घरसंपादकीयओपेडशिवसेनेची वाटचाल रिपाइंच्या मार्गाने होणे हे दुर्दैव!

शिवसेनेची वाटचाल रिपाइंच्या मार्गाने होणे हे दुर्दैव!

Subscribe

शिवसेनेची स्थापना सर्वसामान्य मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्यहक्कांसाठी झालेली होती. मराठी माणसांंच्या या संघटित शक्तीमुळे अनेक सामान्य मराठी माणसांनी राजकारणात सहभागी होऊन प्रगती केली, इतकेच नव्हे तर मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी माणसाच्या आवाजाची दखल घेतली जाऊ लागली. पण अलीकडच्या काळात शिवसेनेत फूट पडून त्यातून विविध गट स्थापन झाले, त्यातून ही संघटना आज भाजप आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. एकेकाळी विविध राज्यांमध्ये प्रभाव असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये फूट पडून त्याचे आज सुमारे ४० गट पडले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला. शिवसेनेची वाटचाल रिपाइंच्या मार्गाने होत असेल तर ते मराठी माणसांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

समाजातील जातीय आणि आर्थिकदृष्ठ्या मागास राहिलेल्या समाज घटकांना राजकीय व्यासपीठ मिळून त्यांना त्यांचे न्याय्यहक्क मिळवता यावेत, म्हणून एकेकाळी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे रिपाइंची आज सुमारे ४० गटांमध्ये विभागणी झालेली आहे. आंबेडकरी विचारांच्या अनेक नेत्यांनी आम्हीच खरी रिपाइं असा दावा करत रिपाइंच्या नावासमोर आपल्या आडनावाचे सुरुवातीचे अक्षर वापरून वेगळा गट किंवा पक्ष स्थापन केला. त्यातून समाजातील मागास वर्गाला संघटित होऊन विकासाचा मार्ग दाखवणारा रिपाइं अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला. त्यामुळे त्या पक्षाची ताकद कमी झाली. परिणामी रिपाइंचे काही गट मोठ्या पक्षाच्या दावणीला बांधले गेले, तर काही नेते स्वतंत्रपणे एकाकी लढत देत राहिले.

याचा फायदा मोठ्या पक्षांना व्हायला लागला. कारण रिपाइंच्या छोट्या छोट्या गटांचा प्रभाव पडत नसल्यामुळे त्यांना दावणीला बांधणे सोपे झाले. यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे रिपाइं या पक्षाच्या प्रभावाखाली जो समाज येतो, त्याच्या संघटित शक्तीला बाधा आली, त्या संघटितपणातून जे मोठे ध्येय गाठायला हवे ते त्यांना शक्य होत नाही. शिवसेनेत गेल्या काही वर्षात होत असलेल्या घडामोडी आणि फाटाफूट पाहिल्यावर या सर्वसामान्य कष्टकरी, झोपडपट्टी, चाळींमध्ये राहणार्‍या मध्यम आणि निम्न मध्यम वर्गातील लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची वाटचालही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्गाने तर होत नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

शिवसेनेची स्थापना ही मुंबईत झाली. त्यानंतर त्या पक्षाचा प्रसार राज्याच्या इतर भागात झाला. या पक्षाला बरेचदा शहरी पक्ष मानले जाते. किंबहुना, त्यांच्या विरोधात असलेले राजकीय नेते त्यांच्यावर शहरी पक्ष म्हणून टीका करतात, ज्यांच्या पक्षांना ग्रामीण भागात आधार आहे, त्या पक्षाचे शरद पवारांसारखे नेते शिवसेनेच्या नेत्यांना रताळे जमिनीच्या खाली लागते की, वर हेदेखील या लोकांना माहीत नाही, अशी टीका करत राहिले. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून मराठी लोक मुंबईत पोटापाण्यासाठी येतात. कारण गावात आर्थिक उत्पन्नांची साधने नसतात किंवा असली तर ती अतिशय तुटपुंजी असतात. काही गावांमध्ये दुष्काळ असतो, पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, तर शेती कुठून पिकवणार, शेती परवडत नाही, पिकवले तर ते विकले जात नाही, त्याला चांगला भाव मिळत नाही, तसेच गावात शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी मुंबई-पुण्याचा मार्ग धरावा लागतो.

असे हे मराठी लोक मुंबई गाठतात, त्यामुळे मुंबईत या सगळ्या गरजवंताचा महाराष्ट्र एकवटत असतो. त्यांना पोटापाण्याची भ्रांत असते. मुंबईत आलेल्या या लोकांना बैठ्या वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये रहावे लागते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असतो, तसेच काही वेळा अन्य राज्यांमधून आलेल्या लोकांची आणि व्यावसायिकांचा दादागिरी असते, त्याला तोंड द्यावे लागते. इतर राज्यांमधून लोक येऊन इथल्या नोकर्‍या बळकावत असतात. राज्यातील भूमिपुत्र म्हणून त्यावर पहिला हक्का हा इथल्या मराठी माणसांचा असायला हवा, कारण प्रत्येक राज्यात तिथल्या भूमिपुत्रांना नोकर्‍यांमध्ये पहिला हक्क असतो. महाराष्ट्रभरातून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेल्या मराठी माणसांसाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम गेली ५६ वर्षे शिवसेनेनेे केले.

- Advertisement -

स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून स्थानिकांचा रोजगारांवर पहिला हक्क असतो, तो शिवसेनेने अनेक मराठी तरुण-तरुणींना मिळवून दिला. त्यामुळे शिवसेनेवर त्यांच्या राजकीय विरोधकांनी शहरी पक्ष म्हणून टीका केली असली तरी महाराष्ट्रभरातून मुंबईत आलेल्या गरजवंत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेना लढत राहिलेली आहे. त्यामुळे शिवसनेने मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या राज्यभरातील सगळ्याच मराठी माणसांचे नेतृत्व केले. अनेक सरकारी आणि खासगी कंपन्या, बँका, हॉटेल्स अशा विविध आस्थापनांमध्ये शिवसेनेने मराठी तरुण-तरुणींना नोकर्‍या मिळवून दिल्या. त्यासाठी काही वेळा शिवसेनेला दांडगाईचाही वापर करावा लागला, पण अनेकांना नोकर्‍या मिळाल्या. कुणाला काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो शिवसेनेच्या नावाने सुरू करणे शक्य झाले. गेल्या ५६ वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेने अनेक मराठी माणसांना आर्थिकदृष्ठ्या आपल्या पायावर उभे केले.

देशभरात जेव्हा कुठली धार्मिक उद्रेकाची घटना घडते तेव्हा त्याचे मोठे पडसाद मुंबईत उमटतात, त्यावेळी मराठी माणसांच्या रक्षणासाठी शिवसेना सज्ज असते. अशा या शिवसेनेला स्थापनेपासून फुटीचे अनेक धक्के बसत गेले. छगन भुजबळ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत होते, त्यांनी शिवसेनेतून बंड पुकारून शिवसेनेला पहिला दखलपात्र धक्का दिला. बाळासाहेब हयात असताना, शिवसेनेतून बाहेर पडून एकट्याला अस्तित्व टिकवणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या शरद पवार यांचा आश्रय घेतला. त्यानंंतर नवी मुंंबईतील शिवसेनेचे प्रमुख नेते गणेश नाईक बाहेर पडले, त्यानंतर नारायण राणे बाहेर पडले, त्यानंंतर या सगळ्यांनी बाहेर पडताना सोबत आपले काही समर्थक आमदार, नगरसेवक नेले. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला.

शिवसेनेला मोठा धक्का बसला तो राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला तेव्हा. कारण जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार समजले जात होते, पण पक्षांतर्गत नेतृत्वबदल झाल्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. ज्यांचा आजवर शिवसेनेमध्ये वावर आणि प्रभाव होता, त्यातही ठाकरे आडनावाची व्यक्ती बाहेर पडल्यामुळे त्यावेळी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फारच दुखावले गेले होते. राज ठाकरे बाहेर पडल्यामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली. कारण पुढे राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवडणुका लढल्या तेव्हा त्यांनी मुख्य लक्ष्य शिवसेनेला केले, त्यामुळे त्यांना जरी जागा जिंकता आल्या नाही, तरी त्यांनी निवडणुकीत शिवसेनेची मते खाल्ली, त्यामुळे त्या पक्षाच्या उमदेवारांचे नुकसान झाले किंवा त्यांचे उमेदवार पडले. या गटाबाजीमुळे शिवसेनेची ताकद कमी होत राहिली.

२०१९ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती कल्पनेच्या पलीकडे बदलली. शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी अनपेक्षित निर्णय घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. खरे तर शिवसेना ही कायमच काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात राहिलेली होती. शरद पवार हे मुळचे काँग्रेसचे. त्यामुळे अशा काँग्रेसींच्या विरोधात कायम लढलेल्या शिवसेनेेने त्यांच्याशी आघाडी करणे हा केवळ भाजपच नव्हे सर्व शिवसैनिकांना मोठा धक्का होता. पण मुख्य नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही बोलता येत नाही. शिवसेना हा सुरुवातीपासून हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यांचे शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारे आहेत. तर काँग्रेस हे सुरुवातीपासून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात आहेत. अशा या दोन विरोधी विचारसरणी सत्तेसाठी एकत्र आल्या. नेत्यांना सत्ता आणि पदे मिळाली, पण स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते संभ्रमित झाले आणि घोळ निर्माण झाला.

त्यांचा वैचारिक गोंधळ झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्यंतरी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात चौथ्या क्रमाकांवर फेकली गेली. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, तोच पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, याची खंत शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना वाटू लागली होती. त्यातूनच पुढे निवडणूक कशी लढवायची आणि निवडून कसे यायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यातूनच मग शिवसेनेतील नाराज मंडळी एका बाजूला येऊ लागली. नेमके हेच भाजपने हेरले आणि त्यांना अप्रत्यक्षपणे हवा दिली. त्यातूनच पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन करून आपणच खरी शिवसेना असा दावा केला. त्यातून शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. ही फूट अगदी वरपासून खालपर्यंत पडली. ती अगदी शाखा पातळीपर्यंत पोहोचली. त्यामुळे कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडून यापूर्वी या पक्षात कधी लढली गेली नाही तेवढी मोठी न्यायालयीन लढाई लढली गेली आणि ती अजूनही संपलेली नाही. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आता त्यांना दोन वेगळी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत.

यातून तळागाळापर्यंतचा सर्वसामान्य कार्यकर्ता केवळ विभागला गेला असे नव्हे तर कालपर्यंत एका ताटात जेवणारे एकमेकांचे वैरी झाले आहेत. त्यातूच चुन चुन के मारेंगे, अशी धमक्या एकमेकांना देण्यात येत आहेत. मुंबईत दादर-प्रभादेवी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी एकमेकांना खिजवण्याच्या नादातून शिवसेनेच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. गोळीबार केल्याचा आरोप झाला. पुढे जेव्हा निवडणुका लढल्या जातील तेव्हा भाजपसोबत असलेला शिंदे गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले नारायण राणे, पूर्वी शिवसेनेत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ असा सगळा मूळ शिवसेनेतील लोकांमध्येच लढा चालणार आहे.

गेल्या ५६ वर्षांत शिवसेनेचे किती तुकडे झाले हेच यातून दिसून येते. ही प्रक्रिया पुढे कितीपर्यंत जाणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसाला पडतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, आणि त्याच वेळी मुंबईतील सामान्य मराठी माणसांचा टक्का कमी होऊन तो मराठी माणूस नालासोपारा, विरार, बदलापूर, टिटवाळा इकडे फेकला जात आहे. शिवसेनेतून काही लोक पुढे आले,त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, पण बहुसंख्य सामान्य मराठी माणूस हा सकाळ-संध्याकाळ भरगच्च लोकलमधून लटकून नोकरीवर पोहचणारा नोकरदारच आहे. त्याला आता मुख्य मुंबईत राहणेे परवडत नाही.

त्याचे दिवसाचे सहा तास प्रवासातच जातात. अशी परिस्थिती असताना सामान्य मराठी माणसाचा आधार समजल्या जाणार्‍या शिवसेनेचे रिपाइंसारखे तुकडे पडत आहेत. असे तुकडे पडणे शिवसेेनेच्या विरोधात असलेल्यांसाठी फायद्याचे आहे. कारण त्यातून त्यांचा राजकीय हेतू साध्य होणार आहे, पण त्यामुळे मराठी माणसाची विशेषत: मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत असलेली संघटित शक्ती कमकुवत होत आहे. ही खरे तर झोपडपट्ट्या, चाळींमध्ये राहणार्‍या श्रमजीवी मराठी माणसांसाठी धोक्याची घंटा आहे. याचा मुळात शिवसेनेतून आलेल्या सगळ्याच नेत्यांनी विचार करायला हवा. ही फुटीची प्रक्रिया थांबून शिवसेना पुन्हा संघटित होणे ही सामान्य मराठी माणसांसाठी काळाची गरज आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -