घरसंपादकीयओपेडतुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!

तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी पुढील वाटचाल ही तितकीशी सोपी नाही, असे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे असे दिसते, तसे संकेत त्यांनी धूलिवंदनाच्या दिवशी दिले. पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोरही पुन्हा संघटना उभारण्याचे मोठे आव्हान आहे. दोघांनाही आपल्या मर्यादा आणि गरज लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळेच तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशीच दोन्ही बाजूंची स्थिती झालेली दिसत आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन भाजपची सत्ता आणण्यासाठी अडीच वर्षे सातत्याने झटणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या धूलिवंदनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पॅचअपचे संकेत दिले, त्याचवेळी आपल्या हातात आता काहीही नाही, माझे हात रिकामे आहेत, हे खेड येथील सभेत सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांनीही आपली वास्तविकता सगळ्यांसमोर मांडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार घालवल्यावर देवेंद्र फडवणीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते की, आमच्याशी दगा करणार्‍यांचा आम्ही सूड घेतला, पण भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर ठाकरेंच्या विरोधात नेहमीच आक्रमक असलेले फडणवीस आता धूलिवंदनाच्या दिवशी मात्र माफीच्या आणि दोस्तीच्या रंगात रंगून जाण्याचे संकेत देताना दिसले. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले, पण खरे तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

कारण शेवटी भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला आणि आज त्यांच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे करिश्मा असलेले नेतृत्व असले तरी प्रादेशिक पातळीवर आपल्याला मर्यादा पडतात हे त्यांना लक्षात घ्यावे लागत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद ओळखून भाजपने त्यांच्या बंडासाठी पोषक वातावरण निर्माण केले, त्यांचा भाजपची सत्ता राज्यात आणण्यासाठी वापर केला, पण गेल्या आठ महिन्यात फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांना हे लक्षात येत आहे की, शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याकडून सगळे काही हिरावून घेतले तरी त्यांचे ठाकरे हे आडनाव आणि लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती हिरावून घेणे शक्य होत नाही. थोडक्यात, काय तर शिंदेंना ठाकरे बनवता येत नाही, इथेच भाजपची कोंडी झालेली आहे. त्यामुळे शिंदे हे काही लंबी रेस का घोडा नाहीत, शिंदेंच्या सोबतीने आपल्याला राज्यातील सत्ता मिळवता आली तरी पुढील काळात विविध पातळ्यांवरील होणार्‍या निवडणुकांना सामोरे जाणे फायदेशीर ठरेल असे दिसत नाही.

- Advertisement -

आपल्या देशात लोकशाही असली तरी भाजपचा अपवाद सोडला तर बहुतेक सगळे राजकीय पक्ष विशिष्ट आडनावांशी जोडलेले आहेत. ती आडनावे बाजूला केली तर लोक त्या पक्षाला फारसा प्रतिसाद देत नाहीत. गांधी हे आडनाव बाजूला काढले तर काँग्रेस उभा राहू शकत नाही. महाराष्ट्रात पवार हे आडनाव बाजूला केले तर राष्ट्रवादी काँग्रेस उभा राहू शकत नाही. तसेच ठाकरे हे आडनाव बाजूला काढून शिवसेना हा पक्ष उभा राहू शकत नाही. निवडणूक आयोगाने कागदोपत्री शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे गटाला दिला असला तरी लोकांच्या मनात शिवसेना हा ठाकरे यांचाच पक्ष आहे हीच भावना आहे, ती कशी पुसणार हे भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. तिथेच भाजपची गाडी अडत आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत यावेळी भाजपला मिळवायची आहे. गेल्या वेळी काही नगरसेवक कमी पडल्यामुळे भाजपला सत्ता मिळवता आली नाही. त्यात शिवसेेना हाच त्यांच्यासाठी अडसर होता, २०१९ साली राज्यातील सत्ता हीसुद्धा शिवसेनेमुळे गेली, त्यामुळे काहीही करून शिवसेनेचा प्रभाव कमी करून त्यांची जागा आपण घेण्यासाठी भाजपने यावेळी कंबर कसलेली आहे. त्यासाठीच त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घेतलेले आहे. शिंदेंची शिवसेना हीच खरी, अशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे, पण इतके करूनही जनभावना आपल्याला हायजॅक करता येत नाही, हे भाजपच्या नेत्यांना कळलेले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन मोठ्या विकास प्रकल्पांची उद्घाटने केली असली तरी हे दौरे कशासाठी आहेत, हे लोकांना कळत आहे. जोपर्यंत वारे भाजपच्या बाजूने वाहत नाहीत, तोपर्यंत पालिकेच्या निवडणुका होण्यात भाजपचा काही फायदा नाही, त्यामुळेच मुंबईसह महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत की काय, अशी शंका लोकांना येऊ लागली आहे. आपण कितीही फौजफाटा लावला तरी जनभावना आपल्या बाजूने ओढता येत नाही, हे भाजपला अंधेरी पूर्व आणि कसब्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून दिसून आले आहे. चिंचवडमध्येही बंडखोरी झाली नसती तर तिथेही भाजपला पराभव पत्करावा लागला असता.

दुसर्‍या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे आता शिवसेेनेचे नाव, निवडणूक चिन्ह नाही. त्याचसोबत वरच्या पातळीवरील पदाधिकार्‍यांपासून ते खालच्या पातळीवरील शाखाप्रमुखांपर्यंत सगळ्यांचीच कोंडी झालेली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करताना त्यांना अवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे ते शिंदेंच्या बाजूला जात आहेत. परिणामी पुढील काळात निवडणुका लढवण्यासाठी जे अनुभवी नेते लागतील ते कमी झालेले आहेत, याची उद्धव ठाकरे यांनाही कल्पना आलेली आहे. त्यामुळे पुढील काळात संघटना उभारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आज पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांच्या मनात सहानुभूती आहे, पण त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या त्यांच्या वैचारिक विरोधकांशी आघाडी केली, ही खंतदेखील आहे. सध्या ठाकरे हे विचित्र कोंडीत सापडले आहेत.

जेव्हा महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जातात, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शिरजोरी असते. शिवसेना दूरवर फेकली जाते. त्यामुळे शिवसैनिक नाराज होतात. त्यामुळे महाविकास आघाडीतून एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद जरी मिळाले असले तरी त्यामुळे शिवसेनेचे दीर्घकालीन नुकसान झालेले आहे. कारण जे वर्षानुवर्षाचे आपले वैचारिक विरोधक आहेत, त्यांच्यासोबत कुठल्या आधारावर पुढील काळात निवडणुका लढवायच्या हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगून आपण कसे सर्वधर्मसमभाव मानणारे आहेत, असे सांगण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काही निष्पन्न झाल्याचे दिसले नाही. त्यात पुन्हा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, ते फार काळ कुणाला पाठिंबा देत नाहीत.

नुकतीच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाली. त्यामुळे सध्या काँग्रेस महाविकास आघाडीत असली तरी त्यांना स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत, असे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधूनमधून जाहीर करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते, हे खरे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा कधी कुणाशी युती आणि आघाडी करतील याचा काहीही भरोसा नाही. कारण त्यांनी २०१४ साली राज्यात भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. आताही त्यांनी नागालँडमध्ये भाजपप्रणित सरकारला पाठिंबा दिल्याची माहिती आहे.

भाजप आणि शिवसेनेची २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली होती, त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेचे तोफगोळे डागण्यात आले. मी पुन्हा भाजपशी युती करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणांमधून ठामपणे सांगितले, पण पुढे दोघांनी आपापली गरज ओळखून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा युती केली. हिंदुत्ववादी विचारसरणी हा या दोन्ही पक्षांना जोडणारा समान दुवा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे या दोन्ही पक्षांचे नैसर्गिक मित्र नाहीत. आता धूलिवंदनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी आता आपल्या मनात सूड नाही तर त्यांना माफ करायचे आहे, असे म्हटले.

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणीचा राग आळवला. त्याला शिवसेेनेच्या सुषमा अंधारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर याविषयी खुद्द उद्धव ठाकरे यांना विचारले असता, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. याबद्दल तुम्ही त्यांना स्पष्टपणे विचारा, अशी प्रतिक्रिया दिली. म्हणजे तेही प्रस्तावाची भाषा करत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी, मी फडणवीसांचा आदर करतो, असे म्हणाले होते. त्यावर आम्ही विरोधक असलो तरी शत्रू नाही, असे फडणवीस म्हणाले होते. थोडक्यात काय तर भाजप आणि ठाकरे यांना आता आपल्या मर्यादा आणि एकमेकांची गरज लक्षात येऊ लागली आहे, त्यामुळे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशीच ही दोन्ही बाजूंची अवस्था झालेली आहे, असे दिसते.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -