Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड शिक्षक जे पेरतात तेच देशाचे भविष्य म्हणून उगवते!

शिक्षक जे पेरतात तेच देशाचे भविष्य म्हणून उगवते!

Subscribe

समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षक महत्वाचा घटक आहे. शिक्षक किती उत्तमतेची आणि उन्नत राष्ट्राची स्वप्न पाहतो त्यावरच देशाचा प्रवास अवलबूंन असतो. शिक्षकांच्या मनात असलेली स्वप्न तो शिक्षणाच्या प्रक्रियेतून पेरत असतो. शिक्षक वर्गात जे काही आज पेरत असतो ते भविष्यात निश्चित उगवणार असते हे लक्षात घ्यायला हवे. आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या या मौलिक भूमिकेला दिलेला हा उजाळा.  

शिक्षक म्हणजे परिवर्तनाच्या पाऊलवाटेचा प्रवास घडविणारा प्रकाशदूत असतो. इतरांच्या आयुष्यासाठी प्रकाशाची पेरणी करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकाने व्यक्तीच्या जीवनात दिशादर्शन करण्याबरोबर राष्ट्राच्या उत्थानासाठी सक्रियता दाखविण्याची अपेक्षा असते. शिक्षकांची समर्पणाची वृत्ती, अखंड ज्ञानाची साधना. राष्ट्राप्रती असलेली दायित्वाची भूमिका यामुळे समाज शिक्षकांना सन्मान देत आला आहे. शिक्षकाला मिळणारा सन्मान हा व्यक्तीचा नाही, तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता, सत्व, तत्व राष्ट्राप्रतीची एकनिष्ठतेच्या असलेल्या पाऊलवाटेचा आहे. त्यामुळे ही समर्पणाची वृत्ती संपुष्टात आली, की आदर, सन्मानदेखील संपतो. खरंतर शिक्षकी पेशाचा प्रवास हा जितका सोपा मानला जातो, तितका तो सोपा नाही, मात्र ते अशक्य आहे, असेही मात्र अजिबात नाही. आजच्या शिक्षक दिनी इतिहासाची पाने आपण चाळत गेलो, तर जगाच्या पाठीवर शिक्षकांनी इतिहास घडविला आहे, हे अनेकदा अधोरेखित झाले आहे.

ज्या भारताची प्रतिमा काळ्या जादूचा देश अशी होती, त्या प्रतिमेला छेद देण्याचे काम अखंड ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या जोरावरती माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केले. जगाच्या पाठीवर त्यांच्या ज्ञानसंपन्नतेमुळे राष्ट्राची प्रतिमा बदलली आहे, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या शिक्षक दिनी त्यांनी निर्मिलेल्या पाऊलवाटेने चालण्याची गरज अधिकाधिक अधोरेखित होऊ लागली आहे. कोणत्याही देशाचे वर्तमान खराब असले तर त्याचा अर्थ भूतकाळातील शिक्षणाची व्यवस्था खराब होती असे म्हटले जाते. शिक्षक केवळ पुस्तकातील अक्षरे शिकवत नाही, तर त्या पलीकडे शब्दांना अर्थ भरण्याचे आणि राष्ट्रासाठी चैतन्य भरण्याचे काम करत असतो. शिक्षक म्हणजे उद्यासाठीचा प्रकाश पेरणारा प्रकाशयात्री असतो.

- Advertisement -

जगाच्या पाठीवर प्रचंड मोठ्या लोकशाही व्यवस्थेची वाट चालणार्‍या देशात एक शिक्षक राष्ट्रपती होतो हे शिक्षकांसाठी आभूषण आहे. अर्थात हा शिक्षकांच्या ज्ञानाचा सन्मान होता. शिक्षक होणे म्हणजे केवळ आपल्याकडे पदवी आणि पात्रता आहे म्हणून नोकरी करणे इतकाच त्याचा अर्थ नाही. त्यापलीकडे जाऊन एखादी व्यक्ती जेव्हा शिक्षणाचा विचार करू लागते, त्यात दायित्व आणि समर्पणाचा भाव असतो, तेव्हा खरा शिक्षक असल्याचा प्रवास सुरू होतो. पदवी धारण केल्यानंतर फार तर नोकरी म्हणून शिक्षक होता येईल. तो पाठ्यपुस्तकातील माहिती शिकवेल, मात्र तो खर्‍या शिक्षकांचा प्रवास नाही. शिकविण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकाच्या माहितीवर अवंलबून असणे म्हणजे  शिकविणे नाही.

खरा शिक्षक हा ज्ञानाचा पूजक असतो. ज्ञानाची साधना केल्याशिवाय या ज्ञानरस्त्याचा महामार्ग होत नाही. समाज व राष्ट्राची अधोगती होते तेव्हा राज्यकर्त्यांपेक्षा शिक्षणाची व्यवस्था अधिक जबाबदार असते. त्यामुळे शिक्षणाचा मार्ग हा एका उंचीचा मार्ग असायला हवा. त्यामुळे या पेशात व्यक्ती स्वतःला झोकून देत ज्ञानाच्या महासागरात किती डुंबत राहतो याला महत्व आहे. जी माणसं या पेशात केवळ नोकरी म्हणून विचार न करता समाज व राष्ट्रनिर्मितीचा विचार करतात ती नेहमीच आदराला पात्र होतात. कधी एकेकाळी शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या माणसांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले होते.

- Advertisement -

स्वदेशी शिक्षणाचा नारा टिळकांनी दिल्यानंतर अनेकांनी त्या मार्गाने जाण्यासाठीची पाऊलवाट निवडली होती. शिक्षण हेच परिवर्तनाचे एकमेव साधन असल्याने समाजाचे उत्थान घडविण्यासाठी समर्पणाने काम करणारी माणसंही या व्यवस्थेने अनुभवली आहेत. साने गुरुजींसारखी संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या अंत:करणात राष्ट्रप्रेम रूजविण्यासाठीचा प्रवास, धडपड  अनेकांनी अनुभवली आहे. आपणावर समाजाला शहाणपणाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जबाबदारी आहे याचे त्यांना सतत भान होते. त्यामुळे गरज पडली तर वेळप्रसंगी राष्ट्रासाठी शिक्षकांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्यानंतर विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा याकरिता साने गुरुजींनी  लढा उभारला होता. त्या लढ्याचे नेतृत्व साने गुरुजींनी केले होते. समाजात जे जे वाईट असते त्यावर मात करत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षकांनी दिशादर्शन करायचे असते.

कोणताही शिक्षक हा केवळ शिक्षक नाही तर खर्‍या अर्थाने समाज शिक्षक असतो. कारण त्यांच्यावरती समाजाचा विश्वास होता. शिक्षक नेहमी सद्मार्गाचा प्रवास घडवितात आणि त्यांची वाट नेहमीच नैतिकतेच्या उंचीची असते ही धारणा समाजमनात आजही कायम आहे. शिक्षकाने सतत विवेकाची वाट चालण्याची गरज असते. तो त्या पलीकडे जाऊन समाजात शहाणपण पेरण्याचे काम करत असतो. त्यामुळे एखाद्या शिक्षकांकडून झालेली थोडीशी चूकदेखील समाजाला स्वीकारताना जड जाते. समाजाला त्या अपेक्षा नाहीत. इतर कोणी चुका केल्या, तर त्या स्वीकारताना जड जात नाही. याचे कारण शिक्षक हा निर्माता आहे. त्याने आदर्शाच्या पाऊलवाटा निर्माण करायच्या असतात. आज तो समाजाचा एक घटक आहे हे मान्य केले तरी त्याने इतरांच्याच वाटांनी चालण्याची अपेक्षा नाही. त्याची वाट वेगळी असायला हवी अशी अपेक्षा आहे.

वर्तमानात शिक्षकांनी दिशादर्शक राहण्याची अधिक गरज व्यक्त होत आहे. देशाची प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी पेरलेल्या विचाराची धारा अधिक गतिमान झाली, तर चित्र बदलेल. वर्तमान अंधारात काही शोधू पाहते आहे अशावेळी शिक्षक जे पेरतील त्या ज्ञानाच्या प्रकाशात काही सापडले, तर प्रगतीची उंच भरारी शक्य आहे. शिक्षक वर्गाच्या चार भिंतीच्या आत भारत घडवत असतो. तेच बालक उद्याचे नागरिक असतात. त्यामुळे त्यांच्या मनात सदृढ लोकशाहीची आणि जबाबदार नागरिक म्हणून पालन करावयाची कर्तव्य यांची विचार बीजे पेरली गेली, तर भविष्य अधिक प्रकाशमान होईल. आजच्या शिक्षक दिनी समाज सन्मान, आदर व्यक्त करील.

तो पुढील पिढ्यांसाठी कायम राहावा यासाठी शिक्षकांनी एका ध्येयाने चालत राहण्याची गरज आहे. परिवर्तनासाठी निश्चयाची गाठ मारत शपथ घेऊन प्रवास सुरू ठेवला, तर शिक्षक दिन साजरा होईल. शेवटी शिक्षक काय पेरतात त्यावर राष्ट्राचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तमतेचा ध्यास घेऊन पेरते होण्यासाठी शिक्षक दिन कामी यावा अशी समाजाची अपेक्षा आहे. आपल्यातील शक्तीचा शोध घेऊन चालणे सुरू ठेवले, तर परिवर्तन फारसे दूर नाही हे निश्चित आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रगत राष्ट्रांची भरारी ही तेथील शिक्षणातून केलेल्या पेरणीचे फलित आहे. शिक्षक स्वप्न पाहतात आणि त्या दिशेने प्रवास सुरू ठेवतात म्हणून उंच भरारी शक्य आहे.

त्यांनी विचाराची मशाल हाती घेऊन समाजाचे उत्थान घडविण्याचा प्रयत्न केला, तर अवघे जग उजळून निघेल यात शंका नाही. शाळा-कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे जेव्हा मुले नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपले करियर सुरू करतात, तेव्हा कितीही वर्षे झाली तरी त्यांना आपल्या शिक्षकांचा विसर पडत नाही. त्यांनी आपल्याला जे शिकवले त्यामुळे आपण इथे आहोत, याची जाणीव त्यांना असते. जेव्हा मुले जीवनात यशस्वी होतात, देशासाठी मोठे योगदान देतात, तेव्हा हा आपला विद्यार्थी आहे, या जाणिवेने शिक्षक मनोमन सुखावतात, पण एखादा विद्यार्थी गैरमार्गाला गेला, तर त्याचे त्या शिक्षकांना दु:खही होते.

समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षक महत्वाचा घटक आहे. शिक्षक किती उत्तमतेची आणि उन्नत राष्ट्राची स्वप्न पाहतो त्यावरच देशाचा प्रवास अवलबूंन असतो. शिक्षकांच्या मनात असलेली स्वप्न तो शिक्षणाच्या प्रक्रियेतून पेरत असतो. शिक्षक वर्गात जे काही आज पेरत असतो ते भविष्यात निश्चित उगवणार असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राष्ट्र निर्माण करण्याचे काम समाजातून घडत असते आणि समाज शिक्षणाच्या प्रक्रियेतून घडत असतो. तो समाज आपल्याला कोणत्या विचाराचा हवा आहे ते शिक्षकाच्या पेरणीवर अवंलबून असते. शिक्षक हा कोणत्याही देशाच्या भविष्याचा कणा असतो.

त्याची पेरणी म्हणजे राष्ट्रनिर्मितीची वाट आहे. शिक्षक हा नोकर नाही…त्याचे मोल सरकारी कर्मचारी म्हणून नाही, तर त्या पलीकडे त्याच्या हातात आणि पेरणीत बरेच काही असते हे लक्षात घ्यायला हवे. आता इतिहासातील शिक्षकांच्या पाऊलवाटेचा महामार्ग व्हायला हवा होता..आता त्या वाटा अधिक अरुंद होताना दिसत आहेत. त्याची जबाबदारी केवळ शिक्षकांवर टाकून आपल्याला मोकळे होता येणार नाही. समाजानेदेखील काही जबाबदारी स्वीकारायला हवी. समाजाने त्यासाठीच्या पाऊलवाटा निर्माण केल्या नाही, तर शिक्षकांना त्यासाठी कष्टत राहावे लागेल.. त्यामुळे समाज व शिक्षक सोबतीने आले, तर अधिक वेगाने बदल घडवले जाऊ शकतात. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवत पेरते होण्याची नितांत गरज आहे.

 

 

- Advertisment -