वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा घट्ट होतोय!

एकाच वेळी वाहने रस्त्यावर येऊ नयेत म्हणून शहरी भागात कार्यालयीन, तसेच शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना अधूनमधून होत असते, ज्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळा, कार्यालये एकाच वेळी सुरू किंवा बंद होत असल्याने वाहनांची गर्दीही रस्त्यावर एकाच वेळी होते. त्यामुळे वाहनांची कोंडी होणे हा नित्यनियम ठरून गेलेला आहे. वाहतुकीचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने वाहनांची गर्दी झाली की वाहतूक व्यवस्था क्षणात कोलमडून जाते. वाहतूक कोंडीच्या अजगराचा विळखा घट्ट होत जातोय, पण लक्षात कोण घेतो?

गेल्या १५-२० वर्षांपासून तज्ज्ञ इशारा देयायंत की वाहतूक कोंडीवर वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल, परंतु कोणी असा किंवा असे इशारा दिल्यानंतर आपल्याकडे एकतर त्याला मूर्खात काढले जाते किंवा दुर्लक्षित केले जाते. वाहने वाढल्यानंतर वाहतूक कोंडी ही होणारच, असे तर्कट पुढे आणले जाते. वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असताना योग्य प्रकारे पार्किंग सुविधा, प्रशस्त रस्ते याबाबत आपण खूपच मागे आहोत, ही वस्तुस्थिती आहे. पण आता अशी वेळ आलेयं की, वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष द्यावेच लागेल. वरकरणी ही समस्या मामुली वाटत असेल तर तो भ्रम ठरेल.

शिवसेनेचे दिवंगत नेते भ्रमंतीकार प्रमोद नवलकर यांनी त्यांच्या हयातीत अनेकदा, नव्हे शेकडो वेळा, मुंबईच्या वाहतुकीबद्दल शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. तीन तपापूर्वीपासून ते मुंबईची वाहतूक व्यवस्था भविष्यात कशी असेल आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, या संबंधी वर्तमानपत्रातून लिहीत होते. त्यावेळी मुंबईत एखाद दुसरा उड्डाण पूल होता. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन एकावर एक असे उड्डाण पूल बांधावे लागतील अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवून ठेवली होती. तेव्हा नवलकरांचे ते लिखाण अनेकांना ‘नवल’ वाटायचे. परंतु त्याची प्रचिती आता मुंबईत येऊ लागली आहे.

वाहतूक कोंडी मुंबईकरांच्या इतकी अंगवळणी पडलेय की त्या विरोधात कुणाच्या तोंडातून साधा ब्र ही बाहेर पडत नाही. मुंबईत आता तर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गर्दीच्या रस्त्यातून मेट्रोची कामे काढू नका, याकडे अनेकांनी लक्ष वेधले. राजकीय महत्वाकांक्षेमुळे मेट्रो प्रकल्प रेटला गेला. मुंबईत उड्डाण पुलांचे जाळे पसरले असले तरी वाहनांच्या वाढत्या संख्येला ते अपुरे ठरत आहेत. त्यामुळे नवलकर यांनी सांगितल्याप्रमाणे दुमजली उड्डाण पूल जागोजागी बांधण्याचे दिवस दूर नाहीत. मुंबईच्या वाहतुकीबद्दल ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त टी. चंद्रशेखरन यांनीही भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, वाहनांची संख्या लक्षात घेतली तर भविष्यात त्यांचे रेशनिंग करावे लागेल.

आज मुंबईसारखीच परिस्थिती मोठ्या, तसेच छोट्या शहरांतूनही झाली आहे. दररोज हजारो नवी वाहने रस्त्यावर येत असताना ती उभी कुठे राहतील याचे नियोजन बिलकूल नाही. मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात येणारी-जाणारी वाहने पाहिली की ही वाहने कुठे थांबत असतील किंवा कुठे थांबली होती, हा सवाल उपस्थित होतो. पुणे किंवा इतर शहरांतून सायकली जवळपास बाद होऊन त्याजागी इंधनावर चालणार्‍या दुचाकी आल्या आहेत. शहरात मध्यमवर्गीयांकडे दोन वाहने असणे यात विशेष असे काही राहिलेले नाही. मग ही वाहने कुठे जागा मिळेल तेथे उभी केली जातात. शहरांतून आता मोठ्या इमारतीत दोन-तीन मजले वाहनांसाठी आहेत.

ज्या इमारतीत अशी सुविधा उपलब्ध नाही तेथील वाहने रस्त्यावर उभी केली जातात. नवीन इमारत बांधताना वाहनांच्या पार्किंगसाठी जागा ठेवणे बंधनकारक असताना अनेकदा बिल्डर थोडी जागा वाहनांसाठी ठेवून इतर जागेत व्यापारी गाळे बांधून मोकळे होतात. यावर कुणीही आक्षेप घेत नाही. शहरात बाहेरून येणारी वाहने कुठे उभी करायची, ही समस्या गहन होत चालली आहे. कित्येकदा वाहनातील प्रवासी उतरवून चालक वाहन उभे करण्यासाठी कुठे जागा मिळतेय का हे पाहण्यासाठी तेथील गल्ल्यांतून घिरट्या मारत असल्याचे गमतीशीर दृश्य नजरेत येते. चुकून कुठे नाईलाजास्तव वाहन उभे केले तर पोलीस टो करून घेऊन जातात.

औद्योगिकीकरण आणि अन्य कारणांमुळे अनेक गावे शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तेथे वेडीवाकडी बांधकामे करून रग्गड पैसे कमाविण्याचा एक कलमी कार्यक्रम जोमात सुरू आहे. व्यापारी पेठांमधील पूर्वीचे प्रशस्त रस्ते बोळ वाटावे असे झाले आहेत. अशा या ‘बोळां’तून वाहने येऊ-जाऊ लागली की वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. बाजारात रस्त्यावरील पदपथांवरून व्यवसाय थाटून बसलेल्यांमुळे चालणे मुश्कील होते म्हणून रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न केला तर अस्ताव्यस्त वाहनांमुळे तेथूनही धडपणे चालता येत नाही. मूळ जागेपेक्षा पुढे येऊन व्यवसायासाठी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. तेथील स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असते. उलट बेकायदेशीररित्या रस्त्यावर दुकाने थाटलेल्यांकडून कराची पावती फाडली जाते. स्वाभाविक आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही याची त्यांना पक्की खात्री होते. पादचार्‍यांना चालण्यासाठी हक्काचे असलेले पदपथ अतिक्रमण करून गिळकृंत करायचे हा मोठ्या शहरातील कित्ता आता छोट्या शहरांतूनही गिरवला जात आहे.

एकाच वेळी वाहने रस्त्यावर येऊ नयेत म्हणून शहरी भागात कार्यालयीन, तसेच शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना अधूनमधून होत असते, ज्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळा, कार्यालये एकाच वेळी सुरू किंवा बंद होत असल्याने वाहनांची गर्दीही रस्त्यावर एकाच वेळी होते. त्यामुळे वाहनांची कोंडी होणे हा नित्यनियम ठरून गेलेला आहे. वाहतुकीचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने वाहनांची गर्दी झाली की वाहतूक व्यवस्था क्षणात कोलमडून जाते. सायंकाळी पनवेलहून मुंबईला जायचे असेल तर तासभराच्या प्रवासाला पुढे कितीही तास लागू शकतात. शनिवार, रविवार किंवा सुट्यांचे दिवस असतील तर तासन्तास रस्त्यावर ताटकळावे लागते.

वाहनांच्या लांबलचक रांगा लागणे हे आता ठरून गेलेले आहे. यात इंधनाची प्रचंड नासाडी होते. वेळेचा अपव्यय होतो हा भाग वेगळा! अत्यवस्थ रुग्णाला घेऊन निघालेली एखादी रुग्णवाहिकाही रस्त्यात खोळंबते. वाहतूक पोलीस नावाची यंत्रणा हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. बर्‍याचदा असे दिसते की वरातीमागून घोडे तसे या पोलिसांबाबत घडते. पोलीस नसतात तेव्हा प्रवासीच वाहतूक पोलिसाची भूमिका बजावत असतात. वाहतूक पोलीस यंत्रणा वाहतुकीला शिस्त लावते म्हणजे नेमके काय करते, याचा लेखाजोखा समोर यायला पाहिजे. पावती फाडून, दंड आकारून किंवा (अनेकदा) तडजोड करून वाहतुकीला शिस्त लागेल, असे जर वाहतूक पोलीस यंत्रणेला वाटत असेल तर मग आनंद आहे.

वाहतूक थांबली की पोलीस आणि प्रवाशांची हुज्जत होण्याचे प्रसंग घडतात. अनेकदा पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत मजल जाते. अर्थात याचे समर्थन कधीच होऊ शकणार नाही. काही वेळेला असेही होते की पोलीस एखादी गोष्ट फारच ताणून वाहन चालक आणि प्रवाशांना जेरीस आणतात. वाहतूक समस्येमुळे इतर समस्या उभ्या ठाकत असल्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही सुविधा धडपणे नसताना इतकी वाहने रस्त्यावर उतरूच कशी दिली जातात, हा प्रश्न कुणाला विचारण्यात अर्थ नाही. नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असला की समस्या उद्भवणारच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वाहतुकीबाबत कुणी सूचना केल्या तर त्या मनावर घेतल्या जात नाहीत. मग प्रवासीही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत असतात. किंबहुना, बेशिस्त वाहतुकीचा त्रास त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. गेले वर्षोनुवर्षे येनकेन प्रकारे वाहतूक व्यवस्थेचे मातेरे झालेले आहे. कुणी सांगावे, की मी घरातून निघाल्यानंतर इच्छित स्थळी वेळेत पोहचलो!

ज्या सुसाट प्रवासाचे स्वप्न दाखवून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार झाला तो वारंवार वाहतूक कोंडीच्या कचाट्यात सापडत आहे. मुंबई ते पुणे हे अंतर या मार्गावरून अवघ्या दोन तासांवर आले असले तरी सायनहून देहू रोडपर्यंत पोहचण्यासाठी दुप्पट, तिप्पट तास लागत आहेत. काही वेळेला हा कालावधी ८ ते १० तासांच्या पुढे असतो. सुट्टीच्या वेळी हा मार्ग ठप्प होतो. वाहतुकीची कोंडी होत असल्याने नवनवे प्रयोग या मार्गावर राबवले जात असले तरी वाहतूक कशा पद्धतीने असावी याचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी होते. पूर्वी नाशिक मार्गावर कसारा, सातारा मार्गावर कात्रज, खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी ठरून गेलेली असायची. त्यावर उपाय शोधून पर्यायी मार्ग अस्तित्वात आले. मात्र शहरी भागातून वाहतूक संथगतीने होत असल्याने नवीन मार्ग असूनही उपयोग होत नाही, असे म्हणण्याची वेळ येत असते. वाहतूक कोंडीमागे अनेक कारणे असताना आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. यामुळे पुढे एकाच ठिकाणी वाहने मोठ्या प्रमाणावर येऊन वाहतूक कोंडीचा त्रास होतो.

अर्थात, वाहतूक कोंडीचा त्रास हा सर्वसामान्यांनाच होत असतो. आपल्या देशात वाहतूक कोंडीत एखादा नेता अडकलाय असे कधीतरीच घडते. साधा मंत्री जायचा असला तरी दम लागेपर्यंत शिट्टी फुंकत पोलीस रस्ता मोकळा करून देतात. एरव्ही वाहतूक कोंडीला फुकटात हातभार लावणारे टोल नाकेही मोकळे केले जातात. हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारासारखा वाटतो. असा चमत्कार रोज घडावा, अशी भोळीभाबडी अपेक्षा वाहतूक कोंडीचा सामना करणारे वाहनचालक, प्रवासी करीत असतात. वाहतूक कोंडीची ही जागोजागची समस्या पाहिल्यानंतर सामान्यांच्या वेळेला काही महत्त्व आहे की नाही तेच समजत नाही. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन नेहमी केले जाते. पण तेथील बेशिस्त गर्दीत जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या वाहनातूनच जाणे परवडले, अशी कित्येकांची मानसिकता आहे. ही सार्वजनिक वाहने वेळेत पोहचतील का, हाही भाग आहेच.

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशस्त रस्ते हे जसे महत्त्वाचे आहेत, तसेच रस्त्याच्या बाजूने होणारी अतिक्रमणे समूळ नष्ट केली पाहिजेत. वाहन चालविणे म्हणजे मनमानी नाही हे बेताल चालकांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उचललाच पाहिजे. वाहतूक पोलीस यंत्रणा ही रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सोयीने नव्हे तर सदैव कार्यरत असावी. बाजूला जाऊन तोडपाणी करण्याचे उद्योग थांबले की वाहतूकही सुरळीत राहील. कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाहने असतील तर ती एकाच वेळी रस्त्यावर उतरली पाहिजेत, हा बालहट्टही थांबला पाहिजे. वाहतूक कोंडीला हातभार लावणार्‍या शहरांतील शाळा, कार्यालयांच्या वेळांमध्ये कुठेतरी सुसुत्रता पाहिजे. वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे, असे समजले तरच ही कोंडी फोडण्यासाठी त्यावर प्रभावी उपाय सापडतील.