओळखला जातो. तरीही त्याच्या मनात बलात्काराचे विचार कसे आले? बालेशसह बलात्कार करणार्‍यांचे मनोविश्व नक्की कसे असते याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न...

बालेश हा ऑस्ट्रेलियातील ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राहिला आहे. डेटा तज्ज्ञ म्हणूनही तो काम करतो. २०१४ साली पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी सिडनीत पंतप्रधान मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात त्याचा पुढाकार होता. पंतप्रधानांशी आपली जवळीक असल्याचं तो सांगायचा. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचे फोटोही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कोरियन-इंग्लिश बोलणार्‍या महिला नोकरीसाठी हव्यात, अशी जाहिरातही त्यानं दिली होती.

बालेशनं पाच कोरियन महिलांना जाळ्यात ओढून त्यांना ड्रग्ज पाजलं. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याच्या पलंगाजवळील अलार्म घड्याळ आणि फोनवरील छुप्या कॅमेर्‍याच्या मदतीनं महिलांच्या लैंगिक अत्याचाराचं रेकॉर्डिंगही त्यानं केलं होतं. बालेश सुशिक्षित होता. तो बुद्धिमान होता. त्याला सामाजिक प्रतिष्ठाही होती. तरीही त्याने बलात्कार का केला असावा? त्याला लैंगिक इच्छा तृप्तीसाठी बलात्काराशिवाय अन्य कोणतीच माध्यमे का दिसली नाहीत? हे आणि असे असंख्य प्रश्न अशा प्रकरणांनंतर उपस्थित होतात.

- Advertisement -

खरेतर अशा घटना जेव्हा पुढे येतात तेव्हा सार्‍यांच्याच मनात बलात्कार्‍याविषयी प्रचंड राग निर्माण होतो. त्याचे लिंग छाटा, त्यांना भररस्त्यात जाळा, भरचौकात फासावर लटकवा… या आणि अशा असंख्य संतप्त मागण्याही मग पुढे येतात. यात मूळ मुद्दा हा आहे की लिंगच्छेद करून वा आरोपींना रस्त्यात फासावर लटकवून बलात्काराचे प्रमाण कमी होणार आहे का? बलात्काराच्या समस्येची कीड केवळ भारतालाच लागलेली नाही, जगभरातील प्रगत राष्ट्रही या किडीमुळे बेजार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगभरात सुमारे ३० टक्के महिला कुठल्या ना कुठल्या स्वरूपातल्या बलात्काराला बळी पडतात.

बलात्कार हा निषेधार्हच आहे. त्याचे समर्थन कोणीही कोणत्याही व्यासपीठावर करणार नाही, मात्र केवळ कायदे बदलल्याने बलात्काराचे प्रमाण कमी होईल असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही. कायद्यातील पळवाटा दूर करतानाच बलात्काराच्या घटनांकडे मनोसामाजिक अंगानेही बघायला हवे. आजवर बलात्कारीत महिलांवर असंख्य संशोधने झाली आहेत. त्यातून तिच्या वेदना समोर आल्या, मात्र बलात्कार कमी करण्याचे उपाय मात्र सापडू शकले नाहीत. याउलट काही संशोधकांनी बलात्कारी पुरुषांचा अभ्यास केला आहे. बलात्कार करावासा वाटणं, त्यावेळी मनातील भावना, या भावनांचा सामाजिक, आर्थिक, भावनिक, मानसिक परिस्थितीवर होणारा परिणाम, लैंगिक आनंद या नैसर्गिक भावनेचे हिंसाचार आणि विकृतीत होणारे रूपांतर याविषयीचा उहापोह या संशोधनातून झाला आहे. ‘द कॉर्न्व्हसेशन’ने मांडलेल्या मतानुसार यापूर्वीच्या गृहितकांनुसार हेच पुढे येते की बलात्कार टाळण्यासाठी महिलांनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत, एकट्याने असुरक्षित ठिकाणी प्रवास करू नये, पार्टीमध्ये मद्यपान करू नये, पण पुरुषांनी बलात्कार करण्याची कारणं ही अनेकदा वेगळीच असतात. त्यामुळे बलात्कार करण्याची पुरुषांची मानसिकता तपासून त्यांच्यावर काम करणं ही काळाची गरज बनल्याचा निष्कर्ष या चर्चेतून निघतो.

- Advertisement -

गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ रजत मित्रा यांनी २००८ पासून पाच वर्षांच्या कालावधीत दिल्लीच्या तिहार जेलमधील २४२ दोषी बलात्कार्‍यांवर संशोधन केले. त्यांच्या अभ्यासातून पुढे आले की, तब्बल ७२ टक्के बलात्कार्‍यांच्या मुलाखतींमध्ये ते मनोरुग्ण होते किंवा समाजविरोधी व्यक्तिमत्त्व विकार त्यांच्यात दिसून आले. सुमारे ६८ टक्के गुन्हेगारांचे बालपण हिंसा किंवा वाईट पालकत्व आणि दडपशाहीत गेले. बलात्कार करणारा कोणताही अपराधीपणा किंवा पश्चाताप दाखवत नाही. गंभीर बाब म्हणजे ही कृती त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू होती, असे त्याला वाटते. त्या घटनेची आठवण त्याला एक थरार अनुभव देत असते. त्यातूनही पुढे त्याच्याकडून बलात्कार होण्याची शक्यता वाढते. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्याच १०० बलात्कार्‍यांच्या मुलाखती घेतल्या. या अभ्यासात तिला जाणवले की, बलात्कार करणारे अतिसामान्य माणसं आहेत. त्यांना लहानपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळे आणि त्यातून तयार झालेल्या त्यांच्या विचारसरणीमुळेच त्यांच्याकडून हे गैरकृत्य केले गेले.

पुरुषत्वाच्या भंपक संकल्पना प्रत्येक बलात्कार करणार्‍यात ठासून भरलेल्या असतात. शंभरपैकी फक्त तीन ते चार आरोपींना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता, पण बाकीच्यांना तो झाला नाही. भारतात लैंगिकतेविषयी मोकळा संवाद साधला न जाणं हे बलात्काराचे प्रमुख कारण असल्याचे मधुमिताचे संशोधन सांगते. बलात्कार्‍यांना फाशी देऊन किंवा त्यांच्यावर पुन्हा हिंसाचार करून प्रश्न सुटणार नाहीत. बलात्कारविरोधी कायदे करताना बलात्कार्‍यांच्या भूमिकाही तपासून बघायला हव्यात, असेही ती आपल्या संशोधनातून सुचवते. युनायटेड नेशन्सशी जोडलेल्या चार एजन्सींनी एकत्र येऊन ‘पार्टनर्स फॉर प्रिव्हेंशन’ हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी राबवला. आशिया खंडात विविध ठिकाणी झालेल्या सर्व्हेच्या अहवालानुसार काही देशांत १० टक्के, तर काही देशांत ६५ टक्क्यांपर्यंत पुरुषांनी आयुष्यात कधी ना कधी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे.

अपरिचित महिलेवर बलात्कार करण्यापेक्षा जोडीदारावर बलात्कार करण्याचे प्रमाण बहुतेक सर्वच देशांत जास्त असल्याचे दिसले. ज्या पुरुषांनी अपरिचित महिलांवर बलात्कार केला होता त्यांनी स्वत:च्या बायकोवरही बलात्कार केल्याचे सांगितलेले आहे. काही पुरुषांनी पुरुषांवरदेखील लैंगिक जबरदस्ती केल्याची कबुली दिलेली आहे. या पुरुषांपैकी बहुसंख्य (७२ ते ९७ टक्के) पुरुषांना कोणतेही कायदेशीर परिणाम किंवा शिक्षा भोगावी लागलेली नाही. कारण बहुतेक देशांमध्ये विवाहांतर्गत बलात्काराची संकल्पना कायद्यात अस्तित्वातच नाही. अपरिचित व्यक्तींवर केलेल्या बलात्कारासाठी मात्र काही प्रमाणात शिक्षा झाल्याचे आढळून आले. अनेक बाबतीत जेव्हा पुरुषाला स्वत:ला सत्ताहीन असल्याचा अनुभव येतो तेव्हा आपली सत्ताहीनतेची भावना दूर करण्यासाठी तो कमी सामाजिक सत्ता असलेल्या स्त्रीवर हिंसा करून ताकदीचे प्रदर्शन करतो, असे या अहवालात नमूद आहे. १९७६ साली क्लारमॅट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीच्या सॅम्युअल डी. स्मिथमिन या मानसरोगतज्ज्ञाने आणि तेव्हा पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती.

या जाहिरातीत म्हटले होते की, ‘तुम्ही बलात्कारी आहात का? संशोधकांना तुमची ओळख न पटवता तुमचा अभ्यास करायचा आहे.’ या जाहिरातीनंतर त्यांना दिलेल्या क्रमांकावर प्रचंड प्रमाणात फोन आले. आपल्या गर्लफ्रेंडवर बलात्कार करणारे, आपल्या मित्राच्या बायकोवर बलात्कार करणारे, श्रीमंतांचा बदला घेण्यासाठी बलात्कार करणारे असे शेकडो फोन त्यांनी घेतले. त्यात त्यांना एक गोष्ट सामान्य आढळली की, हे लोक अत्यंत शांतपणे आणि सभ्यपणाने त्यांच्याशी बोलत होते. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा बलात्कार केला की तो पुन्हा करण्याची प्रवृत्ती या बलात्कारी लोकांमध्ये असते आणि ते अत्यंत लहान वयापासून हे सर्व करण्यास सुरुवात करतात. त्यातल्या अनेकांना संमतीशिवाय संभोग हा बलात्कार असू शकतो याची कल्पनाही नाही. त्यांच्या या संशोधनानंतर बलात्कारी पुरुषाला समजून घेण्यावर एकमत होऊ लागलं.

जर्मन शास्त्रज्ञ गेरहार्ड रोत यांनी केलेले संशोधन तर अतिशय रोचक आहे. त्यांच्या संशोधनानुसार माणसाच्या मनातली बलात्काराची आणि चोरीची भावना मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये असते आणि तिथून त्याला या दुष्कृत्यांची प्रेरणा मिळते. बलात्काराच्या भावनेचे एक मूर्त स्वरूप या शास्त्रज्ञाला आढळले आहे. या शास्त्रज्ञाने अशा काही दुष्कृत्ये करणार्‍या लोकांच्या विचारांच्या लहरींचे फोटो काढले आणि त्यांचे विश्लेषण केले. ते करत असताना काही लोकांच्या मेेंदूच्या पुढच्या भागात एक काळसर डाग आढळला. विशेष म्हणजे या डॉक्टरांना जेव्हा तो डाग आणि माणसाच्या मनातल्या दुष्कृत्याच्या भावना यांचा संबंध दिसून यायला लागला तेव्हा त्याने त्या डागावर उपचार करायला सुरुवात केली.

जोपर्यंत मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये तो डाग होता तोपर्यंत माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसून आला. शस्त्रक्रिया करून हा डाग काढून टाकल्यानंतर मात्र त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नियंत्रणात आली. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीने वागण्याची प्रेरणा मेंदूच्या एका भागात मूर्त रूपाने आढळली. मानवी भावनांचे मूर्त रूप सापडले, पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की मनात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीला लागली म्हणून हा डाग तयार झाला की डाग तयार झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली? यावर संशोधन व्हायला हवं. एकूणच बलात्काराचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर केवळ फाशीच्या शिक्षेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर वर्चस्ववादी पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल. तेव्हाच कुठे बालेश धनखरसारखी हुशार माणसं नराधम होणार नाहीत.

पुरुषांच्या मेंदूतील बलात्कारी प्रवृत्तीचा काळा किडा!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -