घरसंपादकीयओपेडजे नितीश कुमारांना जमले ते उद्धव ठाकरेंना का नाही?

जे नितीश कुमारांना जमले ते उद्धव ठाकरेंना का नाही?

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे पडघम देशात जोरदार वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा जोरदारपणे प्रचारात आणत देशातील वातावरण रामभक्तीमय करण्यात निश्चितच मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. त्यामुळे साहजिकच श्रीराम म्हणजे भाजप हे समीकरण हिंदुत्ववादी भारतीयांच्या मनामध्ये ठसवण्यात भाजपच्या राष्ट्रीय स्तरापासून ते अगदी राज्य पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील नेतेमंडळीदेखील कमालीचे यशस्वी झाले आहेत. यामुळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकांची श्रीराममय झालेली हवा लक्षात घेऊन भाजपप्रणित एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आपले स्वतःचे आसन पुनश्च एकदा भक्कम करून घेतले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जे केले ते महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का जमले नाही हा खरेतर महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि अगदी एकसंध शिवसेनेच्या दृष्टीने असलेला कळीचा मुद्दा आहे.

नितीश कुमार यांनी जो अचानक यू टर्न घेतला त्याच्यामागची प्रमुख कारणे जर लक्षात घेतली तर त्यातलं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर देशातील वातावरण मोठ्या झपाट्याने आध्यात्मिक आणि धार्मिकतेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारांकडे स्पष्टपणे सरकलेले आहे. मोदी-शहा यांच्या कार्यकाळातील भाजप हा सत्तेचे सर्व केंद्र स्वतःकडे ठेवणारा भाजप आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. तब्बल नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नितीश कुमार यांना आता राष्ट्रीय राजकारणात आणि त्याहीपेक्षा म्हणजे पंतप्रधानपदामध्ये अधिक स्वारस्य आहे हे ओघानेच आले, मात्र काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे जरी भाजपच्या विरोधी राजकीय पक्षांना एकत्र बांधू इच्छित असते तरीदेखील या छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्षांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या काँग्रेस नेतृत्वाकडून पूर्ण होतील की नाही याबाबत जसे नितीश कुमार साशंक आहेत तसेच इंडिया आघाडीतील अन्य राजकीय पक्षांची नेतेमंडळीदेखील आहेत. जसं की इंडिया आघाडीचे निमंत्रक होण्याची इच्छा नितीश कुमार यांना होती, तथापि काँग्रेसने अद्यापही इंडिया आघाडीच्या निमंत्रकाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की देशातील प्रमुख आणि प्रस्थापित राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसलाच निमंत्रकपदामध्ये स्वारस्य आहे, तथापि ते लोकसभा निवडणुकीपूर्वी जर सहकारी मित्रपक्षांच्या लक्षात आले तर त्यावरून इंडिया आघाडीमध्ये दुफळी माजू शकते.

दुसरे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे अद्यापही इंडिया आघाडीचा कोणताही जाहीरनामा हा आघाडीने प्रसिद्ध केलेला नाही. तिसरा अतिशय महत्त्वाचा जागावाटपाचा विषय आहे. जो तो पक्ष स्वतःला वाटेल त्याप्रमाणे स्वतःच्या जागा स्वतःच जाहीर करीत आहे. काँग्रेस प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे. तो नेमक्या किती, कोणत्या आणि कुठल्या मतदारसंघात निवडणुका लढवणार आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांना नेमके कोणते मतदारसंघ सोडणार, किती मतदारसंघ सोडणार याबाबत कोणतीही एकवाक्यता अद्याप नाही. एकीकडे या मुद्यांवरून इंडिया आघाडीत असलेले संभ्रमाचे आणि काहीसे अविश्वासाचे वातावरण, तर दुसर्‍या बाजूला अयोध्येच्या श्रीराम मंदिरामुळे भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीकडे सरकलेला भारतातील हिंदुत्ववादी मतदार हे लक्षात घेऊनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत आणि अचूक टायमिंग साधत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी जर राजकीय सलोखा केला तर त्यांनी काही गैर केले असे समजण्याचे कारण नाही.

- Advertisement -

नितीश कुमार हे यापूर्वी तब्बल आठ वेळा कधी काँग्रेसच्या मदतीने, कधी भाजपच्या साथीने, तर कधी लालूप्रसाद यांच्या पाठबळावर बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. नितीश कुमार यांचे राजकीय विरोधक त्यांची अशा या संधीसाधू आणि दलबदलू वृत्तीमुळे पलटूराम म्हणून भलेही संभावना करीत असतील, मात्र तरीदेखील हे लक्षात घेतले पाहिजे की हाच पलटूराम जो आज भाजपच्या पाठबळावर बिहारसारख्या एका मोठ्या राज्याचा 9व्यांदा मुख्यमंत्री झाला आहे. तोच यापूर्वी भाजप विरोधकांच्या पाठबळावर राज्याचा मुख्यमंत्री होता. त्यामुळे भाजपला जशी आताच्या घडीला अशा पलटूरामाची गरज आहे तशीच गरज यापूर्वीच्या राजकीय स्थितीमध्ये भाजपच्या विरोधकांना याच पलटूरामची होती. त्यामुळे राजकीय गरजदेखील सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे.

केवळ एकट्या नितीश कुमार यांना दोष देऊन काय होणार? उलट नितीश कुमार यांनी जे धाडस दाखवले, जो मुत्सद्दीपणा दाखवला तो दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व एकसंध शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे का दाखवू शकले नाहीत, असा प्रश्न जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उत्पन्न झाला तर त्याचे उत्तर देण्याची जबाबदारीदेखील त्यांचीच आहे. अर्थात हे लक्षात घेतले पाहिजे की नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये, दोघांच्याही राजकीय संघटनात्मक कार्यपद्धतीमध्ये आणि त्याचबरोबर दोन्ही ठिकाणच्या स्थानिक राजकीय परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ती परिस्थिती जर लक्षात घेतली तर त्यांनी काही घोर पातक केले होते असे समजण्याचे कारण नाही. शेवटी राजकारणामध्ये राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचे नेते हे सत्तेकरिता सर्व राजकारण करीत असतात. त्यामुळे कोणताही राजकीय नेता हा सत्तेमध्ये कशाप्रकारे त्याला आणि त्याच्या पक्षाला अधिकाधिक स्थान मिळेल याकरिता धडपडत असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर युतीमध्ये निवडणूक लढवून मुख्यमंत्रीपदावरून जर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर 2019मध्ये राजकीय आघाडी केली असेल तर ती काय फार मोठी चूक होती असं आताच्या घडीला समजण्याचे कारण नाही.

- Advertisement -

अर्थात याबाबत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना अत्यंत वेगळी असणे हे सहाजिकच आहे. कारण 2019 मध्ये जर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाण्याचा विचार केला नसता तर 2019 ते 2024 असं पाचही वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आले असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी जी राजकीय खेळी केली ती खेळी भाजपपेक्षादेखील देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जिव्हारी लागणे हे सहाजिकच आहे आणि त्यामुळे त्यांनी अडीच वर्षांनंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवताना शिवसेनेतीलच एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे 50 आमदार यांना बरोबर घेऊन जे काही राजकीय नाट्य केले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनादेखील दोष देण्याचे कारण नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्याचा बदला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद घालवून तसेच त्यांचा राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्यासारख्या की जे ठाकरेंच्या तुलनेत दुय्यम आहेत अशा नेत्याच्या हाती सोपवून ठाकरेंनी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचा राजकीय सूड उगवला असे जर फडणवीस यांना वाटत असेल तर त्यात गैर काय. राजकारणामध्ये हे असेच चालत राहायचे.

तथापि हे सर्व घडण्यापूर्वी एक मोठी घडामोड दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका दिल्लीतील भेटीदरम्यान घडली होती. त्याकडे जर उद्धव ठाकरे यांनी अधिक सजगपणे, जागृतपणे आणि मुत्सद्दीपणाने पाहिले असते तर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदही शाबूत राहिले असते आणि आज जी शिवसेनेची दोन शकले झाली आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळ शिवसेना तसेच मूळ शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणीदेखील राहिलेली नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मूळ राजकीय पक्ष आणि मूळ राजकीय पक्षाची धनुष्यबाण निशाणी गेली आहे. हे जे काही एवढे मोठे नुकसान उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे तर केलेच, मात्र त्याचबरोबर मराठी माणसांची तसेच महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची अत्यंत आक्रमक संघटना म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेचे जे काही नुकसान यामुळे झाले ते उद्धव ठाकरे हे निश्चितच वाचवू शकले असते.

नितीश कुमार यांच्याइतकी नाही पण किमान जर थोडीफार तरी राजकीय परिपक्वता उद्धव ठाकरे यांना वेळीच दाखवता आली असती तर राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हा आज उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष असता. तसेच एकनाथ शिंदे यांना 50 आमदार घेऊन गुवाहाटी, गोवा, सूरत येथे जावे लागले नसते आणि मुळात महाराष्ट्रातील मराठी जनतेने ज्या शिवसेनेला स्वतःचा पक्ष मानला त्या शिवसेनेची आजची झालेली दुरवस्था टाळणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात होते. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यापेक्षाही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शिवसैनिकांचे आणि शिवसेनेवर निःस्वार्थ प्रेम करणार्‍या मराठी जनतेचे जे अपरिमित असे नुकसान झाले ते भविष्यकाळात उद्धव ठाकरे कसे भरून काढणार, हा आजघडीचा खरा प्रश्न आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -