घर संपादकीय ओपेड चंद्रावर पोहोचलेल्या भारतीयांची ‘विवस्त्र’ होणारी माणुसकी!

चंद्रावर पोहोचलेल्या भारतीयांची ‘विवस्त्र’ होणारी माणुसकी!

Subscribe

मणिपूर हिंसाचार हे निमित्त झाले. पण देशभरात अशा घटना कुठे ना कुठे घडतच आहेत. पश्चिम बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील पांचला भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विवस्त्र करून संपूर्ण गावात तिची धिंड काढली. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण केली. राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात पतीने आपल्या गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करत तिची धिंड काढली. चंद्रावर यान पाठवलेल्या भारतीयांची विवस्त्र होणारी माणुसकी यातून दिसून येत आहे.

गेल्या महिन्यात न भूतो न भविष्यती असा पराक्रम भारताने घडविला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्यात इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आले. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यशस्वी मंगळ मोहिमेनंतर अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या मोहिमेतून भारताला महत्त्वाची माहिती प्राप्त होत आहे. त्यापाठोपाठ २ सप्टेंबर २०२३ रोजी इस्रोचे महत्त्वाकांक्षी ‘आदित्य एल-१’ सूर्याच्या दिशेने झेपावले. या कामगिरीबद्दल भारतीय संशोधकांचे, शास्त्रज्ञांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.

या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे समस्त देशवासीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. एकीकडे, अशी गौरवास्पद कामगिरी नोंदवली जात असतानाच देशात माणुसकीलाही लाजविणार्‍या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचारांनी तर परिसीमाच गाठली आहे. महिलांच्या बाबतीत पुरुषांची वृत्ती काय आहे? हे विविध घटनांनी वारंवार समोर येत आहेच. बलात्कार असो, मारहाण असो, निर्घृणपणे हत्या करून तिच्या देहाची लावलेली विल्हेवाट असो, ही माणसातील ‘हिंस्त्र’ वृत्ती कायम दिसतच आली आहे.

- Advertisement -

राजस्थानमधील घटना चीड आणणारी आहे. प्रतापगड जिल्ह्यात पतीने आपल्या गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करत तिला मारहाण केली. तिची तशीच धिंडही काढली. पीडित महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. पण, तिचे जवळच्या गावात राहणार्‍या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती प्रियकराबरोबर पळून गेल्याने दोन्ही घरचे कुटुंबीय संतापले. त्यांनी तिला पकडून पुन्हा गावात आणले आणि तिची धिंड काढली. या दुष्कृत्यात महिलेचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयदेखील सहभागी होते. देशांमधील अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे की, मणिपूरमधील घटनेनंतर त्या जास्त उजेडात यायला लागल्या आहेत? या वर्षाच्या प्रारंभी मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. दोन जाती-जमातींमधील संघर्षात अनेकांचे बळी गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक महिलांवर अत्याचार झाले. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ तर, मन सुन्न करणारा होता. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या दोन महिलांपैकी एक कारगिलमध्ये शौर्य दाखवणार्‍या एका जवानाची पत्नी होती.

मणिपूर हिंसाचार हे निमित्त झाले. पण देशभरात अशा घटना कुठे ना कुठे तरी घडतच आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशा दोन घटना घडल्याचे उघड झाले. हावडा जिल्ह्यातील पांचला भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विवस्त्र करून संपूर्ण गावात तिची धिंड काढली. याबाबत तिने पोलिसांतही तक्रार नोंदवली आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण करण्यात आली. मध्य प्रदेशातही अशा दोन घटनांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यात तर माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना वारंवार घडत आहेत. चोरीच्या संशयावरून एका तरुणाला विवस्त्र करून लाठाकाठ्या आणि पाईपने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर, २०१९ मधील लैंगिक छळाच्या प्रकरणावरून एका जमावाने पीडित मुलीच्या कुटुंबाला मारहाण केली. त्यावेळी त्या मुलीच्या आईला जमावाने विवस्त्र केले. भंडारा जिल्ह्यात ‘अंगात’ आलेल्या महिलेने कथितपणे जादूटोणा करणार्‍या चारजणांची नावे घेतली. तेव्हा गावकर्‍यांनी त्या चौघांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गावकर्‍यांच्या मारहाणीत चौघेही गंभीर जखमी झाले.

तर, सातार्‍यात चार्‍याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून एका महिलेला भर चौकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चौघांनी या महिलेला काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला. तसेच धारदार शस्त्राने तिच्यावर वारही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या आणि मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या या प्रकरणांनी तर मानवी संवेदना किती गोठून गेल्या आहेत, हे दाखवून दिले आहे. या घटना तर दिवसाढवळ्या हजारो नागरिकांच्या समक्ष घडल्या आहेत. पण त्या रोखण्यासाठी कुणीही पुढे आले नाही, हेच चकीत करणारे आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘पाच गुंडाचा तमाशा, आजूबाजूची पाच हजार माणसे सहन करतात.

वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे, असंही नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं, फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण या समाजात ‘पुरुषार्थ’ कुणालाच समजलेला नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय.’ महाभारतात द्रौपदीला द्युतात हरलेल्या पतींची पत्नी म्हणून कौरवांची दासी म्हणून कौरवसभेत ओढून आणले जाते. तिची विटंबना केली जाते. आजही दुसरे काय घडत आहे? राजस्थानमधील पीडित महिलेला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार नाही का? मणिपूर, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील त्या असहाय महिलांचा काय दोष होता? क्षुल्लक कारणावरून महिलेला सर्वांसमोर बडवणे, हा कसला पुरुषार्थ?

ठिकठिकाणी कौरवांची अशी सभा भरली आहे आणि एका असहाय्य महिलेच्या निर्‍यांना हात घातला जात आहे. दुर्दैवाने, त्यांची अब्रू वाचविण्यासाठी कृष्ण धावून आलेला नाही. पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी श्रेष्ठ गणला जात असला तरी, त्याच्या या कृती पशुत्वापेक्षाही हीन आहेत. स्त्रीची विटंबना करणारे जरी सुशिक्षित असले तरी, सुशिक्षित माणूस सुसंस्कारित असेलच असे नाही. त्यामुळे माणसातील पशुत्व माणुसकीपेक्षा वरचढ ठरते, याचीच ही उदाहरणे आहेत. महिलांविरोधी अत्याचारांना आळा घालण्याच्या दृष्टीने कितीही कठोर कायदे केले तरी, त्यांचा काहीही उपयोग नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतच राहणार. कारण, प्रत्येक कायदा हा, अमुक एक गुन्हा केल्यानंतर काय शिक्षा होईल, एवढेच सांगत असतो. पण तो गुन्हा करण्यापासून संबंधित कायदा परावृत्तही करत नाही आणि रोखतही नाही. शिवाय, कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात, त्या वेगळ्याच. म्हणजेच, एखाद्याच्या मनात गुन्हा करण्याचा विचार येण्यापासून रोखणारा कायदा हवा आणि तो अस्तित्वात येणे अजिबात शक्य नाही.

महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, छेडछाड, कारण नसताना डोकावणे, त्यांच्यावर नजर ठेवून असणे, पाठलाग करणे या बाबी असामाजिक आणि बेकायदा आहेत. पण त्या रोखणार्‍या कायद्यांची अंमलबजावणी करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण, प्रत्येक टप्प्यावर महिलेसमवेत होणारा व्यवहार, भाषा याची नोंद केली जाऊ शकते, पण नजरेचे काय? त्याला कसा आळा घालणार? येथे लेखक व. पु. काळे यांचा एक उतारा देतो, महाभारतात युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या अगोदर रथामधून उतरायला सांगितले. अर्जुनाला नवल वाटले तरी, कृष्णाचे ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा तो रथ जळून खाक झाला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितले, ‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता..’ आयुष्यभर स्त्रीदेहाचे रक्षण असाच कुणी अज्ञात श्रीकृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर, पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता…

भारतीय महिलांनी कशी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून मोठ्या कौतुकाने सांगितले. तरी, देशातील अनेक भागांत महिला अजूनही दडपणाखाली जगत आहेत. न पेक्षा त्यांना दडपणाखालीच ठेवले जात आहे, हेच वास्तव आहे. पण त्याचबरोबर, ही परिस्थिती नक्कीच बदलेल, असा एक आशावाद बाळगायला काहीच हरकत नाही. कारण, ‘देश बदल रहा है’. येथे भूतलावर बसून अवकाशातील ग्रहतार्‍यांची गणिते मांडणारे भारतीय आता थेट विविध ग्रहांवर यान पाठवून त्यांचा सखोल अभ्यास करत आहेत. चांद्रयान -२ मोहीम अपयशी ठरल्यानंतर भारतीय संशोधक आणि शास्त्रज्ञ खचून गेले नाही. ते पुन्हा तयारीला लागले. आधी अनाहूतपणे झालेल्या चुका टाळल्या आणि चांद्रयान -३ मोहीम यशस्वी केली. अशा चुकांमधून बोध आपण घेत आहोत. भलेही बुरसटलेल्या विचारांचा पगडा भारतीय समाजमनावर काही अंशी असला तरी, हे चित्र बदलू शकते. आपल्या सहवासात जी माणसे येतात, तेवढेच जग नाही. हे जग अजून चालले आहे, याचाच अर्थ हा की, इथे चांगले जास्त आणि वाईट कमी आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -