नशिबाचं ‘बॅड लक’ अन् फॉर्मची ‘विराट’ कहाणी !

कुठल्याही खेळात कौशल्य, जिद्द, मेहनत अन् आर्थिक कुवतीपेक्षाही महत्त्वाचे ठरते ते नशीब. कारण नशिबाने साथ दिली तर रात्रीतून स्टार, पण नशिबात ‘बॅड पॅच’ आला तर मोठ्यात मोठा खेळाडूही गुडघे टेकतो. नशीब आणि क्रिकेटचा विचार केला, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव चटकन डोळ्यासमोर येते. त्याच्यासह सुनील गावस्कर, युवराज सिंग, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली यांची नावे आहे. ‘बॅड पॅच’चा सामना यांना करावा लागलाच होता. मुळात प्रत्येक खेळाडूच्या नशिबात हा बॅड पॅच येतोच असंही म्हटलं जातं. पण, सध्या जगात अव्वल स्थानी राहिलेल्या विराट कोहलीच्या ‘विराट’ बॅड पॅचची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळेच या भारतीय रन मशिनच्या कारकिर्दीचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

virat kohli

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली काही काळापासून मोठ्या बॅड पॅचला सामोरा जातोय. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीदेखील राहिलेल्या आणि रन मशीन म्हणून जगात ओळखल्या जाणार्‍या कोहलीच्या बॅटने गेल्या अडीच वर्षापासून शतकच ठोकलेले नाही, हे ऐकून पटकन विश्वास बसणार नाही. नुकत्याच सुरू असलेल्या इंग्लंड दौर्‍यातही कोहली अपयशाचा धनी ठरतोय. कसोटी सोडाच, पण टी-२० मालिकेतही त्याला नशिबाने साथ दिलेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येतंय. खराब फॉर्मला सामोरे जाताना कोहलीला भारतातूनच नव्हे तर जगभरातून टीकेचा भडीमार सहन करावा लागतोय. माजी खेळाडू, प्रशिक्षक तसेच जगभरातील चाहत्यांकडून सल्ल्यांचा भडीमार त्याच्यावर केला जातोय. पण एक खेळाडू बॅड पॅचमधून जात असताना त्याची मनस्थिती त्याच्याशिवाय कुणी ओळखू शकत नाही, हे लक्षात ठेवायले हवे.

परंतु, याउलट कोहलीला आज कुणी विश्रांतीचा सल्ला देत आहे, तर कुणी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा पर्याय सूचवत आहेत. तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसारखे काहीजण विराटला पाठिंबा दर्शवत तो लवकरच फॉर्मात परतण्याचा विश्वास दर्शवत आहेत. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर कोहलीच्या विराट कामगिरीवर नजर फिरवल्यास त्याची गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमधली गरज स्पष्टपणे अधोरेखित होते. किंबहुना, त्याने रन मशिन आणि अ‍ॅटिट्यूड बॉय म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करताना अत्यंत वेगाने धावा जमवल्या आहेत. अनेक विक्रमही त्याच्या नावे आहेत. एवढेच नव्हे, तर खडतर परिस्थितीत संघाला सावरण्याचा त्याचा अंदाज टीम इंडियामध्येच नाही तर आयपीएलमध्येही अनेकांना भावून गेला आहे. याच कारणामुळे अनेकदा प्ले ऑफपर्यंतही मजल न मारू शकणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू संघाची फॅन फॉलोविंग प्रचंड असल्याचं आजवर दिसून येत आहे.

१९८८ साली ५ नोव्हेंबरला नवी दिल्लीत जन्म घेतलेल्या विराट कोहलीने वरच्या फळीतील आक्रमक फलंदाज म्हणून आजवर कारकिर्द रंगवली. क्रिमीनल लॉयर असलेल्या प्रेम कोहली यांचा मुलगा ‘चिकू’ अर्थात विराट कोहलीने वयाच्या नवव्या वर्षी वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीत क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतानाच कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून सुरुवातीला क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. यानंतर सुमीत डोगरा अकॅडमीत तो पहिला सामना खेळला. क्रिकेटसाठी त्याची शाळाही बदलली गेली आणि सुरुवातीला मिरा बाग आणि त्यानंतर गुरगावला तो कुटुंबियांसह स्थलांतरित झाला. १८ डिसेंबर २००६ ला त्याच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, कुठल्याही परिस्थितीत क्रिकेटमध्ये करिअर करण्याची जिद्द मनात बाळगून कोहलीने आपले लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. ऑक्टोबर २००२ मध्ये दिल्लीच्या १५ वर्षाखालील संघात पॉली उमरीगर ट्रॉफीमध्ये कोहलीने डोमेस्टिक क्रिकेटचा पहिला सामना खेळला.

यानंतर २००३ आणि ०४ मध्ये तो या संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेला. त्याच्या नेतृत्वाखालील कामगिरी पाहता त्याला विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षाखालील संघात स्थान मिळाले. ही निवड सार्थकी लावत कोहलीमुळे दिल्लीच्या संघाने २००४-०५ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफी जिंकली. यात कोहलीने ७ सामन्यांत ७५७ धावा करताना दोन शतके लगावत सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत पहिले स्थान मिळवले. फेब्रुवारी २००६ मध्ये त्याला अ श्रेणीत दिल्ली संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तर फर्स्ट क्लास क्रिकेटचा पहिला सामना कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी तामिळनाडू विरुद्ध खेळला. पहिल्या सामन्यात त्याला दहाच धावा करता आल्या. परंतु, वडिलांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी कोहलीने कर्नाटकविरुद्ध सामना खेळण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिली. दु:खाच्या छायेतही त्याने ९० धावांची विजयी खेळी करत ती आपल्या वडिलांना समर्पित केली. या मालिकेत ६ सामन्यांत त्यांना २५७ धावा करत अनेकांचे लक्ष वेधले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २००८ साली १९ वर्षाखालील संघात श्रीलंकेविरोधात खेळण्याची संधी कोहलीला मिळाली. यानंतर पाकिस्तानात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याला संधी मिळाली. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग ही जगपरिचित सलामीची जोडी अचानक दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यावर कोेहलीला अनपेक्षितपणे सलामीला फलंदाजी करावी लागली. यात त्याने कारकिर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना ९ धावा केल्या. मात्र, चौथ्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करत स्वत:ची धावांची भूक किती विशाल आहे, हे दाखवून दिले. भारताने श्रीलंकेविरुद्धची ही मालिका जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढे ढकलली गेल्यावर कोहलीला जखमी शिखर धवनच्या जागी पुन्हा ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सराव सामना खेळण्याची संधी मिळाली. यात कोहलीला एकाच डावात फलंदाजी मिळाली त्यात त्याने ४९ धावांची खेळी केली. दरम्यान, सप्टेंबर २००८ मध्ये कैद-ए-आझम ट्रॉफीच्या विजेत्या पाकिस्तानच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून खेळताना कोहलीने ५२ आणि १९७ धावांची खेळी करत सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान मिळवत लक्ष वेधले.

यानंतर कोहलीने इंडियन बोर्ड प्रेसिडंटस इलेव्हन संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्धही लक्ष्यवेधी कामगिरी केली. श्रीलंकेतील तिरंगी मालिका आणि त्यानंतर २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत कोहलीने जखमी युवराज सिंगच्या अनुपस्थितीत धुरा सांभाळली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या साखळी सामन्यात कोहलीने ७९ धावांची विजयी खेळी करत सामनावीरचा किताब पटकावला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुरुवातीला कोहलीला भारतीय संघात राखीव फलंदाज म्हणून घेतले जात होते. मात्र त्यात त्याची सातत्यपूर्ण खेळी पाहता अखेर डिसेंबर २००९ मध्ये भारतात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्याला प्रमुख फलंदाज म्हणून घेतले गेले. यानंतर कोहलीने आपला धडाका सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय करिअरच्या उत्तुंग शिखराकडे वाटचाल सुरू केली. चौथ्याच सामन्यात कोहलीने ११४ धावांत १०७ धावांची खेळी साकारत पहिलेवहिले शतक ठोकले. कोहलीचे वैशिष्ठ्य म्हणजे २२ व्या वर्षात पदार्पण करण्यापूर्वी दोन आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा तो तेंडुलकर आणि रैनानंतर तिसरा फलंदाज ठरला.

२०१० मध्ये रैनाकडे कर्णधारपदाची धुरा असताना कोहलीला उपकर्णधार म्हणून पहिल्यांदाच संधी मिळाली. तेव्हा कोहलीने ४२ च्या सरासरीने दोन शतकांच्या मदतीने १६८ धावा करत सर्वांचे लक्ष वेधले. याच दरम्यान एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद एक हजार धावा कोहलीने पूर्ण केल्या. टी-२० फॉरमॅटमध्ये कोहलीने झिम्बॉबेविरुद्ध पदार्पण केले. त्यावेळी कोहलीचा फॉर्म हरवल्याचे दिसून आले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याला २६ धावाच करता आल्या. त्यानंतर २०१० मध्ये आशिया कपमध्ये त्याने १६ च्या सरासरीने केवळ ६७ धावा केल्या. यानंतर श्रीलंका आणि न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकांतही त्याला सातत्याने अपयश आले. या खराब फॉर्ममध्ये असतानाही कोहलीला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आले. मात्र, कोहलीने आपला फॉर्म परत आणत या मालिकेत तिसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यानंतर भारतातच झालेल्या न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने चौथे शतक ठोकले आणि भारतीय संघात तिसर्‍या क्रमांकावरील फलंदाज म्हणून आपले स्थान अढळ केले.

यानंतर कोहलीचा फॉर्म तुफान राहिला आणि त्याने सातत्य राखत धावांची भूक कायम राखली. कर्णधार म्हणून कोहलीला जखमी महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची संधी मिळाली. ही तिरंगी मालिका वेस्ट इंडिजमध्ये खेळली गेली. यावेळी कोहलीने कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले शतक ठोकले. ऑस्टेलियाविरुद्ध कोहलीने जयपूरला केलेली ५२ चेंडूंतील जलद शतकी खेळी सर्वांच्याच स्मरणात राहिली. यावेळी त्याने रोहित शर्मासह दुसर्‍या विकेटसाठी १८७ धावांची भागिदारी करत आक्रमक शैलीचे दर्शन घडवले होते. २०१४ आयसीसी टी-२० विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीला कर्णधार, तर कोहलीला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेव्हाही कोहलीने सातत्याने धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. २०१४ मध्ये कोहलीला धोनीच्या अनुपस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यांच्याच देशात. यात कोहलीने कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना शतकी खेळी करत विक्रम रचला. मेलबॉर्न बॉक्सिंग टेस्टमध्येही त्याने वैयक्तिक उच्च धावसंख्या करताना १६९ धावा केल्या.

कर्णधार म्हणून कोहलीचे करिअर पाहिल्यास त्याने ६८ कसोटी सामन्यांत ४० विजय आणि ११ अनिर्णित असे योगदान दिले आहे. एकदिवसीय नेतृत्वात कोहलीने ९५ सामन्यांत ६५ विजय मिळवले आहेत. तर टी-२० मध्ये ५० पैकी ३० सामने त्याने कर्णधार म्हणून जिंकले आहेत. २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ मध्ये विश्वचषक, २०२१ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल, २०२१ आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकप याशिवाय भरतात आणि विदेशात झालेल्या अनेक मालिकांमध्ये कोहलीने कर्णधार म्हणून सातत्याने चांगली कामगिरी केली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने टी-२० चे कर्णधारपद सोडले. डिसेंबर २०२१ मध्ये कोहलीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडले. १५ जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कोहलीने कसोटी क्रिकेट कर्णधारपदही सोडले.

आयपीएल करिअरमध्येही कोहली नेहमी उजवाच राहिला आहे. त्याने आजवर आरसीबीकडून खेळताना २२३ सामन्यांत ६ हजार ६२४ धावा कुटत ५ शतक आणि ४४ अर्धशतके लगावली आहेत. २०२२ मध्ये आरसीबीची कामगिरी सर्वात उत्कृष्ट ठरली. आयपीएलमध्ये सातत्याने कोहलीने प्रेक्षकांची मने जिंकत विजयी योगदान दिले आहे. कोहलीच्या एकूण कामगिरीवर नजर फिरवल्यास १०२ कसोटी सामन्यांत त्याने जवळपास ५० च्या सरासरीने ८ हजार ७४ धावा केल्या आहेत. २६० एकदिवसीय सामन्यांत कोहलीने ५८.०७ च्या सरासरीने १२ हजार ३११ धावा, तर ९९ टी-२० सामन्यांत ३३०८ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही कोहलीने १३४ सामन्यांत १० हजार ३२३ धावा कुटल्या. कसोटीत २७ शतके, २८ अर्धशतके, एकदिवसीय सामन्यांत ४३ शतके, ६४ अर्धशतके, टी-२० मध्ये ३० अर्धशतके त्याने लगावली आहेत. मुख्य म्हणजे, कसोटीत नाबाद २५४ ही त्याची आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांत त्याने १८३ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. ही सगळी फलंदाजीतील आकडेवारी आणि कर्णधार म्हणून मिळालेले यश बाजूला ठेवल्यास कोहलीने क्षेत्ररक्षणात केलेली कामगिरी संपूर्ण जगभरात लक्ष्यवेधी राहिली आहे. आजवर ४१६ झेल घेत त्याने क्षेत्ररक्षणात आपण सातत्याने फिट, चपळ आणि आक्रमक असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे.

हा सर्व उहापोह एवढ्यासाठीच की, सातत्याने भारतासाठी मोठ्या आणि विजयी खेळी साकारणार्‍या कोहलीला गेल्या वर्षभरापासून खराब फॉर्मशी झुंजावे लागत असताना त्याच्या चांगल्या कामगिरीची चर्चा होणे गरजेचे वाटते. याची पुष्टी मुंबईकर रोहित शर्मा आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही दिली आहे. जगभरातील दिग्गज खेळाडूही कोहलीच्या दमदार फॉर्मची लवकरच वापसी होण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे भारताच्या ‘नंबर वन’ वाटचालीसाठी कोहलीसारख्या ‘विराट’ खेळाडूची फॉर्मात परतण्याची आशा करणे कदापि चुकीचे ठरणार नाही.