वसई-विरार बनतेय गुन्हेगारीचे हॉटस्पॉट!

विविध गुन्ह्यांकरता कुख्यात असलेले नालासोपारा आता अमली पदार्थनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरतेय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थविरोधी सेलने गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईत नालासोपारा पश्चिमेकडील सीताराम बिल्डिंग चक्रधरनगर परिसरातून तब्बल चौदाशे कोटी रुपये किमतीचे सातशे किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात झारखंडमधील मोस्ट वाँटेड नक्षलवाद्याला एटीएसने अटक केल्यामुळे नालासोपारा शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या दोन घटनांनी वसई-विरार परिसर पुन्हा एकदा हादरून गेला आहे.

वसई विरार परिसराला गुंडगिरी नवी नाही. पण, आता तर गुंडगिरीचा थेट सर्वसामान्यांनाही त्रास होताना दिसत आहे. मुंबईच्या वेशीवर असल्याने वसई विरार परिसरात अतिशय वेगानं नागरीकरण झालं. जमिनीचे भाव गगनाला पोचल्याने बिल्डिंग व्यवसाय जोमात आहे. त्यातून जमिनीचे वादविवाद आणि बक्कळ पैशाने मुंबईतीलच नव्हे तर देशातील अनेक नामचीन टोळ्यांचं याभागात लक्ष गेलं. आणि पाहता-पाहता त्यांची पाळंमुळं वसई विरार परिसरात घट्ट रुजली. त्याला राजकीय आणि पोलिसांचं पाठबळ मिळाल्याने आता वसई विरारमधील गुंडगिरीने अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यात झाली. जमिनी बळकावणे, खून, मारामार्‍या, लुटमारी, बलात्कार, अपहरण यासह अमली पदार्थांच्या व्यापारातही हा परिसर आता मागे राहिलेला नाही.

विरारमधील चाळबिल्डर निशांत कदम आणि समय चौहान हत्याकांडानंतर वसई विरारमध्ये परराज्यातील अनेक नामचिन गँगचे हस्तक कार्यरत असल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं होतं. यातील समय चौहान हत्त्याकांडानंतर कुख्यात सुभाषसिंग ठाकूरचा थेट हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. पण, त्याला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरल्याने सुभाषसिंग टोळीची ताकद किती मजबूत आहे, हेही समोर आलं आहे. समय चौहान हत्याकांडानंतर यातील कुख्यात आरोपी ताब्यात घेतल्यावर त्यांचा या परिसरातील काही हत्याकांडात सहभाग असल्याचंही उजेडात आलं आहे. २६ फेब्रुवारीला भरदुपारी, भररस्त्यात विरारमधील चाळबिल्डर समय चौहान याची हत्या करण्यात आली होती. त्याआधी चाळबिल्डर निशांत कदम याची हत्या करण्यात आली होती.

त्यात समय चौहानच्या भावाला अटक करण्यात आली असून समयकडेही संशयाने पाहिलं जात होतं. समयच्या हत्येत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन सुभाष सिंग ठाकूर याचा सहभाग आढळून आला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला विरारमध्ये आणण्यासाठी गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश न्यायालयात अटक वॉरंट सादर केले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. समय हत्याकांडातील मारेकरी उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसून आलं आहे. तपासात खंडणी नाकारली म्हणून हत्या सुभाषसिंगनेच घडवून आणल्याचंही समोर आलं आहे. असं असलं तरी मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांना सुभाषसिंग ठाकूरला ताब्यात घेण्यात अद्याप यश आलेलं नाही.

उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असलेला सुभाष सिंग ठाकूर वसई-विरारमधल्या बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळत होता. मृत समय चौहान विरारच्या एका पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ११ इमारती बांधत होता. त्यासाठी प्रत्येक इमारतीमागे २५ लाखांची खंडणी ठाकूर याने मागितली होती. मात्र समयने त्याला नकार दिला होता. यामुळे त्याने हत्या करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी वाराणसी जिल्ह्यातील चित्तापूर चौकातून पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या मदतीने राहुश शर्मा आणि अभिषेक सिंग यांना अटक केली आहे. याप्रकरणातील तिसरा आरोपी मनिष सिंग या २१ मार्च रोजी उत्तर पोलिसांबरोबर झालेल्या पोलीस चकमकीत मारला गेला होता. राहुल शर्मा हा कुख्यात गुंड असून त्याने ३ हत्या केल्या आहेत. मागील ९ वर्षांपासून तो फरार होता. त्याने वांद्रे येथे अजिल शेख आणि विजय पुजारी तर भाईंदरमध्ये बंटी प्रधान या तिघांच्या हत्या केल्या होत्या.

तसं पाहिलं तर वसईत विशेषतः नालासोपारा परिसरात मुंबईतीलच नव्हे तर देशातील अनेक नामचिन गुंडांचा आश्रय असतो, हे अनेकदा पोलीस कारवाईवरून उजेडात आलं होतं. आता तर बेकायदा बांधकामांमुळे प्रत्येक टोळ्यांचे हस्तक वसईत सक्रीय झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सुभाषसिंग ठाकूर टोळीशी संबंधित आहेत. ठाकूर टोळीचा वसई विरारसह मीरा भाईंदरमध्ये अनेक वादग्रस्त जमिनीशी संबंध आहे. समय चौहान हत्याकांडानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आलेली आहे.

हे कमी म्हणून की काय वसईतील नालासोपारा शहर अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीचे मुख्य ठिकाण बनू लागलं आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थविरोधी सेलने गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईत नालासोपारा परिसरातून तब्बल चौदाशे कोटी रुपये किंमतीचे ७०० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यामुळे नालासोपारा हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याकारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक सुशिक्षित तरुण हा कारखाना चालवत असल्याचं उजेडात आलं आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कारभाराकडेही संशयाने पाहिलं जात आहे. नालासोपारा परिसरात फक्त एमडीच नव्हे तर गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन अशा अमली पदार्थांचाही व्यापार होत असल्याचं पोलीस कारवाईतून अनेकदा समोर आलेलं आहे. त्याचबरोबर एलएसडी, एमडीएमल, एक्स्टसी गोळ्या, सिरप यांचीही मोठी मागणी असल्याचं दिसून आलेलं आहे.

मुंबई आसपासच्या परिसरातील रासायनिक कारखान्यातून तयार करण्यात येणारे आणि सहज उपलब्ध होणारे एमडी ड्रग्ज शहरातील कॉलेज आणि झोपडपट्टी परिसरांसह बहुतांश ठिकाणी पुरवले जाते. हेरॉईन अफगाणिस्तान येथून इराण व्हाया न्हावा-शेवा मार्गे हे ड्रग्ज मुंबईत येते. धारावी, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि पश्चिम उपनगरांतून याचा पुरवठा होत आहे. आंध्र प्रदेश, झारखंड आणि ओडिसामध्ये तयार होणारा गांजा ठाण्यातील उत्तनमार्गे मुंबईत आणला जातो. धुळे, जळगाव, शिरपूर, उत्तन भागात याची अवैध पद्धतीने गांजाची शेती करुन पुरवठा करण्यात येतो. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि नेपाळ भागातून पुरवठा होणार्‍या चरसचे मुंबईत कुर्ला, वर्सोवा, माटुंगा, अंधेरी, डोंगरी, भायखळा, ठाणे येथे सप्लाय सेंटर आहेत. कोकेनची नायजेरियन ड्रग्ज तस्करांकडून मोठ्या प्रमाणात याची तस्करी होत असून मीरारोड, नालासोपारा, खारघर, उलवे, चकाला, अंधेरी, वांद्रे, पायधुनी, डोंगरी, मानखुर्द परिसरात ते ड्रग्ज विक्री करतात.

त्यामुळे मुंबईतूनच वसई विरार परिसरात अमली पदार्थांचा सहजपणे पुरवठा होताना दिसते. नालासोपारा शहरात प्रगतीनगर हा नायजेरियन नागरिकांची मोठी वस्ती असलेलं ठिकाण आहे. कोणतीही कागदपत्रे नसतानाही नायजेरियन नागरिक याठिकाणी वास्तव्याला असून खुलेआम अमली पदार्थाचा व्यापार करतानाही दिसत आहेत. दर महिन्याला अमली पदार्थ विक्री करताना नायजेरियन नागरिकांवर कारवाई होत असते. मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थही जप्त केला जातो. मागच्या महिन्यात तर पोलिसांनी नायजेरियन नागरीकांचा प्रगतीनगरमधील बेकायदा बारही उध्वस्त केला आहे. नायजेरियन नागरिक फक्त अमली पदार्थच नव्हे तर देहव्यापार्‍यातही सक्रीय असल्याचं गेल्याच महिन्यात झालेल्या पोलीस कारवाईतून समोर आलेलं आहे. काही महिन्यात दोन नायजेरियन नागरिकांच्या हत्या झालेल्या आहेत. असं असताना नायजेरियन नागरिकांच्या कारवायाना आळा घालण्यात पोलीस अपयशी का ठरतात, हा सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न आहे.

नायजेरियनच्या वास्तव्याला एकट्या पोलिसांनाच जबाबदार धरून चालणार नाही. प्रगतीनगरमधील अनेक बिल्डर आणि घऱमालकांनी जास्तीच्या भाड्याच्या लालसेपोटी नायजेरियन नागरिकांना घरं भाड्याने दिली आहेत. याभागात सहजपणे घरं मिळत असल्याने नायजेरियनांची वस्ती वाढून गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याचाच त्रास आपणालाही होत आहे, याकडे अजूनही लालची लोकं गंभीरपणे पाहताना दिसत नाहीत. मध्यंतरी पोलिसांनी भाड्याने घर देताना पोलीस ठाण्यात नोंदणी करण्याचं बंधनकारक केलं होतं. काही भाडेकरूंवर गुन्हेही दाखल करण्यात आले होतं. पण, ही कारवाई मध्येच थांबल्याने, पोलिसांनी त्याची गंभीरपणे अंमलबजावणी न केल्यानं भाडेकरार नोंदणी केली जात नसल्याचंही दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे परदेशी नागरिकांवर कारवाई केल्यानंतर पुढील कार्यवाही किचकट, पैसे खर्च करणारी आहे. बेकायदा वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकाला हद्दीबाहेर घालवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. त्यासाठी पोलीस खात्यातून लगेचच पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कारवाईनंतर पदरमोड करून खर्च करणं पोलिसांना परवडणारं नसल्यानं गंभीरपणे कारवाया होत नाहीत. त्याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे परदेशी नागरिक घेताना दिसत आहेत.

अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात, अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यांचच यातून दिसून येतं. नालासोपारा हे आता परराज्यातील कुख्यात नक्षलवाद्यांनाही लपून राहण्यासाठी अतिशय सुरक्षित ठिकाण तर नाही ना अशी शंका नक्षलवादी कारू यादवच्या अटकेनंतर व्यक्त होऊ लागली आहे. नालासोपार्‍यातील एका चाळीत झारखंडमधील मोस्ट वाँटेड नक्षलवादी कारू यादव याने आसरा घेतल्याचं एटीएसच्या कारवाईनंतर उजेडात आलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो येथील बेकायदा चाळीत मुलगी आणि जावयाच्या भाड्याच्या घरात रहात होता. वैद्यकीय उपचारासाठी आल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं असलं तरी दोन महिन्यांहून अधिक काळ वास्तव्यात असलेल्या कारू यादवला पकडण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरले, हे वास्तव आहे.

बड्या टोळ्यांना राजकीय वरदहस्त लाभलेला असतो. सत्ताधारी, राजकीय नेत्यांकडून स्वतःच्या फायद्यासाठी गुन्हेगारांना आश्रय देऊन गुन्हेगारीचं उदात्तीकरण करत आहेत, हे वास्तव आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते प्रकर्षानं जाणवलं. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचार फेर्‍यांमध्ये किशोर गरिकापट्टीपासून अनेक नामचीन टोळीचे हस्तक फिरताना पाहून वसईकरांच्या मनात धडकीच भरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शर्मा यांच्यासाठी अनेक वादग्रस्त आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी नालासोपार्‍यात तळ ठोकून बसले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी शर्मा यांच्या निवडणुकीत खुलेआम प्रचार करत असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला त्यावेळी निलंबितही केलं होतं. पण, गौरव सिंग यांची बदली झाल्यानंतर तो अधिकारी पुन्हा वसईतच मोठ्या दिमाखात रुजू झाला. त्यावेळी जर प्रदीप शर्मा विजयी झाले असते तर प्रचारामध्ये सामील झालेले गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी याच परिसरात ठाण मांडून बसण्याचीच भीती जास्त होती. म्हणूनच की नालासोपारावासियांनी शर्मा यांना नाकारलं असावं. एकंदरीत सध्या घडत असलेल्या घटना पाहता वसई विरारमध्ये गुन्हेगारीने पाळंमुळं किती घट्ट रोवली आहेत, हेच वास्तव नजरेसमोर येतं.